तडा

  1. तिची गगन भरारी
  2. डाग
  3. सुख
  4. सत्य
  5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
  6. तडा
  7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
  8. प्रायश्चित्त
  9. उत्तर 
  10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
  11. निलिमा
  12. आपली माणसं
  13. विश्वास
  14. जाणीव
  15. गुलमोहोर
  16. हिऱ्याची अंगठी
  17. सासूबाईंचे माहेर
  18. सवाष्ण

©️मृणाल शामराज.
इवल्या इवल्या रंगीबेरंगी  दिव्यांनी ती Blue Diamond  Hotel ची  इमारत लुकलूकत हॊती. त्यावरची Blue Diamond ही  मोठी अक्षर Neon प्रकाशात झगमगत हॊती. शहराच्या थोड्याशा  बाहेर प्रशस्त परिसरात पहुडलेलं हॆ हॉटेल हिरव्यागार झाडीनं लगडलेलं होतं.
त्या झाडांवर  सोडलेले ते हिरवे प्रकाशझोत… त्या झाडीतून आत घेवून जाणारी दगडी पायवाट… ते थुईथुई नाचणारं कारंज.. विविध रंगांच्या पाण्याची त्यातून होणारी बरसात.. दारातच उभा असणारा कडक इस्त्रीतल्या पांढऱ्या शुभ्र  कपड्यातला, ऐटबाज टोपी घातलेला द्वारपाल.. सगळं कसं आत येण्याची ओढं लावणार होतं.

हॉटेलचा  हा ambiance, तिथे दिली जाणारी सेवा, तिथला उत्कृष्ट असा अन्नपदार्थांचा  दर्जा, तिथला बार.. यामुळे तिथले दर  चढेच होते. सामान्य लोकं तिकडे जायला बिचकत. त्यामुळे तिथे येणारे उच्चभ्रूच असत.
या काही मैत्रिणी. खूप वर्षांनी भेटलेल्या, योगायोगानी. काही निमित्ताने एका शहरात विसावलेल्या.. मुलं मोठी झालेली.. त्यामुळे सुटवंग झालेल्या होत्या आता… अधूनमधून भेटायच्या.. पोटभर गप्पा मारायच्या.
विषयांना काही कमी नव्हतीच. कुठलाही विषय चालायचा. खुसूखूसू हसणं कधीतरी धबधब्यासारखं  कोसळायचं. कधी एखादी कोपरखळी, तर  कधी एखादीची खेचण.. पण ना कुणी रुसायचं ना कुणी रागवायचं.

आयुष्यातील कोवळी वर्षे बरोबर काढलेल्या त्या एकमेकींना छान ओळखून होत्या. लग्न झाली, विखूरल्या साऱ्या..आणि आता इतक्या वर्षांनी आता भेटल्यावर काय बोलू, आणि किती सांगू असं झालं प्रत्येकीला.
हळूहळू प्रत्येक जण मोकळी होतं हॊती.
Woman’s Day.. आजचा हा खास दिवस त्यांनी स्वतः साठी राखून ठेवला होता.
सगळ्या आज Blue Diamond ला भेटणार होत्या. आज त्यांनी जलसा करायचं ठरवलं होतं.. मुक्त होऊन आज आकाशात उडायचं.

प्रत्येकीने घरी तशी कल्पना देऊन ठेवली हॊती… त्या सात जणी.. वेगवेगळ्या वातावरणातून, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या.. आज त्यांनी ठरवलं होतं.. मनभरून जगायचं.. ऐश  करायची.
साडेसात झालें. काळ्याभोर  लांबलचक आलिशान गाडीतून श्रीया उतरली. उंची झिरझिरीत गाऊन तिच्या त्या गुबगुबीत अंगाला चिटकून बसला होता. त्यामुळे थोडी का होईना ती बारीक दिसत हॊती. नेहमीच पार्ट्याना जायची सवय असल्यामुळे मेकअप पण छान जमला होता.
शहरातल्या नामांकित सराफाची  सुन  हॊती ना ती.. उगाचच न आलेला घाम टिपत तिनं इकडे तिकडे आजूबाजूला बघितलं. राधिका आधीच आली हॊती. श्रीयाला बघून ती पुढे आली.

दोघी एकमेकींकडे बघून हसल्या.. काय ग बराच वेळ झाला का येऊन.. नाही ग आत्ताच येतेय.. कशी आलीस.. ओला बुक केली हॊती.. श्रीयानी राधिकाला खालपासून न्याहाळल.
ही एका खासगी कंपनीत नोकरी  करते.. नवरा कारकून.. अजून काय असणार.. तिच्या अंगावरचा तो ड्रेस त्यावरील घड्यांवरून ठेवणीतला होता हॆ तिनं ओळखलं.
ती लोकल मेड  पर्स, त्या झीजलेल्या चप्पला ती ओठाच्या कड़ेनी किंचित बाहेर आलेली लिपस्टिक ती न्याहाळत  हॊती. राधिका दुसरीकडे बघत हॊती तरी तिला अंगभर फिरणारी श्रीयाची  नजर  बोचकारे काढत हॊती.

ती नखांनी  जमीन उकरू लागली तशी श्रीया भानावर आली. काय करतोय हॆ आपण. ही काही आपल्या किटी पार्टीतली मैत्रीण  नव्हे.. ती शरमली. हलकेच राधिकाच्या खांद्यावर थोपटत  तिने एक  चुटकूला  सांगितला.. दोघीही खुसखुसल्या.
राधिकाच्या मनावरचा ताण नकळत सैलावला. तेवढ्यात रमा, नयना आणि स्वाती आल्या.
रमा एक शिक्षिका हॊती. छानशी सिल्कची साडी  नेसून, त्यावर तिनं तिच्या भरगच्च केसाचा अंबाडा घातला  होता. एक अर्धउन्मालित गुलाबाची मॅचिंग  कळी  त्यावर अलगद खोचली हॊती. तिचा तो हलका मेकअप तिच्या पेशाची नकळत ओळख  करून देतं होता.

नयना आणि स्वाती गृहिणी असल्यातरी त्यांचे नवरे सरकारी खात्यात मोठ्या हुद्यावर  होते. त्यांचे ते ब्रँडेड कपडे, मोजकेच पण घसघशीत  दागिने ह्यात त्या वेगळ्याच दिसत होत्या. सगळ्या सीमा, आणि रजनीची वाट पाहत होत्या. थोड्याच वेळात होंडा मधून त्याही येऊन पोचल्या. सीमा डॉक्टर तर रजनी प्रोफेसर हॊती.
त्यांच्या वागण्यातील सहजता त्यांचा त्या वातावरणातील त्यांचा सतत वावर सहजपणे जाणवून देतं होती .
सगळ्या आत शिरण्यासाठी दाराशी गेल्या.  द्वारपालानी  हसून दार उघडलं.

श्रीया कुर्‍यात आत गेली. राधिका मात्र त्याच्याकडे बघून मधुर हसली. बाकीच्या त्यांच्याच नादात आत गेल्या.
तो हलका पिवळसर प्रकाश तलम गालिचा अंथरल्यासारखा सगळीकडे पसरला होता. ते अगदी मंद आवाजातलं संगीत  कानात हळुवार घुमत होतं.
ते उंची फर्निचर, त्या किणकिण  आवाज करणाऱ्या काचेच्या नाजूक वस्तू.. ते चकचकीत काटे, चमचे.. दोन टेबलांमधून सफाईतदारपणे फिरणारे ते कडक कपड्यातले वेटर्स.. त्यांची आदब.. सगळ्या सहजपणे विसावल्या.

त्या कोरीव सागवानी टेबलावर  एक नाजूकसा, काचेचा अप्रतिम असा कॅण्डल स्टॅन्ड होता. त्यात तेवणाऱ्या सुगंधी  कॅण्डलची  मंद ज्योत वाऱ्याच्या झुळकीने अलगद डुलत हॊती. त्या नाजूक काचेतून  ती हलकीशी नक्षी टेबलभर हिंदोळत हॊती. परत स्थिर होतं हॊती. राधिका हा नाचरा खेळ मन लावून पाहत हॊती.
अगं.. कुणी तरी तिला हळूच हलवलं. ती क्षणभर थरथरली… अजून ही अशीच स्वप्नात रमणारी नयना म्हणाली. सगळ्या मनापासून हसल्या..
मग गप्पा रंगल्या.. नवरे.. त्यांचे हुद्दे.. मुलं. त्यांची उच्च शिक्षण.. फॉरीन ट्रिप्स, दागिने.. खरेदी.. विषय संपतच नव्हते.
गप्पा अखंड चालू होत्या..

राधिकाला काहीसं कानकोंड झालं होतं. ती शांतपणे सगळं ऐकत हॊती. तिच्याकडे ह्यापैक्की काहीच बोलण्यासारखं नव्हतं..
वेटर नाजूकश्या ग्लासतून ते झुळझुळणार पेयं घेवून आला. राधिका क्षणभर बिचकली. हॆ.. आता काय करायचं..
तिनं सौम्य शब्दात नकार दिला. सगळ्यांना हॆ अपेक्षितचं होतं… त्यांनीही तिला आग्रह केला नाही.. त्या सगळ्या आता त्यात रमल्या.. राधिका मात्र सकाळी झालेल्या संवादातच अडखळली हॊती..तिनं इथं यायचं नाही काही तरी कारण सांगून टाळायचं असं ठरवलं होतं.
विनोद, तिचा नवरा, दोन दिवसापासून तिची घालमेल पाहत होता.. त्यानं कपाटात बाजूला काढून ठेवलेल्या पाचशेच्या चार नोटा तिच्या हातात ठेवल्या.. जा बघू तु आज..

“अहो, चिनुला सायकल घ्यायची आहे ना, किती दिवस मागे लागलाय तो.. एवढ्या लांब त्याला पायी जावं लागतं.. एवढ्यानी होणार नाही, पण ऍडव्हान्स तरी भरला जाईल ना..”
“तु काळजी करू नकॊ.. माझ्या ओव्हरटाईमचे पैसे येतीलच दोन दिवसात.. तु आज जाच.”
त्यानं तिला टू व्हिलर वर आणून सोडलं.. म्हणूनच ती थोडं वेळेच्या आधीच आली हॊती.
सगळ्या आता सैलावल्या होत्या.

श्रीयाच्या नवऱ्याला बाहेरचा नाद होता.. रमाला मुलं नव्हतं.
नयनाचा मुलगा लाडाने बिघडला होता.. सीमाची प्रॅक्टिस रोडवली हॊती..
कुणी वैतागल्या होत्या.. कुणी सुसकारत  होत्या.. श्रीयाच्या डोळ्यात पाणी आलं होतं..
एकदम तड.. असा आवाज आला. सगळ्या चमकल्या.. काय झालं..
टेबलंवरचा तो नाजूक कॅण्डल स्टॅन्ड उष्णतेनी तडकला होता.. त्याला एक हलकासा तडा गेला होता.. जवळच  असलेला वेटर लगबगीने तिकडे आला.

पण त्या सगळ्या परत गप्पात रांगलेल्या बघून तो सर्विग आणायला गेला..वेटरनी सर्विग  आणलं.. 
राधिका त्या  कॅण्डल लॅम्पच्या तड्यातून विखूरलेला  प्रकाश पाहत हॊती. अजाणतेपणे  तो विखूरला गेला होता.. तो तडा जीवनाचे नवीन कंगोरे तिला दाखवत होता..
त्या पुढे तो ज्योतीचा मंद प्रकाश तिला दिलासा देतं होता..
तिचं हसरं गोकुळ क्षणभर तिच्या डोळयांपुढे आलं.. ती सुखावली..
समोरचा प्रत्येक पदार्थ तिनं अपूर्वाईने खाऊन पहिला. पोटभर जेवली ती..

वेटरनी  बिल आणून ठेवलं. श्रीयाने पर्स उघडली.. राधिकाने तिला थांबवलं.. असं नकॊ ग प्लीज.. T. T. M. M. करू यात..
श्रीयानी सगळ्यांकडे पहिलं.. त्या सगळ्या आश्चर्यानी तिच्या कडे पाहत होत्या.
राधिकानी  झोकात आपल्या पर्स मधून कोपऱ्यात नीट घडी घालून ठेवलेल्या पाचशेच्या नोटा काढल्या.. ताठ मानेनी तिनं सगळ्यांकडे बघितलं.. सगळ्यांनी मिळून बिल भरलं.
सगळ्या बाहेर आल्या.

राधिका मागे हॊती. तिनं हळूच विसची नोट द्वारपालाच्या  हातात ठेवली.
कष्टाचं मोल ती जाणत हॊती.
द्वारपाल ख़ुशीत हसला. ती पण मनापासून हसली..
आज ती खरंच राणी झाली हॊती.. औट घटकेची का होईना.. ओंजळभर का होईना, पण शाश्वत असं सुखं तिच्या हातात होतं.
अखंड असतांना पडणाऱ्या कॅण्डल लॅम्पच्या नक्षीसारखं.. मंद पण प्रतलं व्यापणारं…

©️मृणाल शामराज
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “तडा”

Leave a Comment

error: Content is protected !!