लोणच्याची गोष्ट

© राखी भावसार भांडेकर.
लोणचं म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. खाद्य परंपरेत जेवणाची चव वाढवणारा हक्काचा पदार्थ म्हणजे लोणचं. लोणचं घरोघर घातल जातं, जगभरातल्या विविध देशात लोणच्याचा मान मोठा. म्हणुनच आज आपण जाणून घेवू या तुमच्या, आमच्या सर्वाच्या लोणच्याची गोष्ट.
मीराचं लग्न ठरलं अगदी पंधरा दिवसात. एखादया नाटकात  दाखवतात तसं किंवा हींदी चित्रपटात असतं तसं. मीरा दिसायला मुळातच सुंदर, गोरापान वर्ण, चाफेकळी नाक, धनुष्याकृती भुवया, मृगनयनी डोळे, काळे लांबसडक केस, सौंदर्याची खाणच ती. शिवाय आहारशास्त्र विषयात केलेली मीरा ने केलेली पी.एच.डी. आणि आहारतज्ञ म्हणून तीला अगदी कमी कालावधीत मीळालेला लौकीक .

त्यामुळे जेव्हा तेजसला त्याच्या मामे भावाच्या लग्नात मीरा दिसली तेव्हाच तो तीच्या प्रेमात पडला. 
तेजस स्वत: कम्प्युटर इंजीनीअर , विस लाखाचं भक्कम पॅकेज घेणारा. देखणा , मोस्ट इलिजीबल बॅचलर आणि मीरा जवळच्याच नात्यात असल्याने (तेजसच्या मामेभावाच्या बायकोची मीरा आत्ते बहीण होती.) लग्न ठरायला काहीच वेळ लागला नाही. 

साक्षगंध झालं एप्रिल मध्ये आणि जुनच्या पंधरा तारखेचा मुहुर्त लग्नाकरता ठरला. तसं पाहीलं तर जवळपास एक दीड महीन्याचा वेळ होता दोन्ही कडे लग्नाच्या तयारीला , त्यामुळे दोन्ही घरांत कामाची ,खरेदीची, यांद्याची, कार्यक्रमांची नुसती धामधुम आणि लगबग सुरु होती. एका दुपारी मीरा, आणि तिच्या मैत्रिणी लग्नाच्या साड्या, मेहंदी, मेकअप, दागीने , या विषयी बोलत होत्या. पण मीराच्या मावशी आणि मामी ने ‘रुखवंत’ शब्द उच्चारला आणि मीराच्या सगळ्या मैत्रिणी अगदी चुप्प बसल्या- खोलीत टाचणी पडेल अशी शांतता निर्माण झाली. 

मावशी – “अग पोरींनो एवढ्या गप्प का झाल्या गं तुम्ही?”
मामी – “वन्स या आज कालच्या आधुनिक मुली त्यांना रुखवत म्हणजे काय हे तरी माहीती आहे का?” या वाक्यावर  मीराच्या सगळ्या मैत्रिणींना खुप राग आला.

त्यातली राधा लगेच म्हणाली, “मावशी रुखवत वगैरे आम्हाला चांगल माहीती आहे. पण आधी शाळा, कॉलेज , वेगवेगळे क्लास , मग नोकरी हया सगळ्यांत रुखवत बनवायला वेळ आणि सवड कुणाजवळ आहे?” 
दुसरी मैत्रीण लगेच बोलु लागली. 
माया- “आणि मामी आजकाल बाजारात सगळं मीळत विकत, वॉलपीस, सप्तपदी ची पावलं, क्रोशिया चे ताटावर टाकायचं आसन, दारावर लावयाचे तोरण, टेबल क्लाॅथ , कुशन कवर सगळं , खुप सुंदर आणि अगदी स्वस्त.
आता प्रियाही आपल्या मैत्रिणींना सोबत करू लागली. 

प्रिया- “मावशी विस-पंचविस वर्षा पूर्वी मुली शिकायच्या नाही अस नाही ! पण केवळ चांगले स्थळ मिळावं म्हणून  किंवा कधी कधी लग्न जुळत नाही म्हणुन. त्यामुळे त्यांच्याकडे मोकळा आणि रिकामा वेळ होता आणि जीवनाचा उद्देश म्हणजे उत्तम स्वयंपाक करून नवरा आणि सासरच्या मंडळींना खुश करणे – फावल्या वेळात विणकाम, भरतकाम, शिवणकाम शिकुन स्वतः च्या कलेचे प्रदर्शन करणं. पण आतायची गोष्ट मात्र निराळी.”
प्रियाची री ओढत राधाही तीच्या समर्थनार्थ धावुन आली.
राधा- “आणि मावशी या सगळ्या आता जुन्या गोष्टी झाल्या आहेत. त्या कलाकुसरीच, विणकामाचं कुणीही कौतुक तर करतच नव्हतं आणि आयुष्यात  एखादा कठीण प्रसंग आला तर ती कला वापरून कुणीही आत्मनिर्भय होऊ शकत नव्हत.”

राधाच्या या वाक्याचा मीराच्या मामीला मात्र खुप राग आला. ती पण मग स्वतः ची बाजु मांडु लागली.
मामी -” मान्य आहे की, आजकालच्या तुम्हा मुलींना कलाकुसर, स्वयंपाक, विणकाम, भरतकाम, या करीता वेळ नाही पण आज बाजारात जी काही वॉलपीस , टेबल क्लॉथ क्रोशीयाची तोरणं , ताटावरची आसन मीळतात ती ही कुणीतरी बनवली, विणली म्हणुनच ना! ही कला, ही परंपरा आपल्या संस्कृतीचा वारसा आहे आणि तो आपण जपला पाहीजे असं मला प्रामाणीकपणे वाटतं .
मामींच्या या वाक्या मुळे, सगळ्याच सख्या गप्प बसल्या पण प्रसंगाचे गांभीर्य बघुन मावशीनं सख्यांना समजवण्याचा प्रयत्न केला.

मावशी- “अग मुलींनो आपली परंपरा , आपली संस्कृती ,आपले संस्कार आपणच जपायला नको का? आणि विवाह किंवा लग्न ही त्यातल्याच एक महत्वाचा संस्कार . बरं चला रुखवतात ठेवायला काय काय आणायचं याची यादी करुयात का आता?”
मीरा – “मावशी मला काय वाटतं आजी च्या हाताला खुप छान चव आहे. त्यामुळे रुखवतातले खाण्याचे पदार्थ  विशेषतः लोणची, पापड, सरबत आणि चटण्या आपण आजीलाच करायला लावु.”
मामी-” अगं मीरा तुझ्या आजीचं वय झालं आहे. त्यांना जमेल का एवढं सगळं करायला?”
मीरा- “मामी तुमच्या सासू बाईचं जरी वय झाले तरी माझी आजी तीच्या नाती साठी नक्कीच लोणची, सरबत आणि चटण्या बनवुन देईन बरं का!”

मीराची आजी म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा खळखळून वाहणारा धबधबा च जणु तीचं वय म्हणजे केवळ पाऊणशे वयोमान ! नातीच्या लग्नाची बातमी ऐकुन आजीला आकाश ठेंगण आलं आणि रुखवतासाठी या वयातही आजी नं कमरेला पदर खोसला.।नातीच्या आग्रहाखातर रुखवतासाठी सर्वात आधी आजीने लोणच्याचा घाट घातला.
आजी-” मीरा आज मी तुला लोणचं कसं बनवायचं ते शिकवते  ते लक्षपूर्वक बघ आणि मग सासरी गेल्यावर तुच बनवत जा तुझ्या आवडीच लोणचं.”

आधी ज्याचं लोणचं घालयच तो जिन्नस (कैरी, लिंबु, मिरची, फ्लॉवर, गाजर वगैरे वगैरे ) व्यवस्थित निवडुन घ्यायचं, मग ते देठ काढून धुवून , पुसून स्वच्छ कोरडं करायचं. अजुनही पाणी राहण्याची शक्यता नको, म्हणुन हलकेच पेटत्या गॅस वर सुकवुन घ्यायचं. मगच चिरुन ,मसाला घालून लोणेच तयार करायचं. 
लोणच्याचा मसाला पण घरीच बनवायचा बर का मीरा! तिखट, हळद, मीठ सुध्दा हलकेच तव्यावर गरम करून घ्यायचं. सगळं कसं निर्जल हवं. मग काय बिशाद लोणचं खराब व्हायची? ज्या बरणीत लोणचं ठेवायचं ती बरणी पण एक खास पद्धतीत ठेवायची.

ती बरणी पण आधी स्वच्छ धुवून, पुसुन गॅसवर थोडी गरम करून निर्जल करायची. मग बरणीच्या खाली तळाशी, मीठ पिसरवायचे त्यावर लोणचं घालायचं, सर्वात वरती मिठाचा पुन्हा हलकासा थर दयायचा . मग त्या बरणीच्या उघड्या तोंडावर स्वच्छ धुतलेला पांढरा कपडा, त्याची कड, एका बाजुला फाडुन व्यवस्थित बांधायचा आणि मग झाकण लावायचं. 

इकडे आजी लोणचं बनवत होती मीरा ते अगदी मनलावुन लक्षकपूर्वक बघत होती आणि तीनं आहारशास्त्रात अभ्यासलेला लोणच्याचा इतिहास , काळ आणि जगभरातल्या लोणच्याच्या प्रकारांची माहीती आणि महती ही आजीला सांगत होती.
मीरा- “आजी लोणच केवळ भारताचचं  आहे, असं नाही बरं का! तर परदेशातही लोणचं घातलं जातं. शिष्ट, अखडू ब्रिटीश लोकपण लोणचं घालतात , तसेच मोकळे ढाकळे अमेरिकनसुद्धा, मनमोजी इटालीयन, फ्रैन्च आणि मध्यपूर्वेतल्या वाळवंटी देशांत पण लोणची घातली जातात. 


कोरियात किमची किंवा जर्मनीतलं  सॉअर क्रॉउट म्हणजे पचपचीत कोबीचा जबरदस्त कायापालट, रशियात टोमॅटो च, जापान मध्ये प्लम, इटलीत, वांग्याच तर मध्यपुर्वेत लिंबाच, ऑलिव्हज, मिरचीच तर आखाती देशात द्राक्षे – अंजीर – अक्रोड यांची लोणची घालतात. चीन, थायलंड इथे कोवळ्या बांबुचे लोणचे घालतात. 

प्राचीन पर्शियात (इराण) भारतातून मागवलेल्या काकड्यांच लोणचं लोकप्रिय होतं. व्हिनेगर, मीठ, साखर आणि थोडासा शेपू वापरून केलेत हे काकडीचं लोणचं युरोपातही आवडीचं. तिथून ते अमेरिकेला पोचलं. आज पिकल म्हटलं की, अमेरिकेत कुठेही या खारवलेल्या काकांड्यांच्या चकत्या मिळतात. सँडविच वगैरे मधे आवर्जुन घालतात. हे पिकलं तिथे इतके लाडकं की गेली काही वर्ष शरद ऋतूत न्युयॉर्क मध्ये चक्क 13 नोव्हेंबरला ‘पिकल डे’ साजरा करतात.
आजी आपल्या भारतातही त्यातही महाराष्ट्रात लोणचं आणि वरण-भात ही अतूट जोड़ी. रोजच्या साध्या जेवणाला लोणच्याने एक वेगळीच चमचमीत चवं येते. 

मराठी लोणची मुख्य करून कैरी, लिंबू, मिरची, आवळा यांची .पण याव्यतिरिक्त भारतात अनेक पदार्थाची लोणची आहेत. बनारस मधील ‘भरवा लाल मीरची लोणचे’, राजस्थान मधील ‘कैर सांगरी’, पंजाब,  हरयाणा येथील शलगम, गोभीचे, आदीवासी समाजातील करवंद, भोकर आणि मोहाचे लोणचे, कोकण- गोव्यातील बिलकुल तेल  नसणारे निव्वळ मिठा मधील बाळ कैरीचे, गोव्यातील मांसाहारी अशी हजारो प्रकारची लोणची आहेत. 

उद्या शिकार मिळेल ना मिळेल त्यासाठी आजच तरतूद हवी म्हणुन भाज्या, फळं आगामी काळासाठी टिकवून ठेवण्याची धडपड . मिठात आणि आम्लयुक्त द्रावणात बुडवून ठेवलेलं अन्न बऱ्याच काळापर्यंत खराब होत नाही हा खरंतर वैज्ञानिक शोध. त्यातूनच मग खारवणं , मुरवणं हा खाद्य इतिहासातला महत्त्वाचा टप्पा गाठला गेला .  गेली चारेक हजार वर्ष सर्वच संस्कृतीमधली माणस हाती गवसलेल्या प्रत्येक खाण्यायोग्य वस्तुचं लोणचं घालत झाली आहेत. लोणच म्हणजे ‘नो फायर कुकिंग’ म्हणजे ‘अग्नी स्पर्श- विरहीत’ प्रकार.         

मरणाच्या पावसात भाजीची तरतूद करणारे, आजारातून उठताना तोंडाला चव आणणारे , सणवार, समारंभ अशावेळी पानाची डावी बाजू राखणारे लोणचे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. फार पूर्वी लेक सासरी जाताना , किंवा बाळंतीण घरी जाताना तिच्यासोबत लोणच्याची बरणी दिली जायची. परदेशी जाणारे विद्यार्थी नोकरदार यांच्या पैशाची बचत याच घरगुती लोणचे याने केली आहे. वातड तोर्तिया वर पसरून खाल्ले गेलेले असो अथवा फ्राईड राईस सोबत भारतीय जिभेच्या चमचमीत खाण्याच्या सवयी ला लोणच्याचा भक्कम आधार आहे.
मीरा ने ही लोणच्याची कहाणी सांगेपर्यंत एव्हाना आजीने तयार केलेल्या कैरीच्या लोणच्याचा खमंग सुगंध घरभर पसरला होता.
*********
समाप्त
© राखी भावसार भांडेकर.
सदर कथा लेखिका राखी भावसार भांडेकर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!