अनोखे हळदीकुंकू

©️ सौ. ऋचिता बोधनकर दवंडे
काम करता करता अनिताची नजर कालनिर्णयाकडे गेली आणि तिच्या लक्षात आले मकरसंक्रांत आठ दिवसांवर आली आहे. मकरसंक्रांत इतक्या जवळ आली आणि आपल्या लक्षात कसे आले नाही ह्याचे तिला आश्चर्य वाटत होते. पण लगेच दुसऱ्याक्षणी तिला जाणवले की यंदा आईंची गडबड नाही मकरसंक्रांतीची.
मागच्या फेब्रुवारीत बाबा गेले आणि आईंचे सगळे गणितच बदलले. तशा त्या सोसाटीतील बायकांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसतात, आपल्या अडीच वर्षांच्या नातीशी खेळतात पण अजूनही म्हणाव्या तशा सावरलेल्या नाहीत.

नाहीतर आई म्हणजे जणू उत्साहाचा झराच. सणवार सगळे यथासांग आणि हौशीने करतात.
जानेवारी महिना येत नाही तर “अनिता अगं मकरसंक्रांत आहे ह्या महिन्यात तीळ आणायचे आहेत लक्षात ठेव”, “मकरसंक्रांतीच्या दिवशी सुगड्याचेच वाण देऊ गं, बाकी हळदीकुंकाला काय द्यायचे ते तू ठरव” अशा एक ना एक सूचना सुरु व्हायच्या.
तीळ आणले की भाजून, कूट करून तिळगुळ करणे, सुगड्याची वाणे आणणे, ओट्या तयार करणे, हळदीकुंकाच्या दिवशीची तयारी करणे सगळे काही आई हौशीने करायच्या. यंदा मात्र काहीच नाही.

तेव्हा अशा परिस्थितीत आपण काय करायचे असा प्रश्न अनिताला पडला.
पण नाही आपण सगळे नेहमीसारखेच करूयात नाहीतर आई त्यांच्या कोषातून बाहेर येणार नाहीत असे ठरवून अनिता कामाला लागली.
मकरसंक्रांतीच्या चार दिवस आधी जाऊन तिने तीळ आणले, तिळगुळ केला. सुगड्याची वाणे आणली. सगळी तयारी केली. मकरसंक्रांतीच्या दिवशी मात्र आज मंदिरात प्रवचन आहे असे सांगून सासूबाई लवकरच घरातून बाहेर पडल्या आणि थेट दुपारी जेवणाच्या वेळेस घरी आल्या. तोपर्यंत अनिताचे सुगड्याची वाणे देऊन झाली होती.

आईंनी हे मुद्दामच केले आहे हे अनिताच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. जेवताना पण त्या उदासच दिसल्या. अनिताला फार वाईट वाटले. संध्याकाळी चहा देखील आपल्याच खोलीत घेतला.
एकटीच गॅलरीत बसून चहा घेता घेता आईंना ह्यातून बाहेर कसे काढता येईल ह्याविषयी अनिताच्या मनात विचार सुरु झाले. सासूबाईंनी अनिताला सुनेप्रमाणे न वागवता नेहमी मुलीप्रमाणे वागवले होते त्यामुळे अनितालाही त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर होता. तिला त्यांना पूर्वीसारखेच पाहायचे होते.
बऱ्याच वेळ विचार करून तिने एक निश्चय केला.

अनिताने येणाऱ्या रविवारी हळदीकुंकू आणि आपल्या अडीच वर्षांच्या लेकीचे सानिकाचे बोरन्हाण करायचे ठरवले.
मकरसंक्रांतीच्या दिवशीसारखे व्हायला नको म्हणून तिने सासूबाईंना वेळेवरच सांगायचे ठरवले होते.
त्यांना फारसे कळू न देता तिने तयारी सुरु केली.
वाण म्हणून द्यायला छान रुमालसेट आणले. ओटीत द्यायला मटार, गाजर, बोरं आणले. गजरे आणले. शिवाय बोरन्हाणचे सगळे साहित्य आणले. आदल्यादिवशी जाऊन सोसायटीतील बायकांना आमंत्रण दिले. तिने सासूबाईंच्या ग्रुपमधील बायकांनाही आमंत्रण दिले.

“आम्हाला कसे गं चालणार हळदीकुंकूला यायला?” असे म्हणत त्यांनी आढेवेढे घेतले. पण तुमच्या नातीसारख्या असणाऱ्या माझ्या लेकीचे बोरन्हाण आहे तेव्हा तिचे कौतुक पाहायला आणि आशिर्वाद द्यायला तरी या ह्या अनिताच्या आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही आणि त्या यायला तयार झाल्या.
हळदीकुंकाचा दिवस उजाडला.
सकाळपासूनच अनिताची धावपळ सुरु होती. दुपारी अनिता खोलीत आराम करायला गेलेल्या आपल्या सासूबाईंजवळ आली.

“आई आज आपल्याकडे हळदीकुंकू आणि आपल्या सानिकाचे बोरन्हाण आहे तेव्हा तुम्ही पण तिथे हजर राहायचे आहे. संध्याकाळी साधीच पण छानशी जरीकिनार असलेली साडी नेसून या ना बाहेर” अनिताच्या ह्या बोलण्यावर सासूबाई जरा अवघडल्या.
पण सुनेचा प्रेमळ हट्ट त्यांना मोडवला नाही. शिवाय त्यांच्या लाडक्या सानिकाचे बोरन्हाण होते त्यामुळे कुठलीही नाराजी नको व्हायला म्हणून त्यांनी तिला होकार दिला.
अनिताला तर फारच आनंद झाला.

संध्याकाळी बायका यायच्या आत सासूबाई आकाशी रंगाची बारीक जरीकिनार असलेली साडी नेसल्या. नेहमीपेक्षा जरा व्यवस्थित तयार होऊन बाहेर आल्या. त्यांना तसे तयार झालेले पाहून अनिताला बरे वाटले.
ती आणि सानिका देखील छान काळी साडी आणि फ्रॉक घालून तयार होत्या.
वेळेप्रमाणे सगळ्या बायका आणि मुले आली.
सानिकाचे बोरन्हाण झाले. मुलांना खाऊ दिला. बायकांना पण फराळाचे देऊन हळदीकुंकू लावायच्या वेळेस अनिता आधी आपल्या सासूकडे गेली. हळदीकुंकू घेऊन आलेल्या आपल्या सुनेला पाहून सासूबाई आणि इतर बायकाही थबकल्या.

ते लक्षात येऊन अनिता बोलती झाली “आई मला थोडे बोलायचे आहे. कृपया माझ्यावर रागावू नका. आई, बाबा गेले म्हणून सगळेच संपले का हो? मान्य आहे जोडीदार सोडून जाणे, अचानक त्याची साथ संपणे हे नक्कीच क्लेशदायक आहे. पण म्हणून जग थांबून राहत नाही. नवरा गेला म्हणून कुंकू लावायचे नाही, हळदीकुंकू ला जायचे नाही असे का?
हळदीकुंकू हे आपण आपल्या परंपरेसोबतच एक हौस म्हणूनही करतो. त्या निमित्ताने रोजच्या व्यापातून बाहेर पडून काही वेळ का होईना चार बायका एकत्र येतात. गप्पा होतात.

कुंकवाला स्त्रीच्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. मग ते सुवासिनीच्या माथ्यावर लावले किंवा विधवा स्त्रीच्या माथ्यावर लावले काय फरक पडतो? हळदीकुंकू न लावल्याने त्या वेगळ्या आहेत हेच जाणवून देणे नाही होत का?
मकरसंक्रांतीच्या हळदीकुंकाला आपण वाण देतो ती दैनंदिन उपयोगातीलच एखादी वस्तू असते. मग ती वस्तू विधवा स्त्रीच्याही उपयोगात येणारच ना तेव्हा त्यांनाही वाण दिले तर काहीच फरक पडत नाही.
विधवा स्त्रियांनाही छान व्यवस्थित तयार होऊन अशा समारंभाला यायला काही हरकत नाही. मुळातच छान दिसणे आणि छान राहणे हा प्रत्येकाचा हक्कच आहे असे मला वाटते.

स्त्रीला देवीचे रूप मानतात. मग विधवा स्त्री देखील देवीच्या रूपात येऊन आपल्याला अशा प्रसंगी आशिर्वादच देते.
आई मी आग्रह करणार नाही पण माझे म्हणणे मनापासून पटले तर नक्की हळदी कुंकू लावा. हळदी कुंकू लावून घेता आहेत म्हणून काही जगावेगळे नाही करत आहात आई.
तो प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे असे मला वाटते. मी जास्त बोलली असेल तर मला माफ करा”. सासूबाई साश्रुनयनांनी सुनेचे बोलणे ऐकत होत्या आणि भारावून गेलेल्या त्यांनी नजरेनेच तिला समंती देऊन हळदीकुंकू लावून घेतले. वाण घेतले. सासूबाईंप्रमाणेच तिथे उपस्थितीत सगळ्या विधवा स्त्रियांनीही हळदीकुंकू लावून वाण घेतले.

सासूबाईंना आज अनिताचे खूप कौतुक आणि अभिमान वाटत होता. तसेच ह्याप्रसंगाने त्यांच्या चेहऱ्यामध्ये पडलेला फरक अनिताच्या नजरेने लगेच टिपला.
हळदीकुंकू सारख्या मंगलप्रसंगी आपल्याला टाळले जात होते पण आज अनिताने आपल्या बोलावून एक स्त्री म्हणून योग्य तो मान दिला याबद्दल तिथे  उपस्थित सगळ्यांनी तिला भरभरून आशिर्वाद दिले.
तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहून अनिताला आपल्या ह्या अनोख्या हळदीकुंकाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
©️ सौ. ऋचिता बोधनकर दवंडे
सदर कथा लेखिका सौ. ऋचिता बोधनकर दवंडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!