मातृत्वाची हाक

© परवीन कौसर
दोन महिन्यांपासून सकाळ ते रात्रीपर्यंत रजियाच्या पायात अक्षरशः भिंगरी लागली होती. घरातील सर्वांच्या जेवणाची वेळ काटेकोर पणे जपणारी रजिया आता स्वतःच वेळेवर जेवत नव्हती. तिची नुसती धावपळ सुरू होती . पण या धावपळीस ती कंटाळत नव्हती. उलट ती अगदी आनंदाने कामे करत होती. याचे कारण ही तसेच होते.
तिच्या एकुलत्या एक चिरंजीवाचे म्हणजेच अम्मानचे लग्न होते. ते देखील तिच्या माहेरच्या नातलगातील मुलीबरोबर. मुलगी तिला सून म्हणून जशी हवी होती तशीच मिळाली होती. दिसायला जितकी सुंदर तशीच वागणे ही छानच होते. इंजिनिअर होती एका मोठ्या कंपनीत नोकरी पण करत होती. पण याचा जरा देखील गर्व नव्हता.

अम्मान डॉक्टर होता. आपल्या लेकाला शोभेल अशीच सून तिच्या चुलत बहिणीने शोधून काढली होती. यासाठी रजिया आपल्या बहिणीचे वारंवार आभार मानत होती.
त्यादिवशी खूप जोरदार पाऊस सुरू होता. अम्मानला घरी यायला उशीर झाला होता. मुलगी बघायला जाण्यासाठी गावी जायची रेल्वे रात्री वेळाने होती. तिकडे गावी गेल्यावर दोन चार दिवस राहायचे माहेरी असा विचार रजियाने केला होता. तसे आता अम्मानचा दवाखाना सुरू झाला तेव्हा पासून तिला माहेरी इतकेसे जाता येतच नव्हते. अगदीच कारणाकारणीच जायची.

पाऊस थांबल्यावर अम्मान दवाखाना बंद करून घरी परतला. गडबडीने तयार होऊन तो आपल्या अम्मी अब्बू बरोबर बाहेर पडला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते गावी पोहोचले. दुपारी जेवण झाल्यावर मुलगी बघायचा कार्यक्रम होता. रजियाने येतानाच मिठाईचे डबे आणले होते. मुलगी बघताच पसंत पडली. नापसंती दर्शविले जावे असे काहीच नव्हते.
“हमें आपकी बेटी आसिया हमारे अम्मान के लिए पसंद है।” असे म्हणत रजियाने आसियाला पेढा भरविला.

अम्मानला पण आसिया आवडली. अगदी साध्या कॉटनच्या फिक्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते.
दोन्ही घरातील मोठ्यांनी एकमेकांना गळाभेट देऊन पेढे भरवत शुभेच्छा दिल्या.
लग्नाची तारीख लवकरचीच धरायची असे ठरवले गेले.
दोन महिन्यातच लग्नाची तारीख ठरवली. दोन महिन्यात सगळी तयारी करायची होती. रजियाचे पती इम्रान हे एका बॅकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. ते आपल्या कामात व्यस्त असायचे. घरातील सर्व जवाबदारी रजियाने ती लग्न करून आली तेव्हा पासून आपल्या खांद्यावर घेतली होती. तिच्या काटकसरी स्वावलंबी स्वभावाने सगळ्यांना आपलेसे करून घेतले होते.

कपडे खरेदी, दागिने घडविणे, आहेराचे कपडे , लग्न पत्रिका एक न अनेक सगळीच लग्नाची कामे अगदी चोखपणे पार पाडणारी रजिया इम्रानच्या कौतुकास पात्र ठरत होती. बघता बघता चार दिवसांवर लग्न राहिले. आता घरात पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली.कुराणपठण करुन लग्नाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. सवाष्ण जेवण, हळदी, मेहंदी हे सगळे कार्यक्रम अगदीच खेळीमेळीने पार पडले.

लग्नाला आदल्या दिवशी जायचे होते. कारण गावाचे अंतर एका रात्रीच्या प्रवासाचे होते म्हणून.
गावी सगळे वऱ्हाड घेऊन रजिया इम्रान गेले. तिथे आसियाच्या आईवडिलांनी पाहुण्यांची रहाण्या खाण्याची व्यवस्था अगदीच उत्तम केली.
अम्मान एका राजपुत्रासारखा लग्नाच्या वेषात दिसत होता. “रजिया दो नमक के खडे उतार दे बच्चे पर से. किती देखणा राजबिंडा दिसत आहे अम्मान.” असे रजियाला तिच्या बहिणीने सांगितले.
लग्न अगदीच सुंदररित्या पार पडले.

सूनेचा गृहप्रवेश झाला. जो तो किती सुंदर जोडा आहे अगदीच मेड फॉर इच अदर असे म्हणू लागले.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हे दोघे अधिकच सुंदर दिसू लागले होते. आपल्या चांगल्या वागणुकीमुळे आसियाने सासूसासऱ्यांची मने जिंकली.आता रजियापण खूप खुश होती कारण हे दोघे बापलेक कामाला गेले की ही एकटीच घरी राहायची. आता तिला आसिया सूनेच्या रुपात मुलगी मिळाली होती. आसियाने आपल्या सासूसाठी वर्क फ्रॉम होम अवलंबले.

दिवसभर काम झाले तर एकेक वेळी ती आपल्या सासूला घेऊन संध्याकाळी बाहेर फिरून यायची. त्यांना आवडणारी पाणीपुरी रगडा पॅटीस घेऊन द्यायची. एकंदरीत घरात सगळेजण आनंदी होते.
पण म्हणतात ना की सगळेच चांगले असेल तर कुठे तरी कोणाला हे बरे वाटतच नाही किंवा कोणाची तरी वाईट नजर लागतेच.तसेच झाले.
रविवार असल्यामुळे घरात सगळ्यांची आरामात कामे सुरू होती‌. रजियाने आसियाला आवडतात म्हणून नाश्त्याला इडली बनवले होते. दुपारी आसिया आपल्या आईच्या पद्धतीने बिर्याणी करणार होती.यासाठी लागणारे साहित्य अम्मानला आणायला बाजारात पाठविले होते.

इम्रान पण त्याच्या बरोबर गेले होते. इम्रानने आपली स्कुटर घेतली . हे दोघे मार्केट मध्ये गेले. तिथे लागणारे सर्व साहित्य घेऊन दोघे घरी परतत होते तोच त्यांच्या गाडीसमोर एक लहान मुलगा रस्ता ओलांडण्यासाठी जोरात पळत आला. तो असा अचानक समोर आला हे बघून अम्मानने आपली स्कुटर थांबवण्याचा प्रयत्न केला तोच मागुन एक मोठी कार जोरदार वेगाने आली आणि …!
” अम्मान ऽऽऽऽऽ उठ न बेटा. हे बघ मी तुझी अम्मी. डोळे उघड राजा. ये बाबा….!” असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश करत रजियाने आपल्या मुलाला शेवटचा निरोप दिला.

गाडीची धडक इतकी जोरदार होती की अम्मान गाडीवरून वर फेकला गेला होता आणि जोरात जमीनीवर आदळला गेला. यामुळे त्याच्या डोक्याला जबरदस्त मार पडला. खूप रक्तस्राव झाल्याने तो तिथेच गतप्राण झाला.
इम्रान बाजूला फेकले गेले. त्यांच्या हाताला मार बसला होता. एक पाय गुडघ्यापासून फॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी त्या पायावर जोर न देता चालण्यास सांगितले.
रजियाला हे आयुष्य निरर्थक आहे असेच वाटू लागले. तिची अशी मनस्थिती झाली की ती जर हसायला लागली तर हसायची थांबायचीच नाही. मग एकदमच रडायची. नंतर एकदमच पळत पळत अम्मानच्या खोलीत दुधाचा ग्लास घेऊन, “रात्रभर जागून अभ्यास करतो माझा लेक. जरा दुध पी बाळा किती बारीक झाला आहे. आधी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी मगच अभ्यास” असे म्हणत उभारायची.

तर कधी कधी दार उघडायला पळत जायची तेव्हा म्हणायची,” अरे बापरे भिजलास इतका…! काय हे अम्मान जरा वेळ उभारायचे रे कुठेतरी आसऱ्याला ‌. पाऊस कमी झाला तर यायचे. अगदी तुझ्या अब्बूसारखाच बघ तू गडबड घरी यायची. थांब टॉवेल आणते. आधी डोके पुस राजा.” असे म्हणायची. हे बघून आसिया खूप रडायची.
आता तर काही नातेवाईक सूनेचा पायगुण चांगला नव्हता तिने येताच आपल्या नवऱ्याला खाल्ले. सासरा लंगडा झाला. असे टोमणे सुरू केले.
इम्रानने लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस असेच आपल्या सूनेला सांगितले.

रजियाचा हा वेडेपणा आता जास्तच होत होता. तिला रात्री झोपेचे औषध सुरु केले होते.
रात्री एकदमच रजिया झोपेतून,” अम्मान…! अम्मान…! अहो उठा उठा अम्मान आला आहे. अहो उठा लवकर तो बघा आपला छोटा अम्मान. अहो पडेल तो धरा त्याला. हळू बेटा हळू . आले आले थांब .” असे म्हणत ती पटकन उठून अम्मानच्या खोलीत गेली.
तिच्या मागोमाग इम्रान तिला न जाण्याचे सांगत गेले. पण ती त्याला न जुमानता अम्मानच्या खोलीत गेलीच. तिथे आसियाचा पलंग मोकळाच होता.
” कुठे लपलास लबाडा. अम्मीला फसवतो. मला माहित आहे तू पलंगाखाली आहेस. ” असे म्हणत ती खाली वाकली .

तोचआसिया बाथरूम मधून बाहेर आली. इम्रानने आसियाकडे पाहिले. तिने पटकन आपल्या सासूला उचलून पलंगावर बसवले. रजियाचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन आपल्या पोटावर ठेवून म्हणाली,” हो अम्मी तुमचा अम्मान आला आहे. इथे लपून बसला आहे. येईलच तो लवकर तुमच्या मांडीवर बसून खेळायला.”
हे ऐकताच इम्रानच्या डोळ्यातून टपटप अश्रू ओघळू लागले. त्याने अल्लाह जवळ प्रार्थना केली,” या अल्लाह तेरा लाख लाख शुक्रिया. तूने मेरा अम्मान वापस दे दिया.रजियाच्या अंतर्मनात दडलेल्या मातृत्वाची हाक तुला ऐकू गेली.
*********
समाप्त
© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!