विश्वास

© धनश्री दाबके
“आत्या, नको काळजी करु सारखी. होईल आई बरी. स्वामी आहेत आपल्या पाठीशी. ते नक्की आपल्याला ह्यातून बाहेर काढतील.” पार्थ अगदी मोठ्या माणसासारखा अवंतीला समजवत होता.
“हो रे, स्वामी आहेतच पाठीशी आपल्या पण तरी काळजी करायची सवय सुटत नाही ना. बरं.. जेवलात का तुम्ही? आणि दादा काय करतोय?” अवंतीने विचारले.
“हो, जेवलो आत्ताच.. आज मी गवारीची भाजी करायला शिकलो.. बरी झाली होती.. बाबा दुसऱ्या फोनवर आहेत..सांगतो त्यांना. आणि संध्याकाळी डॉक्टरांची राऊंड झाली की तुला आजचे अपडेट्स देतो. Hopefully आज सगळे पॅरॅमीटर स्टेबल असतील आईचे..dont worry.”

“Ok…take care..बोलू परत संध्याकाळी” म्हणून अवंतीने फोन ठेवला आणि इतक्या वेळ धरुन ठेवलेल्या अश्रूंनी आपली वाट धरलीच. कितीही ठरवलं रडायचं नाही तरी अवंतीला ते जमतच नव्हतं.
१५ वर्षांचा, नुकतेच मिसरूड फुटलेला पार्थ किती समजूतदारपणे बोलत होता. आत्ता आत्ता पर्यंत लहान वाटणारा, आत्या आत्या करत मागेपुढे फिरणारा पार्थ या आठ पंधरा दिवसांत अचानक मोठा झालाय. दिवसरात्र मान मोडून दहावीचा अभ्यास करणारा पार्थ आता घरातली कामं करतोय. काय दिवस दाखवतो आहेस रे हे देवा ! किती धीर धरायचा आम्ही? आधी माझ्या आईला घेऊन गेलास आणि आता….

अवंती विचारांच्या लाटांमधे हरवली असतांनाच आशिष ऑफिसचा कॉल संपवून बेडरुममधून बाहेर आला. तिच्याजवळ बसत म्हणाला “अगं रडू नको अवंती. होईल सगळं ठीक. काय म्हणाला दादा?”
“काय म्हणणार? रोजचेच प्रश्न आणि रोजचीच उत्तरं.. पार्थशी बोलले आत्ता. मी त्याला समजवायचं तर तोच मला समजवत होता. एखाद्या मोठ्या माणसासारखा. सगळं ठीक होणारच रे. पण वाईट ह्याचं वाटतं की आपण इतक्या लांबून काळजीशिवाय काहीच करु शकत नाही. आपण तिथे असतो तर मी निदान घरची आघाडी तरी सांभाळली असती.”

“तुझी मनस्थिती समजतेय मला अवंती. पण कितीही वाटलं तरी आत्ता आपण नाही ना जाऊ शकत तिकडे? मग किती त्रास करून घेशील स्वतःला? या आलेल्या परिस्थितीला धीराने तोंड देण्या पलीकडे काही पर्यायच नाहीये आपल्याकडे. तेव्हा आता जास्त विचार करत बसू नकोस आणि रडू तर अजिबात नको. आपलं येणारं बाळ काय म्हणत असेल माहितीये? ते म्हणत असेल, किती रडते आपली आई ! तेही रडकं होईल हा, तू अशीच रडत राहीलीस तर. तेव्हा डोळे पूस आणि शांत हो. मी मस्त कॉफी आणतो दोघांना. मग परत पुढच्या कॉलवर जायचय मला. चल cheer up”

आशिष आत गेला आणि अवंती आपल्या चार महिन्यांच्या पोटावर हात ठेवून परत विचारांमध्ये गुंतली.
दादाचं लग्न झालं आणि अवंतीला वहिनीच्या रुपात जीवाला जीव लावणारी, समजून घेणारी एक छान मैत्रीण मिळाली. अवंतीच्या घरात मुळातच श्रद्धेचे आणि देवाधर्मात रमणारे वातावरण. आई, बाबा दोघही स्वामी भक्त.
वहिनीच्या माहेरीही थोड्याफार फरकाने तसेच असल्याने लग्नानंतर वहिनीही स्वामींच्या भक्तीत रमली आणि पार्थवरही तसेच संस्कार झाले.

अवंतीचे मित्रमैत्रिणी, तिची कॉलेजमधली धमाल, नोकरीत रुळणं, लग्नासाठी आशिषला पसंत करणं, साखरपुडा, लग्न, सासरी रुळणं, संसारात रमणं सगळं सगळं वहिनीच्या साक्षीने घडलेलं. दोघींमध्ये सगळा दिल से दिल तक मामला. समजुतदारपणाचे बंध. मधल्या काळात अवंतीच्या आईच्या अचानक जाण्याने झालेल्या आघाताच्या वेळी तर वहिनीने अवंतीला आईच्या मायेने जपलेलं.
लग्नानंतर तीन चार वर्ष होऊनही अवंतीला बाळाची चाहूल लागेना. मग अवंती आणि आशिषच्या गायनॅककडे ट्रीटमेंटसाठी वाऱ्या सुरु झाल्या. स्वामींवर खूप श्रद्धा असल्याने स्वामींनाही गाऱ्हाणे घालून झाले. नवस-सायास, मठात नित्याचे दर्शन, पोथी पारायणं आणि माणसाच्या रुपातल्या देवाकडची ट्रीटमेंट. सगळ्या बाजूंनी प्रयत्न सुरु होते. पण कशाचाच उपयोग होत नव्हता. मातृत्वाच्या सुखाची आस लागली होती आणि ते मात्र प्रत्येक महिन्याला तिला हुलकावणी देत होतं.

अशीच अजून चार वर्ष गेली आणि कुठूनतरी अचानक या कोव्हीड नावाच्या शत्रूचा उगम झाला. चीनमध्ये कुठलातरी भयंकर व्हायरस पसरलाय असं म्हणता म्हणता तो व्हायरस युरोप, अमेरिकेची वारी करत भारतात पोहोचला.
लॉकडाऊन मधे नोकऱ्या टिकवायची धडपड सुरु झाली. कंपन्यांनी एंप्लॉयीजची कपात सुरु केली. पण त्याच दरम्यान आशिषला मात्र on site जाण्याची संधी मिळायची चिन्हं दिसायला लागली. हो नाही करत करत शेवटी त्याने ती संधी घेतली आणि कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर आशिष आणि अवंती साता समुद्रा पलीकडे येऊन पोचले सुद्धा.

नवीन देशातल्या आयुष्याची घडी बसवण्यात दोनेक वर्ष सरली आणि नियतीने दोघांना त्यांना अनेक वर्ष हवा असलेला सुखद धक्का दिला. इतकी वर्ष ज्या सुखाची दोघं चातकासारखी वाट पाहात होते ते सुख दैवाने ध्यानीमनीही नसतांना अलगद त्यांच्या झोळीत टाकले.
अवंती आणि आशिष आनंदाने हरखून गेले. डॉक्टरांनी अवंतीला प्रवासासाठी मनाई केली आणि दोघांनी इथे परदेशातच डीलेव्हरी करण्याचा निर्णय घेतला. आशिष डोळ्यात तेल घालून अवंतीची काळजी घेऊ लागला. इकडे भारतातही दोन्ही घरांत आनंदीआनंद पसरला. बघता बघता अवंतीला पाचवा महिना लागलाही आणि अचानक दादाच्या घरी उलथापालथ झाली.

साध्या सर्दी खोकल्याने आजारी पडलेली वहिनी औषधांनी ॲसिडीटी खूप वाढलीये आणि जेवण जात नाहीये अशी तक्रार करू लागली. सुरवातीला साधीशी वाटलेली ही ॲसिडीटी नंतर मात्र एकापाठोपाठ एक कॉंप्लिकेशन्स निर्माण करत गेली आणि वहिनी ICU मधे ॲडमिट झाली. त्यात तिची ब्लड शुगर खूप वाढली आणि परिस्थिती अजूनच गंभीर झाली.
आधी दादाने हे सगळे अवंतीपर्यंत येऊ नये ह्याची काळजी घेतली. पण जेव्हा तब्येत जास्तच क्रिटीकल झाली तेव्हा मात्र त्याने अवंती आणि आशिषला सगळं कळवलं.
ते कळल्यापासून अवंतीच्या जीवात जीव नव्हता. स्वामींना साकडे घालून झाले होते. सकाळ संध्याकाळ नामस्मरण सुरु होते. रोज दादाकडे फोन करुन चौकशी करणे सुरु होते.

दादा आणि पार्थ हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊन होते. दिवसातून एकदा डॉक्टरांकडून राऊंडच्या वेळेला वाहिनीच्या तब्येतीचा रिपोर्ट मिळायचा. तो ऐकायचा, ते मगतील ती औषधं आणून द्यायची आणि रूमच्या बाहेर बसून राहायचं. असं दोघांचं रूटीन सुरू होतं.
आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवंतीच्या आयुष्यात आलेल्या मातुत्वाच्या आनंदावर दु:खाचं, चिंतेचं सावट आलं होतं.
आहे मनोहर तरी गमते उदास अशी अवस्था होती. स्वामी आपल्याला याही परिक्षेतून तरुन जायची शक्ती देतील आणि वहिनी सुखरुप घरी येईल असा विश्वास होता मनात. पण तरीही चिंता छळत होतीच. सतत वहिनीची विविध रुपं डोळ्यांसमोर येत होती.

संपूर्ण सृष्टी उजळून टाकणाऱ्या त्या तेजपुंज सूर्यालाही जिथे मावळावं लागतं तिथे काहीच कायमस्वरूपी नसतं.
उंच उंच जाणारी लाट काही क्षणांतच गर्तेत जाते फक्त जातांना सोबत खूप काही घेऊन जाते. मनातल्या लाटाही तशाच. श्रद्धेच्या, सकारात्मकतेच्या, विश्वासाच्या जोरावर कधी आपल्याला धैर्याच्या उंचीवर नेऊन बसवतात तर कधी क्षणात निराशेच्या, हतबलतेच्या गर्तेत ओढून नेतात.
आशिष कॉफी घेऊन आला तरी अवंती ह्या सगळ्या विचारांतच अडकली होती. त्याने आणलेली गरम कॉफी घेतल्यावर तिला जरा बरं वाटलं.

कसंबसं तिने स्वतःला निराशेतुन बाहेर काढलं आणि घरातली कामं आवरायला घेतली. पण तरी तिचं कशात लक्षच लागत नव्हतं.
थोड्यावेळाने दादाचा फोन आला. नेहमीपेक्षा जरा लवकर फोन आल्याने अवंतीने काळजीतच फोन उचलला. पण नुसतं हॅलो ऐकूनच त्याच्या आवजातला उत्साह तिला जाणवला. आता तब्येत सुधारते आहे आणि लवकरच वहिनीला ICU मधून बाहेर आणतील हे ऐकल्यावर अवंतीच्या जीवात जीव आला.
‘आता धोका टळलाय तेव्हा तू अजिबात काळजी करु नको. All will be good now.’ असं म्हणून दादाने फोन ठेवला.

अवंतीने आनंदाने आशिषला हे सांगायला हाक मारली आणि तेवढ्यात तिला पोटातल्या बाळाची पहिली हालचाल जाणवली. पोटात एकदम गुदगुल्या झाल्या आणि बाळाच्या त्या पहिल्याच जाणीवेच्या अद्भूत आनंदाने अवंती नखशिखांत मोहरली. आनंदाने पोटावरुन हात फिरवत ती आशिषच्या मिठीत शिरली.
बाळाने जणू आईची मनस्थिती ओळखून, तिला स्वतःच्या अस्तित्वाची आणि तिच्या आयुष्यात येऊ घातलेल्या सोनेरी क्षणांची चाहूल दिली होती.
स्वामींवर मनापासून असलेला विश्वास आज अजूनच दुणावला आणि ‘जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय” म्हणत अवंती स्वामींच्या फोटोसमोर साखर ठेवायला गेली.
********
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!