©आर्या पाटील
दुपारी बाराच्या सुमारास अनिकेत धापा टाकत दारात पोहचला. हातातल्या भाजीपाल्याच्या पिशव्या सावरत त्याने कशीबशी बेल वाजवली. नंदिनी, त्याची पत्नी कामात व्यस्त असावी त्यामुळे दरवाज्या उघडायला जरा उशीरच झाला.
” काय गं, किती उशीर ?” हातातील पिशव्या सांभाळत तो त्रस्तपणे म्हणाला आणि आत शिरला.
” आणा इकडे.” म्हणत तिने त्यातील काही पिशव्या घेत त्याचा भार हलका केला.
समोरच्या टेबलावर सारा भाजीपाला ठवत तो सोफ्यावर बसला. नंदिनीनेही लागलीच फॅन सुरु केला आणि पाण्याचा ग्लास आणून त्याच्या हातात दिला.
” दमलो बुवा. दुपारचं कडक ऊन आणि त्यात ती बाजारातली गर्दी.” म्हणत त्याने सुस्कारा टाकला.
” कळलं आता ? मी दरवेळी असाच बाजार करते.” ती लगेच रोखात म्हणाली.
” मग त्यात काय झालं. उन्हातच तर वाढलोय आपण आणि शहरात राहणाऱ्याला गर्दीची काय भीती ?” त्याने लगेच पलटी खाल्ली.
” अच्छा. मग यापुढे बाजार तुम्हीच करा.” तिनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.
अनिकेतला मात्र तोंडावर पडल्याचा भास झाला. कालच त्याने बाजाराविषयी तिला चांगलेच सुनावले होते.
” नेहमी काय बाजार बाजार म्हणत ओरडतेस ? थांब उद्या मीच जातो बाजारात आणि तुझ्यापेक्षा चांगल्या भाज्या घेऊन येतो.” त्याने तिला चॅलेन्ज केले होते.
” मग दाखवाच. मी पण बघते माझा नवरा किती संसारी आहे ते.” ती ही पदर खोचत म्हणाली होती.
आज बाजारात जाऊन अनिकेतने दिलेला शब्द पाळला होता.
टेबलावर ठेवलेल्या पिशव्यांकडे तो अभिमानाने पाहत होता.
त्यांतून डोकावणाऱ्या भाज्या जणू त्याच्या कष्टाची महती सांगत होत्या.
” पाहु तरी माझ्या नवऱ्याने कसा बाजार केला आहे.” म्हणत नंदिनी पिशव्यांकडे वळली.
” व्यवस्थित काढ गं..” तो ही संसारी पुरुषासारखा म्हणाला.
नंदिनीने लागलीच पहिल्या पिशवीला हात घातला.
पिवळसर कोथिंबीरीची जुडी हातात घेताच तिने लगेच नाक मुरडले.
” आहो ही अशी कोथिंबीर कोणी आणतं का. कोथिंबीर कशी हिरवीगार, नाजूक पानांची आणि फुलं आलेली आणायची म्हणजे चांगला सुगंध देते.” म्हणत तिने नावडीने ती बाजूला ठेवली.
” तुझ्या आवडीची मेथीही आणली आहे.” ती खुश होईल या हेतूने त्याने पिशवीतून मेथीची जुडी काढत तिच्या हातात दिली.
“एवढ्या लांब पानांची मेथी का आणली. कडवट लागते ती. बारीक पानांची मेथी आणायची असते.”मेथी न्याहाळत तिने शेरा मारला. तसा तो उठून चार हात लांबच जाऊन थांबला.
” आणि ही भेंडी. अरेरे! काय तिची अवस्था ? भेंड्याचा देठ मोडून ती कोवळी असल्याची खात्री तरी करून घ्यायची होती.” दबलेल्या भेंड्यांना बाजूला ठेवत तिने आपले ज्ञान पाजळले.
” चांगलीच होती ती. भाज्यांच्या वजनाने दबली असणार .” पुन्हा जवळ येत भेंड्यांना कुरवाळीत त्याने आपली बाजू मांडली.
तोच तिची नजर टॉमेटोंवर पडली. लालेलाल टॉमेटो पाहून तिचे डोळेही लाल झाले.
” टॉमेटो थोडे कच्चे बघून घ्यायचे. आठवडाभरात चांगले पिकतात.” टॉमेटोची पिशवी बाजूला ठेवत तिने कपाळाला हात लावला.
” ते मी मुद्दामहूनच लाल टॉमेटो आणले. परीला टॉमेटो केचअप खायचा होता. छान घरगुती केचअप बनव पाहू.” जीभ चावत त्याने लेकीच्या नावाने आपली चुक लपवली.
एक एक करीत सगळ्याच भाज्या त्याचा संसारीपणा चांगलाच दाखवत होत्या.
” नशीब निदान फळे तरी चांगली आणलीत.” ताजी फळे पाहून ती खुश झाली.
” मग.. आहेच मी हुशार.” त्याने लगेच आपली कॉलर ताठ केली.
त्याच्या हुशारीचा आनंद क्षणिकच टिकला कारण दुसऱ्या पिशवीतील चवळीच्या शेंगा पाहून ती अक्षरश: ओरडलीच.
” अरे देवा ! या एवढ्या चवळीच्या शेंगा ?” पिशवीतील चवळीच्या शेंगांच्या जुड्या तिने मोजत बाहेर काढल्या.
” एरवी मी एक जुडी आणली तरी ओरडता आणि आज एवढ्या घेऊन आलात ?” ती प्रश्नार्थक स्वरात म्हणाली.
तिच्या त्या प्रश्नाने आपल्या हुशारीचा बडेजाव मिरवणारा तो शांत झाला.
किचनमधून टोपली आणत त्याने त्या जुड्या त्यात काढून ठेवल्या.
” आहो, काय विचारते मी ? हा असा बाजार ? एवढ्या जुड्यांचं काय करायचं ? दुकानदाराने चांगल्याच माथी मारल्या तुमच्या.” ती डोक्याला हात लावत म्हणाली.
” नंदिनी, कोणीही या माथी मारल्या नाहीत. मीच घेऊन आलो.” म्हणत त्याने घडलेली सारी हकिगत सांगितली.
भाजीपाला घेऊन तो जेव्हा बाजारातून बाहेर पडत होता तेव्हा भर उन्हात वडिलांच्या वयाचा एक शेतकरी चवळीच्या शेंगा विकतांना दिसला.
टोपली पूर्णपणे शेंगांनी भरली होती. अनिकेतची नजर त्याच्याकडे वळताच तो आशेने त्यातील एक जुडी त्याच्या समोर धरता झाला.
” पोरा, शेंगा घे चवळीच्या. दहाच्या दोन जुड्या देतो हवं तर.” तो गयावया करत म्हणाला.
पूर्ण बाजारात पहिल्यांदाच त्याला एवढ्या कमी किंमतीत भाजी विकणारा कोणी भेटला होता परंतु त्याला ती भाजी आवडत नसल्याने त्याने घेण्याचे टाळले.
” नाही नको.” एवढं म्हणून तो पुढे निघून जाऊ लागला.
” दहाच्या तीन देतो घे. ” तो पुन्हा गयावया करू लागला.
आता मात्र अनिकेतला कमालीचे आश्चर्य वाटले. तो तसाच मागे फिरत त्याच्याजवळ आला.
” बाबा, एवढ्या कमी किंमतीत भाजी विकलीस तर तुला कसं परवडेल.” त्याने त्याला समजावले.
“भाजी खराब होऊन वाया जाण्यापेक्षा कमी किंमतीत विकलेली परवडेल बाबा. सकाळपासून बसलोय पण अजून एकही गिऱ्हाईक इकडे फिरकलं नाही.बाजारात न संपवता जेव्हा हा भाजीपाला घरी नेऊन खराब होतो तेव्हा खूप वाईट वाटते. कष्टाची किंमत तर मिळतच नाही पण घाम गाळून पिकवलेल्या भाज्याही मातीमोल ठरतात. कमी तर कमी किंमत पण कोणाच्या पोटात जरी गेल्या तरी समाधान.” बोलता बोलता तो गहिवरला.
त्याच्या शब्दांनी मात्र अनिकेतला आपले जुने दिवस आठवले. डोळ्यांसमोर काळ्या मातीत फुललेला शेतमळा फेर धरू लागला. आईची आठवण येताच तो भावनिक झाला. कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाला योग्य बाजार भाव न मिळाल्याने त्याच्या बाबांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला.
आत्महत्या करून त्यांनी स्वतःचा त्रास संपवला पण बायको पोरांना दुर्दैवाच्या स्वाधीन केले.
त्याच्या आईने मात्र या दुर्दैवातूनही आशेचा मळा फुलवला. काबाडकष्ट करून तिने शेती केली. डोक्यावर भाजी विकून मुलांना वाढवले, शिकवले आणि स्वतःच्या पायावर उभे केले. आज त्याची आई जगात नव्हती पण तिच्या कष्टाची जाणीव मात्र त्याच्यासोबत होती.
” आण त्या शेंगा. मी घेतो सगळ्या.” खिश्यातून पाकिट काढत तो म्हणाला. तशी त्या शेतकऱ्याने शेगांची जुडी मागे घेतली.
” नाही पोरा. तुझे उपकार नकोत. एवढ्या शेगांचं तु काय करशील? कमी भावाने का होईना संपतील त्या.” बोलतांना त्याचा खंबीरपणा स्पष्टपणे जाणवला.
नकळतपणे अनिकेतचे डोळे पाणावले.
काबाडकष्ट करून शेतमळा पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे हृदय होते ते. खंबीर आणि तेवढेच तटस्थ.
” बरं मग दहाला एक देणार असाल तर पाच जुड्या द्या.” तो ही त्याचा स्वाभिमान न दुखावता म्हणाला.
भरल्या नजरेने शेतकऱ्याने त्याला न्याहाळले. टोपलीतुन चांगल्या हिरव्यागार शेगांच्या जुड्या काढत त्याच्या समोर धरल्या. त्या घेत अनिकेतने पन्नास रुपयांची नोट त्याच्या पुढ्यात धरली.
” बाबा, तुझ्या कष्टाचे आणि स्वाभिमानाचे पैसे आहेत. घे.” तो म्हणाला.
शेतकऱ्याने खांद्यावरील रुमालाने डोळे टिपले.
पैश्यांना नमस्कार करून त्याने ते आपल्या खिशात ठेवले आणि हात उंचावून अनिकेतला आशीर्वाद दिला.
हे सारं ऐकून नंदिनीचे डोळे डबडबले. त्या शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवणाऱ्या आपल्या नवऱ्याचा अभिमान वाटला.
” तुम्ही आज खऱ्या अर्थाने बाजार केला आहे. एका शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवत त्याला योग्य तो मोबदला दिलात आणि शेतकऱ्यांशी उगाचच भाज्यांचा मोलभाव करणाऱ्या मला चांगलाच धडा शिकवलात.” ती त्या शेंगा न्याहाळत म्हणाली.
” म्हणजे मी जिंकलो तर ?” त्याने लगेच संधी साधली.
हसत तिनेही होकारार्थी मान हलवली.
” पण पुढचा बाजार तुच करायचास नाहीतर प्रत्येक वेळी टॉमेटो ऐवजी टॉमेटो केचअपच खावा लागेल.” त्याने असे म्हणताच दोघेही मनमुराद हसले.
संसारी नसला तरी आपला नवरा दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवणारा आहे या आनंदात तिचा या आठवड्याचा बाजार सार्थकी लागला होता.
समाप्त
©आर्या पाटील
सदर कथा लेखिका आर्या पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.