© धनश्री दाबके
सकाळी ऑफिसला निघतांना संतोष सुलेखाताई आणि माधवरावांच्या पाया पडला.
“येतो मी. सांभाळून जा. संध्याकाळी पोचलात की मेसेज करा. तुम्ही गेल्यावर फार चुकल्या सारखं होतं मला. अजिबात करमत नाही तुमच्याशिवाय.”
“अरे करमत तर आम्हालाही नाही रे. सारखी आठवण येते तुम्हा सगळ्यांची” सुलेखाताई म्हणाल्या.
“आई, तुम्हाला का नाही करमणार तिकडे? तसंही तुमच्या धाकट्या लेकाकडेच तर तुम्हाला जास्त सुख मिळतं. मोठं आलिशान घर, स्वंतत्र खोली, जेव्हा बाहेर जावसं वाटेल तेव्हा हाताशी शोफरवाली गाडी, घरात नोकर चाकर, प्रत्येक रुममधे स्वतंत्र टीव्ही. इथे तुला मुलींच्या अभ्यासामुळे सिरिअल्स बघता येत नाहीत. तिथे तुला कसलेच बंधन नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा टीव्ही बघता येईल आणि पाहिजे तेव्हा बाहेर फिरायला जाता येईल. तुला कसली माझी आठवण येतेय तिकडे गेल्यावर? उगीच म्हणतेस आपली माझं मन राखायला. बरं ते जाऊ दे. मी निघतो. सिद्धार्थची गाडी येईलच ठरलेल्या वेळेवर दुपारी. सांभाळून जा.”
यावर सुलेखाताई आणि माधवराव दोघांनीही काही न बोलता फक्त मान हलवली आणि संतोष बाहेर पडला.
त्यांच्यासाठी संतोषचं हे असं बोलणं नेहमीचंच होतं.
मीना सकाळीच मुलींना शाळेत सोडून ऑफिसला गेले होती. त्यामुळे आता घरात हेच दोघं होते.
संतोष ऑफिसला गेल्यावर माधवराव आंघोळीला गेले आणि सुलेखाताई नेहमीप्रमाणे विचारांत रमल्या.
सुलेखाताई आणि माधवरावांचा जवळपास चार दशकांचा नीटनेटका, सुखाचा संसार.
संतोष आणि सिद्धार्थ सारखी आईवडलांवर माया असलेली, त्यांना जपणारी दोन गुणी मुलं.
दोन्ही सूनाही समजूतदार.
संतोष आणि मीना आपल्या दोन मुलींबरोबर इथे तर सिद्धार्थ आणि रीमा त्यांच्या लेकासोबत तिकडे मोठ्या शहरात सेटल्ड.
आईवडीलांनी आपल्याच सोबत रहावं असा दोघांचाही आग्रह.
मग त्यावर तोडगा म्हणून सुलेखाताई आणि माधवराव दोन्ही लेकांकडे वर्षातले सहा सहा महिने राहायचे.
दोन्ही घरात त्यांना भरपूर प्रेम, आदर आणि मान मिळायचा. मुला- नातवंडांसमवेत आयुष्याची ही सुखाची, समाधानाची संध्याकाळ दिल्याबद्दल सुलेखाताई रोज देवाचे खूप आभार मानायच्या.
हे असेच सुख प्रत्येक उतार वयातल्या आईवडलांना मिळो अशी प्रार्थनाही करायच्या.
पण कदाचित मिळालेल्या प्रत्येक सुखाची किंमत त्याला कुठल्यातरी दु:खाची किनार असल्याशिवाय कळत नसावी कारण इतक्या समधानातही सुलेखाताईंच्या मनाला एक टोचणी होतीच.
ती म्हणजे संतोष आणि सिद्धार्थचे तणावपूर्ण संबंध.
लहानपणी एकमेकांशिवाय ज्यांचे पान हलायचे नाही असे दोघं भाऊ आता मात्र गेल्या काही वर्षांपासून एकमेकांशी कामाशिवाय बोलतही नव्हते.
सिद्धार्थ आपल्यापेक्षा जास्त पैसेवाला बडा आदमी, ज्याचा त्याला खूप गर्व आहे असं संतोषला वाटायचं आणि संतोषला आपल्या कुठल्याच अचिव्हमेन्टबद्दल कौतुक नाही असं सिद्धार्थला वाटायचं.
सुलेखाताई दोघांच्या मधे पडून समजावयला गेल्या की आईला आपल्यापेक्षा आपला भाऊच प्रिय आहे असं दोघांनाही वाटायचं.
इतर वेळी कधी बाहेर न पडणारा दोघांमधला तणाव आईवडील जायला निघाले की मात्र हटकून डोकं वर काढायचा.
आजही संतोषच्या बोलण्यातून त्याच्या मनातला सिद्धार्थच्या श्रीमंती बद्दलचा आकस जाणवला. पण आता सुलेखाताईंनी त्याची सवय करुन घेतली होती.
लहानपणी कसे होते हे दोघं. सतत एकत्र असायचे.
कॉलेजमधे सिद्धार्थ नंबरात आला की संतोषचा उर अभिमानाने भरुन यायचा.
पण सिद्दार्थ मास्टर्ससाठी दोन वर्ष परदेशात राहून आला आणि कुठेतरी काहीतरी बदललं.
दोघांमधे एक अव्यक्त तेढ निर्माण झाली आणि मग प्रेम, माया, एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद या आयुष्यातल्या खऱ्या मिळकतींवर स्टेटस, पैसा, प्रॉपर्टी या भौतिक मिळकतींनी मात केली.
वरवर बघायला गेलं तर सगळं ठीक होतं पण दोघांच्या मनातली मळमळ मात्र सुलेखाताईंमधल्या आईला त्यांनी काहीही न सांगताही समजायची आणि आता आधीसारखी अधिकाराने दोघांमधली दरी मिटवताही यायची नाही.
आता दोघंही मोठे झालेत. वयानेही आणि इगोनेही.
मीना आणि रीमा मात्र खरंच गुणी आहेत. आपापल्या नवऱ्याचे मन जपूनही दोघी एकमेकींशी सलोख्याने वागतात.
सुलेखाताईंचे मन नेहमीच्याच विचारांच्या गुंत्यात अडकले होते.
इतक्यात माधवराव गरमागरम कॉफीचे दोन मग घेऊन आले.
“अहो, मी केली असती ना कॉफी.” गडबडीने उठत सुलेखाताई म्हणाल्या.
“अगं घे ग. माझ्या हातची कॉफी आज. जरा जास्तच गोड केलीये. मुद्दाम. थकली असशील ना. इतक्या सगळ्या आठवणी आणि विचारांचा लांबचा फेरा घालून आलीस ते.”
सुलेखाताई नुसत्याच हसल्या.
“मला समजते तुझी तगमग सुलेखा. मलाही आपले पूर्वीचे साधे पण समाधानाचे दिवस आठवतात. पण आठवणींच्या जगात ना फक्त चार दिवसांच्या पाव्हण्यासारखं जायचं असतं ग. तिथला आवडीचा पाहुणचार घ्यायचा आणि पटकन इथे परत यायचं.
पण परत येतांना आपण अजून फ्रेश आणि उत्साही होऊनच येवू याची काळजी मात्र प्रत्येकाने आपली आपणच घ्यायची. जी मी घेतोच आणि तूही घेत जाच. मग बघ, परत तुझे मन कसे आशेच्या मार्गावर चालायला लागेल ते.
भावनांचे, सुखांचे चढ उतार आयुष्यात सुरुच राहातात ग. पण चढतांना धाप लागली तरी ती आनंददायी असल्याने ज्या सहजतेने आपण ती स्विकारतो तितक्याच सहजपणे उताराच्या घसरणीवरती तोलही सांभाळता यायला हवा आपल्याला.
स्वतःच्या दोन लेकांमधला एकोपा हा तर आईवडलांच्या आयुष्यातल्या समाधानाचा कळस असतो. पण तू चिंता नको करु जास्त. मला खात्री आहे आपल्या सूना आणि नातवंडे नक्कीच आपल्याला त्या कळसाकडे नेतील.
हे आपल्या हयातीत घडेल किंवा त्यानंतर घडेल. पण घडेल मात्र नक्की.
तुला कदाचित हा माझा पराकोटीचा आशावाद पटणार नाही पण मी जेव्हा जेव्हा या बाबतीत विचार करतो त्या प्रत्येक वेळी माझी सकारात्मकता मला हाच निर्वाळा देते.
तेव्हा चल आता कॉफी घे आणि तयारीला लाग. मीनाने तिच्या लाडक्या पुतण्यासाठी टेबलवर जे खाऊचे बॉक्स भरुन ठेवलेत ते घे आठवणीने.” म्हणून माधवराव कॉफी घेत पेपर चाळायला लागले.
‘कसं जमतं ह्यांना दरवेळी माझ्या मनाचा तळ गाठायला कोण जाणे. खरंय ह्यांचं. आनंदाच्या आठवणी जपत आशेच्या पालवीने मनाला टवटवीत ठेवल्यावरच भविष्यातल्या सुंदर आठवणी घडवता येतील.’ असा विचार करुन माधवरावांकडे हसून बघत सुलेखाताई तयारीला लागल्या आणि पेपरा आडून त्यांची ती मिलियन डॉलर स्माईल पाहिल्यानंतरच माधवराव निश्चिंत मनाने बातम्या वाचायला लागले.
*****समाप्त
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.