कुछ तो लोग कहेंगे

©अर्चना अनंत धवड
“काय हे बाबा पण ना अगदी शरमेने मान खाली घालायला लावतात. काय गरज होती त्या मंदिरात जेवायला जायची ?” घरी आल्या आल्या चिडून अजय बोलू लागला.
“अहो, गेले असतील प्रसाद म्हणुन एखाद्या वेळी” अदिती त्याला समजावीत म्हणाली.
“नाही ना. तो निनाद म्हणत होता…. काय रे अजय… तुला शोभते का….. तुझे बाबा रोज संध्याकाळी मंदिरात जेवायला जातात “

आदितीचे पण डोके फिरले परंतु स्वतःच्या भावांनावर ताबा ठेवत अजयला शांत करीत ती बोलू लागली “अहो, तुम्ही शांत व्हा… बसा मी पाणी आणते” असं म्हणत ती आत गेली.
फ्रीझमधून बॉटल काढत मनात विचार करू लागली ” किती हा विचित्रपणा ? जेवायला या तर येत नाही अणि आमची बदनामी करतात. लोक काय म्हणत असतील आमच्याबद्दल ? म्हाताऱ्या आईवडिलांना सांभाळत नाही.. मुलापेक्षा सुनेलाच दोष देतात लोक” तिने त्याला पाणी दिलं. त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाली, “शांत व्हा.. मी कडक चहा आणते.”

तिने गॅसवर चहा ठेवला आणि विचार करू लागली. तिचं मन गतस्मृतीत गेलं. अजय अणि अदिती डॉक्टर दाम्पत्य. नोकरी निमित्त सासू सासरे मुंबईला रहायचे. दोन नणंदा. एक विवाहित अणि एक अविवाहित.
अदितीचं नुकतच MBBS झाली आणि  डॉक्टर असलेल्या अजयशी अदितीचे लग्न झाले. पोस्ट ग्रॅज्युएट करण्यासाठी प्रवेश परीक्षा देऊ लागली . त्यादरम्यान मुलगा झाला. मुलगा सहा महिन्याचा असतांना MD साठी प्रवेश घेतला.

कॉलेज सुरू झालं तेव्हा मुलगा सहा महिन्याचा होता. सासुबाईनी स्पष्ट सांगितले की मला नाही जमणार बाई बाळाला सांभाळणे. तू पाळणाघरात ठेव. MD सारख्या अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी नाकारणे शक्य नव्हते .काय करायचं असा मोठा प्रश्न अदिती समोर होता.
बाळाला पाळणाघरात ठेवायचा एक पर्याय होता  परंतु कधी कधी रात्र पाळी असायची.तेव्हा कसे करावे असा एक प्रश्न तिच्या मनात उपस्थित होत होता .मग तिने मुलाला आईकडे नागपूरला ठेवायचं ठरविलं .

सहा महिन्याच्या बाळाला सोडून जाताना तिला  किती वेदना होत असेल याची कल्पना न केलेली बरी पण तिला तिच्या करिअरसाठी हे करणं भाग होतं. सहा महिन्याच्या मुलाला आईकडे नागपूरला ठेवले.
ती नेहमी आईशी फोनवर बोलायची. आई कौतुकाने फोन मुलाच्या कानाला लावायची. मुलगा बोबड्या बोलत फोनवर आई आई करायचा. तिला फार भरून यायचं.
इतक्या लांब ती नेहमी नेहमी बाळाला भेटायला येऊ शकत नव्हती. सहासात महिन्यानी ती आईच्या घरी यायची.
आदितीची आई म्हणायची “बघ शोनू, तुझी आई आली”

मुलगा तिच्याकडे न जाता फोनकडे धावायचा. त्याला फोन म्हणजेच आई वाटायचे. सगळे हसायचे तिला मात्र खूप वेदना व्हायच्या.
आपलं बाळ आपल्याला ओळखत नाही याचं  फार  वाईट  वाटायचं. मनात विचार करायची सासूबाईने सांभाळलं असतं तर? तर मला बाळाचा विरह सहन करावा लागला नसता.
तिचं शिक्षण झालं. तिला एका खाजगी दवाखान्यात नोकरी लागली..मुलाला घरी घेऊन आली परंतु सासूबाईंनी ठाम सांगितलं की मला नाही जमणार मुलाला सांभाळणे. 
तिचा मुलगा पाळणाघरातच वाढला.

नंतर अदितीला नागपूरला नोकरीं लागली. नागपूरला सासऱ्यांच्या दोन बेडरूमचा फ्लॅट होता. अजय अणि अदिती नागपूरला स्थाईक झाले. सासरे पण निवृत्त झाले होते. सासू सासरे पण नागपूरला राहायला आले.
नणंद मुंबईलाच नोकरी करायची. अदितीच्याच वयाची पण अविवाहित.
नागपूरला आले खरे पण नातवंडाची जबाबदारी नकोच होती. आता मुलगा मोठा झाला होता. मुलगी छोटी होती. आता ही तेच.
मला नाही जमत बाई मुलांना सांभाळणे. पाळणाघरातच ठेव. कारण सासूबाईंना मुंबईला मुलीकडे वरचेवर जायचे असायचे. सासर्‍यांची  जबाबदारी अदितीवर टाकून त्या सहा सहा महिने मुलीकडे राहू लागल्या. अदितीची मुलगी कधी अदितीच्या माहेरी तर कधी  पाळणाघरात. अशीच मोठी झाली.

अदितीला आता घर छोटं पडायचं. अदितीने नवीन घर घेतले. सासू सासऱ्यांना खूप म्हटले सोबत चला कारण दोन्ही घरचा खर्च त्यांनाच (अदिती अणि अजय) करावा लागणार होता. सासऱ्यांना दुसरे मिळकतीचे साधन नव्हते आणि निवृत्तीवेतन पण नव्हते
सासूसासरे आदितीसोबत यायला तयार नव्हते.
ते म्हणाले आम्ही इथेच राहणार. महिन्याला ठराविक रक्कम सासऱ्यांच्या खात्यात टाकायचे ठरले. अदिती आपल्या कुटुंबासोबत नवीन घरी शिफ्ट झाली. घर थोडं लांबच होत .

आता मुलं मोठी झाली होती. सासूबाई मुलीकडे गेल्या की सासरे अदितीकडे जेवायला यायचे. कधी त्यांना यायचा कंटाळा आला तर अजय डबा पोहोचवायचा. अदितीचा मुलगा पण मोठा झाला होता. अजयला वेळ नसला की कधी तो पण डबा पोहचवायचा.
आता अदितीचा मुलगा बारावीला होता .अदिती सासूबाईला  म्हणाली, ” आई, परीक्षेदरम्यान या घरी रहायला. आम्ही दोघेही घरी नसतो.  मुलाला थोडं बरं वाटेल. अभ्यास करताना एकट वाटणार नाही “.
” नाही बाई.  तुम्ही गेले की मला एकटीला करमत नाही “.सासूबाई एकदम झटकल्यासारखं म्हणाल्या.

आदिती मनात म्हणायची, मुलीकडे  सासर्‍यांना एकटे सोडून सहा सहा महिने राहतात तेव्हा नाही का यांना एकटे वाटत ? सासूबाई जास्तीत जास्त काळ मुलीकडेच राहायच्या.  त्यामुळे सासरे एकटेच राहायचे  . 
अदिती सासऱ्यांना म्हणायची  एकटे राहण्यापेक्षा आमच्याकडे या रहायला तर ते त्यालाही तयार नाही व्हायचे  कारण त्यांचा दिवस सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू होत नाही अणि अदितीकडे दिवस सहा वाजता सुरू होतो. त्यांना आपली दिनचर्या डिस्टर्ब करायची नसायची.

आताही सासूबाई मुलीकडे गेलेल्या होत्या . आता आदितीचा मुलगा बारावीला होता अणि डबा नेण्यात आणण्यात जवळपास एक  तास जातो अणि त्याचा अभ्यास बुडतो म्हणुन तो नाही म्हणाला.
सासर्‍यांना जेवायला या म्हंटल तर म्हणाले नाही, मला त्रास होतोय. अजयला बरेचदा इमर्जन्सी कॉल असतो म्हणून तोही जाऊ शकत नाही . सासऱ्याला रहायला या तर त्यालाही तयार नाही .
तुमच्या जेवणाचं कसं कराल म्हणून अदितीने  विचारले तर म्हणाले होते ,’मी खिचडी करून घेईल ‘अणि स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणुन मंदिरात जेवायला गेले .  लोकाना वाटते की मुलगा सून लक्ष देत नाहीत. 

अदिती विचार करू लागली, ‘मुलगी नोकरी निमित्त बाहेर आहे, तिच्या सोबत रहायचे हे योग्याचं आहे पण जस मुलीची गैरसोय होऊ नये याची काळजी वाटते तसच कधी तरी सुनेच्या गरजेच्या वेळी पण थोडी साथ द्यायला नको होती का ?
म्हातारपणी सासू सासरे यांची काळजी घेणे सुन, मुलाचे कर्तव्यच आहे. ते आम्ही पार पडतोच पण सासुसासऱ्यांचे काहीच कर्तव्य नसतं का? मान्य आहे त्यांचे कर्तव्य किंवा जबाबदारी नसते परंतु मुला सुनेची गरज म्हणून किंवा नातवंडाच प्रेम म्हणून किमान वेळ काढून देणे आवश्यक नाही का?
सासू सासरे कसेही वागले तरी आपले कर्तव्य म्हणून आम्ही सगळं करतोच परंतु  जुन्या गोष्टी आठवल्या की वाईट वाटते. जर सासू सासर्‍यांनी अडीअडचणीला थोडी मदत केली असती तर मी पण फक्त कर्तव्य न समजता प्रेम, आपुलकीने सगळं केले असते.”

चहा उतू जाण्याच्या आवाजाने आदिती भानावर आली.
ती कपात चहा ओतता ओतता विचार करू लागली,”बरेचदा लोकांना दुसर्‍याच्या घरातील वस्तुस्थिती माहिती नसते. दोष कुणाचा आहे आहे हे माहिती नसताना देखिल लोक आपली मतं व्यक्त करतात. प्रतेक वेळी मुला-सुनेचा दोष असेलच असे नसते. कधी कधी सासू सासरे पण चुकू शकतात किंवा हट्टीपणा करतात पण लोकांना वाटते की मुलगा सून लक्ष देत नाही.

दोन कप चहा घेऊन ती बाहेर आली.
अजयच्या हातात कप देत म्हणाली, “चहा घ्या.. आज आपण दोघे जावू बाबांकडे डबा घेऊन. लोक काय म्हणतात लक्ष नाही द्यायचं ” तिने टेबलावरील रिमोट उचलला आणि टीव्ही लावला.
टीव्हीवर गाणं सुरु होतं “कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना…. दोघांनी एकमेकाकडे सहेतूक पाहिलं आणि स्मितहास्य केलं.
*********
समाप्त
©अर्चना अनंत धवड
सदर कथा लेखिका अर्चना अनंत धवड यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “कुछ तो लोग कहेंगे”

  1. एकदम खर लिहिलंय. माझी सासू पण तशीच होती. मुलीकडे नाती कडे ओढा. पण लोकांना वाटायचं आम्ही बघत नाही. नाती ची 2 बाळंतपण केली सासूनी. तिथे घरात सर्व काम केली नाती कडे लेकिकडे. पण आम्हाला कधीच मदत नाही केली. आता सासू नाही. पण सगळं आठवत राहत

    Reply
    • काही काही घरात दिसतं खरं असं चित्र. व्यक्ती तितक्या प्रकृती.असो. कथा वाचून कमेंट केल्याबद्दल मनापासून ध्यन्यवाद तुमचे मॅम.

      Reply

Leave a Comment

error: Content is protected !!