पुनर्जन्म की आणखी काही

© डॉ.मुक्ता बोरकर – आगाशे
विजयची बदली झाली आणि तो सहकुटुंब या नव्या ठिकाणी राहायला आला.
विजय ,वैशाली आणि दोन वर्षाचा छोटा अर्णव असे छोटेखानी कुटुंब विजयचे. 
पालिका अधिकारी असलेला विजय ,दर तीन वर्षांनी त्याची बदली व्हायची आणि आपलं बिऱ्हाड पुढच्या मुक्कामी घेऊन तो तिथून प्रस्थान करायचा ,जुन्या आठवणी मनात जपून.
यावेळी त्याची बदली मात्र जवळच झाली. पेण वरून सावंतवाडीला.

अगदी भरपूर निसर्ग सौंदर्याने नटलेले सावंतवाडी साऱ्यांनाच आवडले. तिथला मोती तलाव त्या शहराच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत होता.
या शहराच्या उत्कर्षासाठी अजून बरेच काही करता येण्यासारखं आहे हा विचार नकळतच विजय च्या मनात रेंगाळला.
विजय अन् वैशाली अगदी एकमेकांना अनुरूप जोडपे. विजय ची दर तीन वर्षांनी होणारी बदली अन् जबाबदारीची नोकरी यामुळे संसाराचा भार पूर्णपणे वैशालीच्या खांद्यावर यायचा अन् तीही तो अगदी समर्थपणें  पेलायची.

ही नवी पोस्टिंग विजय अन् त्याच्या कुटुंबाला अतिशय आवडलेली. तिथला निसर्गरम्य परिसर मन मोहून घेणारा अन् लोकंही तेवढीच गोड,मायाळू…
क्वार्टर पण मोठं आणि प्रशस्त! इतर स्टाफ पण अगदी तडफेचा.
एक शिस्तशीर,प्रामाणिक ऑफिसर  म्हणून सगळे आधीपासूनच त्याला वचकून असलेले.
पण काही दिवसांतच विजय ने साऱ्यांची मने जिंकून घेतली.

विजय आणि वैशाली दोघांनाही फिरायची भारी हौस त्यामुळे विजयला जसा वेळ मिळेल तसे हे सहकुटुंब आजूबाजूचा परिसर भटकून यायचे.
त्या परिसरातच  गर्द रानात एक भव्य पुरातन शिवालय असल्याचं विजयला कळले अन् पुढच्याच रविवारी ते शिवालय बघायला जायचा प्लान त्याने केला.
रविवारी सकाळीच विजय, त्याचे कुटुंब आणि त्याच्या  दोनचार मित्रांचे कुटुंबीय मिळून तिथे गेले.
भव्य असे काळ्या कातीव दगडांनी बनलेले ते शिवालय. तिथला सभामंडप,तिथले कोरीव काम,  तिथले शिवलिंग  त्याच्या भव्यतेची अन् पुरातन तेची साक्ष देणारे!  गर्द वनराई ने समृद्ध असा तो मनमोहक परिसर डोळ्यांचे पारणे फेडणारा.

काही अंतरावरच छोट्याश्या ओहळाचा नादमधुर खळखळाट. सारंच  वातावरण अगदी रमणीय!
सारा दिवस त्या रमणीय परिसरात. अगदी आनंदी आनंद!
दुपारी सगळ्यांनी आणलेल्या खाण्याच्या पदार्थांचा आस्वाद घेऊन झाला.
काही वेळानी पाय मोकळे करत वनराईचा फेरफटका झाला अन् मग त्या ओहळाच्या लगतच्या निसर्गरम्य परिसरात खेळ आणि गप्पांची भन्नाट मैफल रंगली.

सूर्य मावळतीला येऊ लागला अन् अचानक आभाळ काळ्या ढगांनी भरून आले.
सर्वजण मग घाईघाईने  मंदिराकडे निघाले.
सगळे अगदी मंदिराच्या जवळपास असतांनाच ढगांचा गडगडाट सुरू झाला, अधून मधून विजाही चमकू लागल्या….
अचानक वैशाली ला मंदिराच्या गाभाऱ्या च्या थोडं  उजव्या बाजूस मागे थोडे दूरवर एक मोठे झाड जळालेल्या अवस्थेत दिसले.
सारे मंदिरात पोहोचले अन् क्षणार्धात विजेचा कडकडाट होत एक मोठा आगीचा लोळ पुन्हा त्या झाडावर येऊन कोसळला. …

हे पाहिलं अन् वैशाली एकदम चक्कर येऊन खाली पडली. सगळे घाबरले! काय झालं कुणाला कळेच ना !
खूप हलवून पाहिलं तरी वैशु उठेच ना.
खूप पाण्याचे हबके मारल्यावर कुठे तिला थोडी शुद्ध आली.
पुन्हा तिचे लक्ष त्या झाडाकडे गेले . अन् नाही नाही अशी किंचाळत पुन्हा बेशुद्ध पडली.
आता मात्र सगळे घाबरले.

वैशाली ला उचलून तसेच गाडीत टाकले. सगळी आवराआवर करून बाकी गाड्या आल्या अन् विजयची गाडी थेट दवाखान्यात गेली.
डॉक्टरांनी वैशाली ला चेक केलं आणि तिला झाल्या प्रकाराचा खूप मानसिक धक्का बसल्याचे आणि तिला शारीरिक आणि मानसिक विश्रांती ची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
काही इंजेक्शन दिले ती शुद्धीवर  आली आणि काही जुजबी औषध देउन तिला सुट्टी दिली.
घरी आल्यावर वैशाली ला पूर्ण आराम देत विजयनीच सारं आवरलं.

काही वेळानी वैशाली ला जरा बरं वाटू लागलं. पण अजूनही ती त्या विचारातच हरवलेली.
तिला तसे बघून विजय तिच्याजवळ जाऊन बसला.
” वैशू काय होतंय तुला?” तिचा हात प्रेमाने हातात घेत त्याने विचारलं.
तिच्याबद्दल असलेली काळजी ,प्रेम सारे त्या स्पर्शात होते. .

ती हळूच त्याच्या छातीवर विसावली ,खूप आश्वस्त वाटलं तिला…
पण क्षणातच ,पुन्हा घाबरली….
“अगं काय होतेय पुन्हा? विजेला एवढी घाबरली का?”, विजय
“नाही रे पण परततांना ते जळलेलं झाडं दिसलं अन् एकदम हे याआधी कुठेतरी पाहिलं आहे असं वाटलं.
तेच शिवालय ,तोच परिसर,छोटी छोटी खेळणारी मुलं अन् अचानक तो विजेचा लोळ अन् त्या झाडाचं जळणं.
सारं अगदी जसंच्या तसं डोळ्यापुढे उभं राहिलं.

कां कोण जाणे विजेची मला आधीपासूनच भीती वाटते पण आज मात्र वेगळेच वाटत होते. ..या शिवालयाशी माझा नक्कीच काहीतरी संबंध आहे. असं अचानक मला सगळं कसं आठवलं असतं. माझ्या मागच्या जन्मीचं तर नसेल हे  सगळं,..?”
बोलता बोलता वैशु थांबली.
” असं काही नसतं ग वेडाबाई, तू जास्त विचार नको करु,औषध घेऊन झोप बरं आता. “, विजय
दुसरा दिवस उजाडला तरी वैशाली काही पूर्णतः नॉर्मल झाली नव्हती. तिचं उदास अन्  कुठेतरी हरवल्या सारखं असणं सुरूच होतं.

मध्ये मध्ये ती पुन्हा मला मागचं सर्व आठवते, माझा पुनर्जन्म झाला असं सांगत सुटायची.
झोपेतही ती खूपदा काही काही बडबडायची आणि कधी कधी किंचाळून उठायची.
दिवसामागून दिवस जात होते . अर्णव आणि विजय तिला बोलते ठेवायचा खूप प्रयत्न करायचे.
तेवढ्यापुरती ती बोलायची पण पुन्हा जैसे थे.

आता वैशाली ची परिस्थिती बघून त्यालाही काळजी वाटायला लागली.
या सर्व गोष्टींचा परिणाम अर्णवच्याही बाल मनावर होऊ लागला.
विजय सुद्धा आता चिंतित राहू लागला.
काय करावे त्यालाही सुचेना!
घरची काळजी आणि ऑफिस चे वर्क लोड यात पुन्हा त्याची तारांबळ उडू लागली.

शेवटी त्याने वैशालीच्या आई बाबांना तिची तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून बोलवून घेतले.
कदाचित त्यांच्या मायेच्या बोलण्याने, ओलाव्याने ती त्यातून बाहेर पडू शकेल असे त्याला वाटले.
विजय चा निरोप जाताच वैशू चे आई बाबा दोघेही आले.
मुलीची अवस्था बघून आई बाबांना सुद्धा खूप वााईट वाटले.
पण आपण सहजच आलो आहोत असेच त्यांनी भासवले.

आई बाबांना पाहून वैशू थोडी खुलली.
काही वेळ खूप मनसोक्त गप्पा मारल्या पण काहीवेळाने पुन्हा ते अनामिक भीतीचे सावट तिच्या वागण्यात जाणवू लागले.
रात्री सुद्धा ती झोपेत किंचाळून उठली.
काय झालं म्हणून विचारताच  तिने ते पुरातन शिवालय,छोटी छोटी मुलं आणि  पडलेली  वीज आणि पुढचं तिला काहीच आठवत नसल्याचं सांगितलं.

मला माझा पुनर्जन्म आठवतो म्हणत ती पुन्हा रडू लागली.
आई बाबांना आता थोडा थोडा संदर्भ लागू लागला
दुसऱ्या दिवशी बाबांनी ती जागा बघायची इच्छा व्यक्त केली.
विजय वेळात वेळ काढून आई बाबांना तिथे घेऊन गेला.

त्या पुरातन शिवालयात गेल्या गेल्या च बाबांना सारे उलगडले आणि एक सुटकेचा निःश्वास त्यांनी टाकला.
त्यांना तसे हसतांना बघून विजय ला आश्चर्य वाटले.
विजयच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव बघून बाबांनी सारे सांगायला सुरुवात केली.
वैशू  अगदी छोटी होती तीन चार वर्षाची. तेव्हा तिच्या बाबांची नोकरी याच भागात होती. एकदा ते असेच सुटीच्या दिवशी शेजाऱ्यांसोबत  सहकुटुंब शिवलयात दर्शनाला आलेले.

सगळं व्यवस्थित आटोपले आणि अचानक वातावरणाचा रंग बदलला .विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट जोराने सुरू झाला आणि अचानक विजेचा लोळ नेमका वैशाली उभी होती त्या बाजूने आला आणि तिथल्या एका झाडावर पडला. लहानगी वैशू त्या प्रकाशाला इतकी घाबरली की अगदी बेशुद्ध झाली. तिला ती वीज तिच्याच अंगावर पडल्या सारखी वाटली.
खूप दिवस या गोष्टीची धास्ती घेतली होती तिने. डॉक्टरांच्या सांगण्यावरून आम्ही तिला यातून बाहेर काढायचे ठरवले.

दुसरीकडे अर्ज करून या भागापासून दूर नोकरी पत्करली. 
ही गोष्ट पुन्हा आम्ही कधी कुणा जवळच काढली नाही कारण आम्हाला वैशाली ला त्यातून बाहेर काढायचे होते.
नव्या ठिकाणी ती रुळली. मग ती मोठी होत गेली तशी सगळे विसरत गेली.
आम्ही जाणीवपूर्वकच या गोष्टीचा उल्लेख टाळत गेलो अन् ती गोष्ट तिच्याही विस्मृतीत गेली.

पण यावेळी पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली अन् मेंदूच्या कप्प्यात बंद असलेल्या आठवणी पुन्हा उफाळून आल्या अन् तिला त्याचा संबंध न लागल्याने ती त्याला तिचा पुनर्जन्म समजली.
घरी गेल्या गेल्या आई बाबांनी जुनी घटना उलगडून सांगितली.
वैशाली ला तिला आठवणाऱ्या घटना ह्या मागच्या जन्मीच्या नसून याच जन्मिच्या आहेत हे ऐकून हायसे वाटले.
अन् तिला नेहमीच वाटणारी विजेची भीती अन् त्या दिवशीच्या घटनेचे सुद्धा संदर्भ लागले.
तिच्या डोक्यावरचा,मनावरचा बराचसा ताण हलका झाला अन् जुनी घटना तिथेच टाकून देऊन ती पुन्हा नव्याने संसारात गुरफटली..
झालेला घटनेतून दहशत बाहेर पडून तिथे हास्याची करंजी फुलली…..!
© डॉ.मुक्ता बोरकर – आगाशे
मुक्तमैफल

सदर कथा लेखिका डॉ.मुक्ता बोरकर – आगाशे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!