दीपस्तंभ

© डॉ राजेश शांताराम जोशी
संपदा संजीवनी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाच्या समोर सुन्न बसून होती. आतमध्ये तिचा नवरा सुधीर याची मृत्यूशी झुंज चालू होती. दहा दिवसांपूर्वी झालेल्या एका जीवघेण्या अपघातात त्याच्या मेंदूला जबरदस्त मार लागला होता. तेव्हापासून तो कोम्यातच होता.
डॉक्टरांनीही त्याच्या जगण्याची खात्री दिली नव्हती. त्यामुळे संपदा अधिकच दुःखीकष्टी आणि निराश झाली होती.
गेल्या दहा वर्षातील घडलेल्या घटना संपदाच्या डोळ्यासमोरुन एखाद्या चित्रपटासारख्या सरकत होत्या.

तिचे आणि सुधीरचे अरेंज मॅरेज होते त्यामुळे सगळ्यांच्या पसंतीनेच झालेले लग्न यशस्वी होणारच असे सगळ्यांना वाटत होते. पण एकत्र कुटुंब पद्धतीत संपदाचे निभावेल की नाही याची तिच्या माहेरच्यांना काळजी वाटत होती आणि झालेही तसेच.
संपदाचे सासू-सासरे तसे मोकळ्या मनाचे आणि आधुनिक विचारांचे होते पण तरीही भारतीय संस्कार, सुनेचे वागणे याबाबत त्यांच्या काही माफक अपेक्षा होत्या.
याउलट एकुलती एक मुलगी असल्याने संपदा फारच लाडात वाढली होती आणि स्वतःचे निर्णय ती स्वतःच घेत असे. यावरून सुरू झालेल्या कुरबुरी पुढे मोठ्या भांडणात परिवर्तित झाल्या आणि संपदाने वेगळे राहायचे आणि सासू-सासऱ्यांची कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत असे ठरवले.

सुधीरनेही सुरुवातीला समेट घडवून आणण्याचा थोडा प्रयत्न केला परंतु संपदापुढे त्याचे फारसे चालले नाही. वेगळे राहिल्यानंतर संपदाने सासू-सासऱ्यांशी संबंध पूर्णपणे तोडले. अगदी तिच्या मुलीचा, प्राजक्ताचा जन्म झाला हे देखील त्यांना कळवले नाही. जणू काही तिच्याकरता ते दोघे या जगात नव्हतेच वेगळे राहिल्यानंतर त्यांचे दोघांचे खर्चही बरेच वाढले.
जागतिक मंदीमुळे सुधीरची नोकरीही गेली आणि तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर छोटीमोठी कामे करू लागला, परंतु त्यातून मिळणारे उत्पन्न पुरेसे नव्हते.
संपदा आणि सुधीरचा संसार कसाबसा चालू होता आणि त्यातून अचानक दहा दिवसांपूर्वी सुधीरचा हा असा अपघात. इन्शुरन्सचे पैसे देऊन सुद्धा बराच खर्च झाला होता.

हॉस्पिटल, घर, प्राजक्ता या सगळ्यांमध्ये धावपळ करून संपदा अगदी थकून गेली होती. तिचे आई वडीलही आता खूप थकल्यामुळे मदतीला येऊ शकत नव्हते आणि संपदाच्या वागण्यामुळे सुधीर संपदाला मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकही फारसे जवळ करत नसत.
त्यातून आज सकाळच्या राउंडमध्ये डॉक्टरांनीही फारशी आशा नाही असे सांगितल्यामुळे संपदा गलितगात्र झाली होती.
आता आपण काय करावे, कसे वागावे आणि कोणाची मदत घ्यावी हेच संपदाला समजत नव्हते.
आपण फार अविचाराने वागलो. नको त्या ठिकाणी उगाचच गर्विष्ठपणा, आढ्यता दाखवली आणि का? कशासाठी? आपल्या दुराभिमानापोटी, स्वातंत्र्याच्या वेडगळ कल्पनेपोटी परतीचे दोर आपणच कापून टाकले आहेत, हे तिला कळून चुकले होते.

आता या वावटळीत, संकटाच्या या चक्रव्यूहात आपल्याला एकटीलाच लढावे लागणार या विचाराने तिचे डोके गरगरू लागले. भीतीने तिने डोळे घट्ट मिटून घेतले. पण विचारांचं वादळ इतक्या सहजासहजी शमणार होत थोडचा!
आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेत ती खुर्चीवर बसून राहिली.
तेवढ्यात ” संपदा, संपदा तूच ना? अग काय झालं ग? ” तिच्या खांद्याला थोपटत कोणीतरी विचारत होतं.
“अगं मी तुझी बालमैत्रीण सुनंदा” संपदानं आपल्या चेहऱ्यावरचे हात बाजूला करत बघितलं तिच्याच वयाची, पण हसतमुख, डोळ्यांमध्ये करुणा दाटलेली तिची बालमैत्रीण सुनंदा उभी होती.

” अगं मगाशी तुला बिलिंग काउंटरला बघितले आणि लगेच ओळखलं. पण अगं किती फरक पडलाय तुझ्यात! काय ही अवस्था तुझी! चेहरा काळवंडलेला. डोळे खोल गेलेत आणि किती अशक्त झाली आहेस तू. अगं कुठल्यातरी मोठ्या संकटात आहेस का तू? ” सुनंदानं असं विचारताच संपदाचा बांध फुटला.
सुनंदाला मिठी मारून ती ओक्साबोक्शी रडू लागली.
थोड्या वेळाने तो शांत होताच तिच्या पाठीवरून हात फिरवत सुनंदा म्हणाली “चल, आपण कॉफी घेऊ ” तिथे कॉफी पिताना संपदान तिला आपली सगळी कहाणी ऐकवली.

“अग संपदा, किती बदलली आहेस तू? शाळेत सगळ्यांशी खेळीमेळीने राहणारी, सगळ्यांना मदत करणारी अशी कशी वागलीस? अगं कितीतरी वेळा स्वतः अर्धपोटी राहून तू तुझा डबा द्यायचीस मला तेव्हा आमची परिस्थिती हलाखीची होती. किती आधार वाटायचा मला तुझा. आता या संकटातून तुला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी.
अग तुझ्या संसाररूपी सूर्याला अहंकाराचं ग्रहण लागलं आहे. ते आपण दूर करूया म्हणजे बघ तुझ्या जीवनातला अंधार कसा नाहीसा होतो ते.
आता आधी आपण तुझ्या सासू-सासऱ्यांकडे जाऊन त्यांची माफी मागू, पाय धरू आणि त्यांना इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊ, काही झालं तरी सुधीर पोटचा गोळा आहे त्यांच्या ते मोठ्या मना माफ करतील तुम्हाला बघ तू.” सुनंदा म्हणाली.

मग हॉस्पिटलमध्ये सांगून सुनंदाच्याच कारमधून दोघी तडक संपदाच्या सासरी गेल्या. थोडे रुसवेफुगवे आणि रडारडी झाली, पण थोड्याच वेळात ते सर्वजण एकमेकांना धीर देत, एकमेकांच्या आधाराने हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
आता सगळं व्यवस्थित मार्गी लागेल या आशेवर सुनंदाही घरी परत गेली.
पण नियतीच्या मनात वेगळंच होतं, दोन दिवसांनी ही बातमी आली की सुधीरचं निधन झालं आहे.
सुनंदा लगबगीने संपदाच्या घर पोहोचली तेव्हा बरेच मित्र, नातेवाईक भेटून गेले होते. सुनंदाला पाहून संपदाने हंबरडा फोडला.
तिला शांत कर सुनंदानं धीर दिला. प्राजक्तालाही तिने जवळ घेतलं.

दुःख आणि निराशेच्या गर्तेत असाच एक महिना उलटून गेला आणि एक दिवस संपदानं एका गहन विषयावरच्या चर्चेसाठी सुनंदाला आपल्या सासरी बोलवलं.
सुनंदा संपदाच्या सासऱ्यांच्या तात्यांच्या बंगल्यावर पोहोचली आणि संपदानं आपल्या समस्यांचा पाढाच वाचला.
फ्लॅटचे भाडं दोन महिने थकलं होतं. आता पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा होता. तसेच सुधीरच्या इन्शुरन्सचे दहा लाख रुपये मिळाले होते. पण तेवढ्यावर पूर्ण आयुष्य कस काढायचं आणि प्राजक्ता, तिचं काय ?
त्यावर सुनंदानं फ्लॅट सोडून संपदान बंगल्यावर राहण्यासाठी यावे असं सुचवलं.

संपदानं ते मान्य केलं. त्यावर तात्या म्हणाले “पहिल्या मजल्यावर दोन खोल्या बांधून घेऊ या म्हणजे तुम्हाला स्वतंत्र राहता येईल. “
“तात्या असं बोलून मला लाजवू नका. स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील फरक समजला आहे मला.” संपदा शरमेनं म्हणाली.
“अगं तसं नाही बाळा. आता वर खाली करणं आम्हाला तर जमणार नाही. फक्त तुझ्या हातचं रुचकर जेवण दोन वेळा पाठवून दे म्हणजे झालं. बघ कसे ठणठणीत राहतो आम्ही” तात्या म्हणाले.
सुनंदा कसल्या तरी विचारात गढून गेली होती.
ती एकदम म्हणाली ” आयडिया संपदा तुझ्या हाताला इतकी अप्रतिम चव आहे. तू डबे का नाही बनवून देत?”

“अगं काहीतरीच काय? आईंना आवडेल का या बंगल्यात स्वयंपाकीणीचं काम केलेल? ” संपदा म्हणाली.
” अग अन्नदात्री, अन्नपूर्णेचं काम म्हण” सरबताचे ग्लास आणत संपदाच्या सासूबाई, कुसुमताई म्हणाल्या.
” मग ठरलं तर” तात्या म्हणाले.
” अगं सुनंदा मी तात्या, कुसुमताई आणि प्राजक्ताला इथे एकट बंगल्यात सोडून नाही जाणार डबे द्यायला” संपदाला अजून धीर होत नव्हता.
” अग वेडाबाई, तू फक्त स्वयंपाक कर. कच्चा माल आणणे आणि डबे पोहोचविण्याचं काम आमच्या ऑफिसमधला शिपाई करेल. त्याला बनवू तुझा बिजनेस पार्टनर. मग झालं ना शेफ बाई तुमच्या मनासारखं? ” सुनदानं हसत विचारलं.

संपदानं होकार दिला. तिचे डोळे भरून आले.
“अगं आता सगळं व्यवस्थित होईल बघ ” कुसुमताई म्हणाल्या.
” हो आई ” संपदा म्हणाली ” सुनंदा, तुझे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीये बघ. एखाद्या जहाजाच्या कप्तानाने उन्मत्तपणे आपले जहाज भर समुदात लोटावे तसे मी माझ्या संसाराच्या बाबतीत केले होते. पण या वादळी समुद्रात हेलकावे खात बुडू पाहणारे माझे संसारतारु किनाऱ्यावर सुखरूप आले ते केवळ तुझ्यामुळे.. तू आमच्याकरिता एक दीपस्तंभ आहेस दीपस्तंभ ”
संपदाने असे म्हणत सुनंदाला आवेगाने मिठीच मारली.

दोघींच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या.
तात्याही डोळे पुसत म्हणाले ” होय. खरं आहे. तू आहेस वादळी समुद्रात भरकटलेल्या जहाजांना मार्ग दाखविणारा दीपस्तंभ.”
© डॉ राजेश शांताराम जोशी
सदर कथा लेखक डॉ राजेश शांताराम जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
बंध प्रितीचे
जाणीव

Leave a Comment

error: Content is protected !!