©शुभांगी मस्के
“काय गं नुसती मागेपुढे करते.. मी मोठा झालोय आता. थोडी स्पेस दे,” म्हणतं अर्णवने शिवानी समोर खाडकन दरवाजा बंद केला.
अर्णव शिवानीचा एकुलता एक मुलगा. शिवानीच्या नव-याची नोकरी दुस-या शहरात त्यामुळे घरात दोघेच. शिवानीने एकटीने अर्णवची जबाबदारी समर्थपणे पेलली.
आजपर्यत मागे पुढे करणा-या लेकाला आईची अडचण व्हावी हे तिला जरा खटकलचं, अर्णवच्या अनपेक्षित वागणुकीने शिवानी चक्रावलीच..
अर्णवच्या वागण्याने तिला खूप राग आला, ती अजूनच चिडली. मोठा झाला शिंग फुटले तुला? माझ्यामुळे तूला irritate होतय का रे? बोलते, रागावते तुझ्या काळजीपोटीच ना, त्याचाही त्रास होत असेल तर सांगून दे नाही बोलणार, दरवाजावर राग कशाला काढतोस?कित्ती जोरात आदळला तो दरवाजा जरा हळहळली. तसाही घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तिचा जीव त्यामुळे ती जास्तच दुखावली गेली होती.
अभ्यास, नाश्ता, जेवणाचा आग्रह तर केला होता तुला, त्यात एवढं काय बिनसलं तुझं?
काम करता करता शिवानीची टपरटपर सुरु होती.
जातेच चांगली चारपाच दिवस कुठे निघून मग बस एकटाच भिंतींकडे बघतं. पोरं मोठी झाली की पंख फुटतात, स्वत:शीच पुटपुटली. आज अर्णवशी काहीच बोलायचं नाही, अबोला धरुन त्याची चांगलीच जीरवायची, तीने मनोमन ठरवलं.
आज अर्णवने आज क्लासला दांडी मारली होती, घरीच अभ्यास करतो म्हणत, गादीत मनसोक्त पेंगला. सकाळ पासून नुसती टंगळमंगळ चालू होती.
अर्णवने जेवणाच्या वेळेवर नाश्ता आणि जेवणात हॉटेलच्या बिर्यानीची फर्माईश केली. क्लासला न जाता, अभ्यासाच्या जागी, त्याचा टाईमपास शिवानीला सकाळपासुनचं खटकत होता.
अभ्यास कर ना रे, परिक्षा जवळ आलीय वारंवार सांगूनही आज स्वारी अभ्यास करायच्याच मूडमध्ये नव्हती.
लोळूनपोळून झाल्यावर, सोफ्यात छान पेपर चाळत बसला. शिवानीने टोकलं. एक दिवस करु दे ना गं आई आराम. बोलताना त्यांने छान लांब जांभई घेतली.
“आराम हराम है”। जांभईसमोर बोटांची चूटकी वाजवत, स्वत:शीच बडबडला. अभ्यासाला जायला उठला तसा मोबाईल हातात घेवून बसला.
अभ्यास करायच्या नावावर उठलेल्या अर्णवच्या हाती मोबाईल बघून शिवानीचा राग अनावर झाला. त्याच्या उठण्याने जराशी सुखावलेली ती, त्याच्याकडे रागात बघू लागली.
एक एक क्षण महत्वाचा असताना तुला ब-या सुचतात रे निवांतपणाच्या गोष्टी, तो समोरचा आयुष बघ, दिवसरात्र अभ्यास करतो, त्याच्या त्याला बघ कित्ती छान परसेंट मिळाले, अमक्याचा अमका तमक्याचा तमका, अर्णवची इतरांशी तुलना करत, त्याच्या पाठी चांगलीच भिडली, तो कसा अभ्यासाची टाळाटाळ करतो, अभ्यासावरुन जरा जास्तीच बोलली.
अर्णव तावातावात उठला,काहीच न बोलता.. खोलीत शिरला, जाताना त्याने दरवाजा आपटून बंद केला. त्याच्या कडून असं वागणं शिवानीसाठी अपेक्षितच नव्हतं. अर्णव तसा शांत, स्वत:चा अभ्यास स्वत:च करायचा. ट्युशन वरुन घरी आला की जेवणखाण करुन अभ्यासाला बसायचा, तोच, बारा बारा पंधरा पंधरा तास, पुस्तकात डोक टाकून असायचा. त्यामुळे तो अभ्यास करत नाही, हे म्हणणं चुकीचंच होतं. शिवानी ला त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास होताच.
मग, नक्की राग आलाय कशाचा अभ्यासाला बसत नव्हता त्याचा, तो टाईमपास करत होता त्याचा, निवांतपणे बसला होता त्याचा, की रागात दरवाजा आपटला त्याचा, तीलाच कळेनासं झालं.
सकाळपासून चिडचिड करत असलेली शिवानी लेकाच्या अशा वागण्याने शांत झाली, जणू मौन व्रत धारण केलं होतं तीने. घरात दोघेच, ना TV चा आवाज ना कशाचा, घरात स्मशान शांतता पसरली.
मी ना स्वयंपाक बनवणार ना तुला आज खावू घालणार. माझ्या हातचं खावून माझ्यावर उपकार करतोय की काय? म्हणत त्याला त्याच्या भरवशावर सोडायचचं ठरवलं.
ख-या अर्थाने शिवानी दुखावल्या गेली, त्याच्या वागण्याचं तीला खरं तर आश्चर्य वाटत होतं. संस्कार करण्यात चुकले की काय!! या प्रश्नाने तीला भंडावून सोडलं. विचार करुन अजूनच अस्वस्थ झाली.
सकाळची सारी काम आटोपली, दोनचार घास कसे तरी तिने तिच्या पोटात ढकलले. रोज ताटाला ताट लागून जेवत असलेला तिचा लाडका लेक, आज जेवनाला नव्हता तिच्यासोबत, उपाशी आहे ह्या विचारात, तिच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. जेवणखावण आटेपलं, तशी बेडरुममध्ये जावून दुपारी पांघरुन घेवून झोपली. अर्णवचं वागणं आठवून तिचे डोळे राहून राहून ओलावत होते.
आईपणा निभावताना कठोर झाली की काय मी? परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासासाठी, खाण्यासाठी बोललेलं खटकतयं की काय पोराला, स्वत:शीच पुटपुटली. सकाळपासून उगाच चिडचिड केली. तुझ्यामुळे कुठे जातायेता येत नाही, घरात मरते दिवसरात्र. तू मात्र मजा कर, सोडून दे अभ्यास म्हणत आदळ आपट केली.
नाश्ता नकोच म्हणत होता तो, तरी जबरदस्ती खायला लावला त्याला. रोज पहाटे उठून अभ्यासाला बसलेला लेक, आज उशिरा उठला तर नको नको ते बोलली.
त्याच्या अभ्यासाचा बाऊ करतेय मी तीला आज प्रकर्षाने जाणवलं.
नसेल अभ्यासाचा मूड त्याचा, उगाच चिडचिड केली त्याला समजून घ्यायला हवं होत स्वचिंतनात मग्न झाली. शिवानीला आता स्वत:च्या वागण्याचाच राग येत होता.
आजकाल शिवानीची फार चिडचिड व्हायची. “आई तू खूप चिडचिड करतेस हल्ली अर्णव अनेकदा म्हणायचा”..
हार्मोनल ईंब्यालंस, मुड स्विंग्जमुळे होतं असं कधीकधी.
मेडीटेशन, योगा, आणि आपल्या आवडीच्या कला गुणांमध्ये गुंतून रहा, आवडतं ते करा म्हणून डॉक्टरांनी तिला आधीच सांगितल्याचं आठवलं. शिवानीचं स्वत:कडे लक्षच नव्हतं. अर्णवचा अभ्यास, त्याच्या खाण्यापिण्याकडे, लक्ष देताना ती स्वत:लाच विसरली होती.
आजच्या त्याच्या वागण्याला आपणचं स्वत: सर्वस्वी जबाबदार असल्याचं तिला जाणवलं. तशीच ती ताडकन उठली, त्याला आवडते तशी छान कॉफी बनवली.
दरवाज्याला knock केलं, दरवाजा उघडलेलाच होता, कॉफी घेऊन आत गेली. अर्णव ही रडला होता त्याच्या लालबुंद झालेल्या डोळ्यांकडे बघून शिवानीला जाणवलं.
आईला बघताच अर्णवला रडू कोसळलं. Sorry Sorry म्हणत तो तिच्या कुशीत शिरला.
“नाही रे बाळा मी sorry, माझं चुकलं. चूका करण्याचा हक्क, फक्त तुम्हालाच थोडी आहे काही, आम्ही मोठी माणसं पण चूकूच शकतो. आईपण चुकते रे कधीकधी” म्हणताना शिवानीचे डोळे पाणावले.
आज, माझी चिडचिड झाली आणि तुझ्यावर राग निघाला, शिवानीला खूपच वाईट वाटत होतं.
“आई तूला change हवायं, तु जावून ये कुठेतरी, गेल्या दोन वर्षात तु कुठेच गेलेली नाहीस ना, काही दिवस बाबांकडे जाते का, मी करेन manage माझं माझं. राहू शकतो गं मी एकटा,” अर्णव बोलत होता.
“मोठ्ठा झालाय माझा लेक” दोन हाताने शिवानीने अर्णव ची दृष्ट काढली, “एकटा राहाणार होय तू? जेवणाचं काय मग?” शिवानीने विचारलं.
“Pizza, burger,जेवन ऑर्डर करुन घेईल आणि थोडं करता येत गं मला” मोठ्या confidence ने बोलत होता?
मायलेकाच्या गप्पा रंगात आल्या आणि सर्वच प्रश्न सुटले.. म्हणतात ना बोलण्याने प्रश्न सुटतात तेच खरं.
मे महिन्याच्या सुट्टीत, शिवानीच्या मावसबहिणीच्या लेकीचं लग्न होतं. मावस बहिणीने, म्हणजे प्रितीने खूप आग्रहाने बोलावलं होतं.. शिवानीने जायचं ठरवलं.
लग्नाचा दिवस येवून ठेपला. उद्या लग्नाला जाणार म्हणून शिवानी पार्लरमध्ये जावून आली. लग्नात नेसायची साडी, त्यावर घालायचे दागिने काढले.
शेजारच्या मुलीकडून दोन्ही, हातावर छान मेहंदी काढून घेतली होती. सुंदर साडी नेसली, केसांचा अंबाडा पाडला, त्यावर ताज्या छोट्या छोट्या मोग-याचा गजरा ही लावला.
आई घरतून निघेपर्यत, अर्णव तिच्या मागेपुढे करत होता. जाताना भरलेल्या थंडगार पाण्याची बॉटल हातात देत आईला बोलला. “छान enjoy कर. tension घेवू नको. मी करतो माझा अभ्यास. तू नको फार टेंशन घेवू”
आणि आईचा छान लाड केला. दोन्ही हातांनी, तिचे गाल पकडले. आई सुंदर दिसतेय म्हणून गोड compliment ही दिलं. तिही सुखावली.
दिवसभर अर्णवचाच विचार तिच्या डोक्यात राहून राहून येत होता. जेवला असेल का? अभ्यास करत असेल का? दूध, पाणी, सरबत, पाहीजे असेल का?
दोन वेळा फोन करुन विचारलं तीची काळजी तिच्या चेह-यावर दिसत होती, हे पाहून तिची आई बोलली “घार फिरते आकाशी। चित्त तिचे पिल्लांपाशी”. आणि खरचं, तसचं झालं होतं. तरीही गप्पा गोष्टी, मज्जा मस्तीत भावा-बहिणींसोबत घालवलेला वेळ तिला एक प्रकारची उर्जा देवून गेला. दिवस कसा गेला कळलच नाही. रिफ्रेश होवून सायंकाळी घरी परतली.
Door bell वाजली, आई तू आलीस पण, तू तर राहाणार होतीस ना एकदोन दिवस मिस्कीलपणे अर्णवने आईला विचारलं “मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर। किती हाकला हाकला, फिरी येती पिकांवर” म्हणत गालातल्या गालात गोड हसली.
पोराला बहिणाबाईंनी फुलवलेल्या कवितेच्या ओळींचा अर्थ समजवताना म्हणाली. नाही रे चैन पडत आईला, आईचा जीव तिच्या पिल्लावर. तिची काळजी तुला नाही कळणार. त्यासाठी आई-बाबा व्हावं लागत.
“माझी काळजी करण्यासाठी तु फ्रेश रहायला हवं ना. माझ्याकडे लक्ष देताना तुला स्वत:कडे दुर्लक्ष करुन कसं चालेल. माझ्यासाठी तू लग्न, समारंभ, स्वत:च्या आवडीनिवडी विसरायलाच हव्या का?
माझ्यासाठी तुझ्या इच्छा आकांक्षांना मुरड घालायला लागू नये असचं मला वाटतं. करतो गं मी माझा अभ्यास!!” अर्णवने मोठ्या विश्वासाने आईचा हात हाती घेतला. शिवानीतली आई अर्णवच्या बोलण्याने पुरेपुर सुखावली, आनंदली.
त्याच्या केसांवरुन हात फिरवत शिवानी बोलली पोर पटकन मोठी होतात आईला कळत देखिल नाही आणि एक दिवस तीच मुलं आईबाबांना सांभाळतात.
“मुलं चुकतात तसे आईवडीलही चुकू शकतात. माणसेच ना रे ती चुकणारचं. माफ करता आलं पाहीजे. बोलून प्रश्न सोडवता आले पाहीजे. आईवडिल जसे कधीकधी मुलांशी कठोरपणाने वागतात तसेच मुलही वागू शकतात. त्यांनाही राग व्यक्त करायचा अधिकार आहेच ना. बोलून मोकळ होता आलं पाहीजे.” त्या दिवशीच्या अर्णवच्या वागण्याचं जणू ती समर्थन करत होती.
शिवानी बोलतच होती तो अर्णव म्हणाला आई त्या दिवशी ना माझं चूकलचं. Sorry म्हणत दोन्ही हात कानाला लावले. ‘माझं चुकलं’ ‘माझं चुकलं’ म्हणताना दोघांनीही एकमेकांची माफी मागितली.
“आई मस्त गरमागरम पिठलं भात बनवतेस का? दूपारच्या heavy बिर्यानी आणि हॉटेलचा नाश्ता खावून कंटाळा आला गं. मी करतो तुला मदत, ऐन परिक्षेच्या वेळी बाहेरचं खावून तब्बेत नको बिघडायला म्हणून खाताना कित्ती टेंशन आलं म्हणून सांगू. आईने बनवलेल्या healthy पदार्थांवर यथेच्छ ताव मारण्याचं सुख काही औरच” अर्णव बोलत होता.
शिवानीच्या स्वयंपाक घरात ,अर्णवची लुडबुड चालू होती आज मात्र, “मन वढाय वढाय, उभ्या पिकात ढोर। किती हाकला हाकला, फीरी येतं पिकांवर” शिवानी आनंदाने गुणगुणत होती.
मैत्रिणींनो अनेकदा होतं असं पोरांच्या काळजीपोटी, अभ्यासावरुन आपण अनेकदा पोरांवर खूप चिडचिड करतो, स्वत:च्या इच्छांना मूरड घातल्याच खापर पोरांवर फोडतो.
कधीकधी पोरांचीही बाजू आईवडिलांनी आणि आईची होणारी चिडचिड मुलांनीही समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
चुकलं तर sorry म्हणून, लहान बनून लेकरांच्या कुशीत शिरता आलं पाहीजे. लहानांच्या चूकांवर प्रेमाचं पांघरुण घालता आलं पाहीजे. रागवून, चिडून प्रश्न सुटत नाहीत तर प्रश्न वाढतात. आईवडिलांचा मुलांशी संवाद हाच यावरचा चांगला उपाय. तुम्हाला काय वाटतं लाईक कमेंट करुन कळवा.
*********
समाप्त
©शुभांगी मस्के
सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
वाचतांना असं वाटत आहे की हे सगळं माझ्या आणि माझ्या मुलांमध्येच घडत आहे शब्द न शब्द खरा आहे
Thank you so much mam