तिलांजली

© परवीन कौसर
रोजच्या प्रमाणे ममता लवकर उठून ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. एप्रिल महिना असल्यामुळे बाहेर सकाळपासूनच ऊन वाढले होते. एकीकडे कूकर लावला होता तर दुसरीकडे कपडे धुण्यासाठी मशीन सुरू केली होती. इकडे पोळ्या करण्यासाठी कणिक मळता मळता ती भाजी फोडणी देत होती. अशी रोजच तिला सकाळी तारेवरची कसरत करावी लागायची.
बरोबर ८.३० वाजता ती घराबाहेर पडायची. आज जरा तसा तिला वेळच झाला होता. ती लवकर लवकर भराभर पावले टाकत बसस्थानक जवळ जाऊन बसची वाट पाहत उभारली.

” छ्छे ..! आज जरा वेळ झाला की सगळेच गणित चुकते. त्यात आज मिटींग आहे. आज बॉस ओरडणार मला.” असे मनात म्हणत तिने बस आता लवकर येणार नाही हे गृहीत धरून,” रिक्षा ….!” असे म्हणत रिक्षा थांबवली. तशी एक रिक्षा तिच्या समोर येऊन उभारली. लगेचच ती आत जाऊन बसणार तोच दुसरीकडून एक तरुण रिक्षामध्ये चढला.
” ओ मिस्टर..! काय हा मुर्खपणा. मी रिक्षा थांबवली आहे आणि तुम्ही बिंधास्त चढला आहात. काही कसे वाटत नाही ओ तुम्हाला.” अगदी रागा रागानेच ममता म्हणाली.

” मॅडम तुम्ही नाही मी थांबवली आहे रिक्षा. विचारा यांना हवे असेल तर. तिकडून मी हात केला होता थांबण्यासाठी.समजल …!” त्या तरुणाने ममताला उत्तर दिले.
” किती तरी खोटे बोलायचे. श्शी बाई…! आजचा दिवसच बेकार आहे. आता खरोखरच मी खूप ओरडा खाणार आहे. ” असे म्हणत ममता रिक्षातून उतरली.
” तुम्हाला कुठे जायचे आहे ? जर समजा एकाच ठिकाणी जायचे असेल दोघांना किंवा एकाच वाटेवर दोघांची ठिकाणे असतील तर दोघेही जाऊ शकता एकत्र. बघा पटतंय का ..!” रिक्षावाला म्हणाला.

‘आता हेच करावे लागणार.’ असे मनात म्हणत ममताने ” एम जी रोड” असे म्हटले.
“अरे मला देखील तिथेच जायचे आहे. माझी कार अचानक बंद पडली म्हणून मी रिक्षातून निघालो आहे. “
शेवटी ममताने कसेबसे त्याच्या बरोबर जायचे मान्य केले कारण ऑफिसमध्ये मिटिंग होती आणि काही पेपर पूर्ण करायचे होते यासाठी तिची गडबड सुरू होती.
दोघांनाही जिथे जायचे त्या ठिकाणी ते दोघे उतरले.

ममता पळत पळत ऑफिसमध्ये गेली. आधीच तिला वेळ झाला होता. तिने पटपट मिटिंगमध्ये लागणारी पेपर तयार केली.अगदीच कमी वेळात सगळे पेपर तयार करून बॉसच्या केबिनमध्ये नेऊन ठेवले. मिटिंग वेळेवर झाली. बॉसने ममताच्या कामाची स्तुती केली. तिला आता प्रमोशन मिळेल असे सांगितले. ममताला पण आपण केलेल्या कामाला यश मिळाले हे बघून आनंद झाला.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ती बस स्थानकावर जाऊन बसची वाट पाहत उभारली. तोच समोर एक मोठी कार येऊन उभारली. कारची काच खाली करून,” हाय मिस..! चला मी सोडतो तुम्हाला. जिथे आपण रिक्षा थांबवली तिथे जवळच असेल न घर तुमचे. तिकडूनच जातो मी.”
ममता ने एकदम दचकून पाहिले तर तोच सकाळी रिक्षामध्ये बसलेला तरुण.

“नो थ्यॅंक्स. मी जाईन. बस येईल इतक्यात.”
“अहो मी चांगल्या घरचा मुलगा आहे. तुम्हाला घाबरायचे कारण नाही.” असे हसतच तो म्हणाला.
“नाही घाबरत नाही मी. पण खरंच नको. खूप धन्यवाद तुमचे.” ममता म्हणाली.
“ओके. चला बाय…! भेटू पुन्हा असेच कधी तरी.” असे म्हणत त्याने गाडी सुरू केली आणि तो सुसाट वेगाने दोन मिनिटातच डोळ्याआड झाला.

बघता बघता दोन महिने झाले. ममताला प्रमोशन मिळाले . आता तिची पोस्ट त्याचबरोबर तिचा पगार ही बऱ्यापैकी वाढला.
रविवारी ती घराजवळ असलेल्या मॉलमध्ये घरगुती वस्तू आणायला गेली. तिने एका ट्राॅलीमध्ये आपणास हव्या असलेल्या गरजेच्या वस्तू खरेदी केल्या. ती कॅश काऊंटर जवळ जातच होती .
तोच तिला,” आई ऽऽऽऽऽ आई गं….! आई…!” असा एका महिलेचा विव्हळणारा आवाज आला. आवाजाच्या दिशेने तिने पाहिले तर एक महिला असेल पन्नास वर्षांची तिथे एका ट्राॅलीला धरून विव्हळत होती. तिचा चेहरा घामेघुम झाला होता.तिच्या चेहऱ्यावरूनच तिला खूप त्रास होतोय हे जाणवत होते. ममता पटकन तिच्या जवळ गेली.

” काय होतय काकू ? ” ममता ने विचारले.
तिला काही तरी बोलायचे होते पण ती बोलू शकत नव्हती. ममता ने पटकन आपल्या जवळ असलेली पाण्याची बाटली काढून तिला पाणी पाजले. तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हटले,” आता कसे वाटतेय. काय होतय सांगाल का काकू?”
तिने फक्त आपल्या हातातील पर्स जवळ इशारा केला. ममता ने तिची पर्स उघडली त्यामध्ये मोबाईल फोन होता. त्याचबरोबर दोन तीन चाॅकलेटस होती. ममता ने तिला एक चॉकलेट काढून तिला खायला दिले. तिच्या चेहऱ्यावर आलेला घाम आपल्या रुमालाने पुसला. पुन्हा जरा पाणी पाजले. तेव्हा जरा तिची स्थिती बोलण्याची झाली. तिने फोन करशील आता आलेल्या नंबरावर असे सांगितले.

ममता ने रिसिव्ह कॉलममध्ये पहिला नंबर होता जो अजिंक्य या नावाने सेव्ह होता त्या नंबरवर डायल केले.
“हो आई झाली का तुझी शाॅपिंग. आलोच पाचच मिनिटांत.” तिकडून आवाज.
” हॅलो सर तुमच्या आईंची तब्येत बरी नाही. जरा लवकरच या तुम्ही.” ममता म्हणाली.
” हॅलो कोण ,कुठे आहे आई आता.”
” इथे मॉलमध्येच.”
ममता त्या महिलेला तिथलीच एक खुर्ची देऊन त्यावर बसविले. आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत उभारली. तोच समोरून एक तरुण पळत पळत आला.

“आई …! आई…! “
“अगं आई काय झाले तुला ?”
” या एकदमच आई आई असा आवाज करत होत्या यांना खूप घाम सुटला होता. मला पण काहीच कळले नाही. मी पाणी पाजले यांना. मग यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला फोन केला तेव्हा पर्समध्ये असलेले चाॅकलेट खायला दिले. काय झाले हे मला पण कळले नाही.”
” बहुतेक शूगर डाऊन झाली असेल. बाय द वे आपले खूप खूप धन्यवाद…! ” असे म्हणत त्याने ममता ला पाहिले आणि “अरेच्चा तुम्ही…! म्हणजे तुम्ही आईजवळ…! तुमचे पुनश्च एकदा धन्यवाद.”

त्याचे बोलणे ऐकून ममताने त्याचा चेहरा पाहिला तेव्हा ती पण आश्चर्य चकित झाली.
” अरे तुम्ही…! म्हणजे तुमच्या आई आहेत या.”
हे दोघे आईला धरून हळूहळू बाहेर घेऊन आले.
समोरच मॅकडी होते. तिथे जाऊन बसले. तेव्हा अजिंक्य ने आपल्या आईला ममता बरोबर आपली भेट कशी झाली हे सांगितले.
” चला आम्ही सोडतो तुम्हाला तुमच्या घरी.” असे म्हणत अजिंक्य ने ममताला कारमध्ये घेतले.

अजिंक्यची आईची प्रकृती अजून सुधारली नव्हती. तिच्या बाजूला ममता बसली. गाडीत बसल्यानंतर ममताने अजिंक्यच्या आईला ,” आता कसे वाटतेय.” अशी आपुलकीने विचारपूस केली.
अजिंक्यच्या आईने ,” हो थोडे बरे वाटतेय गं.” असे हळू आवाजात म्हटले.
ममताचे घर आले तेव्हा ममता म्हणाली,” चला घरी चहा करते. तुम्हाला थोडे फ्रेश वाटेल.”

” नको बाळ जातो घरी आम्ही.”
“असे कसे दारासमोरुन जाणार काकू. बघा अजून किती बारीक आवाज येतोय तुमचा.” असे म्हणत जबरदस्तीने ममताने त्यांना आपल्या घरी आणले.
घर तसे छोटेच अगदी दोन खोल्यांचे पण खूपच टापटीप लावलेले. स्वच्छ आणि चकचकीत. कुठल्याही वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या नाही की कुठेही पडलेल्या नाही.एक प्रकारचे समाधान असलेले घर वाटले.
” तू एकटीच राहतेस?”

” हो काकू. तुम्हाला थोडीशी साखर घालून बदामाचा शिरा करुन देते बरे वाटेल तुम्हाला.” असे म्हणत ममता ने पटकन शिरा बनवला. शिऱ्याचा घमघमाट घरभर पसरला होता.
शिरा अगदीच स्वादिष्ट बनला होता.अजिंक्यच्या आईने आपला फोन नंबर ममताला दिला त्याच बरोबर तिचा नंबर देखील आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला.
आता दिवसांतून एकदा तरी दोघींचा फोन व्हायचा.

दिवाळी जवळ आली होती. ममता ने आपल्या घराची साफसफाई केली. फराळ बनवायला सुरुवात केली. कामातून जसा वेळ मिळेल तसा तिने फराळ बनवला.
आज दिवाळी. ममता ने दिवाळी साठी फिकट निळ्या रंगाची साडी नेसली. तिच्या काही मैत्रीणी दुपारी येणार होत्या. त्या तयारीत ती होती तोच तिच्या दाराची बेल वाजली.
तिने दरवाजा उघडला तर समोर अजिंक्यची आई अजिंक्य बरोबर उभी होती त्यांच्या मागे दोन महिला हातामध्ये मोठमोठे बाॅक्स घेऊन उभे होते.

” या या काकू.” असे म्हणत तिने सर्वांचे स्वागत अगदी आपल्या हसऱ्या चेहऱ्याने केले.
सगळेजण आत येऊन बसले‌.
” अरे आजच्या दिवशी पण तू एकटीच ?” अजिंक्यची आई म्हणाली.
” हो काकू . बघा न आजच बाबांच्या मित्रांनी गरीबांना फराळ वाटप करायचे ठरविले आहे. त्यामुळे ते आता उद्या संध्याकाळी येतील.” ममता ने अगदीच दुःखी स्वरात म्हटले.

” मला वाटले आज तुझे आईवडील असतील तुझ्या बरोबर म्हणून तर मी आले होते. तसे आज येण्याचे कारण काही वेगळेच आहे. मी एकदम विषयावर येते. मी तुला माझ्या अजिंक्य साठी मागणी घालायला आली आहे. तुझे आईबाबांच्या बरोबर बोलायचे होते मला.”
” नाही काकू हे होणे शक्यच नाही.” ममता म्हणाली.
” का ? “
” नाही काकू मी …! मला…! नको काकू मी काही बोलू शकणार नाही या विषयावर.”

” का ममता तू स्वतःला या सुखापासून वंचित ठेवत आहेस.? तुझ्या सुखाला का तू तिलांजली देत आहेस. सुख चालत आले आहे तुझ्या दारी. याचा अनादर करु नकोस.” बाहेरून आत येत ममताची मैत्रीण म्हणाली.
तिच्या आवाजाच्या दिशेने अजिंक्यच्या आईने पाहिले. तिला काहीच कळले नाही.
” नमस्ते काकू मी स्नेहल ममताची बेस्ट फ्रेंड. आमची मैत्री म्हणजे अगदी आरसाच आहे. काहीही लपलेले नाही आमच्या दोघीत.मी तुम्हाला सर्व काही सांगते.”
” स्नेहल प्लिज…!” ममता म्हणाली.
” काकू ममता तिच्या आईबाबांची एकुलती एक मुलगी. तिचे वडील शिक्षक आई गृहिणी ‌. ममता हुशार आणि कर्तबगार मुलगी. शाळेत कॉलेजात पहिल्या नंबरने पास होणारी मुलगी. खाऊन पिऊन सुखी असलेले हे मध्यमवर्गीय कुटुंब.

कॉलेजचे फायनल इयर झाले. ममताला डिग्री पूर्ण होताच चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. नोकरीचा पहिला दिवस.थोडीशी घाबरलेली बावरलेली ममता ऑफिसमध्ये गेली. पहिल्या दिवशी सर्वांची ओळख झाली. तिचा बॉस शशांक एक रुबाबदार तरुण होता. गडगंज संपत्ती असलेले शहरातील मोठ्या घराण्यातील मुलगा.
त्यादिवशी महिना अखेर होता. काम खूप असलेमुळे ममता घरी जायला वेळ झाला. तिला त्यावेळी बस मिळणे कठीणच म्हणून ती रिक्षा घेऊन जाणार होती तेवढ्यात शशांकने तिला घरी सोडायला येतो म्हणून गाडीतून घरी सोडले.

आता या दोघांत खूप मैत्री झाली. या मैत्रीचे रुप कधी प्रेमात बदलले हे दोघांनाही कळले नाही.दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. ममता ने आपल्या आईवडिलांना शशांकबद्दल सर्व सांगितले त्यांनी शशांकला भेटायला बोलावले. त्याला भेटल्यावर त्यांना आपल्या मुलीने योग्य वर निवडला आहे याची खात्री पटली.
शशांकने आपल्या घरी ममता बदल सांगितले. तेव्हा त्याच्या घरात एकच वादळ उठले. त्याच्या वडिलांनी हे लग्न होणार नाही असे सांगितले. त्यांनी आपल्या मित्राची मुलगी शशांकसाठी आधीच पसंत केली होती. शशांक ने वडिलांना आपण लग्न करणार तर ते ममता बरोबर दुसऱ्या मुलीचा विचार देखील करणार नाही असे सांगितले. यावर बापलेकाचे जोरदार भांडण झाले.

शशांक त्या दिवशी ऑफिसला आलाच नाही. त्याने अशी अचानक सुट्टी का घेतली म्हणून ममता त्याला फोन केला पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. तिने त्याला खूप मेसेज केले . बघता बघता चार दिवस झाले तरी शशांकचा पत्ता नव्हता. त्याची तब्येत तर बरी असेल न ? असा कसा तो फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे. असे एक ना अनेक प्रश्नांनी ममताच्या डोक्यात काहूर माजवले होते. शेवटी तिने शशांकच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ती दुपारी आॅफिसमधून सुट्टी घेऊन शशांकच्या घरी गेली. पाहते तर त्याच्या घराला मोठे कुलूप होते. तिने इकडे तिकडे पाहीले तर तिथे कोणीच दिसले नाही तशी ती हताश होऊन बाहेर पडली तोच शशांकच्या शेजारचे एक गृहस्थ तिला दिसले.

” नमस्ते काका. मी ममता . शशांकच्या घराला कुलूप आहे. कुठे बाहेर गेले का. त्याचा फोन पण स्विच ऑफ येत आहे.”
” हो हो. ते गोव्याला गेलेत. शशांकची एंगेजमेंट आहे न.”
हे ऐकताच ममताच्या पायाखालची जमीन सरकली. ती तशीच तडक घरी परतली. काही दिवस ती आॅफिसला गेलीच नाही. शेवटी तिने राजीनामा दिला आणि आपण इथे राहिलो तर शशांकच्या आठवणी जाग्या होतच राहणार.म्हणून तिने ते शहर सोडून इथे येऊन रहाण्याचा निर्णय घेतला. तिच्या आईबाबांनी तिच्या साठी खूप स्थळे बघितली पण तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तिने जेव्हा ते शहर सोडले तेव्हा आपल्या भावनांना तिलांजली दिली आपल्या प्रेमाची आहुती दिली आजन्म अविवाहित राहायचे असे आपल्या मनाला ठामपणे सांगितले आणि इथे येऊन पुन्हा नव्याने आयुष्य सुरु केले.”

हे ऐकताच अजिंक्यच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. तिने पटकन उठून ममताला आपल्या जवळ घेतले.
” ममता तू तुझे आयुष्य नव्याने पुन्हा सुरू केले याचे खरंच कौतुक वाटते. खरं तर शशांकने लग्नाला का होकार दिला हेच कळत नाही. कदाचित त्याच्या वडिलांनी जबरदस्तीने त्याला तयार केले असेल किंवा काही तरी दुसरा प्राॅब्लेम असेल. असो..! त्याने तर लग्न करून संसार थाटला. पण तू का या सुखावर तिलांजली देत आहेस. हे बघ तू आज शांतचित्ताने विचार करुन निर्णय घे. आम्ही उद्या येतो तेव्हा तुझे आईबाबा पण असतील.आणि हो काळजी घे.” असे म्हणत त्यांनी ममताच्या पाठीवरून हात फिरवला.

” स्नेहल कशाला सांगितले यार तू. मी कशी लग्न करणार सांग. अगं मी मनापासून शशांकलाच माझा नवरा मानले होते अजून ही मानते. मी दुसऱ्याचा विचार करुच शकत नाही गं.”
” ममता आयुष्य एकटीने जगणे इतके सोपे नाही ग. आईबाबा काय आज आहेत उद्या नाहीत. आपल्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी हक्काचे माणूस हवेच ग. बघ तू शांतपणे विचार करून निर्णय घे. ” स्नेहल म्हणाली.
रात्री ममताला झोपच येत नव्हती ती वारंवार शशांकचा फोन नंबर आपल्या मोबाईल वर टाईप करत होती पुन्हा डिलीट करत होती. तिच्या मनाची घालमेल होत होती. तिला काही सुचत नव्हते. तिला शशांकचा चेहरा दिसत होता. तिने फोन बाजूला ठेवला आणि आपल्या चेहऱ्यावर आपले दोन्ही हात धरून,’ शशांक…! शशांक..! किती विसरण्याचा प्रयत्न करतेय तुला पण विसरू शकत नाही मी.” असे म्हणू लागली.

इतक्यात तिच्या फोन वर मेसेजची रिंग वाजली. इतक्या रात्री कुणाचा मेसेज म्हणून तिने फोन बघितला. तशी ती आश्चर्य चकित झाली. मेसेज शशांकचा होता.
” ममता मी तुझा गुन्हेगार आहे. तुला मी सविस्तर येऊन सांगणार होतो पण तू शहर सोडून गेली होती. त्यादिवशी मी आपल्या बद्दल बाबांना सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला मग मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. हे ऐकताच आई रडायला लागली. बाबा जोरजोराने ओरडू लागले. इतके जोरात ओरडल्या मुळे त्यांचे बी पी हाय झाले. त्यांना लगेचच दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या समोर असले काही बोलू नका ज्यामुळे बी पी वाढेल. नाही तर अॅटॅक येण्याची शक्यता आहे. आधीच त्यांना एक येऊन गेला आहे पुन्हा आला तर वाचण्याची शक्यता कमीच असे सांगितले.

त्यांना जितके आनंदी ठेवाल तितके आयुष्य वाढेल असे सांगताच आईने माझ्या समोर त्यांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्नाला होकार देईल बाबांना आयुष्य दे शशांक बाळा अशी विनंती केली. शेवटी आईबाबा साठी मी होकार दिला. आजच मला तुझ्या मैत्रिणीचा स्नेहल चा फोन आला होता.तिने आज जे झाले ते सगळे सांगितले. ममता तू लग्नाला होकार दे. तू तुझ्या आयुष्यात सदैव सुखी रहावी असेच मला वाटते.
हा मेसेज वाचल्यावर ममता आणखीन रडू लागली.

सकाळी उठल्यावर ममता ने आपली कामे पटापट करुन आईबाबांच्या आवडीचा स्वयंपाक करत होती तोच दारावर थाप पडली. तिने दरवाजा उघडला.
” या या. अगं आई किती बारीक झाली आहेस. तब्येत तर बरी आहे न तुझी.” ममता म्हणाली.
” अगं हो हो. आहे बरी. आत तर येऊ दे .” असे म्हणत आईबाबा आत आले.
तिघांच्या गप्पा रंगल्या तोच दारावर टकटक झाली. ममता ने पटकन जाऊन दार उघडले. समोर अजिंक्यची आई उभी होती. ममता त्यांना बघितल्या बरोबर त्यांच्या पाया पडली.

” अगं वेडा बाई पाया काय पडतेस. मी तर तुला गळाभेट देणार आहे. माझी लाडाची गुणाची पोर.” असे म्हणत त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
ममताच्या आईबाबांना काही समजेना कोण आहेत या. असे का म्हणतायेत .
” मी ममताची होणारी सासू आहे. अजिंक्यची आई. असे म्हणत त्यांनी जे काही घडले ते सगळे सांगितले. हे ऐकताच ममताचे आईवडील खूप खुश झाले.
” आता काही विलंब न करता चट मंगणी पट शादी करायचे बरं का. माझ्या अंगणात खूप दिवसांनी आता मोगरा फुलणार आहे.” असे म्हणत अजिंक्यच्या आईने ममताला पेढा भरविला. तशी ममता लाजेने चूर चूर होऊन आपल्या आईजवळ जाऊन आईला गच्च मिठी मारत रडू लागली.
*********
समाप्त
© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!