केतकी

© कांचन सातपुते हिरण्या
कुमुदच्या घरी संक्रांतीचं हळदीकुंकू म्हणजे यशोलक्ष्मी सोसायटीतल्या बायकांना पर्वणीच. भरपूर गप्पा,  नाश्त्याचा बेतही मस्त असतो. अन वाणही एकदम हटके असतं सगळ्यांना उपयोगी आणि आवडेल असं.
आजही सगळ्या नटून थटून अगदी तयारीनिशी आल्या तिच्याकडे. बायका म्हणलं की दागिने, साड्यांच्या गप्पा आल्याच पण नेलपेंट लिपस्टिकचा विषयही चर्चेला पुरेसा असतो अगदी . 
मटार करंजीचा बेत केलेला, सोबत पुदिन्याची चटणी आणि मग कॉफी.

गप्पांना उधाण आलं होतं पण यावेळी मुख्य विषय होता नवव्या मजल्यावर नव्याने रहायला आलेल्या मिसेस केतकी जोशी.
” काय मस्त राहते गं ती ! तिचे एकेक ड्रेस, मेकअप , चप्पल्स, सगळंच अगदी बघण्यासारखं असतं .” विजया बोलली तसा कुमुदनंही दुजोरा दिला,
” हो ना , आपणही आवरतो पण रोज कुठं गं एवढं जमतं. मुलांचं , नवऱ्याचं घरातल्या कामांनीच थकायला होतं. हे असं हळदीकुंकू, वाढदिवस, सण असले की आवर्जून आवरतो आपण .”

” हो खरंच गं .” सुलभाही बोलली .
” काय गं कुमुद पहिलं हळदीकुंकू तुझ्याकडेच आज , तू बोलावलं नाहीस का त्या केतकीला ? म्हणजे जरा जवळून बघता आलं असतं . येता-जाता रोज हसते पण तिचं काही कळतंच नाही , म्हणजे मिस्टर जोशी सरकारी अधिकारी आहेत हे कळालंय पण मुलं वगैरे काही दिसत नाहीत.”
बोलता-बोलता विभावरी थांबली ते “येऊ का ? ” च्या आवाजानं .

सगळ्याच दरवाज्याकडे बघायला लागल्या . दारात मिसेस केतकी केदार जोशी .सगळ्यांच्या  हातातल्या करंज्या हातातच !
“सॉरी मला उशीर झाला का ?”
“नाही नाही , आत्ताच आल्यात सगळ्या , या ना .” कुमुद पुढे आली .
रोज स्लिवलेस पंजाबी , जीन्स , वनपीसमध्ये दिसणारी केतकी चक्क गडद हिरव्या रंगाची जरीकाठाची साडी , केसांचा अंबाडा त्यात सोनचाफ्याचं फुल , लाल लिपस्टिक तशीच लालचुटूक टिकली , झुमके , गळ्यात नाजूक सर , मॅचिंग बांगड्या.. नजर हटेना या बायकांची तिच्यावरून .

एखादी हीरोइन समोर असल्याचं फीलिंग. त्यामुळे केतकी जरा संकोचल्यासारखी झाली .
” तुम्ही गप्प झाल्यात सगळ्याजणी ?”
” नाही असं काही नाही . अहो पुरेशी ओळख नाही ना .”
” हो ना .” सगळ्यांनी तिच्या सुरात सूर मिसळला .

मग थोड्याफार गप्पा , हळदीकुंकू , कुमुदने तिच्या मैत्रिणीकडून आणलेल्या इक्कतच्या हॅन्डपर्स दिल्या . निघेस्तोवर सगळ्यांचं लक्ष मात्र राहून राहून नटलेल्या सुंदर केतकीकडेच .
”  उद्या माझ्याकडे या हळदीकुंकवाला . त्या निमित्ताने आपली ओळखही वाढेल.” केतकीने आमंत्रण दिलं आणि ती गेली .
दुसर्‍या दिवशी सकाळपासून सुलभा , विजया , विभावरी , कुमुद , अंजू सगळ्यांचे एकमेकींना फोन .

संध्याकाळी केतकीच्या घरी जाताना कुठली साडी घालायची इथपासून ते मेकअप डार्क करायचा की लाईट ..
सगळ्या एकत्रच लिफ्टनं आल्या नवव्या मजल्यावर . दारात सुंदर फुलांच्या रांगोळीची आरास . एका पाठोपाठ एक आत आल्या .
केतकीनं हसून स्वागत केलं .
”  या ना वाटच बघत होते मी .” आजही केतकी अगदी नक्षत्रासारखी सुंदर म्हणतात तशीच दिसत होती .

पिवळी नाजूक हिरव्या काठाची साडी , तसंच ब्लाऊज ,  रेखीव मोजकेच दागिने , आधीच सुंदर चेहरा मेकअपमुळे उठून दिसत होता .
तिनेही बायकांच्या मनातलं कुतूहल बहुधा ओळखलं होतं.  त्यासाठीच हे हळदी कुंकवाचं निमित्त . सोनचाफ्याची फुलं दिली प्रत्येकीच्या हातात . पिनाही दिल्या लावायला .
” लावा गं मैत्रिणींनो लगेच . मला फार आवडतो सोनचाफा  सुगंधी आणि टवटवीत .”  केतकीच्या अश्या वागण्या बोलण्याने जरा निवांतपणा आला वातावरणात . 

गप्पा मारत असतानाच तिनं पटकन ,भाजणी वडे चटणीच्या डिश आणल्या .
” खास तुमच्यासाठीच केलेत . घ्या ना .”
इतके दिवस ही एवढी नटून थटून फिरते म्हणजे घरात काही करतच नसेल हा भ्रमाचा भोपळाही फुटला .
”  तुम्ही दोघंच असता का म्हणजे ..”
” हो म्हणजे इथं आम्ही दोघंच, सासू-सासरे जळगावला असतात मूळ घर तिकडे आणि मुलगा अक्षय हैदराबादला असतो इंजीनियरिंग पहिलं वर्ष त्याचं .”

”  एवढा मोठा मुलगा आहे हिला ,काहीतरीच सांगते वाटतं.”
केतकीनं बोलता बोलता त्यांच्या फोटोंचा अल्बमही आणला .
तिला भरभरून बोलताना बघून सगळ्याच गप्पांमधे रमल्या. 
” मला केतकीच म्हणा गं प्लीज .”
हळदी कुंकू लावल्यावर छोटे-छोटे बॉक्स दिले वाण म्हणून . लिपस्टिक , नेलपेंट , पावडर, टिकल्यांची पाकिटं.

”  एवढं कशाला गं केतकी ?”
” ही फक्‍त सौंदर्यप्रसाधनं नाहीत गं सख्यांनो . आपली आवड , अस्तित्व , आत्मविश्वासही  बरंच काही सांगतात या वस्तू . तुम्हांला वाटत असेल ना ही बाई रोज नटून थटून बाहेर जाताना दिसते . घरात काही करत नसेल पण तुम्हांला सांगू नटण्या थटण्याची आवड असतेच प्रत्येक स्त्रीच्या मनात.  जसं आपण  घर ,घरातल्या आपल्या माणसांना सांभाळतो तसं आपण स्वत:लाही सांभाळायला हवंच !! आपली आवड जपली तर त्यात वाईट काय . मीही जपते , आवडतं मला नटायला .

आमचं लग्न झालं तेव्हा मीही सुरुवातीची काही वर्ष घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतले पण मग अहोंनीच सुचवलं , त्यांची  बदलीची नोकरी , मुलाचं शाळा शिक्षण चालूच होतं. आई-बाबा गावी , मग स्वतःसाठी काहीतरी कर आणि मला त्याच वेळी ब्युटी एडव्हायजर कोर्सची माहिती कळाली . तो पूर्ण केला आणि कमालीचा बदल झाला माझ्यात .
आताही मी त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या शहरांत जाते तेव्हा तिथल्या ब्युटीशियन्ससाठी वर्कशॉप्स घेते . तुम्हांलाही मला हे सगळं सांगायचं होतं पण वेळ मिळत नव्हता तो आज मिळाला .

बापरे ! एवढं सगळं ऐकून केतकीसाठी कौतुक , आदर वाढला सगळ्या जणींच्या मनात .शंका , कुतूहल , थोडासा मत्सर होता ते सगळं स्वच्छ झालं .
निघताना कुमुदच्या केसातला निसटणारा  सोनचाफा केतकीने पुन्हा लावून दिला .
“मैत्रिणींनो, या चाफ्यासारखंच टवटवीत सुगंधी राहायचं आपणही . हो ना ?” केतकीने विचारलं.
आणि चाफ्यासारख्याच केतकीच्याही प्रसन्नतेने भारावलेल्या सगळ्याजणींनी एका सुरात होsss असा दुजोरा दिला.
केतकी मधल्या हुशार एडव्हायजरने यशोलक्ष्मी सोसायटीतल्या सगळ्याच बायकांच्या मनाला तिच्यासारखं टवटवीत राहायची भुरळ पाडली.
*********
समाप्त
© कांचन सातपुते हिरण्या
सदर कथा लेखिका कांचन सातपुते हिरण्या यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!