सवत..३६० अंशात फिरलेलं आयुष्य

©वर्षा पाचारणे.
निर्मला आणि शरदचं लग्न झालं. छान निसर्गरम्य खंडाळ्यासारख्या ठिकाणची थंड हवा, छोटसं घरकुल, घरात इनमिन सासू-सासरे, नवरा आणि निर्मला, नणंदेचे लग्न झालेले, नवरा चांगल्या ठिकाणी कामाला, यापेक्षा दुसरं सुख ते काय! असं निर्मलाला सतत वाटायचं. लग्नाला साधारण वर्षही झालं नसेल आणि निर्मलाचे सासरे एका अपघातात मरण पावले. पण त्या दिवसापासून निर्मलाच्या सासूबाईंनी तिच्यावर पांढऱ्या पायाची म्हणून शिक्कामोर्तबच केला.
आधी वर्षभरही त्यांचं वागणं प्रेमळपणाचं असं कधीच नव्हतं पण आता तर अगदी पूर्वीच्या काळी टीव्हीवर दाखवायचे तसे खाष्ट सासू या कॅटेगिरीत बसवावी एवढी छळवणूक त्या निर्मलाची करत होत्या. 

सगळं काही सहन करत करत निर्मला रोज कधी एकदा रात्र होते, याची वाट पाहायची. तिला वाटायचं नवरा रात्री घरी आला की, त्याच्या कुशीत शिरून दिवसभराची सारी मरगळ, चिंता एका क्षणात दूर व्हावी.. त्याला न सांगताही त्याने आपल्या मनातील ओळखावं.
पण शरद कामावरून आला की तो आधीच थकलेला असायचा… त्यात निर्मला आणि त्याचं काही बोलणं व्हायच्या आधीच सासूबाई असे काही त्याचे कान भरायच्या, की उगाच शब्दाने शब्द वाढायला नको, म्हणून तो जेवण झालं की निमूटपणे झोपून जात असे. नेहमी आपली आईच बरोबर आणि बायको चुकते असं त्याचं ठाम मत झालं होतं, त्यामुळे निर्मलाच्या भावना समजून घ्यायचा त्याने कधीच प्रयत्नच केला नाही.

दोन वर्षांनी घरात पाळणा हलला. पहिली मुलगी झाली, म्हणून सासूबाई अतिशय नाराज झाल्या. शरदही म्हणावा तसा खूष नव्हता. अशी वर्ष सरता सरता निर्मलाला तीन मुली झाल्या. ‘आपल्या वंशाला वारस नाही’, म्हणून सासूबाई सतत तिला हिणवत असायच्या. आता आता शरदही निर्मलापासून थोडा अलिप्त राहायला लागला होता. त्याचं असं वेगळं वागणं निर्मलाच्या ध्यानात येत नव्हतं असं नाही, पण ती जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करत होती.
अशातच सासुबाईंचे अल्पशा आजाराने निधन झाले. इतके दिवस सासूबाई बडबड करायला होत्या, तेव्हा नणंद अधेमधे माहेरी आलीच, तर तीही त्यांना साथ द्यायची.आता तर स्वतःची आई वारल्याने, ‘आपले माहेर तुटते की काय?’, या भीतीने तिला जणू ग्रासले होते.

त्या भीतीपोटी आईच्या अंत्यविधीनंतर, दहा दिवस माहेरीच असल्याने, सतत निर्मलाला घालून पाडून बोलत होती. ‘आता माझी आई नसली म्हणून तुला काही धाक नाही असे समजू नकोस, माझे तुमच्यावर बारीक लक्ष असेल’, असे म्हणून जवळपास धमकीच देऊन गेली.
दिवस सरत होते. निर्मलाही आता मुलींमध्ये गुरफटत चालली होती. त्यांच्या शाळा, दिवसभराचं काम, नवऱ्याच्या ऑफिसच्या वेळा, सारं सांभाळताना तिची दमछाक व्हायची.एक दिवस तिला कपडे धूत असताना नवऱ्याच्या शर्टच्या खिशात लेडीज रुमाल सापडला. मनात हजारो प्रश्नांनी काहूर माजवले. दिवसभर विचार करून करून डोकं भणभणायला लागलं होतं.
तिने रात्री जेवण आटोपून मुली झोपल्यानंतर शरदला त्या रूमालाबद्दल विचारलं. आपण असं विचारल्यावर शरद काय बोलतो, या उत्सुकतेपोटी ती त्याच्याकडे पाहू लागली.

आधीच दिवसभर विचारांनी डोक्यात जो संशय माजवला होता, त्यामुळे डोळ्यात अश्रुंनी गर्दी केली होती. शरदने एक रागाने कटाक्ष टाकत ,’तुला उद्या सांगतो’, असे म्हणत पाठ फिरवून तो झोपी गेला.
निर्मला त्याला हलवून हलवून विचारत होती,” उद्या नाही, मला आजच उत्तर सांगा. कोणाचा आहे तो रूमाल? आणि तुमच्या खिशात कसा आला? जे उद्या सांगणार आहात ते आजच सांगा…. उगाच माझा जीव टांगणीला लावू नका”… पण तोंडातून एक शब्दही न काढता शरदने झोपेचं सोंग घेतलं. निर्मला मात्र खाटेवर तशीच तळमळत पडली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने शरदला ऑफिससाठी डबा बनवून दिला. पण दोघेही एकमेकांशी एकंही शब्द बोलले नाहीत. निर्मलाला शरदकडून उत्तराची अपेक्षा होती, पण सारेच प्रश्न अनुत्तरीत राहिले होते.

संध्याकाळी रोजच्याप्रमाणे स्वयंपाक करून निर्मला विचार करत बसली होती. रोजची ठरलेली वेळ होऊनही अजूनही शरद घरी आला नव्हता. रात्रीचे दहा वाजले होते. अजूनही शरद घरी न आल्याने आता मात्र निर्मलाचा जीव कासावीस होऊ लागला.डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ‘आपण उगाच संशय घेतला का त्यांच्यावर? त्यांचे किती प्रेम आहे, हे माहित नाही का मला? आजपर्यंत मी… मी कधीही कुठल्याही गोष्टीवरून त्यांच्याशी वाद घातला नव्हता. मग एवढ्याशा रुमालाच्या तुकड्याने इतका मोठा अबोला आणि प्रेमाला तडा तर जाणार नाही ना?’, या विचाराने तिचे अश्रू काही केल्या थांबेना. झोपलेल्या मुलींच्या डोक्यावरून हात फिरवत ती सतत देवाकडे, शरद लवकर परत घरी येण्यासाठी प्रार्थना करू लागली.

रात्री साडेदहाच्या सुमारास दारावरची बेल वाजली. निर्मला धावतच दाराजवळ गेली. तिने दार उघडले आणि शरदला दारात पाहून त्याला घट्ट मिठी मारली आणि ,”माझं चुकलं, मला माफ करा, मी असा उगाच तुमच्यावर संशय घ्यायला नको होता”… म्हणत ती मिठी आणखी घट्ट होत होती. पण शरद मात्र पूर्णपणे अलिप्त होता. त्याने तिला स्वतःपासून दूर लोटले आणि ‘बाजूला हो’, म्हणत घरात आला. त्याने खांद्यावरची बॅग टेबलवर ठेवली, तरीही निर्मला त्याच्या आजूबाजूला घुटमळत हात जोडून,” अहो, मला माफ करा, एवढ्याशा रुमालाच्या तुकड्याने मी एवढं बोलायला नको होतं”… म्हणत पुन्हा पुन्हा माफी मागू लागली.

तितक्यात तिचे लक्ष दाराकडे गेले. दारात तिच्याच वयाची एक महिला आणि साधारण सात-आठ वर्षांचा मुलगा उभे होते. निर्मला काही म्हणणार, तितक्यात ती बाई आणि तो मुलगा घरात आले. तशी निर्मला पुढे सरसावली. म्हणाली,” कोण पाहिजे तुम्हाला? आणि इतक्या रात्री आमच्या घरी का आलात?” तसा शरद तिच्या अंगावर खेकसला. म्हणाला,” आमच्या घरी?”…. कोण, समजतेस कोण तू स्वतःला? ती कोणी दुसरी तिसरी बाई नसून तुझी सवत आहे आणि हा आमच्या दोघांचा मुलगा केतन”….

एवढे सगळे ऐकून निर्मलाच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ती मटकन खाली बसली. आयुष्य ३६० अंशात फिरलं होतं. शरद आणि ती बाई (माधुरी) आत खोलीमध्ये गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मुली उठल्या, तेव्हा आई एका भिंतीला टेकून हमसून हमसून रडत असल्याचे त्यांना दिसले. ‘आई का रडते?’… ‘आई, का रडते सांग ना गं?’, म्हणत मुलीही रडू लागल्या. आपल्या तीनही लेकींना उराशी कवटाळून निर्मला असहाय्यपणे रडत होती. तितक्यात माधुरी आणि तिचा मुलगा खोलीतून बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ शरदही बाहेर आला. निर्मलाकडे एक विचित्र कटाक्ष टाकत शरद म्हणाला,” आजपासून हे दोघे इथेच राहणार आहेत, जर तुला काही प्रॉब्लेम असेल, तर तू घर सोडून जाऊ शकते. मुलींना माझ्याकडे ठेवू शकते किंवा सोबत नेऊ शकतेस… माझी काही हरकत नसेल.

पण या घरात राहायचं असेल, तर माधुरी आणि आमच्या मुलाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला मला चालणार नाही”,… एवढं बोलून निघून गेला. माधुरी पण अगदी हक्क गाजवत घरभर फिरत निर्मलाकडे विचित्र कटाक्ष टाकत होती.
शेवटी ‘मुलींना घेऊन आपण एकटं बाहेरच्या जगात जगू शकत नाही’ असा विचार करत निर्मलाने मन मारून त्याच घरात राहायचं ठरवलं. ‘मुलगा होत नाही, ही काय माझी चूक होती?, म्हणून ती दिवस रात्र स्वतःला कोसत होती. “माझ्यात अशी काय कमी होती की त्यांना दुसऱ्या बायकोची गरज लागली?”, म्हणून सतत ती स्वतःला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होती.नक्षत्रासारख्या दिसणाऱ्या मुली असताना केवळ मुलाच्या हट्टापायी? का अधिक शरीरसुखासाठी? का म्हणून शरदने अशी प्रतारणा केली?, या प्रश्नाचे उत्तर काही केल्या मिळत नव्हतं.

आता मुली हेच आपलं विश्व समजून, तिने शरदबरोबर कायमचा अबोला धरला. शरद एक ठराविक रक्कम निर्मलाच्या हातात दर महिन्याला तिच्यासाठी आणि मुलींसाठी देत होता. मुली आणि निर्मला जणू काही परके असल्यासारखं त्यांना घरातल्या घरात एक विचित्र वागणूक मिळत होती. शरद मुलींबरोबर थोडाफार तरी बोलायचा पण निर्मला तर त्याच्या खिजगणतीतही नव्हती. कितीतरी रात्री तिने तळमळत काढल्या होत्या. खोलीतून शरद आणि माधुरीच्या कुजबुजत बोलण्याचा किंवा हसण्याचा आवाज कानावर पडल्यावर किती यातना व्हायच्या त्या तिचे तिलाच माहीत…, आपलाच नवरा दुसऱ्या बाईच्या मिठीत आहे या विचाराने कुठल्याही स्त्रीच्या शरीर आणि मनाची अवस्था शब्दात वर्णन करणेच कठीण.

वर्ष सरत गेले निर्मला आणि शरद हे आता पूर्णपणे एकमेकांपासून अलिप्त झाले होते. एकाच घरात राहून शरीर आणि मनाचा कुठलाही संबंध त्यांनी एकमेकांशी ठेवला नव्हता. एवढेच काय तर त्यांनी इतक्या वर्षात एकमेकांबरोबर एक शब्दही बोलला नव्हता. निर्मलाच्या तीनही मुलींची लग्न झाली. मुलींना सासरही तितकेच छान आणि समजूतदार मिळाले होते. सासरची मंडळी अगदी स्वतःच्या लेकींप्रमाणे त्यांची काळजी घेत होते. निर्मलाला आयुष्य धन्य झाल्यासारखं वाटलं. नवऱ्याचं नाही किमान अशा समजूतदार लेकींचं सुख पदरात पडलं होतं.
आता वय झाल्याने तिने स्वतःला देवाधर्माच्या कामात गुंतवून घेतलं होतं. भजनी मंडळ, मैत्रिणी यामध्ये ती आता वेळ घालवू लागली होती. एक दिवस ती संध्याकाळी भजनी मंडळावरून घरी परतल्यानंतर, शरद एका कोपर्‍यात तिला सुन्न अवस्थेत रडताना दिसला. पण इतक्या वर्षात प्रेम आटलं होतं. ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं, त्याने तिचा विश्वासघात केल्याने, त्याच्याबद्दल काडीचीही सहानुभूती तिच्या मनात राहिली नव्हती. 

तितक्यात माधुरी आणि तिचा मुलगा खोलीतून बाहेर आले. निर्मलाच्या जवळ बसून माधुरीने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली ,”ताई, मी इतके वर्षात तुझ्याकडे, तुझ्या मुलींकडे ढुंकूनही पाहिले नाही. तुझ्या नवऱ्याला आपलंसं करून तुझ्या संसाराचं वाटोळं केलं. पण आज त्याची शिक्षा मी भोगत आहे. मला कॅन्सर झालेला आहे. आज मी शेवटच्या स्टेजमध्ये आहे. माझं मरण जवळ येतंय, तसं मला एकच चिंता वाटते…. माझ्या केतनची…, तू आजवर तुझ्या मुलींमध्ये आणि माझ्या केतनमध्ये कधीही भेदभाव केला नाही. स्वतःच्या पोटच्या लेकराप्रमाणे तु त्याला कायमंच जीव लावला. फक्त यापुढेही माझ्यानंतर तू त्याची अशीच आई बनून राहशील ना… एवढे बोलून माधुरी रडू लागली…. पण तिचे अश्रू आणि तिचे शब्द दोन्हीही निर्मलाच्या मनावर परिणाम करू शकले नाही…. काही वर्षांपूर्वी जो आघात निर्मलाच्या मनावर झाला होता, त्याने तिचे मन तेव्हाच सुन्न झाले होते.

शरद माधुरीची आता खूप काळजी घेत होता. तिचे शेवटचे दिवस अगदी सुखात जावेत, म्हणून झटत होता. निर्मलाबरोबरही तो आता आडून आडून बोलण्याचा प्रयत्न करत होता. परंतु सर्व व्यर्थ होते….. कारण संवादासाठी दोन्ही व्यक्तींनी बोलण्याची गरज असते. पण आता तो संवाद नाही, तर केवळ एकतर्फी बडबड राहिली होती.., तीही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी….. दोन महिन्यांनी माधुरी देवाघरी गेली. मनात शरद आणि माधुरीबद्दल कितीही द्वेषभावना असली, तरीही निर्मलाने केतनला जीव लावण्यात कधीही कसली कसूर ठेवली नव्हती.

आपल्या मुलींप्रमाणे, तिने त्याचे सगळे हट्ट, लाड पूर्ण केले होते. पण म्हणतात ना,’ हे कलियुग आहे, इथे या जन्मातल्या कर्माची फळं इथंच भोगावी लागतात’…. केतनचे लग्न झाले आणि दोन महिन्यातच त्याची बायको एका क्षुल्लक कारणावरून भांडून निघून गेली. शरद आणि केतनने नंतर दहा वेळा तिच्या माहेरी जाऊन तिला परत घरी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळं व्यर्थ ठरलं…. शेवटी दोघांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर शरदने अनेकदा ओळखीपाळखीतल्या लोकांना सांगून केतनचं दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्नांना कधीच यश आलं नाही. आता केतन वडिलांच्या जीवावर सुरू केलेल्या किराणामालाच्या दुकानात केवळ गल्ल्यावर बसून असतो.

निर्मलासारख्या एका पतिव्रतेची हाय लागल्याने शरद कधीही सुखी होऊ शकला नाही. केतनचे लग्न होऊनही लगेच घटस्फोट झाल्याने त्यांच्या वंशाला वारस मिळालाच नाही. आज शरदला स्वत:चीच चूक कळून चुकली, तरीही गोष्टी हातातून निसटून गेल्या होत्या. कुठल्या अघोरी विचाराने, त्याने निर्मलाला डावलून माधुरीची सोबत करणे पसंत केले होते, त्याचे त्यालाच माहित…. मुलगा-मुलगी भेदभाव अनेकदा काही घरांमध्ये आजही पाहायला मिळतो. पण व्यर्थ आणि विकृत हट्टापायी एखाद्या स्त्रीचे आयुष्य असे पणाला लावणे किती योग्य आहे?, याचा विचार करणे काळाची गरज आहे. नाहीतर नियतीचे फासे कधी आणि कसे पडतील, हे कोणीही सांगू शकत नाही.

आज मागे वळून पाहताना निर्मलाला तिच्या आयुष्यात घडलेल्या कडू आठवणींचा उजाळा करताना केवळ तिच्यापोटी तीन गोंडस समजूतदार मुली जन्मल्याचा अभिमान आहे. तर ‘वंशाचा दिवा हवा’, म्हणणाऱ्या शरदला आज स्वतःलाच या वयातही मुलाला पोसावं लागत आहे. ‘केलेलं पाप आपल्याकडे कधी ना कधीतरी फिरुन येतंच हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवं. तरुण वयात डावललेल्या बायकोच्या साथीची आज उतारवयात तो अनाठाई अपेक्षा ठेवत आहे. स्त्री प्रेम करते ते अगदी मनापासून पण विश्वासघात झाल्यावर तीच स्त्री प्रेम झिडकारते, ते अगदी मरेपर्यंत.. आज पुन्हा एकदा ३६० अंशात आयुष्य बदलू पाहत होतं. ज्या सोबतीची तिने मनापासून आस लावली होती, ती आज विचित्र पद्धतीने तिच्यासमोर हात पसरून उभी होती. पण मिळालेल्या कडू आठवणींचा बटवा गाठीशी बांधत, निर्मलाने आज सार्‍या कडेच पाठ फिरवली होती.
********
समाप्त
©वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!