वसुबारस

© धनश्री दाबके
“राणी, चल घरी, पूजेसाठी गोठ्यात जायचंय ना? ए पोरींनो, आता खेळणं बास करा आणि या आटोपून पटापट आपापल्या आयांना घेऊन. मी भैय्याला गायी आणि वासरांना तयार ठेवायला सांगितलंय.” सुनीता काकूने, म्हणजे राणीच्या आईने, हाक मारल्यावर आधी राणी घरी गेली. मग एकेक करत बाकीच्या सगळ्याही आपापल्या घरी गेल्या आणि मनु एकटीच उरली.
मनुला आज घरी जावसंच वाटत नव्हतं. काहीही कारण नसतांना उगीचच तिची चिडचिड होत होती. तसं गेल्या काही दिवसांपासून अधेमधेच पोटात कळाही येत होत्या. आज तर जास्तच येत होत्या. कशातच उत्साह वाटत नव्हता. घरी न जाता मनु एकटीच तिथे अंगणातल्या पाण्याच्या टाकीवर बसून राहिली.

इतक्यात अमेय आला, “मनु ताई, चल ना घरी आईने बोलवलंय तुला.”
अमेयला पाहून मनुला अजूनच राग आला. “तुला किती वेळा सांगितलयं रे मी, की मला मनु नाही मनिषा ताई म्हणायचं आणि ती आईही फक्त तुझी आहे कळलं? ती माझी आई ना…” मनुचे पुढचे शब्द अर्धवटच राहिले कारण तेव्हढ्यात तिला तिथे बाबा येतांना दिसले.
तसं तर हल्ली तिला बाबांशीही बोलावसं वाटत नव्हतं आणि आजीशीही. आजीनेच तर बाबांना हे लग्न करायला भाग पाडलं होतं.
बाबांना पाहून काही न बोलता मनु घाईघाईने उठून घरी जायला निघाली.

पण आज बाबांना तिच्याशी बोलायचंच होतं. ते म्हणाले, “मनु थांब. काही होतंय का ग तुला? तुझी आई म्हणत होती की हल्ली तू जास्तच अपसेट असतेस आणि अधूनमधून तुझं पोटही दुखतं.” बाबांनी असं विचारल्यावर मनु चमकली. तिला कसं कळलं मी तर तिला कधी काही सांगितलं नाही!
तरीही त्यावर फारसं न बोलता, “नाही बाबा, मी ठीक आहे” म्हणून मनु घरी आली. तिच्या पाठोपाठ बाबाही घरात आले.
मग मनु या आईने घेतलेला नवा फ्रॉक न घालता, तिच्या आईने शिवलेला जुनाच थोडा आखूड, घट्ट होणारा टॉप आणि त्याखालची सलवार चढवून पूजेसाठी तयार झाली.

मनुला जुन्या ड्रेसमधे बघूनही आई बाबा दोघं त्यावर काहीच बोलले नाहीत. उलट छान दिसतेयस म्हणत आई तिच्यासोबत बिल्डिंगमधल्या सगळ्या बायकांबरोबर  वसुबारसेच्या पूजेसाठी जवळच्याच गोठ्याकडे निघाली. या आईला अशी साडी नेसलेली आणि सोन्याच्या बांगड्या घातलेली पाहून मनुला परत तिची आई आठवली. आपसूकच तिचे डोळे भरून आले. नकोच जायला आत्ता असं परत वाटून ती मागे वळणार तोच आईने हळूच तिचा हात पकडला आणि ती काही न बोलताच पुढे जाऊ लागली.
गोठ्यात आज भैय्याने दर वर्षीप्रमाणे दोन तीन गायींना छान सजवून आपापल्या वासरांसोबत बांधून ठेवले होते. मग सगळ्या बायकांनी गायी आणि वासरांची त्यांच्या पायांवर पाणी घालून पूजा केली. त्यांना ओवाळले. करंजीचा नेवैद्य दाखवून नमस्कार केला.

त्यातलं एक छोटसं गोड वासरू इतक्या गर्दीला पाहून बुजत होते आणि हळूच त्याच्या आईच्या पायांत शिरत होते. मग त्याची आई त्याच्या मानेला चाटून त्याला धीर देत होती. ते पाहून मनुला परत तिची आई आठवली. आईबरोबर कसं आपण दिवाळीला इथे येत होतो ते आठवलं.
आई गेल्यापासून मनुच्या घरात दिवाळी फारशी साजरी झालीच नव्हती. आता ही आई आणि नवा भाऊ घरी आल्यानंतर यंदाची ही घरातली पहिलीच दिवाळी होती. नाहीतर गेली दोन तीन वर्ष मनु दिवाळीच्या सुट्टीत आजोळीच गेली होती. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर परत तो गोठा, ती पूजा आईशिवाय करतांना मनुचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.

आज या आईने करंज्या केल्या होत्या त्या पाहून तर मनु फारंच हळवी झाली होती. आई आई म्हणून तिचं एक मन आक्रंदत होतं तर दुसरं मन तिची ही अवस्था घरात कोणाला कळू नये, या आईला तर अजिबात कळू नये याची काळजी घेत होतं. मनातली सगळी घालमेल मनातच दाबत मनु आईबरोबर घरी आली आणि तिच्या रूममधे गेली. कपडे बदलतांना तिने इतक्या वेळ धरून ठेवलेल्या भावना ओसंडून वाहू लागल्या.
परत तिच्या पोटातून आणि कमरेतून जोरात कळा येऊ लागल्या. तिला खूप घामही आला. आणि आपल्याला आधी कधीही न झालेलं असं वेगळंच काहीतरी होतंय हे जाणवलं.
शाळेतल्या बाईंनी हे असं का होतं, कसं होतं याची सगळी कल्पना दिली होती. कधी काही वाटलं तर लगेच आईशी बोला असंही बजावलं होतं.

पण तरी मनुला या आईला काही सांगायचंच नव्हतं. तिला एकटीनेच हे सगळं फेस करायचं होतं. कसाबसा ड्रेस बदलून मनु तिचे दोन्ही पाय पोटाशी घेऊन तिथेच बसली आणि गुडघ्यांमधे डोकं घालून रडू लागली.
मनु बाहेर येत नाहीये ते पाहून तिची ही आई दार ढकलून आत आली. तिला असं रडतांना बघून आईला एकदम गलबलून आलं. आई तिच्या शेजारी बसली आणि हळूच तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली.
“खूप दुखतंय ना बेटा तुला?” तिने विचारल्यावर मनुने मान वर करून तिच्याकडे नुसतंच पाहिलं.

“मला कसं कळलं हा प्रश्न पडला असेल ना तुला? मी पण दर महिन्याला यातून जाते ग. त्यामुळे तू काही सांगितलं नाहीस तरी मला तुझी ही फेज कळतेय. तुझी जन्मदात्री आई नसले तरी मीही एक आई आहे मनु. माझ्यावर विश्वास ठेव आणि तुला काय काय होतंय, काय वाटतंय ते सगळं सगळं मला सांग. मनात कहीच ठेवू नको. मी तुझी आई म्हणून जरी तुझ्या आयुष्यात आली असले तरी तू मला लगेच तुझ्या मनात आईची जागा द्यावीस असं अजिबात नाही. इन फॅक्ट मला तुझ्या आईची जागा घ्यायचीही नाही कधीच. तेव्हा एक आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून तू माझ्याकडे बघ. म्हणजे आपल्या घरातली ही नवी घडी स्वीकारणं तुला सोपं जाईल.”
आईचे हे हळूवार आणि प्रेमळ बोलणं ऐकून मनु थोडी शांत झाली.

“फ्रेंड्स?” आईने विचारलं आणि “हो फ्रेंड्स” म्हणत मनु हळूच तिच्या कुशीत शिरली.
या आईच्या कुशीतही तिला छान आणि आश्वासक वाटलं आणि तिच्या डोळ्यांसमोर मगाशी पाहिलेलं आईच्या पायांत लपणारं ते छोटूकलं वासरू आलं.
मग मनुने मनात साठवून ठेवलेलं सगळं तिच्या या नव्या मैत्रीणीकडे मोकळं केलं. तिच्या आईने नेसलेल्या साडीपासून, केलेल्या करंज्यांपर्यंतच्या आठवणी, आईबरोबर काढलेल्या रांगोळ्या, उडवलेल्या फटाक्यांच्या गमतीजमती सगळ्या या आईबरोबर शेअर केल्या. पोटात कुठे आणि किती दुखतंय तेही सांगितलं. आईनेही सगळं शांतपणे मनुचं सगळं बोलणं ऐकून घेतलं.

मग आईने मनुला पाळीबद्दलचं सगळं नीट समजवून संगितलं आणि तिला जेवणाच्या टेबलवर घेऊन आली.
आता मनु बरीच शांत झाली होती. बऱ्याच दिवसांनी ती बाबांकडे बघून पूर्वीसारखी स्वच्छ हसली.
लेकीला परत असं मोकळेपणाने हसतांना पाहून बाबांना खूप बरं वाटलं.
“आज मी केलेली करंजी कशी झालीये ते सांगशील का ग मला?” असं विचारत मनुच्या या नव्या फ्रेंडने तिला करंजी वाढली.
ती गोड करंजी खाऊन मस्त म्हणून मनुने तिला अगंठा दाखवला. मनुला पूर्वीसारखं वागतांना पाहून वात्सल्याचे प्रतिक असलेली आजची ही वसुबारस खऱ्या अर्थाने साजरी झाली असं सगळ्यांना वाटलं.
******
समाप्त
© धनश्री दाबके
सदर कथा लेखिका धनश्री दाबके यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!