भांडण

© सौ. प्रतिभा परांजपे
छोटी वैष्णवी हातात काहीतरी घेऊन ‘माझा आहे माझा आहे ‘म्हणत धावत धावत घरात  शिरली.
तिच्या मागे मागे शेजारचा चिनू रडत रडत आला.
“मी पाहिलं होतं —माझं आहे”
“मला पहिले मिळालं. मी नाही देणार—“
दोघांचे भांडण व रडारड ऐकुन वैष्णवीची आई साधना बाहेर आली .”काय झालं का भांडता आहात?”
तेवढ्यात चिनूची आई सुखदा पण आली “काय झालं? का रडतोय ?”

वैष्णवीच्या हातात एक लाल फुगा होता त्यावरून दोघांचे भांडण चालले होते.
काल रात्री टेरेसवर  वाढदिवसानिमित्त पार्टी होती. त्यात फुग्यांच डेकोरेशन होते.
त्यातला एक फुगा खाली आला त्यावरून भांडण चालले होते.
चिनूने वैशूच्या हातातून फुगा खेचून घेतला तशी ती चिडली.
आता दोघं खेचाताणी  करू लागले. या खेचाखेचित फुगा फाट्कन फुटला .

चिनूने जोरात भोकाड पसरले, तशी सुखदा रागाने म्हणाली “पहा फुटलां ना? दिला असता त्याला तर?”
“वा गsवा, नेहमी हा याचच खरं करतो ! का द्यावा वैशूने? तिला मिळाला होता.”
मुलांचे बाजूला राहिले. आता दोघी आया वाद घालू लागल्या .
“हा असाच हट्टी आहे. नेहमी रडून भांडून आपलं खरं करतो ,अगदी तुझ्याच वर गेलाय “!
“ए– मला हवे ते बोलू नको हं. मी नाही ऐकून घेणार, तू काय कमी अकडू आहे?”

” चल रे कोण हिच्या तोंडी लागेल” म्हणत चिनूचा हात खेचत सुखदा निघून गेली .
स्वतःला फारच समजते म्हणत साधनाने धाडकन दार बंद केलं.
वैशूला आपल्या आई आणि चिनूच्या आईला काय झाले ते कळेना.
संध्याकाळी वैष्णवीला घरी कंटाळा येऊ लागला, बाहेर चिनूचा आवाज येत होता .
“आई– मी जाऊ का खेळायला चिनू बरोबर?”

“काही नको !आपण बाहेर जातोय बाबांबरोबर.”
वैष्णवी बाहेर निघाली चिनू दारातून तिच्याकडे पाहत होता,”वैशू बघ माझं हेलिकॉप्टर” म्हणत धावत  दाखवू लागला.
तेवढ्यात साधना दार लावत  “वैशू चल काही गरज नाही” म्हणत ,वैशूचा हात धरून निघाली.
चिनू हिरमुसुन पाहतच राहिला, घरात येऊन गुपचूप सोप्यावर बसला.
” काय झालं चिनू रडायला?” जवळ बसलेल्या राधा आजींनी विचारले.

“मी कोणाबरोबर खेळूं? वैशू बाहेर गेली आई बरोबर..
सुखदा बोलली “गेली तर गेली काही गरज नाही तिच्याबरोबर खेळायची. काल किती कटकट करत होती ती साधना”.
“अगं असं काय झालं? लहान पोरांचं भांडण ते, आज भांडतील उद्या एक होतील “आजी म्हणाल्या .
“तुम्हाला माहित नाही आई , जाताना ती साधना चिनूला काय वाट्टेल ते बोलली.मुळीच जाऊ नको “बडबडत  सुखदा निघून गेली.
राधाआजींना असे शब्द फार पूर्वी  त्यांच्या लहानपणी ऐकलेले आठवले .

राधाच्या बाबांचा म्हणजेच पाटलांचा वाडा होता.
राजा पाटील त्यांना तीन मुलं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी एक मुलगी झाली. राधा, खूप कौतुकाची.
त्यांचे धाकटे भाऊ शंकर ही तिथेच राहत असत. त्यांना तीन मुलीवर एक मुलगा झाला राजू. कौतुकाला उधाण आले .
राधा दिवसभर राजू बरोबर खेळायची. दोघे एकाच वयाची.
दोघे छान खेळत, कधी कधी भातुकली वरून भांडणही होत असे  पण थोड्याच वेळात भांडण विसरून खेळायला लागत.
दोघांना एकमेकांशिवाय करमत नसे.

दोन्ही भावांमध्ये खूप एकोपा होता पण दोनी जावांचे मात्र फारसे पटत नसे.
थोडीफार धुसफूस चालायची.
पण या सगळ्याची लहान मुलांना काहीच जाणीव नव्हती, ते निरागस पणे एकमेकांशी खेळायचे. कधीकधी भांडायचे.
एकदा खाऊ वरून भांडण झालं राजू म्हणाला, ” मी बाप्या माणूस. मला जास्त हवं .”
पण राधा म्हणाली,”अर्धा वाटा माझा. मी रांधलआहे म्हणून.”

आता दोघ हट्टाला पेटले, खेचाखेची त खाऊ खाली सांडला आणि धुळीत मिळाला. 
खाऊ सांडलेला पाहून राजूने रागाने हातातली वस्तू फेकून मारली. ती राधाच्या कपाळावर लागली खोक पडली.
रक्त येऊ लागले. राधाच्या रडण्याचा आवाज ऐकून राधाची आई धावत आली .
“माझ्या लेकीला केवढं मारलं. रक्त काढलं या राजूने” म्हणून ओरडा करू लागली.
घरातले सर्व आले.
राजूची आई पण धावत आली.

“काय झालं राजू ? चुकून लागलं असेल थांब. हळद लावू” म्हणू लागली.
पण राधाची आई ऐकेच ना. मग वादविवाद होत भांडण पेटलं .
जुने वाद हेवे दावे बाहेर निघाले आणि राजू व राधा दोघांचं खेळणं बंद झालं. 
दोन दिवसांनी दोघांना करमेना. पण घरातले ऐकच ना
एका घरात राहूनही दोघी जावा एकमेकांशी बोलत नसत.
छोट्या छोट्या गोष्टींवर तक्रारी होत.

या सगळ्याचा परिणाम म्हणून वेगळं व्हायचं ठरलं.
त्यानंतर एक दिवस राजूचे बाबा आणि त्याच्या घरचे सर्व दूर कुठेतरी राहायला निघून गेले. .
कितीतरी दिवस राधाला राजू ची आठवण यायची.
काळ कोणाकरता थांबतो?
अजूनही राधाआजींना राजूची आठवण दर राखी भाऊबिजेला यायची.
त्याला येत असेल कां आठवण ?विचार करता करता आजींचे डोळे भरून आले.

आज त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. हे वेळिच थांबायला हवे असे आजींना वाटू लागले.
“आई मला खूप कंटाळा येतोय काय करू? मी जाऊ कां चिनू कडे?” वैष्णवीने विचारले!
“नाही, चल तासभर बागेत जाऊ, तिथे तुला खूप फ्रेंड भेटतील.” साधना वैशूला घेऊन निघाली.
दारात चिनू उभा होता. वैशू त्याच्याकडे पाहत होती पण आईच्या भीतीने बोलली नाही.
चीनू उदास होऊन घरात आला.आजी हे सर्व पहात होत्या. त्यानाही वाईट वाटले.

बागेत मुलं खेळत होती. पण वैशूच्या ओळखीचं कोणीच नव्हतं.
ती त्या मुलांजवळ जाऊन उभी राहिली पण कोणी तिच्याकडे लक्ष देत नव्हते आणि तिला खेळात घेत नव्हते .
साधना बेंचवर बसली होती ,तेवढ्यात तिची क्लासमेट प्राची दिसली “अरे प्राची तू इथे “म्हणत दोघींच्या गप्पा सुरू झाल्या!
वैशू मुलांच्या मागेपुढे करत होती .
आता साधनाचेही तिच्या कडे लक्ष नव्हते. ती मैत्रीणीशी गप्पांमध्ये गुंग झाली.
बराच वेळ गेला. “बर साधना परत भेटू” म्हणत प्राची निघून गेली.

अचानक बागेच्या दुसऱ्या कोपऱ्यात हल्ला ओरडा ऐकू येऊ लागला.
साधनाचे लक्ष गेले, वैशू कुठे दिसत नव्हती.
ती घाबरली व वैशू वैशू करत आवाज देत शोधू लागली .
वैशू कुठे दिसेना तशी साधनाला रडू येऊ लागले .ती इकडे तिकडे पाहू लागली.
तेवढ्यात सुखदा बरोबर चिनू आणि वैशू तिला येताना दिसले. वैशू खूप घाबरलेली होती रडत होती.

“कां ग काय झालं,? चिनू ते परत काही केले वाटतं. तरी मी बोलले होते न–?”
–तेवढ्यात बागेचा वॉचमन आला “ताई या लहान मुलामुळे तुमची मुलगी वाचली, दोन बदमाश हिला  पळवून घेऊन जात होते.”
“काय?”
“हो साधना–  चिनूला घरी कंटाळा आला म्हणून मी चिनूला बागेत घेउन येत होते. चिनूने पाहिलं वैशूला ती दोन मुलं धरून घेऊन जात होती. चिनू ने मला दाखवलं आम्ही दोघांनी आरडाओरडा केला तशी ती मुलं पळून गेली .”
“बाप रे– चिनूला जवळ घेत साधना म्हणाली, “चिनू थँक्यू आणि सॉरी सुखदा.”

” इट्स ओके साधना. जसा माझा  चिनू तशिच वैशू ग माझ्यासाठी.”
“हो पण– त्या दिवशी मी  —
‘”जाऊ दे ग ,मी पण जरा जास्तच बोलले. मुलांची काय चूक “!
घरी आल्यावर सर्व हकीकत चिनूने आजीला सांगितली
दुसरे दिवशी साधनाकडे सत्यनारायणाची पूजा ठेवली इतक मोठ संकट टळल  म्हणून.

मेहूण अर्थातच सुखदा व तिचे मिस्टर . आणि राधा आजी आणि मुख्य हीरो अर्थातच चीनू…
जेवण झाल्यानंतर दोघी मैत्रिणी गप्पा मारत बसल्या होत्या .
तेवढ्यात चिनू आणि वैशूचा भांडण्याचा आवाज आला तशी साधना आणि सुखदा एक क्षण चमकल्या आणि मग हसायला लागल्या…
बाजुला बसलेल्या राधा आजींनी  देवाला हात जोडले नी म्हणाल्या, “चला एक भांडण तरी वेळच्या वेळेत संपले. दोन लहान निरागस नाती वेळीच सावरली गेली.”
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.


Leave a Comment

error: Content is protected !!