©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
मनोहररावांनी पहाटे सहा चा गजर लावला होता तरी नेहमी ते साडे सहा ला उठत. पलंगावरील त्यांच्या उजव्या बाजूच्या खिडकीकडे त्यांनी नजर टाकली पण बाहेर अजून अंधारच होता.
मनोहररावांनी पलंगावर नजर टाकली. स्मिता गाढ झोपली होती. तिच्या चेहेऱ्यावर निरागस भाव होते. स्मिता अजुनही तितकीच सुंदर दिसत होती जशी त्यांनी पहिल्यांदा कॉलेजमध्ये तिला पाहिलं होतं.
स्थूलपणा सोडला तर तिच्यात फारसा बदल झाला नव्हता.
घरातला पहिला पदवीधर होण्याच्या सन्मानासाठी मनोहररावांनी बीएला प्रवेश घेतला होता तेंव्हा त्यांच्या एका मित्रानं स्मिताशी ओळख करून दिली होती.
स्मिताने त्यांच्याकडे पहात प्रश्न केला “मनोहरराव ? हे काय नाव झालं? आमच्या पुण्यात राव, दादा अशी जोडाक्षरं जाऊन जवळ जवळ एक पिढी उलटली आहे”
त्यावर मनोहररावांनी ओशाळून खुलासाही केला “ते काय आहे की मी नवसानं झालो म्हणून मला माझ्या पणजोबांचं नाव ठेवण्यात आलंं”. स्मिताचा देवावर तसा विश्वास नव्हता.
स्मिता मनोहररावांच्या अनेक मतांशी कधीच सहमत झाली नाही पण बरीच वर्षं अपत्य नं झाल्यानं आजीच्या आग्रहास्तव तिने आणि मनोहररावांनी देवाला गाऱ्हाणं घातलं आणि नवस बोलल्यावर पारस जन्मला होता.
स्मिताचं देवबद्दलचं मत त्यानंतर बदललं की नाही याची मनोहररावांनी कधीच शहानिशा झाली नाही परंतु स्मिताने त्यांच्याशी तात्विक वाद घालणं मात्र सोडून दिलं.
स्मिता ही साने वकीलांची एकुलती एक मुलगी आणि ती सुध्दा पुण्यासारख्या वैचारिक स्वात्यंत्र्य असलेल्या शहरात वाढलेली, शिक्षणात अग्रेसर, जर्नालिझम घेऊन उच्च पदवीधर झालेली स्मिता त्यांना कशी पटली याचं मनोहररावांनां कौतुक वाटे.स्मिता ला पुण्याचं स्वात्यंत्र लग्नानंतर गावात मिळालं असतं तर तिनं कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र पण घातलं नसतं पण मनोहररावांच्या आजीसमोर इतका पुरोगामीपणा स्मिता ने दाखवला नव्हता.
मनोहररावांना त्यांचे कॉलेजचे दिवस नेहमी काल परवा घडलेल्या घटनांप्रमाणे स्पष्ट आठवत.
पुणं त्यांना खूप आवडलं होतं. पुण्याची थंडी, ती स्मिता बरोबर घेतलेली कॅन्टीन मधली वाफाळलेली कॉफी, तिने प्रत्येक गोष्टीत घातलेला वादविवाद, ते दोस्त आणि ती पिकनिक. जेव्हा मनोहररावांनी स्मिता ला प्रपोज केलं होतं या सगळ्या गोष्टी त्यांना एखादा सिनेमा परत पहावा अश्या ठळकपणे आठवत.
त्यांचे आजी आणि आजोबा व त्यांची एवढी मोठ्ठी प्राँपर्टी सांभाळण्याची जबाबदारी अशी बंधनं नसती तर ते गावी परत आले नसते आणि पुणं हेच त्यांचं गाव झालं असतं.
पुण्यात आणि गावात खूप अंतर होत. अंतर म्हणजे दूरी नाही तर दोन जगातील तफावत!
पुणं कसं एक स्वछंद शहर होत, आणि गावाकडची गोष्टच वेगळी होती. घर
कसलं, अनेक खोल्यांचा महालच होता, नोकरचाकर होते आणि मनोहर रावांना हा सारा व्याप आजोबा आणि आजी कसे सांभाळतात याचा अचंबा वाटे.
पण आजोबांनी त्यांना पुण्याला जाण्या अगोदर सांगितलं होतं की लवकरच सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडणार आहे. मनोहररावांच घराणं प्रतिशिष्ठित होत.
लग्नानंतर स्मिताला हे सगळं अनोळखी होतं. कुठल्यातरी मध्ययुगीन कालात आपण येऊन पोहोचलो असा भास तिला होत असे याची जाणीव मनोहररावांना होती.
किती वेळा स्मिता ला त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा वाद घालून झाल्यावर मनोहररावांना माहित होतं स्मिता रागानं काय म्हणणार ते.
“मनोहरराव तुम्ही एवढे कर्मठ, पुरातन मतवादी, सनातनी आणि बुरसटलेले असाल हे मला लग्ना अगोदर माहित असतं तर नक्की मी तुमच्याबरोबर लग्न केलं नसतं.” मनोहरराव हसून वाद संपवत.
सरकत्या काळानुसार दोघांनीही वादांवर पडदा टाकला होता कारण दोघांच्याही विचारातील तफावत कधीही भरून निघणार नव्हती.
मनोहररावांना स्मिताच्या साधेपणाचं आश्चर्य वाटायचं. पण इतक्या वर्षात त्यांना खात्री पटली होती की स्मिताच्या मतात आणि वागण्यात फरक नाही. हे पण त्यांना उमगलं होतं पण त्यांनी तिला कधीही आडकाठी केली नाही.
काल साठे वकील साहेबांचा फोन आला होता, मनोहररावांना आठवण करण्यासाठी की त्यांच्या आजोबा आणि आजी यांचं जॉईन्ट मृत्युपत्र त्यांच्या पूर्व सुचनेनुसार आज उघडण्यात येईल आणि दुपारी वकिलसाहेब आले.
मनोहररावांनी पारस ला हाक मारली आणि वकील साहेबांना म्हणाले. ” चला, सगळे जमलेत तेंव्हा तुम्ही तुमचे काम आता सुरु करू शकता.”
वकिलसाहेब म्हणाले “ठीक आहे. मनोहरराव , तुम्हाला माहित आहे की हे मृत्यूपत्र आजोबांच्या जाण्याच्या काही वर्षं अगोदरच बनवलं होतं ज्याला आमच्या कायद्याच्या भाषेत “जॉईन्ट अँन्ड म्युचुअल विल“ असं म्हणतात. हे विल मी त्यांच्या इच्छेनुसार बनवलं होतं. मीच या विलचा एक्सिक्यूटर आहे.”
मनोहरराव म्हणाले “ वकिलसाहेब, आपली बरेच वर्षाची चांगली ओळख आहे.. त्यामुळे तुम्ही कायदेशीर कागदपत्र वाचायची आवश्यकता नाही. तुम्ही सर्वांना समजेल असे महत्वाचे पाँईंट सांगा म्हणजे झालं.”
वकिलसाहेब म्हणाले “ माझी काही हरकत नाही पण विल बरोबर एक बंद पाकिटात तुम्हाला लिहिलेलं पत्र आहे. पाकिटावर लिहिलेल्या आजोबांच्या अक्षरावरून पत्र असेल असा माझा अंदाज आहे. हे पाकीट तुमच्या नावानं आहे.”
“वकिलसाहेब, तुम्हीच वाचा. इथं फक्त माझे जवळचे आप्त आहेत आणि तुम्ही आजोबांचे विश्वासू वकील व विलचे एक्सिक्यूटर आहात.” मनोहरराव म्हणाले.
“ठीक आहे, मनोहरराव जशी तुमची ईच्छा” असे म्हणून वकील साहेबांनी पाकीट उघडून पत्र वाचायला सुरुवात केली.
मनोहरराव – . आम्ही इस्टेटीचे सर्व अधिकार तुझ्याकडे सोपवत आहोत. बहिण आणि भावोजी यांच्यावरचे तुझे प्रेम आणि माया तशीच राहो. तुला इस्टेटीतला वाटा त्यांना द्यायची ईच्छा असल्यास तू तसे करू शकतोस पण मुख्य म्हणजे त्यांच्या गरजेच्या प्रसंगी तू त्यांच्या पाठीशी उभे रहावेस.
मुद्दयावर येतो . मनोहरराव तू एक दत्तक घेतलेला मुलगा आहेस. तुझी खरी आई वेगळी होती हे सत्य तुझ्यापासून लपवलं, पहिल्या मुलीच्या डिलिव्हरी नंतर आशाला आणखी मूलं होणार नाहीत असं डॉक्टरनी सांगितलं. मग आम्ही सर्वानी निर्णय घेऊन तुला एका बाई कडून दत्तक घेतले. आम्ही प्रेमाबरोबर चांगले शिक्षण आणि संस्कार तुला दिले पण जर कुठे कमी पडलो असू तर देव आम्हाला क्षमा करो. आपल्या घराण्याच्या रीती भाती, पूजाअर्चा तू व्यवस्थित पार पाडशील ही खात्री आहे.
पारसवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी काळजी घे. तुझी बायको स्मिता खरंच गुणी आहे. अशी बायको मिळाली हे तुझं नशीब..
तुझे – आजोबा आणि आजी “
सगळेजण अवाक होऊन मनोहररावांकडे पहात होते.
त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. ते हमसाहमशी रडू लागले.
सर्वात प्रथम बहिण उठली. मनोहररावांना जवळ घेऊन म्हणाली, “माझं तुझ्यावरच प्रेम तिळभर सुध्दा कमी झालं नाही ऐकून.”
पारस उठून उभा राहिला “. आय डोन्ट केअर“ असं म्हणून तो बाहेर निघून गेला.
वकिलसाहेब उठले आणि नं बोलता आणलेले कागद खाली ठेऊन निघून गेले.
स्मिता म्हणाली..“ चला, जरा विश्रांती घ्या. सकाळपासून दमला आहात.”
स्मिता त्यांना खोलीत घेऊन गेली.. आणि म्हणाली, “काही ही झालेलं नाही, उगाच का त्रास करून घेत आहात स्वतःला” स्मिता त्यांच्या डोळ्यात पाहून म्हणाली “अहो मला तुमचा अतिशय अभिमान वाटतो. मी भाग्यवान आहेमकी मला तुमच्यासारखा सद्गुणी नवरा मिळाला. आता आज वाचलेल्या आजींच्या पत्राबद्दल म्हणाल तर ही गोष्ट आजींनी मला आपले लग्न होण्यापूर्वी आजींनी सांगितली होती आणि नंतरच माझा लग्नाला होकार त्यांनी स्वीकृत केला त्या गोष्टीबद्दल इतक्या वर्षांनी मी काय आश्चर्य व्यक्त करू?”
मनोहरराव स्मिता च्या डोळ्यात पहातच राहिले त्यात त्यांना खूप प्रेम दिसलं जे त्यांनी पूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं…
समाप्त
©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
सदर कथा लेखिका सौ. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.