बंध प्रितीचे

©️ शोभा वागळे
आताच पाऊस पडून गेला होता. सगळीकडे पाणी साचलेले होते. म्हणजे मोठी सर येऊन गेलेली असावी. रेल्वेतून प्रवास करताना काही जाणवले नाही. पण स्टेशनवर उतरल्यावर समजले.
गावच्या स्टेशनवर रात्रीच्यावेळी सामसूम असते. रमेश स्टेशनच्या बाहेर आला. घरी जायला कुणाची सोबत मिळते का बघू लागला, पण कोणी नजरेला आले नाही.
रात्रीचे आठ  वाजून गेले होते. त्याने आई बाबांना फोन लावायचा प्रयत्न केला पण लागतच नव्हता. त्याची पंचाईत झाली होती. एवढ्यात “साहेब कुठे जायचे आहे?” असे म्हणून कंदील घेतलेला एक इसम त्याच्या समोर आला.

अरे, ह्या माणसाला आपण कसे बघितले नाही? कुठून आला हा?, असा विचार त्याच्या मनात आला. त्या माणसाने कंदिलाची वात मोठी करून तो वरती धरला त्या बरोबर दोघांना एकमेकांचे चेहरे दिसले. 
“कोण रे, दादासाहेबांचा रमेश ना तू?” “हो हो, पण आपण कोण?” रमेशने विचारले.
“अरे मी परसू, रंजूचा बाप”
“हं, आलं आता लक्षात. बऱ्याच वर्षाने आलो गावी. पण काका तुम्ही मला बरोबर ओळखले, कसे काय?” 

“आज रंजू गेली होती तुमच्याकडे तेव्हा आईसाहेबांनी सांगितले तुला घेऊन यायला. पाऊस आल्याने मला यायला उशीर झाला. चल मी बैलगाडी आणलीय, ये.” असे म्हणून परसूने त्याची बॅग आपल्या हातात घेतली व रस्त्यावर असलेल्य बैल गाडीत ठेवली.
बैलांच्या गळ्यातल्या घंटेचा किणकिण आवाज आणि चाकांच्या खडखड आवाजाने गाडी रस्ता कापू लागली. परत पाऊस पडू लागला. परसू बैलांना पळवू लागला. नाही म्हटले तरी परसूचे घर येई पर्यंत पावसाचा जोर वाढला. 
“आपण माझ्या घरी जाऊ मग पाऊस थांबल्यावर घरी सोडतो तुला”,परसू रमेशला म्हणाला आणि दोघे ही चिंब भिजून परसूच्या घरात शिरले.

दार ठोठावताच परसुच्या बायकोने दार उघडले. साहेबांच्या मुलालाही घरी घेऊन आल्यामुळे तिची खूप धांदल उडाली. रमेशचे कपडे पूर्ण ओले झाले होते. बदलणे भागच होते. त्याने बॅग उघडली, कपडे घेऊन बाथरूमच्या दिशेने गेला.
तेवढ्यात रंजनाने त्याला थांबवून गरम पाणी दिले. त्याची आंघोळ उरके पर्यंत तिच्या आईने भात व मासे तळुन तयार ठेवले होते. परसूने ही कपडे बदलले आणि त्याला सांगितले
“मी आईसाहेबांना तू इथं असल्याचा निरोप पाठवलाय. पाऊस थांबला तर पोचवतो, नाहीतर उद्या सकाळी.”  

हे कळल्यावर त्याला हायसे वाटले. तळलेल्या माश्याचा वास पसरला होता. त्याची भूक चांगलीच चाळवली. एवढ्या दिवसांनी मासे खायला मिळाले वरून वेगळ्या पध्दतिचे! त्याने जेवणावर ताव मारला. पावसाने रौद्ररुप धारण केले होते. सोसाट्याचा वारा ही वहात होता. झाडे ही कोलमडुन पडत होती. परसूकडे राहिल्याने बरे झाले होते. निरोप देऊन ते पोरगं ही परतलं. वाटेत झाडे पडल्याची बातमी त्या पोरानेच दिली होती.
भरपेट जेवणाने व थकल्यामुळे रमेशचे डोळे जड झाले होते.

रंजनाने आपल्या बाबांचे व रमेशचे अंथरुण बाहेर घातले व ती आणि आई आत गेली.
परसूने कंदिलाची वात बारीक केली व सगळे गाढ झोपी गेले. सकाळचे सहा वाजले होते. रमेशला जाग आली. पहिल्यांदा त्याला कळलेच नाही तो कुठे आहे. खडबडून तो उठून बसला.
मग रात्रीचं सगळं त्याला आठवलं. तो उठून बाहेर आला. बाहेर सगळं हिरव गार दिसत होतं. ते पाहून तो सुखावला. मनात विचार आला, एक कप गरम ‘चा’  मिळाला असता तर!

एवढ्यात चहाचा कप रंजनाने त्याच्या समोर धरला. अरे! ही मनकवडी आहे की काय? काल ही आंघोळीला गरम पाणी मिळालं असतं तर असा विचार करायला आणि तिने आणायला एकच गाठ पडली होती.
त्याने ‘सुप्रभात रंजना’ म्हणून तिच्याकडून कप घेतला. तिने ही त्याला ‘शुभ सकाळ’ म्हटले व ती आत जायला निघाली.

त्यांने तिला थांबवलं. “रंजना तुझा चहा घेऊन ये, खूप बोलायचे आहे तुझ्याशी.” ती हसत आत गेली व स्वतःचा चहा घेऊन आली.
दोघं बाहेर गप्पा मारू लागले.
खरं म्हणजे रजंना व रमेश एकाच शाळेत होते. रजंना पहिलीत व रमेश सातवीत. लहानपणापासून रंजना त्यांच्याकडे जायची. सगळी मुलं खेळतात तशीच खेळायची. सातवी नंतर रमेश मोठ्या शाळेत तालुक्याला गेला. पण त्यांचं खेळणं बागडणं व अभ्यास चालूच होता. रंजनाला अभ्यासात काही अडचण आली तर तिला तो समजाऊन सांगायचा.

रंजनाही नंतर तालुक्याला मोठ्या शाळेत जाऊ लागली. पण रमेशचं कॉलेज सुरू झाले तेव्हा त्याच्या मैत्रित थोडा फरक पडला. रंजनाही दहावीत असल्याने अभ्यासाला लागली. रमेशने इंजिनीयरिंग पूर्ण केले व अजून पुढील शिक्षणासाठी तो फॉरेनला गेला. रंजनाला दहावीत उत्तम गुण मिळाले व तिला शिष्यवृत्ती ही मिळाली.
दादासाहेबांनी पण ती हुशार असल्याने पुढील शिक्षणास तिला मदत केली.
आता तिने बारावीची परिक्षा दिली होती आणि त्याकरता त्याला तिच्याशी बोलायचे होते.

रंजना आता वयात आली होती. परसूची मुलगी असली तरी नाकी डोळी उजवी होती. रंग गव्हाळ आणि लांब लचक केस. कुणाचेही लक्ष जावे अशी ती उठून दिसत होती. आणि अशी सुंदर बालपणीची रमेशची ती मैत्रिण होती.
अभ्यासामुळे मैत्रीत थोडा दुरावा आला होता. आता बारावी नंतर तिला काय करायचे आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते.
“रंजना, पुढे काय करायचा विचार आहे? कुठली शाखा निवडणार.”
“अरे, बारावीचा निकाल तर येऊ दे.” 

“तो येईलच गं, पण तू काही तरी ठरवलं असशील ना? तुझा स्वतःचा निर्णय फार महत्वाचा आहे. दुसरं कुणी काही सांगत असलं तरी आपण स्वतः आपल्याला जास्त आवडतं तेच करायचं असं मला तरी वाटतं. बघ विचार कर.” 
एवढ्यात परसू चहा पीत पीत तेथे आला.
“अरे रमेश बाबा, लवकरच उठलांत! काय म्हणतेय तुमची अमेरिका? परत जाणार का तेथे?”
“नाही काका परत नाही जाणार पण मुंबईत चांगल्या कंपनीत नोकरी मिळालीय.  पाऊस थांबलाय मी निघतो आता घरी.” 

“थांब. समोरचा गणेश घरी पोचवेल त्याच्या स्कुटर वरून. ये आत, गरमा गरम थालीपीठ खायला.” 
थालीपीठाचे नाव काढताच रमेशच्या तोंडाला पाणी सुटले. न्याहारी झाल्यावर रमेशने सुटकेस उघडून एक पॅकेट रंजनाच्या हाती दिले. एवढ्यात गणेश आला. सर्वाना टाटा करून तो त्याच्या बरोबर निघाला.
रंजनाने ते पॅकेट उघडले तर त्यात अत्तराची बाटली, चॉकलेट्स व तिकडचे खास दागिने होते. 
रमेश घरी पोचला तेव्हा पाऊस पूर्ण थांबला होता व रविराज मध्ये डोकावण्याचा प्रयास करत होता. सकाळ खूपच प्रसन्न वाटत होती.

रमेशला तर कधी आईसाहेबांना भेटतो असे झाले होते. सतत दोन वर्षे तो घरापासून लांब होता.
तो घरी पोचताच त्याची दृष्ट काढून व ओवाळणी करून आईसाहेबांनी त्याला आत घेतले.
आईला नमस्कार करून तो आईच्या कुशीत शिरला व त्याचा सगळा शिण नाहीसा झाला. दादासाहेब ही पुजा करून आले. त्यांच्या ही तो पाया पडला. नंतर त्याच्या गप्पा सुरू झाल्या.
सारे नोकर चाकर ही त्याला भेटून गेले.
रमेशचे घर खूप मोठे होते. म्हणजे एक वाडाच. पुर्वी घरात लोक व नोकर चाकर खूप होते. सगळे एकत्र राहत होते. पण मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय नसल्यामुळे एक एक जण पांगले.

पण सणवाराला सगळे घरी येत. दादासाहेब व आईसाहेब घर व घरचा सगळा कारभार सांभाळत गावीच राहिले.
त्यांचा एकुलता एक रमेश अगोदर मुंबईत नंतर दोन वर्षे अमेरिकेला शिक्षण घेऊन आला. त्याला उच्च पदाची नोकरी ही मिळाली होती. रूजू व्हायच्या अगोदर तो गावी आई वडिलांना भेटायला आला होता. 
रमेश श्रीमंतीत वाढलेला असला तरी त्याची राहणी, वागणूक साधी होती.
दोन दिवसा नंतर दादासाहेबांनी पार्टी ठेवली व त्याप्रमाणे त्याचं आमंत्रणाचे निरोप ही पोचवले होते. घरचे सगळे आता भेटतील म्हणून रमेश खूप आनंदित झाला.

गावातली पार्टी म्हणजे शहरी लोकांसारखी नसते. तर गावी श्री सत्यनारायणाची पुजा घालतात. जवळचे खास व घरचे लोक बोलवतात. नातेवाईकांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या कल्याणाकरता देव पुजा घालून देवाने सगळ्यांचे भले करावे हाच एक उद्देश असतो.
पुजेच्या रात्री भजनी मंडळा कडून भजनाचा कार्यक्रम व नंतर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. सर्वांच्या चहा पाण्याची व्यवस्था ही केली होती.
दुसऱ्या दिवशी माशांचा खास पध्द्तीचा जेवणाचा कार्यक्रम. त्यात वेगवेगळया प्रकारचे मासे व त्यांचे वेगवेगळे पदार्थ एक परवणीच असते.

रमेशचे सर्व नातलग व त्यांची मुले बाळे एकत्र जमल्याने दोन दिवस खूप मजेत व आनंदात गेले. रमेशला लहानपणचे दिवस आठवले. असेच घर भरलेले असायचे. आपण हसलो की घराच्या भिंती, कौले सारे घर ही आनंदित होत असतं.
घरात एक उमदं, प्रसन्नतेचं वातवरण जाणवतं. एक वेगळाच आनंद उपभोगता येतो. तसाच ह्या दोन दिवसात त्याला मिळाला.
त्याला तो आनंद दादामुळे मिळाल्याने त्याने त्यांचे आभार ही मानले. आपल्या मुलाला गावचं आकर्षण असल्याचे त्यांना जाणवले. शहरात जरी नोकरी धंदा केला तरी आपल्या गावाकडे अधुन मधुन येत राहील ह्याची त्यांना खात्री झाली.

रमेशला संपूर्ण गावात फेरफटका मारायचा होता. त्याने दादांना विचारले. दादांनी त्याला परसू व रजंनाला ही बरोबर घेऊन जायला सांगितले. आईसाहेबांनी सगळ्यांचे खाणे पिणे ही परसूकडे दिले.
रमेशचे गावचे दोन मित्र ही त्यांच्यात सामील झाले. भल्या सकाळी सगळी निघाली. गावची शेती, मंदिर परिसरा नंतर ते नदीकडे गेले. नदी म्हटली की गावच्या मुलांना त्यात पोहण्याची इच्छा होते. परसूसकट सगळ्यांनी पाण्यात उड्या मारल्या.
रमेश थोडा घाबरला. त्याला पोहता येत होते पण नदीत पोहणे त्याला अवघड वाटले. सवय नव्हती ना!

पण त्याच्या मित्रांनी त्याला ओढून पाण्यात नेले. हळूहळू भीती कमी होऊ लागली व तो ही पोहू लागला.
काठावर रंजना त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती. तिला ही त्याचे नवल वाटले.
एवढी वर्षे बाहेर असून गावातल्या पोरांसारखा पोहत होता तो. तसे पाहिले तर रंजनाला ही पाण्यात उतरावे असे वाटले होते पण, ती त्यांच्या जेवणाच्या तयारीला लागली.
रमेशने सगळा गाव बघून घेतला व मनात बरेच गावच्या भल्याकरिता मनसुबे रचले.
एव्हाना त्याची व रंजनाची बरीच दोस्ती जमली होती. तिच्या पुढच्या शिक्षणाची काळजी त्याला वाटू लागली कारण तिच्या आईवडीलांना तिचे आणखी शिक्षण नको होते.

रमेश गावी असतानाच तिचा बारवीचा निकाल लागला. त्यात ही तिला ९७% गुण मिळाले. तिचे पालक तिला पुढे शिकवायला तयार नव्हते. पण रमेशने त्यांना समजावले व पुढच्या शिक्षणाकरता तिला पुण्याला कर्वे संस्थानच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला आणि तो स्वतः मुंबईत आपल्या कंपनीत रुजू झाला.
एक दोन महिने होतच असतात तेवढ्यात त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याची जागा मिळाली. राहायला ही कंपनीचे घर मिळाले.
आईसाहेबांना रहावलं नाही. एका नोकराला घेऊन त्या मुंबईला आल्या. सगळा संसार मांडून गणू नोकराला रमेशच्या दिमतीला ठेऊन त्या परतल्या.

परसू व बाकीच्या चार लोकांना हाताशी धरून रमेशने गावात नारळ व नारळाच्या झाडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा कुटीर उद्योग सुरु केला. तिथल्या काही लोकांना ही कामे मिळाली. तो मध्ये मध्ये जाऊन देखरेख करत होता.
दोन चार वर्षे झाली. रजंनाने पदवी घेतली व त्याच बरोबर तिने IAS च्या सगळ्या परिक्षा दिल्या आणि ती IAS ऑफिसर होऊन कोकणात गेली.
जी रमेश व रंजनाने गावाकरता स्वप्ने पाहिली होती ती सफल व्हायची लक्षणे दिसू लागली.
रमेश व रंजनाच्या गावच्या विकासा करता बऱ्याच भेटी गाठी व्हायच्या. आता ती कलेक्टर झाल्याने आपल्या गावाकडे जातीने लक्ष देत होती व त्यामुळे गावाचीही खूप प्रगती झाली.

नदीचे पाणी नळाद्वारे प्रत्येक घरात पोचवले. रस्ते, वीज, गॅस, शाळा, कॉलेज हे सर्वांसाठी उपलब्ध करून दिले, तर शेतकरी लोकांना बी बियाणे, शेतीची अवजारे, खत, पाणी ह्या सगळ्या सुख सोयी झाल्यावर लहान मोठे कारखाने ही उभारले गेले.
रमेश व रंजनाने संपूर्ण गावचे रूपच पालटले. जे लोक गाव सोडून गेले होते ते परत गावी येऊ लागले.
थोड्याशा कालावधीत रमेश व रजंनाच्या कर्तबगारीने त्यांचा गाव नंबर एकचा झाला.
सरकार ने डिस्ट्रिक्ट लेवलवर गावाला पुरस्कार प्रदान केला व रमेश व रंजनाचा ही सत्कार केला.

आईसाहेब लग्नाकरता रमेशच्या कधीपासून मागे लागल्या होत्या. मोठ मोठ्या श्रीमंतांच्या मुली त्याला सांगून येत होत्या. पण तो आईला काहीच उत्तर देत नव्हता.
मग वडिलांनी त्याला विचारले “तुझी कोणी आहे तर तसं सांग.” तरी तो काही बोलला नाही.
खरं पाहिले तर लहानपणापासून त्याला रंजना खूप आवडत होती. सर्व मुलीत तिचं वागणं वेगळं होतं. ती अभ्यासात ही हुशार होती. आपल्या सारखे तिलाही खूप चांगले गूण मिळावे म्हणून तो तिला अभ्यासात मदत ही करत होता.
तिचं जवळ असणं त्याला बरं वाटत होतं. नंतर कॉलेजकरता तो तालुक्याला गेला. त्याचा अभ्यास वाढला. उच्च शिक्षणाकरता मुंबई व नंतर अमेरिकेला गेला. भेटी गाठी बंदच झाल्या होत्या.

तरी बऱ्याच वेळी तो एकटाच तिच्याशी संवाद साधायचा. असे का होते त्याला कळत नव्हते. तिच्या मनात काय आहे हे त्याला माहीत नव्हते आणि तिला विचारण्याचे धाडस त्याच्यात नव्हते.
दोन चार वर्षे गावाच्या विकासासाठी त्या दोघांनी घालवली. कामकाजाकरता दोघं खूप वेळा जवळ आली पण गावच्या विकासाचे ध्येय होते व नितळ मैत्रीच्या नात्याने ते वागत होते.
त्याला तिला विचारावं असे बऱ्याच वेळा वाटले पण संधी मिळालीच नाही. आई सारखी लग्नाची गोष्ट काढते, तेव्हा आपण रंजनाला विचारावं असं वाटलं.

आता दादांनी त्याला विचारले “तुझी कोणी असेल तर सांग”, वाटलं त्यांना सांगावं पण पंचाईत होती. त्याला रंजनाचा कौल माहीत नव्हता. तो जाणून घेण्यास त्याने तिला फोन लावला आणि सांगितले, “एका महत्वाच्या कामासाठी भेटायला तुझ्या ऑफिसमध्ये येतोय.” फोन बंद केला व तो निघाला.
त्याला पाहून तिने विचारले, “का एवढ्या घाईत? फोनवर का नाही सांगितले?”
“थांब मला थोडं पाणी पीऊ दे.” तिने ग्लास त्याच्या पुढे सरकवला.
त्याच पाणी पिऊन झाल्यावर तिने विचारले “हं, बोल आता. काय काम निघालं?”

रमेशने ओठावरून जीभ फिरवली व पटकन बोलला “रंजू, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू तयार आहेस?” त्याच्या ह्या प्रश्नाने ती अवाक झाली.
तिने स्वप्नात ही विचार केला नव्हता रमेश असं काही विचारेल ह्याचा. लहानपणापासूनची मैत्री, वयात येताच कधी प्रेमात बदलली हे तिलाही कळले नव्हते. तिच्या ही मनात प्रेमाचा अंकुर उमलला होता. पण बोलायची, सांगायची सोय नव्हती.
आपल्या वागण्यातुन कुणाला कळता कामा नये म्हणून ती दक्षता घेत होती. ती त्याच्याकडे बघतच राहिली.
“तू करशील माझ्याशी लग्न?”
“का नाही!” ती पटकन बोलून गेली. त्याने तिचा हात पकडला व “थँक्स अ लॉट रंजू” म्हणून किंचीत दाबला. संध्यकाळी भेटू असं सांगून तो घरी गेला. 

रंजनाने ही गोड बातमी आपल्या आईवडिलांना कळवली. त्यांना बरं वाटलं पण शंका आली आईसाहेब मान्य करतील रंजूला!
किती ही शिकली तरी एका नोकराची मुलगी? त्यांना रंजनाची काळजी वाटू लागली.
इकडे रमेश जेवणाच्या वेळी घरी पोचला.
आनंदाचे उधाण फुलले होते. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ प्रमाणे आईने विषय न काढताच तो आपणहुन म्हणाला, “तुम्ही लग्नाचे म्हणत होता ना?” त्या बरोबर आईसाहेब म्हणाल्या, “मग उद्याच मुलीला घेऊन यायचा निरोप पाठवते. संध्याकाळी पाच वाजता, चालेल ना?”

“अग आई, मला रंजनाशी लग्न करायचे आहे.”
“काय?” आईसाहेब जवळजवळ किंचाळल्याच.
“अरे, ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला. दोन घराण्यांचा मिलाप असतो तो. त्यांच कुळ काय! आपले खानदानी घराणे. लोक काय म्हणतील? नाही, हे शक्यच नाही. तिचा विचार तू सोडून दे आणि त्या देशपांडेंच्या मुलीशी लग्न कर. ती आपल्या घराला शोभेल अशीच आहे.”

एवढा वेळ गप्प असलेल्या दादासाहेबांनी तोंड घातले. “रमेश, माझी तुला परवानगी आहे. तू खुशाल रंजनाशी लग्न कर. आम्ही आमची घराणीच कुरवाळत बसलोयं. आमची घराणी व बुध्दीमत्ता आता नाही राहिली आमच्याकडे. आमची प्रतिष्ठा आम्हीच गोंजारायची. ती गड्याची मुलगी असली तरी आज एक नामवंत डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे. ती जर सून म्हणून आपल्या घरी आली तर आपली प्रतिष्ठा, आपल्या घराण्याची इज्जत वाढेलच. इथं वर्ण, जात बघू नका तर माणूस व माणूसकी बघा.” “गावाची तर प्रगती झाली. रमेश, आता रंजनाचा हात पकडून तूझ्या घराची प्रगती कर.” हे दादासाहेबांचे बोलणे एकुन रमेशने त्यांना कडकडून मिठी मारली.

तेव्हा ते त्याच्या कानात बोलले, “लहानपणी तुम्ही खेळत होता ना तेव्हा पासून मी रंजनाला सून म्हणूनच पाहत होतो.” रमेशला आनंदाचा आणखी एक धक्का बसला. 
नंतर रमेश व दादासाहेबांनी आईसाहेबांना नीट पटवून दिले व रमेशच्या मनधरणीने त्यांनी ही मग होकार दिला.
दादासाहेबांनी रंजनाच्या आईवडिलांना बोलवून घेतले. ते लोक दबत दबत आले होते. पण दादासाहेबांनी त्यांना दिलेल्या मानाने त्यांना भरून आले.

थोड्या वेळाने रंजनाला घेऊन रमेश ही आला. सगळ्यांनी एकत्र देवाला नमस्कार केला.
रमेश आणि रंजनाने दोघांच्या आईवडिलांना वाकुन नमस्कार करून आशीर्वाद घेतले.
एकत्र बसून चहापाणी केले. दादासाहेब व परसूकाका पंचांगात लग्न मुहुर्त शोधू लागले.
समाप्त
©️ शोभा वागळे
सदर कथा लेखिका शोभा वागळे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
घुसमट
रेशमी पाश

Leave a Comment

error: Content is protected !!