लहान बाळं

©️ सौ बीना समीर बाचल
“आरं ह्या गावच्या वेशीभायेर सुदीक गेली न्हाय रं कधी, कायम आपलं घर,शेत आणि पीक पाणी,बस. हीच आपली काशी आणि हीच पंढरी बग. आन तक्रार म्हणशीला तर ती बी न्हाय बरं का! अर मर मर मरून आणि मन मारून शेतात पीक हुभ रहातय न, तवा सगळ्याच इसर पडतू बघ! ते भायर गावचं काय काडू नगसा.. आता आम्ही म्हातार्यांनी जायचं का तुमि तरण्यांनी र? का उगीच मजा लावली मा म्हातारीची!” किसनची आई काही एक ऐकायला तयार नव्हती.
“अग आये, सलग चार वर्षं झाली,देवाच्या कृपेने पीक चांगलं येतंय शिवाय त्याच्या जोडीला मी पशु पालन करतोय, चांगला पैका हाती गावतोय तर का न्हाई म्हणायलीस ग, ऐक की, तू इमानात बसलेली बघायची हाय मला …त्या शहरातल्या बायका बग कशा चटपटीत असत्यात, एकट्या जातात कुट कुटं आणि तुला साद गावभायेर नको जायला…..”किसन आईची समजूत काढत होता.

अखेर आपल्या आईची कशी बशी समजूत काढत किसनने शहर गाठलं.
वर्तमानपत्रात जाहिरात बघून त्यानं परदेश वारी सुखरूप आणि सुरक्षित पणे घडवणाऱ्या एका नामांकित ‘ट्रॅव्हल एजन्सी’चं ऑफिस गाठलं.
त्या ऑफिस मध्ये शहरातील लोकांची पळापळ, सतत खणखणणारे फोन्स आणि ऑफिस मधली ती कृत्रिम झुळझुळीत हवा एकूणच सगळ्या वातावरणाची सवय नसलेल्या किसनचाच जीव दडपला; तिथे किसनच्या आईची काय कथा!
ती बिचारी दारातूनच ‘माघारी चल बा, उगा पैका नाही तिथं घालवू नगं ‘म्हणत त्याला मागे खेचू लागली. पण किसननं सगळा धीर गोळा केला आणि आईला सोबत घेऊन मॅनेजर च्या केबिन मध्ये प्रवेश केला.

तिथे आधीच एक साधारण त्याच्याच वयाचा तरुण आणि साधारण किसन च्या आईच्या वयाचे असावेत असे एक वृद्ध गृहस्थ बसले होते. ‘कदाचित हा पण आपल्या वडिलांना विमानात बसवण्याची इच्छा घेऊन इथं आला असावा’ किसनने उगाच आपल्या मनात आडाखे बांधले.
किसन आत येताच मॅनेजरनं त्याला दोन मिनिटं बसायला सांगितलं आणि समोर असलेल्या दोघांना टूर विषयी थोडक्यात माहिती दिली, सोबत टूरचे वेळापत्रक आणि ईतर माहिती असलेले पत्रक ही सोपवले.
तो तरुण आपल्या वडिलांना टूर वर पाठवण्यासाठीच आला होता हे त्यांच्या बोलण्यावरून किसन ला समजले. अंदाज बरोबर निघाल्याने किसन च्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले आणि चला ‘आईला सोबत होईल प्रवासात’म्हणून थेट पुढचा अंदाज ही बांधला.

पण ते दोघे जागचे उठले आणि त्या वृद्ध माणसाची नजर किसन आणि त्याच्या आईवर पडली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म अठी किसनला दिसली.
अर्थातच नऊवर साडी, डोईवर पदर, उन्हाने रापलेला चेहरा हे रूप बघून शहरातील कोणीही इसम ह्याच नजरेनं  आपल्या आईकडे बघणार हे किसनला पक्के ठाऊक होतं आणि त्याचा नाईलाज ही होता.
त्या दोघांकडे दुर्लक्ष करत किसन आईला घेऊन उठला तोच त्या वृद्ध माणसासोबत असलेल्या तरुणाने किसनकडे आपला हात पुढे करत ‘नमस्कार मी सुनील आणि हे माझे वडील  श्री दामोदर कोलते, पुढल्या आठवड्यात जी फॉरेन टूर जाणार आहे न सिनियर सिटीझन स्पेशल त्यात हेही जाणार आहेत.

ह्या तुमच्या आई का? ह्याही जाणार का त्याच टूर ला?’ सुनील ने एका दमात आपली ओळख , शंका सगळंच सांगून टाकलं.
किसनलाही ह्या शहरी सुनीलने आपली ओळख नसतानाही दाखवलेली उत्सुकता सुखावून गेली.
‘हो,हो माझी आई पण जाणार आहे ह्या टूरला’ म्हणत किसननेही सुनीलशी हात मिळवला.
‘चला, बाबा तुम्हांला सोबत मिळाली बघा ह्या काकूंची! कोणीतरी समवयस्क असले की बरं पडेल न टूर मध्ये’ सुनीलने बोलून दाखवलं.
‘अरे ही टूरच मुळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे त्यामुळे असे बरेच जण भेटणारच आहेत इथे. त्यात ह्यांनी फारसा प्रवास केलेला दिसत नाहीये त्यामुळे ह्यांची मदत होण्याऐवजी ह्यांनाच मदत करावी लागेल असे दिसतेय!’ दामोदर पंतांनी आपल्या फटकळ स्वभावानुसार मनातलं बोलून टाकलं!

सुनीलला थोडासा awkwardness वाटला पण किसननेच ‘अहो,असू देत म्हातारं माणूस म्हणजे जरा लहान पोरासारखं करणारच की अन माझ्या आईचा काही त्रास नाही व्हायचा तुमच्या बाबांना बरं का!’ म्हणत सुनीलला धीर दिला.
दोघांनी हसत ‘आता  थेट प्रवासादिवशी भेटू ‘ म्हणत एकमेकांचा निरोप घेतला.
किसनने टूरच्या आवश्यक गोष्टींची पूर्तता केली आणि तोही घरी निघाला.
इकडे किसनच्या आईलाही दामोदर पंतांचं ते कुचकट बोलणं सतत आठवत होतं.
‘ लैच खउट दिसतंय म्हातारं’ असा रागराग ही करून झाला होता.

किसन आणि त्याच्या आईनं प्रवासाची सगळी तयारी केली आणि टूरच्या दिवशी थेट विमानतळ गाठलं.
ते विमानतळ आणि सतत ये जा करणारे प्रवासी,एकूणच भारावून टाकणारं वातावरण पाहून किसनच्या आईच्या डोळ्यात पाणीच आलं, ‘आर लेकरा,हा तुझा मला इमानात बसवायचा हट्ट म्हंजी माझ्यासाटी शिक्षाच व्हानर बघ, कसली लोकं अन काय आणि मी बग शोभतेय व्हय ह्या लोकांत ? अर कूट विठोबाच्या दर्शनाला पंढरीला धाडलं असतस तर आनंदानं गेली असती पर तुझं हे इमानाच खुळ काय जाईना बघ ,आता म्या तिथं परदेशात हरवली म?’ किसनच्या आईची शंका आणि घालमेल अगदी रास्त होती.

पण टूर गाईडने किसनला अगदी निर्धास्त केले, ‘आता पुढचा आठवडा मावशी आमच्या आहेत, तुम्ही कसली म्हणून काळजी करू नका, सुखरूप फिरवून आणतो मावशींना!’ किसनला ऐकून समाधान झालं आणि आईचा जीव भांड्यात पडला!
किसनने आई काचेच्या दरवाज्या पल्याड जाईपर्यंत हात केला आणि ती दिसेनाशी झाल्यावरच डोळ्यातलं पाणी पुसलं!
इकडे कितीही टूर गाईड ने सांभाळू म्हटलं तरी काही गोष्टी स्वतः च्या स्वतः च कराव्या लागणार होत्या.
किसनची आई नुसतीच कावरीबावरी झाली होती. कुठली बॅग विमानात नेता येईल कुठली luggage मध्ये हे सगळं सविस्तर सांगूनही प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा बिचारीचा पार गोंधळ उडाला.

बाकी सगळे तिचा गोंधळ बघत नुसते उभे असले तरी एक व्यक्ती त्यांच्या मदतीला आली,अर्थात दामोदर पंत!’ जमत नाही तर कशाला यायचं परदेश वारीला’ तेवढ्यात त्यांनी टोमणा मारलाच! पण ऐन वेळी मदत झाली म्हणून मग किसनच्या आईनं गप्प बसण्याचं ठरवलं.
नशीब ही असं की विमानात ही दोघांच्या जागा एकमेकांशेजारीच आल्या! आता खिडकीची जागा किसनची आईला मिळाली होती पण दामोदर पंतांना ही खिडकीतून डोकवायचे होतेच!

आता मात्र किसनच्या आईचीही चिडचिड सुरू झाली,’आता ,किती बी वाकून पाहिलं तरी काय ढगात जाऊन बसता यायचं नाही बगा! वय झालंय म्हणा तरी असं नाही जाता यायचं, खालून जायला पाहिजे तेंबी डायरेक्ट; असं इमानातून नव!’
दामोदर पंतांना असा राग आला की बस्स, पण चूक त्यांची असल्यानं आता गप्प बसायची वेळ त्यांची होती.
त्यांची ही एकमेकांसोबत सुरू असलेली वादावादी पाहून टूर गाईड ला ह्या दोन ‘लहान बाळांना’ सांभाळण्याची जास्तीची जबाबदारी घ्यावी लागणार होती!

आता थोड्या वेळात  विमानात जेवण येणार होतं, तशी घोषणा झाली होती, म्हणून त्याआधी गोळ्या घ्याव्यात म्हणून दामोदर पंतांनी घाईने गोळ्या घेतल्या.
जेवण आलं खरं पण त्यांना मांसाहारी (अर्थात त्यांनीच तसं सांगितलं होतं म्हणून ) जेवण घ्यावं लागलं.
शेजारी किसनच्या आईला शाकाहारी जेवण दिलं गेलं.
सगळे जण जेवण उघडून सुरुवात करू लागले.

‘हे कसं एवढ्याशा जागेत, एवढ्याशा ताटात जेवाव ‘ह्या गोंधळात किसन ची आई थांबून राहिली आणि इकडे विमान प्रवास किंवा एकूणच दगदगीमुळे दामोदर पंतांना ते मांसाहारी जेवावसे वाटेना.
गोळ्या घेऊन बराच वेळ झाल्याने जेवण तर अत्यावश्यक होतं पण समोर चे जेवण अगदी नको झाले त्यांना! हळूहळू त्यांना अस्वस्थ वाटू लागले, थोडी चक्कर येऊ लागली. काय करावं सुचेना.
त्यांच्या शेजारी बसलेल्या किसनच्या आईला ह्यांना काहीतरी होतंय असं जाणवलं, त्यांनी क्षणाचाही विचार न करता टूर गाईडला मोठ्याने हाक मारली.

तोही धावत आला आणि त्याने चौकशी केली तेव्हा समजले की त्यांनी शुगर च्या गोळ्या घेतल्या पण बराच वेळ जेवले नाहीत त्यामुळे कदाचित शुगर कमी झाली असावी. शेवटी किसनच्या आईनं त्यांना स्वतः च जेवण देऊ केले’
अहो ,प्रवासात हलकं जेवावं हे मांसाहारी तर लै च जड पोटाला, हे माझं जेवण खाऊन बघा बरं वाटतंय का’
पडत्या फळाची आज्ञा मनात दामोदर पंत अक्षरशः अधाशासरखे जेवले, इतके की किसनची आई काय खाणार हा विचारही त्यांच्या डोक्यात आला नाही.
पोटात थोडी भर गेल्यावर  मात्र ते भानावर आले. आता मात्र त्यांना फार अपराधी भाव आला. ‘इतकं घालून पाडून बोललो आपण ह्या बाईला पण मदत मात्र तिनेच केली ऐनवेळी!

अखेर स्वभावाच्या विरुद्ध जात त्यांनी किसनच्या आईची माफी मागितली आणि हळूहळू एकमेकांना तुसडेपणाने वागवणाऱ्या ह्या दोघांची ट्रिप संपेपर्यंत  चांगली गट्टी जमली!
किसनच्या आईला परदेशात आत्मविश्वासाने फिरता आलं तसं दामोदर पंतांना शेती, पिकं ह्याचं ज्ञान मिळालं.
सगळ्यात आनंद कोणाला झाला असेल तर टूर गाईडला कारण ह्या ‘लहान बाळांची ‘भांडणं सोडवण्याच्या extra जबाबदारी तुन तो मुक्त झाला होता!!
©️ सौ बीना समीर बाचल

सदर कथा लेखिका सौ बीना समीर बाचल यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!