तू सुखकर्ता

©® मृणाल शामराज
खणं.. जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून सुलभा बाहेर डोकावली. टीपॉय वर ठेवलेल्या तांब्यावरचं भांड खाली पडलं होतं.
“अरे, सावकाश जरा.. किती घाई करशील?”
“अगं आई, interview ला जायचंय ना, माझं लकी पेन कुठे ठेवलंय? सापडतं नाही आहे. शोधतोय.”
“अरे, त्या टेबल वर बघ तिथेच असेल. बॅग भरलीस ना नीट?
सगळी कागदपत्र, सर्टिफिकेट्स घेतलीस ना?”

“हो ग, आई. लहान का आहे मी ?”
“अरे, तुझे बाबा असते तर, कशाला मला हॆ सर्व बघायला लागलं असतं?” सुलभाच्या डोळ्यात पाणी आलं.
सौमित्र पण हळवा झाला.
दोन वर्ष झाली.
गणपतीचं होते तेव्हा..
करोनाच सावट सगळीकडेच होतं.

शुल्लक सर्दी तापाचं निमित्त झालं आणि करोनच्या विळख्यात हॆ पान अलगद गळून पडलं.
तो इतका जबर धक्का होता ह्या माय लेकराला..
नेहमीच हसरा, खेळकर असणारा आपला बाबा आपल्यात नाही ही कल्पनाच सहन होतं नव्हती त्याला.
इतकी वर्षे गणपतीची श्रद्धेनी भक्ती करणारा, अथर्वशीर्षाची आवर्तनं केल्याशिवाय पाणी ही तोंडात न घेणारा माझा बाबा, ऐन गणपतीतच जावा..
का?
असं का.देवा?

असं म्हणतात चांगलं वागलं की चांगलं होतं. माझे बाबा तर किती सज्जन होते, तरी तू त्यांना घेवून गेलास.
काय उपयोग रे तुला सांगून! तू तर मातीचा देव.
“आई, बस नी जाणार आहे मी. उदया interview आहे.
आजच जातो. काकाकडे राहीन रात्री.
सकाळी साडेदहाची बस आहे. नंतर सव्वाअकराची. जी मिळेल तिनं जाईन.”
“पोहे केलेत. खाऊन घे. तुझ्या आवडीचे तळणीचे मोदक केलेत काल.”

“वा.. मस्तच की. मोदक खातो पण मला पूजा करायला मात्र सांगू नकोस.”
“अरे, देवावर का राग धरतोस !
ज्या गोष्टी होणार असतात त्या कशा ही होतात.. आणि होणार नसतील तर त्या आपसूकच पुढे ढकलल्या जातात.
आपला जन्म, मृत्यु सगळं ठरलेलं असतं रे बाळा.
सगळं आपल्या हातात असतं तर त्याची आठवण आपण काढली असती का?”
“नाही, आता तू माझी कशी ही समजूत काढ. मला हॆ पटणार नाही.”

सौमित्रनी भरभर सगळं आटोपलं.
“निघू का आई..?”
“अरे सोन्या, देवाला नमस्कार कर ना.”
आई, तू म्हणजे,
त्यानी नाईलाजाने देवाला हात जोडले.
सुलभानी त्याच्या हातावर दह्याची कवड देतं म्हटलं, “यशस्वी भव.”

सौमित्र चौकात आला.
सगळीकडे गजबज हॊती. चौक मंडपानी सजला होता.
सुरेल आवाजातली गणपतीची गाणी वातावरण प्रसन्न करत हॊती.तो लोभस गणराया सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं होता.
एकीकडे आरतीची गडबड चालली हॊती.
सौमित्र.. कुणीतरी बोलवतय म्हणून त्यानी मागे पाहिलं.

आदित्य, त्याचा घनिष्ठ मित्र त्याला बोलवत होता.
“अरे, निघालास का?”
आदित्य आणि तो लहानपणापासूनचे मित्र.
एका बाकावर बसणारे. आता पर्यंत एकत्रच. सगळी सुखं दुःख एकमेकांना माहिती असणारे.
त्यामुळे उदया interview आहे आणि सौमित्र मुंबईला जाणार आहे हॆ आदित्यला माहिती होतं.
“अरे.. आरतीची वेळ झाली आहे. थांब ना थोडा.”

“बस चुकेल माझी..”
“सौमित्र, तुझ्या भावना मला माहिती आहेत. पण तू थांबावंसं आरतीला असं मला मनापासून वाटतंय.
थांब ना यार.. प्लीज.”
सौमित्रला नाही म्हणवेना.
तो थांबला.
आरती सुरु झाली.
तो जाणीवपूर्वक गणपती कडे न बघतच आरती म्हणत होता.

“गणपती बाप्पा मोरया..” गजर झाला.
सौमित्रला बाबांची खूप आठवण आली. त्याच्या काळजात कालवलं.
गणपतीत दहा दिवस बाबा इथेच असायचे.
या मोरयावर त्याचा अगाध विश्वास. आरती करतांना तर भक्तीभाव त्यांच्या डोळ्यातून नुसता ओसंडून वहात असे.
“बाबा.. बाबा..” त्याचं लक्ष आता मूर्ती कडे गेलं. आपसूकच त्याचे हात जोडले गेले.

गणराज आपल्याकडे आश्वासक बघतोय असं वाटलं त्याला.
“हा घे रे प्रसाद.”
“आदित्य, निघतो रे. बस चुकेल माझी.”
“All the best मित्रा. सांभाळून जा.”
सौमित्र बसस्टॅड वर पोचला.
नुकतीच बस स्टॅन्ड बाहेर पडताना दिसली.
थांबा, थांबा म्हणे पर्यंत बस स्टॅन्ड च्या बाहेर पडली.
‘हट.. गेली बस.काय पण हा आदित्य. आता थांबावं लागेल काही वेळ.’
दुसऱ्या बसनी तो काका कडे पोचला.

सकाळी interview ला जायचं म्हणून गडबड हॊती.
पेपर वाचण झालं नाही.
Interview खूपच छान झाला. आत्मविश्वासानी सगळी उत्तरं त्यानी दिली.
लवकरच कळवतो.. असं त्यानी सांगितल्यावर बहुतेक ही नोकरीं आपल्याला मिळेल ह्या कल्पनेनी तो खूष झाला.
उगाचच टेन्शन घेतलं होतं आपण, तो पुटपुटला.

घरी आल्यावर काकू म्हणाली, जेवून जा..
तीच होतं होतं, तोपर्यंत सौमित्रनी पेपर वाचायला घेतला.
अरे.. हॆ काय?
सातारा मुंबई बसला भीषण अपघात. तो सावरून बसला आणि पुढंच वाचू लागला.
अरे, ही तर आपण येणार होतो तिचं साडेदहा ची बस..
त्यानी त्या बसचा फोटो पाहिला आणि क्षणभर शहारा आला त्याच्या अंगावर.

बापरे, काय हॆ..आदित्य, थँक्स यार.. मला थांबवलंस..
काय झालं असतं माझं? आणि काही झालं असतं आपलं तर? आई..
डोळ्यासमोर आईचा चेहरा आला त्याच्या.
आई म्हणाली ते पटतंय आता.
जन्म मृत्यु काही आपल्या हातात नसतो.
गोष्टी होणार नसतील तर त्या काहीतरी कारणांनी पुढे ढकलल्या जातात.
तो परत निघाला.

तो पोचेपर्यंत संध्यकाळ झाली हॊती.
आदित्य मंडपातच होता. दुरूनच त्याला बोलवत सौमित्र म्हणाला, “आलो रे मी. येतोच दहा मिनटात. आरतीला थांबा माझ्यासाठी.”
आदित्यनी आ वासून पाहिलं त्याच्या कडे.
थोडा विचार केला आणि हसून म्हणाला..
असं झालंय तर..
सौमित्र लालचुटूक जास्वंदीचा हार घेवून आला.

सुखकर्ता.. दुःखहर्ता.. आरती सुरु झाली.
आज सौमित्र गणपतीच्या डोळ्यात बघून आरती म्हणत होता.
तिथं त्याला मिस्किल भाव दिसत होते,
चुकलेलं लेकरू परत भेटल्याचे.
त्यानी आदित्यला कडकडून मिठी मारली.
मित्रा..
दोघं आपसूकच मोठ्यानी म्हणाले..
मंगलमूर्ती मोरया..
बाप्पा मोरया..

©® मृणाल शामराज

सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!