कोंडी

© मृणाल शामराज.
सगळं आभाळ निळ्या काळ्या ढगानी  आक्रसून गेलं होतं. वातावरणात एक कुंदपणा भरला होता. पंखा डोकयावर जोरात गरगरत असतानाही जाणवणाऱ्या दमटपणाने यशोधरा जागी झाली. डोळे जडावलेलेच होते.
अळोखेपिळोखे  देतं ती उठली. खिडकीचे  पडदे सारत ती पुटपुटली, अग बाई, पाऊस येणार वाटतं.
तिने पंख्याच बटण बंद केलं नी चहा ठेवला. चहाशिवाय हा जडपणा जाणार नव्हता.
सवयीचा परिणाम होता तो… आधणात तिने आलं ठेचून टाकलं. थोडा गवती चहा टाकला. त्या नुसत्या वासानी तिला तरतरी आली.

परत बाहेर येऊन ती सोफ्यावर बसली. मस्त वाफाळलेला चहा घेतं तिनी पंकज उधासच्या गझलं  लावल्या.
ते कुंद वातावरण, त्या गझलची आर्तता, तो वाफाळलेला  चहा तिच्या वृत्ती पुलकित झाल्या.
नवरा टूरवर  गेला होता, आणि मालविका तिची लेक, ऑफिसला.
आज ती निवांत होती. शेल्फ मधून तिने रणजित देसाईची स्वामी कादंबरी काढली आणि ती त्यात रमून गेली.
अचानक अंधार जाणवला म्हणून तिने खिडकीतून बाहेर डोकवलं तर पाऊस धोधो कोसळत होता. खिडकीच्या फटीतून दोन थेंब तिच्या अंगावर आले. नकळत ती  शहारली.

शाळा नुकतीच सुटली होती. ती एवढीशी मुलं एका हातात छत्री, एका हातात दप्तर घेऊन एकमेकांवर पायांनी पाणी उडवीत चालली होती. कुणी आईचा हात सोडून पळत होतं तर कोणी धुपकन पडत होतं. तिला हसू फुटलं. शाळेचे दिवस आठवले.
बघता बघता पाऊसाचा जोर वाढला. त्यानं रुद्ररूप धारण  केलं. त्याचं तांडव जोरात चालू झालं. लोक अडोश्याला उभं राहून पाऊस कमी व्हायची वाट बघत होते. अंधारू लागलं तशी यशोधरा आत आली.
साडेसहा झाले होते. तिने देवापुढे दिवा लावला. चंदनाची उदबत्ती साऱ्या घरभर दरवळत  होती. स्वयंपाक तयार होता. सव्वा सातच्या सुमारास मालविका येईल तेव्हा गरम भात लावू असा विचार केला आणि दूरदर्शन चालू केला.

सातच्या बातम्या सुरु होत्या. धुवंधार  पडणाऱ्या पाऊसाचं वर्णन सुरु होतं. गच्च  भरलेल्या गाड्या, दिवे गेल्यामुळे पडलेला अंधार, पाण्याखाली गेलेले रेल्वेमार्ग, मोबाईलच्या लाईटच्या प्रकाशात त्यातून चालणारे लोक.. ती मटकन खालीच बसली. आता मालविका घरी कशी पोचेल हा यक्षप्रश्न  तिला पडला.
आता मात्र ती बेचैन झाली. परत खिडकीजवळ जाऊन तिने अंदाज घेतला. पाऊसाचं थैमान चालूच होतं. मिट्ट काळोख होता.
बस गर्दीनी भरल्या होत्या. चारचाकी गाड्या पाण्यात अडकल्या होत्या. त्या काळोखात या वाहनांचे  दिवे टक  लावून बघत असल्यासारखं वाटतं होतं. सगळा रस्ता गाड्यांनी जाम झाला होता.
आत बाहेर, आत बाहेर तिच्या जीवाला चैन नव्हतं. काय करावं तिला कळेना. मालविकाचा फोन लागत नव्हता.

तिने नवऱ्याला फोन केला. मी मीटिंग मध्ये आहे. नंतर फोन करतो, त्याचा मेसेज आला. ती दरवाजा उघडून बाहेर डोकावली तर शेजारच्या बर्वेकाकूंच्या दरवाजाला कुलूप होतं. दुपारीच त्या मुलाकडे गेल्या होत्या. तिचा धीरच खचला.
कालच मालविका बरोबर तिच्या लग्नासबंधी झालेली वादावादी आठवली.
का बरं आपण तिच्याशी वाद घातला. नसेल करायचं तिला एवढ्यात लग्न. तिला उशिरा सुचलेलं शहाणपण  होतं हॆ..
डोळे नकळत वाहू लागले. एवढ्यात तिला निहिरा आठवली, मालविकाची मैत्रीण.
तिनं तिला फोन लावला पण तो ही लागत नव्हता.

दूरदर्शनवर त्याच बातम्या पुन्हा पुन्हा सांगत होते. सहज आवाज जाणवला म्हणून तिनं बाल्कनीत डोकावून पाहिलं.
तिथं वळचणीला पारव्याचं घरट  होतं. त्या धुम्म पाऊसात ती पिल्लं अंग चोरून बसली होती.
पंखाचा फडफडात होतं होता. त्याची आई पाऊसात कुठे अडकली होती काय माहित.. ती अजूनच व्याकुळ झाली.
दिवे गेले होते. बंद दाराआड बसलेल्या तिला जिन्यावरून कोणी गेलं तरी जाणारी पाऊल आधार देऊन जातं होती.
तेवढ्यात फोन खणखणला. तिनी लगबगीने तो उचलला.

तो निहिराचा होता. “काकू, काकू, ऐकू येतंय का?”
ती मोठ्या आवाजात म्हणाली, “अग, कुठे आहात तुम्ही?? मालविका कुठेय??”
“काकू, आम्ही लवकरच निघालोय. खूप पाणी साचलंय. तिचा फोन लागत नाहीये. काळजी करू नका. पोचेलच ती.”
ती धाय मोकलून रडू लागली. घरातला तो अंधार तिला अजून भेडसावू  लागला.
तशीच ती उठली आणि देवाजवळ जाऊन बसली. समईचा तो मंद प्रकाश तिला धीर देऊन गेला. तिनं कुलदेवतेला साकडं घातलं. उंबरठ्यावर  भांड उपड घातलं.

रामरक्षा म्हणत ती इकडेतिकडे फेऱ्या घालू लागली. पारव्यांची फडफड  तिची हुरहूर वाढवत होती.
इकडे मालविका कितीतरी वेळ बसमध्येच बसली होती. तुडुंब भरलेल्या पाण्यात बस सरकूच शकत नव्हती.
कंटाळून ती खाली  उतरली. जसा रस्ता दिसेल तशी चालू लागली. भुकेनी  जीव कासावीस झाला होता. कपडे अंगाला गच्च चिटकून बसले होते. छत्री हातात असून सुद्धा चिंब भिजली होती ती. केसातून पाणी झिरपत होते.
ती काळोखातून वाट काढत तशीच पुढे निघाली होती. रस्त्यावर असलेली टवाळखोर मुलं तिच्या मागे लागली. गलिच्छ हावभाव करत, घाणेरडी गाणी म्हणत तिच्या अंगावर पाणी उडवत ती तिच्या मागे मागे चालली होती.

तिला सुचेना काय करावं.आजूबाजूनी लोकं चालत होती, पण प्रत्येकजण आपल्याच विवंचनेत.
जवळून चालणाऱ्या एका चाचाला ते जाणवलं. एकदम त्याची शबनमच  त्याच्या डोळ्यापुढे आली.
“ए, क्या कर रहे  हॊ !! तुम्हे कोई माँ, बहेन नही है क्या?” तो करवदला.
त्याचा आवाज ऐकून चार पाचजण  पुढे आले. त्या मुलांनी काढता पाय घेतला. तिचे डोळे पाणावले होते. तिने कृतज्ञतेनी चाचांकडे पाहिलं.
त्यांच्या डोळ्यात तिला माया दिसली. त्यांनी विचारलं, “बेटा, कहा जाना है.?”
तिनं सांगितल्यावर ते म्हणाले, “डरो मत. मैं उधर ही जा रहा हूं, तुम्हे छोड दूंगा.”
ती चालतच होती.

आता चिरपरिचित परिसर तिला दिसू लागला. तिला हायस वाटलं. एकदम तिच्या लक्षात आला की आपण आईला कळवलं नाही. किती काळजी करत असेल ती, त्यात बाबा पण इथे नाहीयेत. तिनं फोन लावला. पण रेंज नव्हती.
लहानपणी शाळेतून यायला उशीर झाला तर किती बेचैन व्हायची ती.. आता तिची पावलं पाण्यातून वाटा काढत जलद निघाली.
दिवे आले. आता यशोधरेच्या जीवात जरा जीव आला.
बातम्यात सांगत होते, पाणी ओसरतय, वाहतूक धिम्या गतीने सुरु झालीये. आता तिचे डोळे दाराकडे लागले. ती एकटक तिकडे बघत होती.

मालविका बिल्डिंगच्या खाली पोचली. तिने चाचाना  घरी चलायचा  आग्रह केला. पण त्यांनाही घरी जायची  घाई होती. परत यायचा वादा करून ते गेले.
आज तिला अल्लाह मध्ये ईश्वर दिसला होता.. ती घाईघाईने जिने चढून वर आली.
आईला बघताच ती तिच्या गळ्यात पडली. मायलेकी दोघीही रडत होत्या.
अश्रू आवरत यशोधरा म्हणाली, “जा हात पाय धु. देवाला नमस्कार कर. मी गरम भात टाकते तोवर…”

पाऊस आता थांबला होता आभाळ स्वच्छ झालं होतं.
स्वयंपाकघराकडे वळत होती तेव्हा परत आवाज ऐकू आला, म्हणून ती बाल्कनीकडे वळली., तर पिल्लं आईला बिलगली  होती, तिच्या पंखाच्या  उबेत होती. ती समाधानाने हसली, आत वळली. तिथे तिचं पिल्लू वाट बघत होतं आपल्या आईची..
© मृणाल शामराज.
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
दीपस्तंभ
जाणीव
त्यांचं काय चुकलं??

Leave a Comment

error: Content is protected !!