मंगळसूत्र एक बंधन

© अर्चना अनंत धवड
“हॅलो, उर्मी तू आईकडे आहेस ना? मी पण आले गं माहेरी. शॉपिंगला चालते का?” पूर्वीने फोन करताच उर्मी तयारी करून पूर्वीकडे गेली. डोरबेल वाजताच पूर्वीने दार उघडले.
“उर्मी हा काय अवतार केलास तू? हा पंजाबी ड्रेस, गळ्यात मंगळसुत्र अणि कपाळावर टिकली. पक्की काकूबाई दिसतेस. अग,आजच्या आधुनिक युगात तू कसले कपडे वापरतेस.अशी चालणार तू शॉपिंग ला? “हसत पूर्वी म्हणाली.

“अग, तसही मी माहेरी सुद्धा शार्ट्स वैगरे घरी बाबांसमोर घालत नव्हते. त्यामूळे मला याचे  काही विशेष वाटत नाही “
“उर्मी कसला अवतार केलास ग तू? आजकाल मंगळसुत्र कुणी घालतं  का? तिच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे पाहत पूर्वी म्हणाली. मात्र तुझं  मंगळसुत्र आहे खूप गोड !!! “
“आहे ना? सासुबाई नी गिफ्ट केलं ” ऊर्मी कौतुकाने म्हणाली. 
“बघ उर्मी, तुझ्या सासूने काय गिफ्ट दिलं? मंगळसूत्र!!! मंगळसूत्र म्हणजे गुलामगिरीचे प्रतीक.का घालायचे आपण मंगळसूत्र? त्यांचा मुलगा घालतो का असल काही आपल्या नावाचे? तेव्हा आपणच का घालायचे मंगळसुत्र, का लावावी टिकली?”

“अग, मी मंगळसुत्र नाही जरी नाही घातलं तरी माझ्या सासुबाई काही म्हणणार नाही. हा, थोडं  मन  दुखावेल एवढेच. अगं आम्ही एकत्र राहतो तेव्हा एकमेकांची मन जपतो. त्यांना माहिती आहे आजकाल मोठ मंगळसूत्र घालायला मुलींना आवडत नाही. माझं लग्नातील मंगळसूत्र मोठे होते .म्हणून खास नाजूक हिऱ्याचे मंगळसूत्र मला गिफ्ट दिलं”
“मंगळसूत्र, हिऱ्याचे असो सोन्याचे आहे तर बंधनच ना?”

“हे बघ पूर्वी, दोन पिढीच्या विचारांमधे फरक हा असणारच. तुला मंगळसूत्र म्हणजे गुलामगिरी वाटते. माझ्या सासूबाईंना ते सौभाग्याचे प्रतीक वाटते.माझ्या आईला आपली संस्कृती वाटते. मला म्हणशील तर तो एक दागिना वाटतो. तसंही मला गळ्यात वेगवेगळ्या माळा घालायला आवडतात.
मग  सासुबाईच्या भावना त्यात जुळल्या आहे आणि घातलं मंगळसूत्र तर काय बिघडतं? अणि आईनी जे लहानपणापासूनच संस्कार केले. ती म्हणते आपली संस्कृती आहे.तेव्हा माझ्याही मनात कुठेतरी ते रुजलंय गं आणि माझी आई आणि सासूबाई मंगळसूत्र अगदी गळ्यातून काढतच नाही तसं माझं नाही गं. तशी माझ्याकडून सासूबाईची अपेक्षाही नाही “

“हो का? लग्न झाल्याबरोबर खूप तत्वज्ञान सुचतंय तुला ” तिला चिडवीत पूर्वी म्हणाली.
“बदल हा एका दिवसात होत नसतो पूर्वी .माझी आई सांगते, तीचं  लग्न झाल तेव्हा ती साडी अणि डोक्यावर पदर घ्यायची पण आता सलवार घालते अणि आम्ही कुठे फिरायला गेलो की जीन्स-टॉप पण घालते. बरेचदा. हातात बांगड्या सुद्धा घालत नाही पण आता तिला कुणी काही म्हणत नाही”. 
माझी आजी एखादे वेळी म्हणते, ” काय बाईआजकालच्या मुली एक बांगडी सुद्धा घालत नाही पण ती हसण्यावारी नेते “

“आता तू म्हणशील आजींनी असं का विचारावे? अग, तिच्या दृष्टिने आपण चुकीचे वागतो. तिच्या दृष्टीने काचेची बांगडी घालणे म्हणजे सौभाग्याचे प्रतिक! हे बघ पूर्वी, एका पिढीला जे चुकीचे वाटते ते दुसर्‍या पिढीला बरोबर वाटते. हा विचाराचा फरक आहे.
मला नाही पटत लग्न झाल्या झाल्या छोट्या छोट्या गोष्टीत मतभेद करून घरातील वातावरण खराब करावे. माझी आजी नेहमी म्हणायची एक मूल होईपर्यंत मुलीने थोडं सासरच्या लोकांच्या कलानी घ्यावं.”
“का? लग्न दोघांनी केलं मग तूच का तडजोड करायची?”

“का करायची? याचं ठोस उत्तर मला नाही देता येणार… पण  छोटया छोटया गोष्टीसाठी वाद घालणं मला नाही पटत..आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे.. कदाचित त्या प्रेमासाठी?”
“हे बघ उर्मी, तु चुकीच्या गोष्टीच समर्थन करतेस.
तू आधुनिक युगातील स्त्री आहे.अशी कशी वागू शकते?”पूर्वी आपलं म्हणणं पटवण्याचा प्रयत्न करू लागली.
“पूर्वी तसं नाही गं , बघ तुझ्याकडे एकदम फ्री वातावरण आहे..तू नवर्‍यासोबत पार्टीमध्ये गेल्यावर ड्रिंक घेत असशील. घरी आल्यावर तुझ्या सासुबाई काही म्हणत नाही?”

“अग, मी त्यांना जास्त भावच देत नाही. माझ आयुष्य मी जगणार. त्यांचा मुलगा पितो तर चालतं  मग आपण का नाही?”
“तेच तर,अग, माझ्या घरी माझ्या बाबांनी ड्रिंक्स केल तरी माझ्या आईला आवडायचे नाही.सासूबाईंना त्यांच्या मुलाने ड्रिंक्स केले तरी आवडत नाही त्यामुळे मी ड्रिंक्स केलेले माझ्या सासुबाईना कसं आवडेल?
आणि एकत्र घरात राहतो तेव्हा एकमेकांच्या मतांचा आदर करतो.एकत्र कुटुंबात तडजोड करावीच लागते.पूर्वी, तू स्री पुरुष समानतेच्या अणि आधुनिकतेच्या गोष्टी करते पण निसर्गानेच आपल्यात फरक केलाय. निसर्गाने स्त्री अणि पुरुषाला वेगवेगळ्या जबाबदार्‍या दिल्या. पुरुषाप्रमाणे आपणही दारू अणि सिगरेट प्यायला लागलो तर कसं होइल?

आपल्याला बाळाला जन्म द्यायचा असतो. त्याच्यावर संस्कार करायचे असतात. शारिरीक दृष्टीने जरी विचार केला तरी ते स्त्रियांसाठी जास्त हानिकारक आहे. तू हव तर याला मध्यमवर्गीय मानसिकता म्हणु शकते. पूर्वी, मलापण स्त्री पुरुष समानता हवी आहे पण वैचारीक. तिला आर्थिक स्वातंत्र्य असावं. तिला तिचे निर्णय घेता यावे. समानता म्हणजे स्पर्धात्मक बरोबरी नाही तर घरातील आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक निर्णय जे आतापर्यंत फक्त पुरुष घेत होता त्या सर्व निर्णयांमध्ये स्त्रीचा सहभाग असणे.  पुरुष मंगळसुत्र घालत नाही म्हणुन मी का घालू किंवा तो ड्रिंक्स करतो म्हणुन मी पण करणार यात कसली आली समानता?

स्त्रीनी मंगळसूत्र घातलेच पाहिजे या मताचे समर्थन करीत नाही..मंगळसुत्र अणि स्त्री पुरूष समानता याचा काहीही संबंध नाही. आज किती तरी मंगळसूत्र घालणाऱ्या  स्त्रिया मोठमोठ्या पदावर आरूढ आहेत. मंगळसुत्र घालतात म्हणुन त्या आधुनिक विचारसरणीच्या नाहीत असं अजिबात  नाही.मंगळसूत्र घालावे किंवा नाही हा प्रत्येकीचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु मंगळसूत्र म्हणजे मागासलेपण असं मला अजिबात वाटत नाही”.
तेवढयात उर्मीला सासुबाईचा फोन आला.ती बाहेर जाऊन बोलून आली.
“कुणाचा फोन होता ग?”

“सासुबाईचा”
“बघ इथेपण वॉच आहे तुझ्यावर…. 
“नाही गं,आज रिझल्ट होता माझा. माझं एमपीएससीत सिलेक्शन झालंय. अभिनंदन करायला फोन केला होता.”
“अरे वा!अभिनंदन.”
“बर जाऊ दे. तुझ सांग. तुझं कस सुरू आहे. तुझ्या सासूला काहीतरी आजार होता ना. त्यांची ट्रीटमेंट कुठे सुरू आहे?
“माहीत नाही.”
“म्हणजे??? 

“अग आम्ही दोघे वर वेगळे राहतो. मी त्यांच्या भानगडीत पडत नाही “
“अग पण त्यांची प्रकृती ठीक नसताना त्या एकट्या राहतात अणि तुझा नवरा?”
“तो जातो मध्ये मध्ये भेटायला. मी जास्त लावूनच घेत नाही. त्याची आई तो बघेल ना काय करायच ते. आपल्या आईवडिलाचे बघतात का कुणी?”
उर्मीला पूर्वीच्या वागण्याचे फार आश्चर्य वाटले. विचारातच ती तिच्यासोबत शॉपिंगला गेली. शॉपिंग आटोपल्यावर दोघी आपापल्या घरी गेल्या.

उर्मीला फार वाईट वाटत होते.मनात विचार यायचा “करावा का फोन पूर्वीला? पण तिला माहिती होते पूर्वी ऐकणारी नाही.
तिनी तिला मेसेज केला.
पूर्वी…. आधुनिकता म्हणजे शॉर्ट घालणे. मंगळसूत्र न घालणे किवा टिकली न लावणे किंवा पार्टी मध्ये ड्रिंक्स, सिगरेट घेणे इथपर्यंत  मर्यादित नाही. तुझ्या दृष्टीने मी मागासलेल्या विचारसरणीची असेल. अगं पण माझ्या सासरच्यांनी मला शिक्षणासाठी सपोर्ट केलाय ना. उद्या मी ऑफिसर म्हणून रुजू होईल आणि हे स्वातंत्र्य नाही का?
अग,तुला मंगळसूत्र अणि टिकली पारतंत्र्याचे प्रतिक  वाटते. पण मला ते प्रेमाचे बंधन वाटते.माझ्या सासरी , माझा प्रतेक निर्णयामध्ये सहभाग असतो. प्रतेक गोष्टीत माझ मत विचारात घेतले जाते. त्यामुळे या पेक्षा जास्त समानतेची मला अपेक्षा नाही.

तुझ्या स्त्रिपुरुष समानता असावी या मताशी मी सहमत आहे.. कारण आजही समाजात स्त्रिपुरुष समानता नाही….आजही ग्रामीण भागातील त्या मुली, शिक्षणापासून वंचित आहेत.काही मुली चूल अणि मूल यात अडकलेल्या आहेत.त्या जेव्हा मुख्य  प्रवाहात येतील ती खरी स्त्री पुरुष समानता….. नाही का?आणि त्या दृष्टीने ऑफिसर झाल्यावर मी माझ्यापरीने नक्की प्रयत्न करणार…
तुझ्या दृष्टीने मी कदाचित मागासलेल्या विचाराची असेल तर हो, आहे मी मागासलेल्या विचाराची.
…..उर्मी 

आपल्या समजावतात अशा अनेक उर्मी अणि पूर्वी आहेत… तुम्हाला काय वाटते उर्मी मागासलेल्या विचारसरणीची आहे??की पूर्वी नी स्त्री पुरुष समानतेचा अर्थ पुरुषाशी स्पर्धात्मक समानता असा घेतला ???? 
अर्चना अनंत धवड
(हा लेख मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मुलीचा दृष्टिकोन आहे. ती मंगळसूत्र का घालते कारण मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी कितीही शिकली तरी तिच्या घरातील संस्कारानुसार वागते.पूर्वापार चालत आलेल्या परंपरा ती पाळते. प्रतेक गोष्टीत अपवाद असतात.तेव्हा मंगळसुत्र घालणार्या सर्व मुली उर्मी सारख्या अणि न घालणाऱ्या  पूर्वीसारख्या असतिलच अस नाही. कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही) 
*********
समाप्त
©अर्चना अनंत धवड
सदर कथा लेखिका अर्चना अनंत धवड यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!