© अलका मोकाशी
बैलगाडीतनं धान्याचे पोते वाड्यावर येऊन पोचले होते. अर्पिता ते उतरवून घेऊन गड्यांकडून कोठी घरात ठेऊन घेत होती. तितक्यात फटफटीवरून मुन्ना येऊन पोचलांच. एव्हढ्या रखरख उन्हामध्ये तिला अशी उभी राहून काम करतांना पाहून त्याचा जीव कळवळला. पण त्याचबरोबर अभिमानही वाटला की, ती न खचता त्याच्याबरोबरीने उभी होती.
कॉलेज मधे डिस्को डान्स वर थिरकणारी अर्पिता आपल्याला पडत्या काळात अशी साथ देईल असे मुन्नाला स्वप्नातही वाटले नव्हते.
मुन्ना देखणा तर होताच पण त्याच्या बिनधास्त स्वभावामुळे अर्पिताला तो खूप आवडायचा. पण कायम गावातंच शेती करत राहण्याचा त्याचा मानस ऐकून ती त्याच्या प्रेमात बिमात पडायचं प्रकर्षाने टाळत होती.
त्यालाही ती खूप आवडतं होती. तसा तो स्पष्टपणे तिला बोलूनही दाखवत होता. तिचे वागणे, बोलणे तर छानच होते. पण त्याही पेक्षा तिच्यातली सतत लोकांना मदत करण्याची वृत्ती रंग रूपापेक्षा त्याला खूप भावत होती. तिचा चेहरा बोलका होता. ती खळाळून हसली की तिच्या गालात खळी पडे ती त्याला भारी आवडत असे. पण तिला खेडेगावात राहणे पसंत नव्हते.
“एकदा आमच्या गावात ये, प्रेमातंच पडशील तू माझ्या” तो सारखा तिला म्हणायचा. ती उडवून लावायची.
ती मात्र त्याच्या तनामनावर राज्य करू लागली होती.
कॉलेज संपल्यावर सगळ्यांच्या दिशा बदलणार होत्या. कुणाचे लग्न होणार होते तर कुणी शहर सोडून जाणार होते, शिक्षणाच्या निमित्त्याने. पुन्हा आपली भेट होईल नाही होईल म्हणून आपण सगळे एकदा भेटूया आठवण म्हणून असे मुलांनी ठरवले.
“या आमच्या मोहगावला …बघा कसे करतो स्वागत तुमचे… ” …मुन्ना म्हणाला.
कॉलेज संपायला अर्धे वर्ष बाकी होते. सगळ्यांनी मुन्नाच्याच गावाला त्याच्या आग्रहाखातर ट्रीप काढायचे ठरवले.
सगळे जमले तरी अजून अर्पिता आली नव्हती. मुन्नाचे मन चलबिचल व्हायला लागले होते.
जिच्यासाठी आपण पुढाकार घेऊन ट्रीप ठरवली तीच नाही आली तर?… तो विचार करतंच होता तितक्यात अर्पिता आली. तिला पाहून त्याला हायसे वाटले. “ काय गं किती उशीर केलास? माझा जीव टांगणीला लागला होता”
“सॉरी सॉरी मला जरा उशीरच झाला. पण तुझा जीव टांगणीला का लागला होता?”……ती मिश्किल हसत गाडीत चढू लागली. तिने त्याचे मन ओळखले होते पण त्याला ती तसे भासू देत नव्हती.
गाडीत सगळे बसले नि मस्ती, मजा करत गाडी गावाच्या वेशीवर येऊन पोचली. नागपूरच्या पुढे एक तासाच्या अंतरावर मोहगाव नावाचे छोटेसे गाव होते.
गावात जातांना आजूबाजूला भव्य दिव्य बहाव्याच्या झाडांच्या लांब लांब पसरलेल्या फांद्यांनी रस्त्यावर जणू मांडवच घातला होता. त्यातून लोंबणार्या पिवळ्या धम्मक गुच्छेदार फुलांच्या माळा, झुंबरं स्वागताला उभ्या आहेत असे वाटत होते. खूप शांत नि प्रसन्न वातावरण होते. “दोन मिनट थांबुया का इथे?”
अर्पिता बोलल्या बरोबर मुन्नाने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. अर्पिता बहाव्याचे सौंदर्य बघण्यात रमली होती. तिने ते सगळे सौंदर्य डोळ्यात भरून घेतले. ती डोळे मिटून हात पसरून उभी राहिली. मुन्नाने तिच्या हातावर हात ठेवले .
तेव्हढ्यात वाऱ्याची झुळूक आली. आणि बहाव्याची ती नाजूक फुलं त्यांच्या अंगावर पडली.
तिने डोळे उघडले. मुन्ना तिच्याकडे बघत होता. तिने लटक्या रागात म्हंटले, “हे काय रे”
हात झटकून ती गाडीमध्ये जाऊन बसली. गाडी पुढे जाऊ लागली.
” ही माझी शाळा आहे रे मित्रांनो ” मुन्ना ने सांगितले.
“ही न्यू इंग्लिश हायस्कूल?”…विवेक म्हणाला .
“ बापरे ! चांगलीच मोटठी शाळा आहे… “…अर्पिता आश्चर्याने म्हणाली.
“ मग तुला काय वाटलं ?”…मुन्ना म्हणाला .
“मला काही वाटलं नाही …छान आहे शाळा”
“हं”…मुन्ना हसत म्हणाला.
“बरं पुढे सांग”…चेतन म्हणाला.
“हो सांगतो …इथे पीटी साठी आम्हाला वैद्य सर होते. खूपच मजेदार होते. थंडी मध्येही आम्हाला सकाळी सकाळी परेड करायला बोलवायचे. ले ssss फ्ट म्हंटले की राईट म्हणायचेच नाही लवकर. त्यातून ती ढिली हाफ पँट. आम्ही आपला एक पाय वरती घेऊन उभे राहायचो. आतून आरपार गार वारे जायचे. सगळ्यांचे तोल जायचे. तेव्हा कुठे ते रा ssss इट म्हणायचे.” मुन्नाचे बोलणे ऐकून सगळे पोट धरून हसायला लागले.
अर्पिताला हसू आवरत नव्हते.
तो तिच्याकडे एकटक बघत होता. तिला मिठीत घेण्याची त्याला प्रबळ इच्छा होत होती . तेव्हढ्यात ती त्याला चापट मारत म्हणाली, “काहीही बोलतो”.
तिचा स्पर्श! त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो तिचे एक एक स्पर्श हृदयात जमा करून ठेवत होता.
त्याच्या वाड्याकडे जातांना रस्त्याच्या दुतर्फा छोटी छोटी कौलारू, मातीच्या भिंती शेणाने सारवलेली घरे होती. अंगणही शेणाने सारवलेले होते. त्यात पेरु ,पपई ,केळी, करदळ , सीताफळ, लिंबाची आणि कितीतरी फुलांची झाडं सगळ्यांकडेच दिसत होती. घराघरांतून चुलीवरच्या चहाचा, स्वयंपाकाचा सुगंध सुटला होता. मनाला खूप तरतरी आली होती.
गाडी वाड्यापाशी येऊन पोचली. गाडीतून उतरल्यावर पाहतात तो काय? भलामोठा ऐसपैस वाडा होता. सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटले. मुन्नाने कधीच त्याच्या अशा श्रीमंती बद्दल सांगितले नव्हते. वाड्याला मोठ्ठे गेट होते.
आत गेल्याबरोबर समोर राधाकृष्णाचे सुंदर मंदिर होते. वाडा खरंच खूप सुंदर होता. सगळ्या सोयींनी युक्त होता.
तिथे सगळ्या गडीमाणसांना आपल्या कुटुंबाबरोबर राहायची सोय होती. त्याचे वडील गावचे पाटील होते. देशमुख पाटील! पंचक्रोशीत त्यांचा दबदबा होता.
मुन्ना त्यांचा मुलगा , श्रीरंग देशमुख!
त्यांच्याकडे शंभर एकर जमीन होती आणि कितीतरी गायी म्हशी होत्या. त्याला एकच दुःख होते ते म्हणजे त्याच्या वडिलांना तमासगीर उर्मिलाबाईने आपल्या नादाला लावले होते. बाटलीचाही नाद होताच. त्यामुळे घरी असलेल्या या इस्टेटीचा पसारा त्याला सांभाळण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि ती जबाबदारी त्याने मनापासून स्वीकारली होती.
त्याला एक लहान बहीण होती मानसी!
हे सगळे ऐश्वर्य बघून अर्पिताचे तर डोळेचं दिपले.
वाईटही वाटले मुन्नाची व्यथा ऐकून.
दुपारी चुलीवरच्या जेवणाचा मस्त आस्वाद घेतल्यानंतर सगळे शेतावर मनसोक्त फिरले. शेतावरच्या त्या झाडाखालची सावली वेगळाच आनंद देत होती. कुणी कॅमेराने फोटो टिपत होते.
अर्पिता मात्र कसला तरी विचार करत एका झाडाच्या आडोशाने शांत उभी होती.
मुन्ना तिच्याजवळ गेला.
“कसला विचार करतेस?” मुन्नाने तिच्या डोळ्यात बघत विचारले.
“तुझ्या बरोबर ही जबाबदारी स्वीकारायला आवडेल मला”
क्षणभर त्याने तिच्याकडे कपाळावर आठी आणून बघितलं. त्याला खरच वाटत नव्हतं॰
“काय ?”..त्याच्या ओठावर स्मित आलं होतं.
अर्पिता काही न बोलता सरळ त्याच्या मिठीतचं शिरली. तो बघतच राहिला.
त्याने मिठी आणखीन घट्ट केली. तिची हनुवटी हलकेच हातात घेत त्याने तिला विचारले ,” मग देशील ना साथ मला?”
तिने मानेनेच होकार दिला.
“खरंच! गावात राहशील माझ्याबरोबर ?”
“हो , घे वचन”…तिने त्याच्या हातावर हात ठेवत म्हंटले.
मुन्ना अर्पिताच्या अशा अनपेक्षित निर्णयामुळे हरखून गेला. त्याचा ट्रीप त्याच्या गावी ठरवण्याचा उद्देश सफल झाला होता.
या त्यांच्या निर्णयाला त्याच्या घरच्यांनी पण हुंकार भरला होता.
कॉलेज संपल्यानंतर दोघांनीही दोन वर्ष शेतीविषयक भरपूर शिक्षण घेतले. बरेच नवे तंत्र शिकून घेतले जेणेकरून शेतीचे उत्पादन वाढवता येईल.
अर्पितामधे गावाविषयी, शेतीविषयी झालेला बदल मुन्नाला खूप सुखावून जात होता. घरासाठी काहीतरी करण्याची तिची तडफड बघून मुन्नालाही खूप जोश आला होता. तोही तिच्या बरोबर जोमाने उभा राहिला .
पण अर्पिताच्या आई वडिलांना आपल्या मुलीचा हा निर्णय खूप आततायी वाटला.
तिचे वडील एका कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्यावर कार्यरत होते. आईही शिकलेली होती. त्यांचा या संबंधाला विरोध होता. शहरात राहिलेली मुलगी गावात जाऊन राहणार शिवाय शेतात काम करणार त्यांना ते अशक्य वाटत होते.
पण ती तिच्या मताला ठाम होती.
“तुला गम्मत वाटते का ?..खेड्यात जाऊन राहणे सोपे नाही. नव्याचे नऊ दिवस झाले की मग कंटाळा येईल”..तिचे बाबा तिला समजाउ पहात होते.
“ बाबा नाही असे नाही होणार …मी मनापासून तिथे राहण्याचे मुन्नाला वचन दिलेय”
“वचन दिलेय म्हणजे काय? ती काही दगडावरची रेघ थोडीच आहे. उद्या तडजोड करणे अशक्य झाले की वचन विसरून जाशील. शहरातली ती चकाचक दुनिया तिथे नसणारे. उगाच श्रीमंतीकडे बघून होकार देऊ नकोस. बघ तुला लहान बहीणही आहे…उद्या जर तू होऊ नये पण जर घरी परत आली तर किती बदनामी होईल याचा विचार केलाय ?”…तिचे बाबा तिला काळजीपोटी सत्य परिस्थिती सांगत होते.
“ हो बाबा केलाय …मी तुमच्यावर अशी कुठलीच वेळ येऊ देणार नाही …विश्वास ठेवा माझ्यावर”….तिचे जीवतोडून बोलणे तिच्या बाबांना खरेच विश्वास देऊन गेले.
अर्पिताने धूमधडाक्यात सर्व गावाच्या साक्षीने माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलाने देशमुखांच्या घरात प्रवेश केला नि ती अर्पिता महाजन ची अर्पिता श्रीरंग देशमुख झाली.
लग्नानंतरचे नवे दिवस आटोपल्यानंतर दोघेही उत्साहाने शेतीच्या कामाला लागले. उसा बरोबरच महाराष्ट्रात कुठेही होत नसलेले खजुराचे उत्पादन त्यांनी मोहगावात करायचे ठरवले होते. पण पाटलांना थोडी शंका होती की हे नवीन उत्पादन या जमिनीत होईल की नाही.
“गड्या तुम्ही पोराइनं खजुराचं उत्पादन घ्याचं ठरवलतं आहे पन मला शंका वाटून राहयली.”
“बाबा आम्ही पूर्ण विचारपूस केल्याच्या नंतरच हे प्रोजेक्ट तुमच्यासमोर ठेवले आहे.” मुन्ना म्हणाला.
“ पण फायदा व्हायला हवा बाळांनो ”
“ बाबा प्रयत्न करून बघू …नाही जमलं तर सोडून देऊ. आम्ही मेहनत घ्यायला तैयार आहे”…अर्पिता म्हणाली.
सूनबाईचे मन त्यांना मोडवले नाही . त्यांनी तुरंत होकार दिला. ते स्वतःही मुलांबरोबर उभे राहिले.
त्यासाठी त्यांनी काही एकर जमीनित दोनशे तीनशे खजुराच्या रोपांची लागवड केली. त्या रोपांची काळजी ते दोघे डोळ्यात तेल घालून घेत होते.
बराच खर्च त्यासाठी केलेला असल्यामुळे पाटलांना दिलेला शब्द मुलांना खरा करून दाखवायचा होता. एक दोन वर्षात ही झाडं पूर्ण वाढून त्यांना फळे यायला सुरुवात होणार होती.
एका झाडाला कमीतकमी चारशे ते पाचशे किलो खजूर लागतिल . ही झाडं तीस चाळीस वर्ष आरामात उत्पादन देणार. म्हणजे आपल्या दोन पिढ्या कमीतकमी ह्याचे उत्पादन घेऊ शकणार. ते दोघे स्वप्न पाहायला लागले होते. त्यांच्या स्वप्नात पाटीलही शामिल झाले होते.
खजुरच्या शेती बरोबर बाकी पिकाचीहि काळजी दोघे मिळून व्यवस्थित घेऊ लागले होते. हिरवेगार शेत पिकाला आले होते. सार्या गावाच्या नजरेत पाटलांची शेती भरायला लागली होती.
जो तो मुन्ना आणि सूनबाईंचे खूप कौतुक करू लागला होता. पाटील खूप आनंदात होते. मुलगा सून जातीने शेतीमधे लक्ष घालत असल्यामुळे त्यांची काळजी मिटली होती. घरातही खूप आनंदी वातावरण राहू लागले होते. पाटील आता घरात लक्ष देऊ लागले होते. त्यामुळे मुन्नाची आई ही खुश रहायला लागली होती.
ती उठसूठ सगळ्यांना सांगायची ,”माझी सून बाई खूप गुणाची आहे हो…पायगुण खूप छान आहे तिचा….आल्यापासुन अंमळ भरभराट झाली आहे”
पाहता पाहता वर्ष कसे झाले कळलेच नाही.
हळूहळू पाटलांचे त्या तमासगिर उर्मिला बाईकडे जाणे आता बंदच झाले होते. ती मात्र चेकाळली होती. पाटलांच्या पैशाच्या भरवशावर ती जगत होती , मौज करत होती.
शरीराची भूक भागवायला तिला पाटील आणि मजा मारायला पैसा तिला दोन्ही हवे होते.
पाटलांच्या घरची भरभराट तिच्या कानावर गेली होती.
आडून आडून तिने पाटलाला निरोप धाडून पहिला होता . पण पाटील आता लक्ष देत नाही म्हंटल्यावर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. तिला पुन्हा पाटलाला आपल्या नादी लावायचे होते.
एक दिवस पाटील दुपारच्या वेळी एकटेच पायदळ शेताच्या बाजूला चालले होते. शेत तसे घरापासून पाच सहा किलोमीटर दूर होते. रखरखीत उन्हाची वेळ असल्यामुळे रस्त्यावर कुणीच नव्हते.
अचानक चार पाच लोक तोंडाला कपडा बांधून पाटलाच्या समोर आले. काही कळायच्या आत त्यांनी रुमाल पाटलाच्या तोंडाला दाबून धरला. क्षणात पाटलांच्या डोळ्यासमोर अंधारी आली.
जरा वेळाने त्यांची गुंगी उतरू लागली. डोळे उघडले तर काय पलंगावर त्यांच्या बाजूला उर्मीलाबाई झोपली होती.
हाताचा डोक्याला टेकू देऊन ती त्यांच्या कडे बघत होती.
“मी इथे ?”
“तर वो ….तुमच्या उर्मीलाबाईपाशी आलात”
“कुणी आणलं मला इथे?”
“आवाज चढवू नका मालक. काय पाटील ओळखलत का?….लय दिवस झालिती , फिरकलाच नाहीत…आम्हाला लय आठवण येत होती.”….उर्मीलाबाई त्यांच्या अंगाशी लगट करत म्हणाली.
पाटील उठून जाऊ लागले . तिने त्यांचा हात पकडला.
“अंहं अंहं….मी अशी बरी जाऊ देईन तुम्हास्ंनी” तिने अंगावरचा पदर टाकला नि ग्लास त्यांच्या समोर केला.
“तुमच्या आवडीची मदिरा ….घ्या”
पाटलांनी ग्लास दूर केला.
“ घ्या हो घ्या “
तिने ग्लास पाटलांच्या ओठाजवळ नेला. पाटलांनी तो ग्लास गटागटा पिऊन टाकला. ती त्यांच्या कपड्याशी झटपट करू लागली. तिने अंगातली चोळी काढली नि पाटलांच्या अंगाशी आपले अंग घुसळू लागली.
तितक्यात पाटलांच्या डोळ्यासमोर अर्पिताचा चेहरा आला. आणि ते भानावर आले. त्यांनी तिला दूर केले नि कपडे चढवून निघू लागले. पण खोलीचे दार बाहेरून बंद होते.
त्यांनी तिच्याकडे वळून पाहिले ,“हे काय ?”
“ मी नाई जाऊ द्यायची तुम्हास्ंनि”…ती परत त्यांच्या जवळ येत म्हणाली.
“ हा काय शानपना हाय ?…मला घरी जाऊ दे”
“मला तुमची गरज हाय”..उर्मिला बाई पाटलांचा हात पकडत म्हणाली.
त्यांनी तिचा हात जोरात झटकला नि दाराला ताकतिनि लाथ मारणार तितक्यात ती त्यांचा हात आपल्या पोटावर ठेवत म्हणाली ,
“तुमचा अंश वाढतोय माझ्या पोटात”
पाटील एकदम थबकले ,”काय ?…खोटं बोलतेस तू”
ते परत दारावर लाथ मारणार इतक्यात ती म्हणाली , “ मी गावात बोभाटा करीन…तुमची बदनामी होईल पाटील..आन नवीन आलेली सून …इचार करा ”
“ काय पाहिजे तुला ?”
“ मी जे मागिन ते द्याल”
“ बोल”
“ तुमची अख्खी शेती माझ्या या पोटातल्या जिवाच्या नावानं करा”
“ काय ?…म्हंजी तुझ्या नावानं?” त्यांचे डोळे विस्फारले. रागाने लाल झाले होते.
त्यांनी तिच्यावर उगारायला हात उचललाच होता तोच तिने पकडला. नि त्यांच्या समोर स्टॅम्प पेपर ठेवला. त्यांना गरगरायला लागले होते. बायका पोरं डोळ्यासमोर दिसू लागले.
“सही करा पाटील”.
“ नाय करणार”
“ सही करा पाटील “….ती जिद्दीने बोलत होती. तिचा आवाज त्यांच्या डोक्यात घुमू लागला.
तिने त्यांचा हात पकडूनच ठेवला. त्यांनी त्या कागदावर सही केली तसे दार आपोआप उघडले , ते जाऊ लागले तेव्हढ्यात पाठीमागून त्यांना हसण्याचा आवाज आला,
“ किती महिन्याची गाभण हाय नाई विचारलसा पाटील ?….”
पाटील मागे वळून न बघता निघाले…..रस्त्यात त्यांना चक्कर यायला लागली. खाली पडणार तितक्यात शेतावर काम करणारे गडी माणस धावले. पाटील घामाने थपथपले होते. त्यांना कसेबसे वाड्यावर नेले .
पाटलांची अवस्था बघून मुन्ना घाबरला. डॉक्टरांना बोलवायला धावतंच होता तितक्यात पाटलांना छातीत खूप दुखायला लागले नि त्यांनी तळमळत प्राण सोडला.
सगळं घर , गाव दु:खात बुडालं होतं. लोकांची कुजबूज मुन्नाच्या कानावर पडली.
“तमासगिरीनं घात केला पाटलाचा” .
गावातल्या सरपंचांच्या कानावर ही गोष्ट गेल्याबरोबर त्यांनी तडक सभा बोलावून तमासगिर उर्मीलाबाईला सर्व मतानुसार गाव सोडून जाण्यासाठी संगितले.
पण तिने मान्य केले नाही. पाटलांनी शेती तिच्या नावावर केल्याचे कागदपत्र तिने सरपंचांच्या समोर ठेवले आणि सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला.
मुन्ना तर हे सर्व बघून तिच्या वर चवताळून धावलाच होता.
हा धक्का सहन न झाल्यामुळे मुन्नाची आई गेली.
मुन्ना मूळापासून हादरला होता. शेतीसाठी रात्रंदिवस त्यांनी केलेली मेहनत पाण्यात जातांना पाहून त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. अर्पिता आणि त्याच्या लहान बहिणीची जबाबदारी त्याच्यावर होती. पण अर्पिता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
पण देव एक मार्ग बंद झाला की दुसरा मार्ग उघडतो म्हणतात तसेच झाले.
पाटलांनी गावासाठी केलेले काम नि उदार स्वभाव लक्षात ठेवून सारा गाव त्यांच्या पाठीशी उभा राहिला. बाजूच्याच गावाच्या हळदे पाटलांनी या पोरांना आधार दिला. ते आपल्या घरी घेऊन गेले. आणि त्या तमासगीर उर्मिला बाईच्या विरुद्ध कोर्टात केस टाकायलाही मदत केली.
त्याचा आत्मविश्वास हळूहळू वाढयला लागला. आता ही झुंज जिंकायचीच.
त्याने विडा उचलला नि नव्या जोमाने मुन्ना नि अर्पिता हळदे पाटलाला कामात मदत करायला लागले.
हळदे पाटील त्यांच्या कामावर खुश होते.
आज अर्पिता मुन्नाला कुठे दिसत नव्हती. कुठे असेल म्हणून तो तिला वाडाभर शोधत होता. मानसीने खुणेनेच त्याला खोलीत असल्याचं सांगितलं. पाटलीन बाई तिच्या जवळ बसल्या होत्या. त्याला पाहून त्या मुरख्या मुरख्य हसत निघून गेल्या. त्याला काहीच समजत नव्हतं. त्याने अर्पिताला चिंच खाताना पाहिले नि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो तर आनंदाने उडलाच.
“काय?” त्याच्या आनंदाला पारावार नव्हता.
दोघांच्या प्रेमाचं अंकुर तिच्या गर्भात वाढत होता. ती त्याला बिलगली. त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतलं.
आणखीन नव्या जोमाने कामाला लागला. अर्पिताही त्याला गरोदर असतांनासुद्धा जसे जमेल तसे त्याच्या कामात हातभार लावत होती.
“मुन्ना ….मुन्ना अरे कधी आलास तू ?” मुन्नाची तंद्री तुटली.
“अगं कधीचाच …तुझ्याच कडे बघत होतो. चल घरात …उन्ह किती आहे” त्याने आपली फटफटी अंगणात ठेवली. आणि अर्पिताला तो हळुवार आत घेऊन गेला.
अर्पिताचे दिवस भरत आले होते. डिलिव्हरीची तारीख जवळ आली होती.
आज कोर्टात त्याच्या केसचा निकाल लागणार होता. तो तय्यार झाला. निघणार तितक्यात अर्पिताच्या पोटात कळा यायला लागल्या. त्याला समजेना काय करू. इकडे जाऊ की तिकडे जाऊ. त्याची द्विधा मनस्थिती झाली होती. पण अर्पिताने त्याला धीर दिला.
त्याला कोर्टात जायला सांगून ती पाटलिन बाईंना घेऊन हॉस्पिटल मध्ये गेली.
“कन्या रत्न जन्माला आलंय”. नर्स म्हणाली.
तिकडे कोर्टात निकाल मुन्नाच्या बाजूने लागला होता.
तो धावतच हॉस्पिटल मधे आला.
नर्स ने त्याच्या हातात दुपट्यात गुंडाळलेले एक गोंडस बाळ दिले. बाळ पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
तो पुटपुटला,”लक्ष्मी”
“काय?आपण केस जिंकलो?”
ग्रीष्म सरून आषाढ आला होता. आभाळात ढग जमले होते.
लक्ष्मीला घेऊन त्यांनी आपल्या घरात प्रवेश केला.
© अलका मोकाशी
सदर कथा लेखिका अलका मोकाशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.