आमच्यासाठी काय करतेस?

© अनुजा धारिया शेठ
श्रेया एक गृहीणी तसे तिचे शिक्षण म्हणाल तर, 12 वी नंतर अर्धवट राहिलेले बीसीएस. माहेरी मोठी त्यामुळे घरातील काही अडचणींमुळे पुढे शिक्षण अर्धवट राहिले तरी वेगवेगळे कोर्स करून मोठ्या IT कंपनीत जॉब करत होती.  केदारचे स्थळ आले सर्व काही चांगले अगदी ओळखीतले, नकार द्यायला जागा नव्हती मग् काय लग्न झाले. लग्नाआधी स्वतःच्या लग्नाची जबाबदारी मोठी असल्यामुळे तिच्यावर होती म्हणून नोकरी सोडली तिने.
लग्न झाल्यावर सुरवातीला सगळे सणवार त्यामुळे नोकरीचा विचार काही मनात आला नाही आणि मग् आली गोड बातमी. त्यात दोन्हीकडून पहिले बाळ सगळ्यांना काय करू आणि काय नको झाले होते.

बाळ झाले मग् गुंतून गेली आणि तोवर एवढी गॅप गेली की परत त्या फील्डमध्ये ती जाऊ शकली नाही. घरचा बिझनेस सासरे, दिर, नवरा त्यामुळे तिकडे ती काही जाऊ शकत नव्हती. आता काय करायचं असा विचार करत असताना परत गोड बातमी आली अन् ती अडकून पडली.
पण ह्या वेळेस बातमी समजली तेव्हा ती रडली तिचे पंख कापत आहे कॊणी तरी असे वाटले तिला आईने समजवून सांगितलं. तरी पण श्रेया थोडी नाराज होती.  परत सर्व पहिल्यापासून सुरुवात. ते बाळ मोठे होईपर्यंत तिची एवढी सवय झाली होती सासरी आणि माहेरी दोन्हीकडे.

सासर आणि माहेर जवळ होते त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम निघाला की जबाबदारी हिच्यावर. तिच्या असण्याची खूप सवय झाली होती सगळ्यांना. पण तरी तिने इतके काम करूनही कोणालाच ते दिसत नव्हते. ती अगदी सहज उपलब्ध असल्यामुळे तिची किंमत कोणालाच नव्हती.
तिला हे सर्व जाणवत होते पण दोन मुलांमुळे ती अडकली होती. त्यात तिचा स्वभाव मुळात शांत होता. कोणाला नाही बोलता येतं नव्हते. त्यामुळे सर्व गृहीत धरून चालत, या सगळ्या ओझ्याखाली एवढी दमायची की केदारला पण वेळ देता येतं नव्हता तिला मग त्यांची भांडणं होत असत.

केदार फटकळ होता, राग खूप होता त्याला.. त्यामुळे त्याचा आवाज नेहमी रूमच्या बाहेर जाई मग काय प्रत्येक जण मध्ये पडत आणि भांडण कमी होण्यापेक्षा ते वाढत जाई.
तिने कोणासाठी किती काही केले तरी काय करतेस ग???? सगळ्या कामाला बाई आहे, जरा आवरत नाही तुझे. असे बोलतांना कॊणी एक दिवस पण मुलांचे आवरायचे नाही की, कोणत्या कामात मदत नाही. सगळयांना सगळे हातात हवे आणि वर परत तिने पण वेळेत आवरायला हवे.
बरं ते कमी तर असेच कपडे का घातले आणि तसेच केस बांधले  यावरून पण सर्व बोलत असत. खूप रडायची पण खंबीरपणा येत नव्हता, रडून आई जवळ बोलली एक दोन वेळा पण उलट झाले वडील तिलाच बोल लावायचे.

पण हे सर्व ऐकल्यावर कळत नकळत पणे केदारचा जावई म्हणून असलेला मान कमी झाला हे तिला हळू हळु जाणवले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. माहेरी भावाचे लग्न आले तिने आणि केदारने शक्य तेवढी सगळी मदत केली. पण कानफाटे नाव असल्यामुळे ती काही दिसण्यांत आली नाही.
पुढे भावाची बायको घरात असल्यामुळे तिने माहेरी जाणे येणे कमी केले. सासरी परिस्थिती आहे तशी होती, काहीच बदल नव्हता आणि तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुढे जायचं ठरवलं होते. त्यामुळे तिला आता काही फरक पडत नव्हता जश्याला तसे वागणे थोडे थोडे करून शिकत होती.

पण तरीही ती घरात कुठे काय करते? कारण ती घरीच असते असा समज मात्र ती दुर करू शकली नाही. स्वतःला तिने तिच्या छंदामध्ये गुंतवून घेतले, वेगवेगळे क्लास घेऊ लागली तसे केदारमध्ये थोडे बदल होऊ लागले. पण मुळ स्वभाव मात्र अधून मधून डोकावत होताच.
त्याचं जरा काही कमी झाले की तो सगळ्याचा उद्धार करी. अगदी एखाद्या रात्री तो जवळ आल्यावर तिने दिलेला नकार सुद्धा त्याला सहन होत नसे लगेच त्याच वाक्य येई, काय करतेस ग आमच्यासाठी?‌‌‌??? तुझ्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तुला जोर येतो आणि घरात मात्र चिडचिड करतेस. ती काहीच बोलत नसे उगाच बोलुन भांडण नको म्हणून ती गप्प बसे.

हे सगळं लग्नाला 12वर्ष झाली तरी तसेच. मधल्या काळात जाऊ आली, तिने वेगळा संसार मांडला तसे थोडे फार डोळे उघडले सर्वांचे पण परत जैसे थे.
माहेरीपण भावजय आल्यावर बहिणीचे लग्न झाले तेव्हा श्रेया आणि केदारने लक्ष दिले नाही तेव्हा आई बाबांना जाणीव झाली की श्रेया काही काम सांगितले तरी दोन मुले आणि घरच्यांना सांभाळून कस मॅनेज करत होती. बाबांनी तर बहिणीच्या लग्नात बोलुन दाखवले कौतुक करून तेंव्हा श्रेयाला आकाश ठेंगणे झाले.
पण सासरचे काय??? तिने अपेक्षा सोडून दिली होती..

येईल तो दिवस पुढें ढकलत होती त्यात मधल्या काळात लॉकडाउन सांगितलं तेही 21दिवस.. श्रेया किचन मध्ये काम करता करता बाहेर आली. टीव्ही वरची लॉकडाउनची बातमी ऐकून तिला टेन्शन आले,तिचा चेहरा पडला  त्यावर पण तिची मज्जा उडवली केदारने.
तुला कसल टेन्शन??? घरीच तर असतेस..
ती मनात बोलली, कस सांगूं कसले टेन्शन. सगळे घरात म्हणजे माझी अगदी डबल ड्यूटी.
बाबा घरी म्हणजे मुले पण ऐकणार नाहीत कामाला कॊणी नाही, एवढे मोठे घर आणि ह्यांच्या न संपणार्या फर्माइशी..  त्यात आहे त्या वस्तूमध्ये मॅनेज कसे करू.

तेवढ्यात केदारने परत आवाज दिला, काय ग कुठे हरवलीस? काही नाही असे म्हणाली…आणि परत किचनमध्ये गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी केदार जाम मूड मध्ये होता अगदी पहाटे त्याने तिला जवळ ओढले आणि म्हणाला आजपासून डबा वगैरे नाही सो लवकर उठायची घाई नाही. श्रेया हसली आणि त्याच्या मिठीत विसावली आणि बऱ्याच दिवसांनी त्याला त्याची पहिली श्रेया मिळाली, शेवटी तिनेच अलगद त्याची मिठी सोडवली आणि म्हणाली मला सुटटी नाही आहे.
हो नाही करत त्याने सोडली मिठी आणि म्हणाला मी झोपतोय उठवू नको मला, ती फक्त हसली.

एकंदरीत पहाटे पहाटे बऱ्याच दिवसांनी त्यांना एकांत मिळाल्यामुळे केदारचा मूड अगदी दिवसभर रोमँटिक होता. पण श्रेया मात्र त्याला रिकामी किंवा एकटी भेटली नाही. दिवसभर तो सारखा तिच्या मागे मागे करत होता.
श्रेयाला अगदी नवीन दिवस आठवत होते.
सकाळी ती उठली त्यानंतर सगळ्यांचा चहा, नाश्ता, केर, देवपूजा दुपारच जेवण, संध्याकाळी नाश्ता, रात्रीच जेवण मध्ये मध्ये कोणाला लागला तर चहा, सरबत त्यात मुलांची लुडबुड सगळे अगदी छान मॅनेज करत होती.
केदार फक्त बघत होता, त्याचे मन त्याला खात होते.

खरच मी चिडलो की किती बोलतो हिला पण दिवसभर किती मॅनेज करावे लागतें हिला आणि किती  सहज बोलतो मी आमच्यासाठी काय करतेस?
खरं तर माझ्याकडून मॅनेजमेंट शिक असे बोलतो मी हिला पण हिच्या एवढे multitasking मला पण जमणार नाही. सकाळी उठल्या पासून रात्री पर्यंत ती सतत उभी असते सगळ्यांसाठी आणि मी मात्र तिला रात्री…शी..
खर तर संसार दोघांचा आहे, माझे आई बाबा….तरी ती किती करते, तिच्या प्रमाणे मुले आमच्या दोघांची आहेत पण मी मात्र कायम गृहीत धरून चाललो तिला असा विचार करत असताना समोर मस्त चहा आणि भजी घेऊन श्रेया उभी होती.

केदारने हात पकडला ती लाजत म्हणाली, mr काय विचार आहे खाऊन घ्या.
मला खुप् काम आहे…मला सुट्टी नाही आहे.
त्याने विचारलं, तू खाल्लेस का??? ती म्हणाली नाही घेते आता.
नाही आता इथे माझ्या समोर खा….तो म्हणाला.
आणि त्याने भरवणार इतक्यात सासूबाई नि आवाज दिला ती काही बोलायच्या आत केदारने सांगितलं, कि आई माझी फाईल शोधून देते ती येईल पाच मिनिटात.

आधी भजी खा मग् जा अशी धमकी दिली त्याने…एवढी प्रेमळ धमकी…ती ही नकार देऊ शकली नाही.
मनातून मात्र विचार करत होती, काय विचार आहे ह्याचा….रात्री बोलू….रात्री तो येईपर्यंत ती झोपली. त्याने पण नाही उठवल….सकाळी परत ह्याने हात धरला…सोडायला तयारच नाही, मी करेन मदत.. पण एवढ्या लवकर उठायचं नाही आणि मिठीत ओढत झोपी गेला. तिने किती प्रयत्न केला तरी त्याने तिला सोडले नाही…
तिला झोप लागली, जाग आली तर ८ वाजले. बघितलं तर केदार नव्हता, किचन मध्ये गेली तर काय केदार चहा करत होता आणि पोहे पण रेडी.

त्याने तिला मस्त चहा दिला आणि म्हणाला पोहे खा.
ती म्हणाली पूजा व्हायची आहे त्या आधी मी नाही खात. तो म्हणाला, आजपासून पूजा, कचरा,लादी मी करणार आहे. नाश्ता आज केलाय पण उद्यापासून तूच कर कारण मला फक्त पोहे येतात आणि रोज पोहे कसे चालतील? श्रेया हसली.
तिला वाटलं हे काय नवीन २ दिवस करेल, नंतर भुत उतरेल कामाचं त्यामुळे काही बोलली नाही.
पण 21 दिवस त्याने जमेल तेवढी सगळी मदत केली आणि लॉक डाउन वाढेल असे समजलं तसे तिला अगदी जबाबदारीने विचारले घरात काय आणायचं आहे त्याची लिस्ट दे, मी आणतो.

श्रेया बघत होती काय झालंय नक्की केदारला? जे आहे तें चांगले आहे म्हणून काहीच बोलली नाही. तिच्यावरचे काम तो कमी करत होता त्यामुळे ती पण फ्रेश रहात होती.
श्रेयाचा वाढदिवस आला, मुलांनी आठवण केली तो मात्र विसरून गेला होता. लॉकडाउन मुळे घरीच छान सेलेब्रेट केला मुले आणि केदारने मिळून केक केला.
रात्री श्रेयाला अगदी भरून आले. तिने थँक्स म्हणायला गेल्यावर एवढे दिवस त्याच्या मनात असलेली सल त्याने बोलून माफी मागितली श्रेयाची..

मी नेहमीं तूला म्हणायचो आमच्यासाठी काय करतेस….? पण ह्या कोरोना ने मला दाखवलं, कि तू किती करतेस ह्या घरासाठी, घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि मला हे समजायला 12 वर्ष लागली. ह्यापुढे सुद्धा स्वतः ची कामे मी स्वतः करेन.
मला असे वाट्त होते मी बाहेर जातो, पैसे कमावतो म्हणजे मलाच काम असते. पण तूझं काम न संपणार आहे आणि त्या बदल्यात आम्ही तूला काय दिले? कायम तुझी चेष्टा केली. पण तुझी मॅनेजमेेंट काय आहे ती समजते ह्या घराला घरपण आणलेस तू.

किती विचार पूर्वक करतेस प्रत्येक गोष्टी खरच मला माफ कर. तूझा वाढदिवस पण विसरून गेलो मी आणि तू मात्र माझी प्रत्येक गोष्ट आठवण ठेवून करतेस तरी मी बोलतो तूला काय करतेस? काम धड करत नाहीस आणि मी साधे गिफ्ट पण आणू शकलो नाही तुला.
श्रेया म्हणाली, ह्या कोरोना ने खूप मोठे गिफ्ट दिलाय मला. तू बदललास अजून काय हवंय मला? हेच खूप मोठे गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि ती त्याच्या कुशीत शिरली.
केदारनेपण मिठी घट्ट केली, आणि म्हणाला एक गिफ्ट मात्र मी तुला आता पण देऊ शकतो ह.. असे म्हणत त्यानें आपले ओठ त्यांनी तिच्या ओठांवर टेकवले.
*********
समाप्त
© अनुजा धारिया शेठ
सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!