बजाव ढोल…

© गोविंद कुलकर्णी
गोष्ट तशी जुनी आहे. माझ्या लहानपणी घडलेली. आमच्या गावात तेव्हा पोट भरायला येणारे अनेक कलाकार येत. त्यात सर्कशीतल्या सारखे खेळ करून दाखवणारे डोंबारी येत. ग्रामीण भागातून ते वेगवेगळे कलाप्रकार करून पोट भरीत असत. एकेका गावात चार आठ दिवस मुक्काम पडे. तिथंच पालात राहत आणि तीन दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जेवत आणि तिथंच झोपत.
चारपाच दिवसात मिळून तीनचार खेळ झाले की मग ते विंचवाचं बिर्हाड पाठीवर घेऊन पुढच्या गावाला जात.
एके वर्षी असेच एका डोंबार्याचा खेळ करणारे लोक आले. त्यांच्यात अंगकाठी बारीक आणि लवचिक असल्याने कोलांट उड्या मारणारे अगदी दहा बारा फूटापेक्षाही अधिक उंच उडी मारणारी मुलं होती.

त्यातील एक पोरगा खूपच चपळ होता. तो इतकी उंच उडी मारायचा की बघणारे आश्चर्यचकित होत. या पोराने खूप गल्ला जमवून दिला. एका ओळीने सात आठ माणसे उभी करून त्या सर्वांच्या वरून उडी मारून दाखवणं, काठीचा आधार घेऊन उंचच उंच उडी मारणं यात तो खूप तरबेज होता. आमच्या गावची अत्रंगी जोडगोळी म्हणजे लक्ष्या आणि पक्या. या दोघांनी काय काय केलं नाही?
चालता चालता कुणाच्याही खुराड्यातली कोंबडी पळवून पार्टी करणे, शेतात उघड्यावर पडलेल्या वायर्स, मोटारी, पाईप्स चोरून विकणं आणि आलेल्या पैशातून दारू पिणं हा छंद होता. त्या दोघांची नजर या पोरावर पडली आणि पक्याच्या सैतानी डोक्यात एक किडा आला.

त्यानं लक्ष्याला ही योजना सांगितली आणि मग दो से भले तीन या भावनेनं त्यांनी मलादेखील या योजनेत सामील करून घेतलं.
मग ठरल्याप्रमाणे आम्ही त्या डोंबार्याकडं गेलो आणि त्याला साईडला घेतला. (गेले दोन दिवस पक्याने त्या पोराच्या बापाला दारू पाजवून मस्तपैकी बाटलीत उतरवलं होतंच) आतादेखील तो फुल्ल होता.
“बोलो मालिक, क्या हुकूम है? ” त्यानं आम्हाला सलाम करत विचारलं.
“ये तेरा छोकरा हमें चाहिए! उसकी एक काम के वास्ते जरूरत है। कितना भाडा देने का ये भी बता…!” मी सरळ एक घाव दोन तूकडे केले.

“मेरा छोकरा? भाडे पे नै आता..!”त्यानं स्पष्ट सांगितले.
“इतके दिन हमारे पैसे से दारू पिया वो वापस दे…! ” पक्याला राग आवरता येत नाही.
“देख, तुझे दारू का वास्ता..बोल तू बच्चे को हमारे साथ भेजता है या नही? ” मी शेवटचं विचारलं.
“अरे साब, मेरे मालिक आप नाराज हो गए..! मै क्या बोलता, उसको भाडे पे कायको ले जाते खरीदके ले जाव…! “
डोंबारी येडाय कि काय असंच आम्हाला वाटलं. स्वतःच्याच पोराला विकायला निघाला होता. पण त्यानं परत तेच सांगितलं आणि एवढ्यावरच थांबला नाही तर लगेच पोराला बोलावलं.

“ऐ फिरजा, इनके साथ जा..! “एवढ्या शब्दात ते पोरगं आमच्यासोबत निघालं. आपल्याला बापाने एका दारूच्या बाटलीवर आणि शंभर रुपयात विकलं हे समजलं तरी कसलाही खेद किंवा खंत त्याला नव्हती.
बारा वर्षाच्या पोराला तेवढी समज तरी कुठून असणार म्हणा.
मग पुढचे दोन दिवस आम्ही त्याला घेऊन मास्तरच्या शेतातील शेडवर राहिलो. त्यावेळी पक्या त्याच्यासोबत राहिला आणि मी आणि लक्ष्या उस्मानाबादला गेलो.
तिथल्या एका गल्लीत सर्वात मोठी आणि पॉश दिसणारी इमारत पाहून आज इथंच उद्घाटनाचा कार्यक्रम करावा असं ठरलं. इकडं पक्याने त्या पोराला सारंकाही पढवायला सुरुवात केली.

“रातकू हमरे साथ चलनेका.. जादा बडबड न करते हुए जिस घर में तूमको भेजेंगा उधरसे माल लाने का.. और जास्ती आवाज होएंगा तो लोगा तेरेकू पकडके उधरीच मार डालेंगे तो ये बाता ध्यान मे रखनेका..!”
त्यानं सारंकाही समजल्याप्रमाणे मान डोलावली.
संध्याकाळी चार वाजता गावातून निघालो. कुणाच्याही नजरेला न पडता आम्ही सटकलो आणि उस्मानाबादला पोहोचलो. तिथं जाईपर्यंत साडेसहा वाजले होते. रात्री बाराच्या नंतरच कार्यक्रम होता पण गावाकडून यायला दुसरी सोय नसल्यामुळे लवकर येउन अडकलो.

आता वेळ कुठं घालवावा याचा विचार करता करता एक आयडिया आली. मग आम्ही थिएटरला गेलो. सगळ्यात जुनं आणि गर्दी नसणारं थर्डक्लास थिएटर शोधून तिथं गेलो. तिथं फक्त आमच्यासारखे चोर आणि दारुडे येत असावेत कारण तिथली पोस्टर्स पाहून त्या थिएटरची क्वालिटी लक्षात येत होती. पंधरा रूपये पर हेड या हिशोबाने तिकीटं घेतली आणि आत जाऊन बसलो.
सुमारे अर्धा तास बंबयीसे आया मेरा दोस्त हे गाणं वेगवेगळ्या आवाजात परत परत ऐकून झालं आणि मग काही जाहीराती झाल्या
आणि मग बॉबी देओलचा जुगनू चित्रपट सुरू झाला. जेमतेम अर्धा तास मग थिएटरमधे एकेक माणूस यायला लागला.

थोड्या वेळाने वाढती गर्दी पाहून लक्षात आलं की या थिएटरची खासियत आणि अभिरुची अतिशय उच्च दर्जाची आहे. काही क्षणात याचा प्रत्ययदेखील आला. समोरच्या पडद्यावरील चित्रपट जाऊन तिथं वेगळाच चित्रपट सुरू झाला. जुगनू त्याआधी मी पाहिला होता पण त्यात ही दृश्ये कधी पाहिली नव्हती. पक्या आणि लक्ष्या विचित्र हावभाव करायला लागले आणि पुढील धोका लक्षात आला की आता जर इथंच थांबलो तर रात्रीचा मुख्य कार्यक्रम अडचणीत येईल.
त्या दोघांची चुळबुळ पाहून तो फिरज्या मात्र हसत होता.

“क्या चचा, क्या हो रेला है?? इसके पैले ऐसा पिच्चर देखा नही? “
मी त्याला नजरेनं दटावलं आणि त्या दोघांना तिथून बाहेर पडण्याचा इशारा केला.
“आरं दाद्या, भायेर जाऊन काय करणार? थांब की लका अजून तर खरी गंमत पुढंच हाय..! “लक्ष्याला उठावं वाटत नव्हतं. त्याच्या हावभावावरुन एकंदरीत त्याला आपण जवानीत आल्याची भावना आजच प्रथम झाली असावी असं वाटत होतं.
पक्या मात्र डोळे फाडून पडद्यावरील दृश्य पाहत होता. कुणीही ऐकायला तयार नव्हतं मग माझा नाईलाज झाला. सुमारे तासाभराने थिएटरवाल्याची माणसं आली आणि त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः शिव्या देत बाहेर काढलं.

तीन तासांचे पैसे घेऊन दीड तासात बाहेर घालविण्याची घाई करणार्‍या त्या इसमाला मी कमीत कमी तो जुगनू तरी पूर्ण लावून बघु दे अशी विनंती केली आणि आसपासचे सगळे लोक मोठ्यानं हसले.
“अबे चल भाग यहाँ से.. जुगनू देखने को आया स्साऽला…! अभी देखा वो जुगनू नही था क्या? “
“जाने दो भाय, वो अभी बच्चा है, इसको वो वाला जुगनू समझ में नही आया…! ” कुणीतरी बोलला आणि ते सगळे परत एकदा हसले.
इकडे तिकडे भटकत आम्ही एका गाड्यापाशी आलो. तिथं सांबारचा घमघमाट सुटलेला पाहून भूक चाळवली गेली.

मग वीस रुपयात एक ह्या हिशोबाने प्रत्येकी पाचपाच प्लेट वडासांबर हादडलं आणि मुख्य कामाकडे मोर्चा वळवला. बारा वाजायला अजून तीन तास होते मग आम्ही बसस्टँडच्या अंधाऱ्या कोपर्‍यात जागा धरून तिथंच पडून राहीलो. भरल्यापोटी मस्त झोप लागली. कुणीतरी ढोसलं म्हणून मी जागा झालो त्यावेळी तो फिरज्या आम्हाला उठवत होता.
आम्ही लगबगीने उठून बसलो.
बसस्टँडवरील घड्याळात पहाटेचे तीन वाजले होते. चोरी करायचे गोल्डन अवर्स हेच तर होते. मग आम्ही लगबगीने टार्गेटजवळ पोहोचलो.

इमारतीखाली उभे राहून एकमेकांकडे अत्यंत हावरटपणाने पाहत आणि काही मिनिटांतच आपण पैसेवाले होणार या आनंदात आम्ही जागा घेतल्या. तीन कोपर्यांवर तिघे उभे राहीलो.
फिरज्या एका उडीत एक मजला गाठणार तिथं मिळालेला मुद्देमाल खाली फेकणार तत्परतेनं कुणीतरी तो झेलायचा आणि वाटेला लागायचं. अशाच क्रमानं तीन मजले साफ करून पहिल्या गाडीने गाव जवळ करायचा बेत होता.
फिरज्या उगाच येड्यासारखा उभा होता. आम्ही आळीपाळीने त्याला उडी मार असं खुणावत होतो पण तो हलत नव्हता. मग पक्या अंधारात दबकत त्याच्याजवळ गेला आणि त्यानं त्याला उडी मार असं सांगितलं.

तरीही फिरज्या शांतच उभा.
पक्या डोक्याला हात लावून खालीच बसलेला पाहून आम्ही पुढे आलो.
मी काय झालं असं पक्याला विचारलं. “विचार त्यालाच..! “असं तो म्हणाला.
मग मी फिरज्याला अत्यंत प्रेमाने विचारलं,” काम नही करेगा क्या? ” यावर तो करणार असं म्हणाला. “काम करणे के लिए ही तो आया हूँ! “
“तो फिर मार उडी..! “लक्ष्य मी आणि पक्या एकदमच म्हणालो.

“हां तो बजाव ढोल…! ” फिरज्याचं उत्तर ऐकून आम्ही चक्रावलो.
“ढोल कशाला वाजवायचा? ” आम्ही तिघांनीही एकदमच विचारलं.
” ढोल वाजवल्याशिवाय आपल्याला उडी मारता येत नाही…! ” त्याचं हे उत्तर ऐकून आम्ही भूईसपाट झालो. आता या भरवस्तीत घर फोडताना जर ढोल वाजवला असता तर लोकांनी आम्हाला वाजवलं नसतं का?
चुपचाप आम्ही माघारी वळलो आणि गावात आलो. लगेच त्याच्या बापाला गाठला.

यावेळी तो पूर्ण शुद्धीत होता. निघायच्या तयारीत असणारे ते डोंबारी आम्हाला पाहून जवळ आले.
“ये बच्चा वापस लेलो..! “पक्याने त्याला सुनावलं.
“किसका बच्चा..? ये हमारा नही है!” फिरज्याच्या बापाने तर झटकून टाकलं.
“अरे ये तुम्हारा बच्चा है ना..? तुम्ही ने तो बेच दिया था इसे दो दिन पहले! “
“हाँ तो? अब ये तुम्हारा हो गया ना! “त्याचा हा तर्क बरोबर होता.

“अब हमें नही चाहिए.. इसको उडी मारने को बोला तो ये ढोल बजाने को बोलता है। “
“हाँ तो बराबर है ना मालिक, डोंबारी का बच्चा ढोल बजेगा तभी उडी मारेगा ना…! ”
“तो ठीक है, इसको वापस लेलो..! “
“अब हम इसको नही लेता, ये तुम्हारा है, इसको लेके जाव और चाहे तो काटकर खा जाव..! “
“अरे लेकीन ये तुम्हारा बच्चा है ना? ” आम्ही तरीही नेट लावून खिंड लढवत होतो. आमचा तमाशा बघायला निम्मा गाव गोळा झाला होता.

“है नही, था..! उसको बेच दिया अब ये तुम्हारा हो गया! ” तो ऐकायलाच तयार नव्हता.
“देखो अब ये हमें नही चाहिए, इसे वापस लेलो..! “
“देखो मालिक एकबार माल बेच दिया तो दिया.. अब हम बेचा हुआ माल वापीस नही लेता…! ” अत्यंत कोडगेपणानं फिरज्याचा बाप आणि त्याच्यासोबतचे डोंबारी आपली गाढवं घेऊन निघाले.
आज एक महिना झाला फिरजा आमच्याकडेच आहे. ज्या कुणाला गरज भासेल त्याने गेल्या महिन्याभराचा फिरज्याचा खर्च द्यावा आणि फिरजाला घेऊन जावे.
त्याच्या बापाने सांगितल्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी मिळून त्याला एक डझन अंडी खायला
लागतात. आणि ढोल वाजवल्याशिवाय तो उडी मारत नाही, बोला मग कसं करता?
***** 
समाप्त
© गोविंद कुलकर्णी

सदर कथा लेखक गोविंद कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धेमधे सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धा

Leave a Comment

error: Content is protected !!