भैरवी ( भाग 2)

भाग 1 इथे वाचा

© अपर्णा देशपांडे 
(अश्विनी गेली . जातांना तिने निलंयला तिच्या वडिलांचे गळ्यात बांधायचे साखळीतले घड्याळ भेट दिले .  तिच्या जवळ असलेल्या मोजक्या  जीव्हाळ्याच्या वस्तूतील एक ! जातांना चार पावलं पुढे जाऊन मागे फिरली ,  निलंय चा हात हातात घेऊन थोपटला आणि झपाट्याने बाहेर पडली . ) 
इथून पुढे ……
निलंय कितीतरी वेळ तिच्या वाटेकडे बघत होता . मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली होती . एका निरर्थक वचनाने किती जणांचं आयुष्य ढवळून निघालं होतं . 

का असं होतं ? का कुणा एकाच्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्या कुणी घ्यायचे? आता ह्यापुढे कैलाश तिला त्रास देणार नाही कशावरून? इतकी चांगली गायिका , इतकं नाव कमावलं , पण एका नालायक माणसाशी गाठ पडली आणि  नशिबाचा फेरा कसा फिरला.  पण …आपण तिच्याबद्दल इतका विचार का करतोय ?
निलंयला तिच्यातील स्वतःच्याच  मानसिक गुंतवणुकीचे आश्चर्य वाटले . जन्मतः इतकी प्रतिभा घेऊन जन्मलेल्या कलाकाराला त्याच्या खाजगी आयुष्यात आई ,वडील , भाऊ ,पती यातील कुठल्याच नात्याकडून प्रेम मिळू नये ही बाब त्याला अस्वस्थ करत होती .

थोडा वेळ झोप घेऊन , नाष्टा करून निलंय ऑफिस ला गेला .
‘लंच अवर’ मध्ये एकटाच डबा खात बसला . काहीतरी टोचत होते . काय नेमकं ? अश्विनी ची कहाणी ?…. का तिची काळजी ? …की  एक चांगल्या कलाकाराची ही अशी अवस्था….नेमकं कांय होतंय?
दोन तीन दिवस गेले .
एक दिवस संध्याकाळी तशाच उद्विग्न अवस्थेत तो घरी आला . आज तबला काढायचा मुडच नव्हता . तो नकळत त्याच गॅलरीत जाऊन उभा राहिला , जिथून अश्विनी दिसायची .

त्याने कपाटातले ते  तिने दिलेले साखळी घडयाळ काढले . कितीतरी वेळ तसाच बसून होता आणि फोन वाजला .
तिचाच होता ….
” निलंय ?”
” अश्विनी ? तुम्ही ? …कुठून बोलताय?”
“भुवनेश्वर वरून . कैलाश नं माझं भुवनेश्वरचं मोठ्ठ  घर विकलं हे मी सांगितलं नं ?….ते कुणी विकत घेतलं होतं माहितेय ?” 

”  लेट मी गेस !…दीपेन ने !!! …..हो नं ? “
” हो s s , आणि माझी जुनी  रियाजाची खोली तशीच ठेवलीये . “
“ग्रेट !! ….अविश्वसनिय!!!…मला तर खूपच भरून येतंय .”
” ईश्वराने खूप खूप मोठी कृपा केलीये माझ्यावर .”
” दीपेन आणि कुटुंब तिथेच रहातात का?”

”  नाही . काही घरं पलीकडे रहातात . पण जोपर्यंत मी इथे असेन , तोपर्यंत मी इथेच रहावे असा हट्ट आहे भावी काकींचा .”
” असेही माणसं आहेत अजून …कमाल आहे . खूप छान वाटलं ऐकून .”
“निलंय , पुढच्या आठवड्यात एक मोठा कार्यक्रम आहे , पंडित शंकर , श्रावणी ताई , अमानुद्दीन खाँ , असे मोठे कलाकार आहेत . तू येशील माझ्या आणि श्रावनीताईंच्या साथीला ?”
ते ऐकून तर निलंय ला उडीच मारावी वाटली . त्याने लगेच होकार कळवला .

बिजू हे सगळं ऐकत काय चाललंय याचा अंदाज बांधायचा  प्रयत्न करत होता .
” कुठे जायचंय तुला आता ? एकदम खुश झालास ते .” बिजू .
” अरे , तबल्याची साथ द्यायला .”
” ते ऐकूनच तर विचारलं तुला  की कुठे जाणार आहेस ?”
” भुवनेश्वर ला ” बिजुच्या प्रश्नमालिकेला खंडित करून  निलंय नं त्याला उत्तर दिलं .

” निलंय , एक विचारू?” बिजू च्या प्रश्नाचा नेमका रोख ओळखून निलंय म्हणाला ,” तुझ्या प्रश्नाचं उत्तर  “नाही”  असं आहे . 
अश्विनीची आणि माझी बरोबरीच होऊ शकत नाही . पण मला मनापासून वाटतय की मी अश्विनीला जमेल तितकी मदत करावी . संगीत साधना ही फार अवघड वाट आहे  बिजू . तुमचं आयुष्य सतत तुमची कठोर परीक्षा घेतंय आणि तरीही तुम्ही संगीताची कास नाही सोडत ….हे सोपं नाहीये . मी देखील एक कलाकार आहे , पण सर्वस्व नाही झोकत त्यात . नोकरी सांभाळून वेळ उरल्यावर आमची संगीताशी निष्ठा ! कातडी वाचवणारी जात माझी .  पण अश्विनी सारखे कलाकार निखऱ्यावरून चालताना सुद्धा मनात मेघमल्हार आळवत असतात . म्हणून खूप आदर करतो मी त्यांचा .”

बिजू  कौतुकाने एकटक निलंय च्या चेहऱ्याकडे बघत होता .
कार्यक्रम रविवारी होता म्हणून निलंय शुक्रवारी संध्याकाळी भुवनेश्वरला पोहोचला.
अश्विनीच्या वाड्यापर्यंत पोहोचायला रात्रीचे  दहा वाजले. अश्विनी वाटच बघत होती.
आल्या बरोबर तिने त्याला एक हळुवार आलिंगन दिले .
निलंय ने एक नजर टाकली सगळ्या घरावर . बरेच जुने धागे अजूनही शाबूत होते .

इतकी जुनी वास्तू , पण अतिशय प्रसन्नता होती तिथे . आपल्या आयुष्यावर आता आपलाच ताबा , मी इतर कुणाची कळसूत्री बाहुली नाहीए … ही भावनाच अश्विनी साठी नवी होती . त्याचा पुरेपूर आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता .
पहाटे सहालाच निलंय उठला . रियाजाची वेळ आठची ठरली होती . अजून अवकाश होता .
“मी पाय मोकळे करून येतो .” असे म्हणत तो बाहेर पडला .
अश्विनीने सुचकपणे त्याच्याकडे पाहिलं . तो कुठे जाणार ह्याची तिला कल्पना होती .

तिचे घर ओलांडून निलंय पुढे गेला . एका घरासमोर एक पस्तिशीतला तरुण बागेत काम करत होता .
दाट केस , त्याची कपाळावर झुल्प ,  अतिशय नितळ    रंग  . चेहऱ्यावरचे भाव शांत ….नजर फिरवावी तिथे गच्च फुललेले गुलाब होते . पलीकडच्या बाजूला एक झोपाळा होता . एक देखणी स्त्री त्यावर बसून भाजी निवडत होती . निलंय ला अंदाज आलाच . आश्विनीने केलेलं वर्णन जुळत होतं . निलंय फाटकाजवळ गेला .
“हॅलो , मी निलंय  .”

त्या तरुणाने पुढे होऊन फाटक उघडले . ” मी दीपेन . या , आत या .”
कुणालाही बघितल्या बरोबर आवडावा असाच होता दीपेन . त्याची पत्नी राधा आणि  त्यांचा छोटाही फारच गोड होता .
आत गेल्याबरोबर भावी काकी बाहेर आल्या .
“नमस्कार करतो काकी “
” आयुष्यमान हो…..अश्विनी ने खूप सांगितलं तुझ्याबद्दल …..तुझी फार मदत झाली तिला .” काकी म्हणाल्या .

” असं काहीच नाही हो काकी.’
” अश्विनी ने कसे दिवस काढले रे तिथे?” काकींनी काळजीने विचारलं .
” त्यांना फार मान आहे काकी मुंबईत . खूप नाव आहे त्यांचे .” उत्तराला बगल देत बोलला निलंय .
” तू फार मोठा आधार झालास तिचा . नाहीतर कसे केले असते तिने ?”…दीपेन
”  छे हो , असं काहीच नाही . फक्त काही तास त्या माझ्याकडे थांबल्या होत्या , इतकंच ….तेही कैलाश पासून लपण्यासाठी ….”

बराच वेळ इकडडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . 
“दीपेन मला एक सांग , की   कैलास  तो बंगला  कसा विकू शकला ? त्याच्या नावावर थोडीच होता तो .”
” त्याने सगळ्या पेपर्स वर  आधीच अश्विनी च्या सह्या घेऊन ठेवल्या होत्या ….किंवा डुप्लिकेट केल्या असतील …मी त्याला किती खोदून खोदून विचारलं … त्याने काहीच सांगितलं नाही …….मला तिचा काहिच ठावठिकाणा माहीत नव्हता . तिचे कैलास शी संबंध कसे आहेत , हा कसा माणूस आहे काहीच माहिती नव्हती …तो इथे आला तेव्हा मी शिक्षणासाठी बाहेर गेलो होतो ……..मला सगळे ती इथे वापस आल्यावरच समजले. हा बंगला इतर कुणाच्या ताब्यात जाऊ नये , आपणच घेऊया हे मात्र आईने सुचवले . तिच्या भावना गुंतल्या होत्या  ह्या घरात . “

 राधा चहा घेऊन आली होती . तिने हा संवाद  ऐकला असावा असे वाटले निलंयला .
तो एकदम गप्प झाला हे बघून तीच म्हणाली , ” अश्विनी ताईने आता पुन्हा मुंबईला जाऊच नये . काय गाण्याचे दौरे करायचेत ते इथूनच करावेत . निदान आम्ही तरी आहोत सोबत . मी तसं स्पष्ट सांगितलं त्यांना .”  अश्विनीच्या बोलण्यातून तिचे आणि दीपेन चे नाते उलगडले होते . 
सगळा अगदी स्वच्छ मोकळा कारभार होता , कुठलीही लपवालपवी नाही ,  कि किल्मिश नाही.

भावी काकींनी देखील कुठला आडपडदा ठेवला नव्हता .हे नात्यांच्या चौकटींना छेदणारे  काहीतरी त्या पलीकडचे होते ….निलंय देखील त्यातलाच एक हिस्सा . कुठे न कुठेतरी धाग्यात बांधलेला .
अश्विनी सोबत निलंयची तालीम खूप मस्तं झाली .
संध्याकाळी श्रावणी ताई पण आल्या . छान मैफिल जमली …अनेक महिन्यांनी .
आज मारवा , कलावती राग आळवून झाले , ठुमरी तर अशी जमली की निलंय भान हरवून वाजवत होता .

दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रम  खूपच बहारदार झाला . भरपूर गर्दी होती . कुठून कुठून लोक आले होते . दीपेन , भावी काकी , राधाही आवर्जून आले होते .
अश्विनीची शेवटची भैरवी तर ……अब तो हमिसे है चैन हमारे ….लाजवाब !! 
आज पहिल्यांदाच दीपेन आणि काकींनी अश्विनीचं गाणं हे असं समोर बसून ऐकलं होतं . आयोजकही खूप खुश होते .

कार्यक्रमानंतर  लगेच श्रावणी ताई विमानाने निघून गेल्या .
निलंय आणि अश्विनी जास्त न रेंगाळता तिच्या बंगल्यावर आले .
निलंय ला लगेच मुंबई ची रेल्वे पकडायची होती .
“एकदम मस्तं झाला आजचा कार्यक्रम .  अगदी दर्दी श्रोते आहेत हं तुमच्या भुवनेश्वर चे ! खूप धन्यवाद की तुम्ही मला साथीला बोलावलंत .” बॅग आवरत निलंय म्हणाला .

” पण मी तुझे धन्यवाद मानणार नाही निलंय .  तू न बोलता माझ्यासाठी जे काही केलंस न , त्याचं मोल तुला नाही कळणार . ह्यापुढे माझ्या सगळ्या कार्यक्रमात तूच साथ करावीस अशी माझी इच्छा आहे .”
” का नाही ?  जरूर करेन . एक सांगू ? तुमच्या आयुष्यातील काही पानं फाडून टाका . मग बघा तुमची ती कलावती रागातली बंदिश …’नैना बावरे हमसे ना लडे’ कशी खुलून येईल ते . माफ करा , पण  आज तुम्ही गायलात न , तेव्हा त्यातला खट्याळ भाव थोडा झाकोळल्या सारखा वाटला मला .  मन असं उनाड वासरा सारखं मोकळं होऊ द्या ..मग बघा गाण्यातून काही शब्दांचे अर्थ कसे खुलून येतील .”

निलंय ने अश्विनीच्या गाण्यातील बारीकशी कसर अगदी बरोबर ओळखली होती .
त्या बंदीशीच्या वेळी त्याचा तबला आनंदाने थिरकत असताना तिच्या गाण्यात  हवी ती बहार जाणवत नव्हती …आणि त्याला ते बरोबर जाणवलं होतं .
” पुढच्या मैफिलीत नक्की फरक जाणवेल तुला . शब्द देते मी . येते लवकरच मुंबईला . बाय .” दरवाजा पाशी टेकून त्याला निरोप देत ती म्हणाली .

निलंय ला स्टेशनवर सोडण्यासाठी दीपेन गाडी घेऊन आला होता .
राधा ने निलंय साठी  डब्यात काहीतरी पाठवलं होतं . अश्विनी ने पण त्याला सोबत खाण्यासाठी काही बाही दिलं होतं .
अचानक दीपेन म्हणाला , “निलंय , आडवळणाने नाही विचारत , सरळ विचारतो .  तू आणि अश्विनी आता एकमेकांना चांगलं ओळखता .   तुमचे भावबंध जुळायला हरकत नव्हती …सॉरी..    मी ..”
” नो नो , डोन्ट बी ! अश्विनी ह्या फारच ताकदीच्या गायिका आहेत ,  मी खूप आदराने बघतो त्यांच्याकडे …..पण माफ करा व्यक्ती म्हणून  खूप चूकल्या असं वाटतं  मला …..काय गरज होती काकांच्या वचनाला जागायची?…,काय गरज होती कैलाश शी लग्न करण्याची !!! किती अवहेलना , किती छळ सहन केला …हे टाळता आलं असतं . मला चीड येते ऐकून!!”

हे ऐकून दीपेन बोलायला लागला …” आम्ही अतिशय जवळचे मित्र होतो . न बोलताच समजायची मला तिची भाषा …आई वाडीलांचं छत्र नाही , काकांकडे राहूनही गाण्याशी केव्हढं इमान …तिचं ते तंबोरा घेऊन बसणं ….सुरेल तान घेणं …..कार्यक्रमा आधी उतावीळ होणं ……गाण्याला वाहून  घेणं  ….माहीत नाही का , पण नाही जमलं मला माझ्या भावना बोलून दाखवायला .”
निलय ने चमकून त्याच्याकडे बघितले .
” म्हणजे ? तुझं प्रेम होतं तिच्यावर दीपेन ?”

“तिला कधीच सांगु नकोस निलंय , हो ,माझं फार फार प्रेम होतं तिच्यावर . तिचंही असणारच , पण तिला बहुतेक कधी बोलावं वाटलच नाही . कदाचित आयुष्याचा जोडीदार म्हणून नसेल  बघितलं  माझ्याकडे . तिने कैलाश शी लग्न केल्यावर देखील काही वर्षे मी वाट बघितली तिची …..”
निलंय ला काय बोलावे समजेना . त्याच्यासाठी हा फार मोठा  धक्का होता .
अश्विनी आणि दीपेन …किती मुग्ध प्रेम ते ! का व्यक्त झाले नाहीत वेळेवर ? दोघानाही नेमक्या भावना  वेळेवर का व्यक्त करता आल्या नाहीत ? का होतं हे असं ?  कोण चूक , कोण बरोबर माहीत नाही . पण  न बोलण्याची ही केव्हढी मोठी शिक्षा ! दोघांनाही !

त्याने फक्त दीपेनच्या खांद्यावर थोपटले आणि ट्रेनमध्ये चढला .
दीपेन अचानक म्हणाला , “निलंय , तुला अश्विनीची  काळजी वाटते  न?”
“हो , इतक्या मोठ्या कलाकाराला आनंदाने जगण्याचा अधिकार मिळायलाच हवा असं वाटतं .”
“आणि तो अधिकार कोण देणार निलंय?”
“कोण काय ? अश्विनी ने स्वयंभू होऊन स्वतःचा आनंद स्वतः शोधावा !”

” तिने मला बोलू नकोस म्हणू गळ घातली आहे , पण मी बोलणार . तिला फार आवडतोस तू . तू सच्चा माणूस आहेस …” 
” तू हे काय बोलतोय दीपेन ?” गाडी ची शिट्टी झाली ..काही सेकंदात गाडी हलणार असल्याने दीपेन ची तगमग होत होती .
“हो निलंय , तिला आवडतोस तू . तू तयार असशील तर तिची इच्छा आहे तुझ्याशी लग्न करायची . बोल पट्कन …गाडी हलतेय निलंय …उशीर होण्या आधी बोल ! “
निलंय साठी हा अनपेक्षित धक्का होता . हे असं अचानक ?

गाडी हलली . दीपेन खिडकी बाहेरून गाडीच्या बरोबर वेगात चालत होता.
“मला माहितेय निलंय , तुझं प्रेम आहे तिच्यावर …आता आणखी एक नातं चुकवू नये नियतीने ….निलंय!!”
गाडी ने वेग पकडला , तशी निलंय ने आपल्या सामाना सकट बाहेर उडी टाकली !
दीपेन ने धावत येऊन आनंदाने त्याला मिठी मारली .
त्याच्या मनावरचं एक फार मोठं ओझं कमी झालं होतं .
निलंय च्या डोळ्यात आभाळ साचलं होतं . त्याच्या कानात अश्विनीची भैरवी घोळत होती …’तुम्ही से है अब चैन हमारे ‘
( समाप्त)
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!