ना उम्र की सीमा हो ( भाग 1)

© स्वामिनी चौगुले
एका हाय प्रोफाईल ऑफिसमध्ये एक पस्तिशी पार केलेली बाई आत्मविश्वासाने प्रेझेन्टेशन देत होती. प्रोजेक्टरवर स्लाइड्स सरकत होत्या आणि ती अस्खलित इंग्रजीमध्ये बोलत होती.
तिथे असलेले दहा लोक मन लावून तिचं बोलणं ऐकत होते. त्यातील एक तिला पाहत होता पण ती काय बोलतेय? हे जणू त्याच्या कानावरच पडत नव्हते, कारण तो तर मंत्रमुग्ध होऊन तिला पाहत होता.

तिने घातलेला बेबी पिंक  एप्पल कट शर्ट त्यावर ती ब्ल्यू जीन्स, तिने बांधलेला मेसी बन आणि त्यातून तिच्या चेहऱ्यावर रुळणाऱ्या बटा, काळे काजळ घातलेले मृगनयनी डोळे, सावळा पण चमकदार रंग, ओठांची महिरप आणि त्यांची बोलताना होणारी विलक्षण हालचाल, तिचं मधूनच भुवया उडवून काहीतरी बोलणं सगळं सगळं तो न्याहाळत होता.

“सो दॅट्स इट!”  ती म्हणाली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तो अचानक भानावर आला.
ती कॉन्फरन्स हॉलमधून निघूनही गेली आणि तो गालाला हात लावून तिथेच बसून होता. 
तो म्हणजेच आपल्या स्टोरीचा हिरो हो! संयम दरेकर!
उंचा पुरा, गोरा, नाकी डोळे नीटस आणि पिळदार शरीरयष्टीचा तीस वर्षांचा तरुण!

तो अजूनही तिच्याच हवेत तरंगत होता आणि त्याच्यासमोर कोणीतरी चुटकी वाजवली.
“साहेब भानावर या ती निघून गेली आहे.” 
“अरे ती गेली पण..” त्याने  भानावर येत विचारले.
“हो गेली! मग काय तुझी वाट पहावी का तिने? सया लेका गेलं एक वर्ष झालं नुसतेच तिला पाहत आहेस. तिचा विचार तू मनातून काढून टाक ती तुझ्या आवाक्या बाहेर आहे.” तो त्याला समजावत म्हणाला.

“गप्प ए केत्या! तू ना माझ्या राशीला केतू सारखा लागला आहेस. मित्र आहेस की दुष्मन रे?” तो चिडून म्हणाला.
“मित्र आहे म्हणूच सांगतो तिचा नाद सोड.” तो म्हणाला.
“यार ही कट्यार काळजात घुसून बसली आहे रे! ती नाही निघणार. कसली कातील आहे ती!मी तर मेलो तिच्यावर केव्हाच.” तो म्हणाला.
“चला धन्य आहात तुम्ही.” तो म्हणाला आणि दोघे हॉलमधून बाहेर पडले. 

संयम दरेकर तीन वर्षे झाले पुण्यातील वंडर्स टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये काम करत होता.
त्याचा मित्र केतन आणि तो दोघेही औरंगाबादचे शिक्षणासाठी पुण्यात आले आणि इथेच सेटल झाले.
दोघांनीही टुरिझम मॅनेजमेंटमधून एम.बी.ए. केले होते.
दोघेही एकाच फ्लॅटमध्ये राहत होते आणि एकत्रच वावरत होते.
दोघांना ऑफिसमध्ये चेष्टेने सगळे जुळे म्हणायचे. 

एक वर्षापूर्वी ती हैदराबादहून बदली होऊन त्यांच्या ऑफिसमध्ये आली होती आणि संयमच्या मनात रुतून बसली होती.
दोघेही त्यांच्या त्यांच्या डेस्कवर जाऊन बसले आणि संयमचा इंटर कॉम वाजला. 
“हो मॅडम आलोच लगेच.” तो म्हणाला आणि केबिनमध्ये गेला.
ती त्याचीच वाट पाहत होती. 

“मिस्टर दरेकर आज जे प्रेझेन्टेशन मी दिले आहे त्याचे डिटेल्स आपल्या असोसिएटना मेल करा.” ती म्हणाली पण तो नुसता तिचा चेहरा पाहत होता.
त्याच्याकडून काहीच उत्तर नाही म्हणल्यावर ती पुन्हा जरा आवाज चढवून म्हणाली, “मिस्टर दरेकर लक्ष कुठे आहे तुमचे? मी काय सांगितले तुम्हाला?” ती चिडून विचारत होती.
तिच्या आवाजाने तो दचकला आणि भानावर येत म्हणाला, “हो मॅडम मी करतो ना मेल!” आणि डेस्कवर येऊन बसला.

तो हो म्हणून आला आणि त्या कामाला लागलाही.
ते पाहून केतन त्याच्याजवळ आला.
“कशाला बोलावले होते रे तुला?” 
“आज झालेल्या प्रेझेंटेशनच्या डिटेल्स मेल करायच्या आहेत. आज आलेल्या त्या असोसिट्सना! तो कॉम्प्युटरवर हात चालवत म्हणाला.

“आज कॉन्फरन्स हॉलमध्ये मॅडमला नुसतं आ वासून पाहत होतास. तुझ्या कानापर्यंत पोहोचलं का रे काय?” त्याने विचारले.
“नाही ना!” तो म्हणाला.
“मग मेल काय घंटा पाठवणार का?” केतनने हसून विचारले.
“तू काय मला येडा समजतो काय रे? मला माहित असतं की त्या प्रेझेन्टेशन देतात तेव्हा मला फक्त त्या दिसतात आणि मला त्यांना मन भरून पहायचं असतं. ऐकू काहीच येत नाही रे केत्या म्हणून मी आधीच सगळे प्रोजेक्ट डिटेल्स पाहून ठेवलेले असतात. पी.पी.टी तयार करायचं काम त्या मलाच देतात ना त्यामुळे मला सगळे प्रोजेक्ट डिटेल्स माहीत आहेत. तू नको काळजी करू.” तो हसून म्हणाला.

“मानलं गुरू देव तुम्हाला! तुझ्या इतका हुशार तूच आहेस. म्हणून तर सगळ्या ऑफिसच्या मुली घोंडा घोळत असतात तुझ्या मागे पण तू कुणाला भाव देशील तर शप्पथ.” केतन कौतुकाने म्हणाला.
“यार बाकीच्यांनी घोंडा घोळून काय उपयोग? माझ्या काळजात जी रुतली आहे ती भाव देत नाही मला पण यावेळी कंपनीच्या ऍन्युअल  फंक्शनला मी तिला प्रपोज करतो की नाही बघ.” संयम हसून म्हणाला.
तोपर्यंत तिथे ती आली.

“तुम्ही ऑफिसमध्ये काम करायला येता की गप्पा मारायला? रात्रंदिवस तर एकमेकांना चिटकून असता तरी ऑफिसमध्ये गप्पा मारता. तुम्हा दोघांना केव्हाच मेमो दिला असता पण कामात तुम्ही चोख असता.
मिस्टर केतन शहा गप्पा मारून झाल्या असतील तर तुमचे सिंहासन ग्रहण करा जाऊन आणि मिस्टर दरेकर मला ही मेलची कॉपी सॅन्ड करा. तेच सांगायला आले होते मी.” ती दोघांनाही सूनावुन निघून गेली.
ऑफिस सुटले आणि दोघेही घरी निघाले. आज संयम भलताच खुश होता.

गाडी चालवत न राहवून केतनने त्याला विचारले, “इतकं खुश व्हायला काय झालं तुला? ती तुला आणि मला रागावून गेली. तुला आय लव्ह यू म्हणून गेल्यासारखा खुश काय होतोय?” केतन तोंड वाकडं करून म्हणाला.
“अरे मूर्खा ती आपल्याला म्हणाली की सारखे एकमेकांना चिकटून असता याचा अर्थ तिचं माझ्याकडे लक्ष असतं.” संयम खुश होत म्हणाला.
“ए येड्या तिचं तुझ्याकडे लक्ष असतं असा याचा अर्थ नाही होत तर तिची नजर असते आपल्यावर असा अर्थ होतो याचा. एक वर्ष झाले नुसते मनाचे मांडे खातंय.” केतन त्याला चिडवत म्हणाला.

“यार तिच्या समोर गेलं की माझी बोलतीच बंद होते. शब्दच फुटत नाही माझे! आहेच सॉलिड ती!” संयम म्हणाला.
“हो सॉलिडच आहे ती. मागच्या तीन महिन्यांपूर्वी खाली एक क्लायंट तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा सगळ्या ऑफिससमोर तिने त्याला जो लाताबुक्यांचा प्रसाद दिला होता माहीत आहे ना तुला?
कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे ती म्हणून तुला मी सांगतोय ती तुझ्या आवाक्यात नाही. तिच्या नादाला लागून तू स्वतःच्या अब्रूचे खोबरे करून घेऊ नकोस. असंही काकू मागे लागल्या आहेत लग्न कर म्हणून! एखादी सुंदर, सुशील, मुलगी बघ आणि लग्न करून घे. ही मांजरीण आहे पंजा मारेल तुला.” केतन गाडी चालवत बोलत होता.

“तू ना केत्या माझा दुश्मन आहेस. कायम माझा पाय खेचत असतो आणि मांजरीण नाही ती तर वाघीण आहे कळलं का? आणि माझ्या लग्नाची तू नको काळजी करू हे टक्कल अजून जास्त होण्याआधी तूच लग्न कर. संयम त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाला आणि फ्लॅट आला म्हणून खाली उतरला.
“ए तू माझ्या केसांच्या मागे लागत जाऊ नकोस.” केतन चिडून म्हणाला.
“मग तूही माझ्या प्रेमाच्या मागे लागत जाऊ नकोस.” संयम म्हणाला आणि दोघे हसत गाडी पार्क करून गेले.

 लेडीज आणि जंटलमन आपला हिरो संयम आणि त्याचा जिगरी यार केतनची तर ओळख झाली.
संयमची तिचीही ओझरती ओळख झालीच आहे म्हणजे ती दिसते कशी? करते काय?
आता पुढच्या भागात तिचा नाव, गाव, पत्ता पाहू आपण. 
तर आजपासून आपण एका नवीन प्रवासाला निघत आहोत. संयम आणि त्याच्या तिच्याबरोबर! संयमची प्रेमकथा आता कशी वळणे घेत पुढे जाते ते पाहण्यासाठी वाचत रहा. 
क्रमश:
भाग 2 इथे वाचा
© स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!