वचनपूर्ती ( भाग 1)

© सौ. प्रतिभा परांजपे
सुधीर चितळे…एका नावाजलेल्या शाळेचे प्रिन्सिपॉल, रिटायरमेंट करता दोन महिने उरलेले, कामात खूपच चोख आणि तब्येतीने व स्वभावाने उमदे असल्याने स्टाफ मधे खूप लोकप्रिय.
विद्यार्थ्यांचे पण आवडते.
खरंतर सुधीरना अजूनही काम करायची खूप इच्छा, पण शाळेच्या नियमानुसार सेवानिवृत्ती घेणे क्रमप्राप्त होते.

घरी फक्त बायको माधवी आणि ते, असे दोघंच. दोन्ही मुले बाहेर देशात.
आता रिटायरमेंट नंतर आपण फिरायला कुठे जायचे यावर दोघांनी चर्चा करून आठ दिवस महाबळेश्वरची ट्रिप ठरवली.
पण ठरवल्याप्रमाणे सर्व घडते तर मग काय !
सुधीर सर सेवानिवृत्त व्हायच्या आधीच माधवीची तब्येत बिघडली, शुगर डाउन झाली आणि काही कळायच्या आत ती कोमातच गेली.

पाहिलेले सुंदर स्वप्न धुळीस मिळाले. काही दिवसातच माधवी त्यांना सोडून गेली.
मागे उरला तो नको असलेला एकटेपणा.
सेवानिवृत्तीचा आनंदही सुधीर व माधवीला उपभोगता आला नाही.
माधवी शिवाय रिकामे घरआता त्यांना खायला उठायचे.                                      
नोकरीसाठी  त्यांनी  एक-दोन शाळांमध्ये अप्लाय केले पण तिथून समाधान कारक उत्तर नाही मिळाले.

एक दिवस व्हाट्सअप ग्रुप वर त्यांना लहानपणी शाळेत असलेला मित्र अशोक याचा फोन आला.
अशोक आणि सुधीर दोघं दहावीपर्यंत बरोबर शिकलेले. अशोकशी बोलता-बोलता जुन्या आठवणींना उजाळा मिळायला लागला.
चिपळूणसारख्या तालुक्यावजा गावात सुधीरचे बालपण गेले .
बाबा तिथेच कचेरीत होते . स्वतःचे छोटेसे घर ,आई आणि एक बहीण आणि सुधीर असा परिवार.
दहावी पर्यंतची शाळा. त्या शाळेतले पेंडसे सर, जे अशोकचे काका होते ते गावात अगदी शिस्तीने वागणारे व तत्ववादी म्हणून प्रसिद्ध होते.       

नेहमी उत्तम निकाल असल्याने त्यांच्या शाळेचे नांव पूर्ण तालुक्यात प्रसिद्ध होते.
दहावी नंतर सुधीर पुढील शिक्षणासाठी  मुंबईला काकांकडे आले ते तिकडचेच झाले.
कॉलेजमध्येच माधवीशी त्यांची मैत्री नि मग प्रेम विवाह झाला.
शिक्षण घेत तेही एका नावाजलेल्या शाळेत शिक्षक, मग प्रमोशन घेत घेत प्रिन्सिपॉल झाले.
सुधीर ना आता गावी जायची इच्छा होऊ लागली .

त्यांचे वडिलोपार्जित घर होते, माधवी बरेचदा म्हणायची ही ” विकून टाका ना घर कोण राहणार आहे आता तिथे”?
पण कां कोण जाणे, सुधीरना त्या घराचा मोह होता.
गावी जायचे ठरल्यावर सुधीरनी अशोकलाही कळवले . तोही चार दिवस गावी यायला तयार झाला.
एक दोन दिवस अशोक च्या घरी पाहूणचार  घेत सुधीरनी घर स्वच्छ करवून राहण्याजोगत करून घेतलं.
घरात शिरताच, आई ,बाबा ,ताई सर्वांची त्यांना आठवण येऊ लागली.

स्वयंपाक घरातील आईचा वावर ,तुळशीपाशी काढलेली ताईची रांगोळी, बाबांचे बाग काम सर्व आठवता आठवता डोळे भरून येऊ लागले
सामानातून त्यांनी आई बाबांचा फोटो काढून भिंतीवर लावला.
बाहेरून फुले आणून त्याला हार घातला देवघरात देव मांडले स्वयंपाक घरात भांडीकुंडी होतीच हळूहळू काही सामान विकत घेतले. आता सध्या तरी त्यांनी तिथेच राहण्याचा विचार केला.
माधवी गेल्यापासून त्यांना स्वतःची कामे स्वतः करायची सवय लागली होती.

त्यांनी दिवसभराचे वेळापत्रक तयार केले.
संध्याकाळी अशोक बरोबर ते गाव फिरायला निघाले .
गप्पा मारत मारत दोघे जुन्या शाळेपाशी येऊन थबकले.
शाळेचे मेन गेट खोलून आज जातात जुन्या आठवणी डोळ्यासमोरुन जाऊ लागल्या. कितीतरी वेळ दोघे त्या आवारात फिरत होते. उन्हाळा असल्याने शाळा बंद होती.

बोलता-बोलता पेंडसे सरांचा विषय निघाला “सर होते त्यामुळे शाळेचे किती नाव होते पण– सर गेले आणि”,
अशोक काहीच बोलला नाही , दोघांचे डोळे पाण्याने भरून आले.
” काकू कशा आहेत”??
“मोठ्या मुलाकडे असतात, येतात गावी, तिकडे त्यांनाही करमत नाही. आता येणारच आहे सोमवार कडे. तुझी भेट होईलच.”
चार दिवसांनी अशोक मुंबईला परत निघून गेला.

एक दिवस फिरताना सरपंच देशमाने साहेब भेटले, विषय निघाला, तेव्हा म्हणाले, “शाळा जवळ जवळ बंदच आहे”
“कां बरे?”
“कोणी इथे प्रधानाचार्य म्हणून टिकत नाही.”
“प्रत्येकाला शहराची ओढ असते.”
“नाही हो, ही शाळा शापीत आहे”
“काय”?? सुधीरना धक्काच बसला.

“कसे शक्य आहे! मी पण इथेच शिकलोआहे .”
“तेव्हाची परिस्थिती वेगळी होती!”
“पण नेमके काय घडले??”
“इथे प्रधानाचार्य म्हणून रुजू होणारी व्यक्ती फार दिवस जगत नाही.”
सर्वच धक्कादायक होते.
सुधीर रात्री कितीतरी वेळ जागत होते .खरंच असे काही आहे की हा निव्वळ योगायोग असावा?

दोन दिवसांनी पेंडसे काकूंना भेटायला म्हणून सुधीर गेले
“किती वर्षांनी आला रे, हे तुझ खूप कौतुक करायचे, नेहमी म्हणत असत माझे विद्यार्थी पहा किती मोठे नाव कमावून आहेत”.
“सर होतेच ग्रेट, गणित, इंग्रजी काय छान शिकवायचे ! आणि एकदम स्ट्रीक्ट. त्यांच्यांमुळे शाळेचे नावं लोक कौतुकाने घेत.  सर प्रिंसीपल झाल्यावर तर शाळेचं नावलौकिक आणखिनच वाढलं.
“हो, रे पण!!… “काकूंनी जे काही सांगितले तेही दुःखद होते.
“फार घुसमट होत होती रे त्यांची, शाळेवर फार फार प्रेम होते त्यांचे पण त्यांची तत्व, त्यांचा स्वभाव यात परिस्थिती आड आली. शेवटी राजीनामा देणे भाग पडले.”

पेंडसे सरांचा म्रुत्यू हार्ट अटॅकनी झाला असे जरी ते सगळीकडून ऐकून होते तरी त्याच्या मागची कारणं काहीतरी वेगळीच असावी असे सुधीरना वाटू लागले.
रात्री अचानक त्यांची झोप उघडली गर्मी मुळे कि कशाने सर्व अंग घामाने डबडबले होते ,घशाला कोरड पडली ते उठून बसले.  पाणी प्यायल्यावर त्यांना आठवले, स्वप्नात  पेंडसे सर दिसत होते.
ते रागारागाने ओरडत होते,” नाही नाही मी हा अन्याय होऊ देणार नाही, माझी शाळा मी अशी सहजासहजी सोडणार नाही. तुम्ही माझे काही बिघडवू शकत नाही .मी बदला घेईन सोडणार नाही”!

आवाज अजूनही कानात घुमत होता. काकूंचे बोलणे त्यांना आठवले, त्याची आता सुसंगती लागत होती.
सरांच्या मनाविरुद्ध काम करवली जात होती ती त्यांनी नाकारली असावी,
आता सुधीर ना या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पत्ता करावा असे वाटू लागले.
दुसरे दिवशी फिरता फिरता देशपांडे सरांच्या घरी सहज म्हणून सुधीर गेले .
बोलता-बोलता त्यांनी शाळेची चौकशी केली.

“कारे तुला मुंबई नावडती झाली कां?” देशपांडे काकूंनी  विचारले.
“नोकरीसाठी प्रयत्न करतोय रिकामपण नकोसं वाटतंय आपल्या शाळेला प्रधानाचार्यांची गरज आहे असे ऐकले तेव्हा…”
काकू आणि देशपांडे सर दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिले हे त्यांच्या लक्षात आले! 
“कां सर??”
“मॅनेजमेंटमध्ये बडी बडी  प्रस्थ आहेत. त्यांचे रूल्स वेगळे आहेत, ते मान्य असतील तर तुला नक्कीच ठेवतील.”
“असे काय जगावेगळे रुल्स आहेत इथले? मी आधीपण एका शाळेचा प्रिन्सिपल होतो”

“ते खरे पण इथे बरीच पॉलिटिक्स आहे. मागे आपल्या सावंत मॅडम होत्या शाळेत प्रिन्सिपॉल पण त्या अचानक गेल्या.
नंतर एक बाहेरून कोणी मुजुमदार आले, देशमाने सरपंचांनी आणले होते पण ते ही चार महिन्यात अचानक वारले. त्यानंतर या शाळेत कोणीच काम करायला तयार होत नाही…”
मॅनेजमेंटच्या अध्यक्षांना भेटून सुधीरनी आपली इच्छा व्यक्त केली.
ते आनंदाने तयार झाले.

“पण माझ्या कामाची पद्धत थोडी वेगळी आहे त्या त कोणी  मधे आलेलं नाही चालणार”
शाळा सुरू असण गरजेच आहे हे लक्षात घेऊन अध्यक्ष तयार झाले.
उन्हाळा संपताच शाळा सुरू झाली.
सुरुवातीला शाळेचे स्वरूप तिथल्या कामाची पद्धत याची सुधीरनी बारकाईने तपासणी केली.
शाळेतला प्यून शाळेचे काम कमी आणि अध्यक्षांच्या घरचे जास्त करत असे.

त्यावरून सुधीरने त्याला नोटीस दिली, तेव्हा तो म्हणाला “साहेब तुम्ही नवीन आहात. इथले नियम, कायदे अजून तुम्हाला ठाव नाय”
“नवीन?? मी इथेच या शाळेत शिकलो आहे.”
“म्हणजे ! त्या पेंडसे सरांच्या टाईमला? त्या टाईमला माझा बा होता कामाला. मी तर आत्ता आत्ता लागलो नोकरीला.”
क्रमशः
खरंच ही शाळा शापीत असेल का? नक्की काय झाले असेल पेंडसे सरांसोबत? शाळेत नव्याने रूजू झालेल्या सुधीरना जमेल का या कोड्याची उकल करायला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचा पुढील अंतिम भागात…
© सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!