© धनश्री दाबके
‘कंट्रोल मनु कंट्रोल. हे काय भलतं सलतं येतय तुझ्या मनात आत्ता? काही काळ वेळ आहे की नाही? पहिली दुसरी नाही तर चक्क अठरावी दिवाळी आहे ही दोघांची. पण आजही ह्याला असा शर्टलेस पाहिला की भरल्या घरात सगळे अवतीभवती असतांनाही धडधड होते उरात आणि पिरतीची बाधा मनात. काय म्हणावं या जादूला? काही अंतच नाही.’ पाडव्याच्या सकाळी आंघोळीच्या आधी परागला सुगंधी तेल लावत असतांना मनाली स्वतःलाच समजावत होती.
तसा मनाली आणि परागसाठी एकमेकांच्या प्रेमात घालवलेला रोजचाच दिवस खास होता. पण दिवाळीतला पाडवा मात्र अजूनच स्पेशल होता.
‘दीड तप होऊन गेलं आता त्या पाडव्याला, तरीही सगळं अगदी कालपरवाच घडल्यासारखं वाटतं. मी मैत्रीणीं बरोबर त्यादिवशी गावातल्या देवळात दर्शनाला गेले आणि तिथे ह्याने अचानक समोर येऊन मला लग्नासाठी विचारलं.
स्वप्नात अनेकदा पाहिलेलं दृष्य अचानक सत्यात घडायला लागलं आणि तरीही मी आधी विचार करकरुन ठरवून ठेवलेलं उत्तरही मला देता नाहीच आलं. तीन वर्ष वाट पाहायला लावून ह्याने मला लग्नासाठी विचारलं आणि टांगणीला लागलेला माझा जीव शेवटी एकदाचा प्रेमाच्या भांड्यात पडला.
तसं कॉलेजपासूनच एकमेकांसाठी खास होतो. ह्याला तर म्हणे बघता क्षणीच आवडले होते मी. पण तरीही डीग्री हातात येऊन नोकरी लागेपर्यंत मला विचारायचं नव्हतं याला. तेव्हा आजच्या सारखं उठसुठ एकमेकांना फॉलो करता यायचं नाही ना त्यामुळे सगळंच अवघड. कधी वाटायचं हा माझ्या प्रेमात आहेच. कधी वाटायचं नाही हे सगळे माझ्याच मनाचे खेळ आहेत.
विचार करुन करुन डोकं फिरायची पाळी आली होती. घरी आईबाबा विचारत होते तुझं आहे का कुठे काही. असलं तर सांग आधीच म्हणून. पण समोरुन काही घडतंच नव्हतं आणि माझ्यात काही घडवण्याची हिम्मत नव्हती. तर काय सांगणार त्यांना.
मी काही बोलत नाही म्हंटल्यावर बाबांनी स्थळं बघायला सुरुवात केली आणि माझी अवस्था अजूनच बिकट झली. मनात हाच भरलेला त्यामुळे इतर कोणासाठी जागा नव्हतीच आणि मनातला हा प्रत्यक्षात मात्र भेटत नव्हता. तसं कॉलेजमध्ये त्याचे डोळे वाचलेले होते पण डोळ्यातले भाव कानांनीही ऐकायला हवेत ना. ह्याची स्वतःच्या पायांवर उभ राहिल्यानंतरच प्रपोज करायची फिलॉसॉफी ह्याला डोळे आणि कानांमधले अंतर पार करुच देत नव्हती.
शेवटी एकदाचा तो सोनियाचा दिवस उगवला. नोकरी मिळवून साहेब एकदाचे पुढ्यात अवतरले आणि मला जरा तुझ्याशी बोलायचंय म्हणाले. माझ्या मनात तर दिवाळीतच सनई चौघडे वाजायला लागले पण तरी मी ‘आत्ता? आत्ता नको. मला घरी जायचंय’ म्हणून पळ काढला.
मग पाठपुरावा करुन याने माझ्या मनातलं ओठांवर आणलं आणि सरळ घरी येऊन मला मागणी घातली. नाही, हो करत आईबाबांनी परवानगी देत माझं मन राखलं आणि तेव्हापासून ते आजतागायत आमचा प्रत्येक पाडवा असाच प्रेमाच्या जादूने भारलेला असतो.’ असा विचार करत पराग समोर बसून त्याच्या खांद्यांवर तेल लावत असतांना मनालीने त्याच्या डोळ्यांत पाहिले तर तोही तिचे विचार वाचल्यासारखा तिच्याकडे पाहात होता.
त्याच्या अशा एकटक बघण्याने मनाली लाजली आणि तिच्या गालांवर लाली चढली. तिचे मुळचे सुंदर रुप अजून खुलले आणि पराग मंत्रमुग्ध होऊन तिच्या रुपाकडे बघत राहिला. तिचा चेहरा ओंजळीत धरुन तिच्या ओठांवर प्रेमाची मोहर उमटवून आजच्या पाडव्याचे गोड सुरवात करावी अशी तीव्र इच्छा परागच्या मनात उमटली. मनालीही त्याच्या नजरेतल्या आव्हानामुळे तिच्याही नकळत जराशी पुढे झुकली, इतक्यात कुणाल आणि राधिका तिथे आले.
“वाहिनी, माझ्यासाठीही थोडं तेल शिल्लक ठेवा बर का.” म्हणून कुणालने त्यांची समाधी मोडली आणि दोघं भानावर आले.
“अरे असू दे रे. आज खास प्रपोज डे चा पाडवा आहे ते माहितीये ना तुला? कशाला रे उगीच डिस्टर्ब करतोस? चल आपण थोड्यावेळाने येऊ” असं म्हणत राधिकाने त्याला दटावलं आणि दोघं रुमबाहेर जायला निघाले.
“अरे, ए. तुम्ही तर खरचं निघालात की. इतकं पण काही मनावर घ्यायची गरज नाहीये आणि तसाही थोडा वेळ काही आम्हाला पुरणार नाही. तेव्हा थांबाच तुम्ही इथे. मी आंघोळ करुन येतो. कुणाल तू ही आवरुन घे मग फराळ करुन बाहेर पडू. संध्याकाळच्या ओवाळणीची तजवीज करायला.” पराग हसत म्हणाला आणि मनालीने त्याच्याकडे बघून डोळे वटारले. तिच्या वटारलेल्या डोळ्यांतलं प्रेम पाहून पराग सुखावला.
आयुष्यात बाकी काही कमवायला जमलय की नाही माहिती नाही पण आपली ही निवड मात्र नक्कीच स्वतःचा गर्व वाटावा अशीच आहे. हिच्या संगतीने आपला आजचा आणि येणारा प्रत्येक पाडवा असाच मनोदीप उजळवणारा ठरणार असा विचार करुन परागने मनोमन स्वतःची पाठ थोपटून घेतली.
समाप्त
**********
© धनश्री दाबके
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.