© सौ. अनला बापट
संध्याकाळची वेळ होती. तो टॅक्सी घेऊन आजूबाजूला अनेक आई. टी. ऑफिसेस असलेल्या चौकात उभा होता. आज शनिवार असल्यामुळे त्याला खात्रीच होती की कोणीतरी प्रवासी नक्की मिळेल.
शनिवार असल्यामुळे बऱ्याच लोकांना घरी जायची घाई असते तर ते लोक कंपनीची गाडी सोडून टॅक्सी पकडून लवकर घरी जाण्याकरता ह्याच चौकात येतात, हे त्याला माहीत होते.
तो पण एखादा लांबचा प्रवासी घेऊन जास्त पैसे कमवून आधी घरी आणि मग मजा करायला जाणार होता.
मूळचा बिहारचा तो पैसे कमवायला वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षीच मुंबईत आला.
सुरुवातीला त्याने छोटी-मोठी मिळतील ती कामे केली, पण मग तो इथे टॅक्सी चालवायला शिकला.
दरम्यान त्याने मराठीपण शिकून घेतले. तो मराठीची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मोबाईलवर काही मराठी फेसबुक पेज “माझी लेखणी”, “शब्द चाफा” “अक्षरधन” अशा काही पेजवर नियमित कथा वाचायचा कारण त्यात असलेले संवाद वाचून त्याला ग्राहकांबरोबर संवाद साधणे सोपे व्हायचे.
आत्ता तो एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून, बलबिंदर नावाच्या सरदाराकडे पगारावर कामाला होता.
दोन वर्षापूर्वी जेव्हा तो गावाला गेला तेव्हा त्याचे लग्न पण झाले होते. पण इथे कमी आर्थिक उपार्जनामुळे त्याला आपल्या बायकोला काही आणता येईना, पण अवघा पंचवीस वर्षांचा तो, स्वत:च्या शारीरिक मागण्यांवर खूप संयम ठेवायचा प्रयत्न करायचा. पण एकदा त्याच्यासोबत राहणाऱ्या मनोजने त्याला एक नवीन मार्ग दाखवला.
त्याचा रूममेट मनोज, आपली शारीरिक भूक भागवायला महिन्यात एखाद किंवा दोन वेळा एका विशिष्ट जागी जात असे. एखाद वर्षापूर्वी मनोज ह्यालापण तिथे घेऊन गेला.
मग तर काय, वेळी अवेळी लागणारी शारीरिक भूक त्याला त्या विशिष्ट जागी म्हणजे वैश्यागृहात जायला बाध्य करत होती.
हो, पण तो जरी त्या बाजारू स्त्रीच्या बाहुपाशात असला तरी विचारात मात्र तो आपल्या बायको बरोबरच सहवास करत असायचा. आणि तिथून बाहेर पडताना जणू बायकोला भेटून परत आलो आहे अशी खुमारी त्याच्या डोक्यात असायची.
पण तिथे जाणे म्हणजे काही नुसतेच पोट भरत नव्हते, भरमसाठ पैसे बदडावे लागत होते आणि म्हणूनच तो ह्या चौकात येऊन उभा होता.
इथून जाणारे प्रवासी भरपूर पगार कमवणारी माणसे असायची.
काहींची लफडी असायची तसे प्रवासी आले तर ते वरचे उरलेले पैसे घ्यायला पण थांबायचे नाहीत आणि पन्नास साठ रुपये तसेच जास्त मिळून जायचे.
कधी कुठले रोमँटिक जोडपे आले तर त्याला टॅक्सीतच प्रेमाचे जिवंत प्रसारण पहायला मिळायचे. अशा वेळी त्याला त्याच्या स्वतःच्या बायकोची खूप आठवण यायची, मग तो घरी जायचे नियोजन करू लागायचा, त्याच्या करता साठवलेला पैसा बघून पुन्हा बिहार ऐवजी त्या विशिष्ट जागीच जाणे परवडेल हे त्याच्या लक्षात यायचे आणि तो परत कामावर हजर व्हायचा.
पण आज, त्याने काल रात्री पाहिलेल्या थर्ड ग्रेड सिनेमामधली हिरोईन आणि हिरोचा रोमान्स त्याच्या डोळ्यापुढून जात नव्हता. मनोजच्या शब्दात “उनका लव्ह एकदम ढींच्याक है रे” वाले पिक्चर पाहून त्याचे पुरुषत्व फार उसळू लागले होते आणि कधी एकदा तिथे, त्या बाईजवळ जातो असे वाटू लागले होते, आणि नेमका आजच लवकर कोणी प्रवासी मिळेना.
बघता बघता संध्याकाळ होऊ लागली. घड्याळाचा काटा सातला पोचला तरी आज कोणीच येईना, तेवढ्यात तो उभा होता त्याच्या मागच्या बाजूने एक गोड आवाज आला, “भैयाजी दादर चलेंगे?”
त्याने लगेच मागे वळून पाहिले, एक, वीस-बावीस वर्षाची सुंदर तरुणी अगदी छोट्या कपड्यात समोर उभी होती. हलक्याशा मेकअप मधली ती तरुणी बहुतेक जवळपास काम करत असावी.
तो फक्त “हो” म्हणून टॅक्सीत बसला. पण त्याचे डोळे आणि मन दोन्ही त्याला तिच्याकडे वारंवार पाहायला बळी पाडत होते. तो कारच्या मधल्या आरशातून सारखे तिच्याकडे बघत होता.
आपल्याच नादात बेदुंध असलेल्या त्या तरुणीला तिच्या शर्टचे वरचे बटण खुलून गेले आहे हे लक्षातच आले नव्हते. आणि ह्याला मात्र नेमके तेच दिसत होते!
बंप किंवा खड्डा आला तर तिचे वर खाली होणारे आणि शर्टच्या बाहेर येऊ पाहणारे वक्ष त्याला फार आकर्षित करू लागले होते.
बाहेर हळू हळू अंधार होत चालला होता आणि बरोबरच ह्याच्या मनातल्या एका कोपऱ्यात पण काळोखाने कबजा घ्यायला सुरुवात केली होती.
ती अजूनही कानात हेडफोन घालून गाणी ऐकण्यात मग्न होती.
त्याने हळूच मनोजला फोन लावला आणि त्याला हळूच म्हणाला, “तू पुढच्या सरदार चौकात भेट, मी एक माल घेऊन येतोय, वाटून घेऊ.”
मग मागे वळून तिला म्हणाला,”मॅडमजी मेरे दोस्त की गाडी अगले चौराहे पर बंद पड गई है, क्या उसे साथ ले लू? अगर आप को कोई प्रॉब्लेम न हो तो.”
ती सहज म्हणाली,”ज्यादा टाईम मत बिघाडना. मेरेकु लेट हो रहा है.”
“तो मॅडमजी आप आगे आ जाओ, वह पीछे बैठ जायेगा.” त्याने गाडी थांबवत म्हटले.
तिला त्याचा अर्थ काही कळला नाही पण ती उतरली आणि पुढे येऊन बसून गेली.
पुढच्या चौकापर्यंत पोहोचताना हळूच त्याने फोन लावून मनोजला आता जमणार नाही सांगितले आणि आपण त्या विशिष्ट जागी भेटू म्हटले.
इथे ती पुढे येऊन बसली तशी ह्याने गाडीचा वेग थोडा वाढवला. दहा एक मिनिटानंतर त्याने तिच्या मांडीवर हात ठेवला.
ती चमकली.
“क्या कर रहे हो भैया?” असे ओरडुन म्हणाली.
“काही नाही, फक्त तुझ्या मऊ मऊ मांड्यांचा स्पर्श घेतोय” शुद्ध मराठीत त्याने तिला म्हटले.
“बंद कर हे चाळे आणि थांबवं गाडी” ती ओरडून म्हणाली.
“मला वेड लावलंय तुझ्या ह्या गोऱ्या कातड्याने, ह्या बाहेर येऊ पाहणाऱ्या तुझ्या वक्षांनी” म्हणत तो तिच्या छातीजवळ हात घेऊन चालला होता, तेवढ्यात तिने त्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाली,”तू एक नंबरचा नालायक निघालास. मी गेल्या दोनशे वर्षांपासून ह्याच रस्त्यावर, दर शनी अमावस्येला ये जा करते पण आत्तापर्यंत कोणीही इतके निर्लज्ज वागले नाही माझ्या सोबत.”
तिचे बोलणे ऐकून तो खडखडाट हसला आणि म्हणाला,”बेबी, हे सगळे फंडे जुने झाले बरे..मी पण वाचतो ग मराठी साहित्य. त्या अनला बापटची कथा “लिफ्ट” मीपण वाचली आहे राणी. बल्की ती तर इतकी व्हायरल झाली होती की मला अनेक समूहातून वाचायला मिळाली. जवळ जवळ मला ती पाठच झाली आहे आता. खरंच पण त्या बाईची कल्पना म्हणजे..सलाम आहे ! पण मला कथा माहित असल्यामुळे त्यात तिने वापरलेली चाल माझ्याजवळ नाही चालणार बरं.”
त्याने अट्टाहास करत गाडी हळूच एका आडमार्गी न्यायला वळवली.
आता ती लाचार वाटू लागली होती, आणि तो एक पुरुष मिटून, राक्षस बनू लागला होता.
त्याच्या डोळ्यात शिकार मिळाल्याचा आनंद दिसत होता आणि तिच्या डोळ्यात अविश्वासाचा अग्नी पेट घेत होता.
त्याने एकदम आडमर्गी येऊन गाडी थांबवली. गाडी थांबताच ती पटकन उतरली आणि वाट मिळेल तिथे पळू लागली. पण हा शिकार करायला निघालेल्या वाघासारखा, त्या हरणीच्या मागेमागे पळू लागला.
एवढ्यात तिची चप्पल तुटली आणि ती अडखडून पडली, आणि तिचा पाय नेमका तेव्हाच मुरगळला गेला.
आता काय होईल ह्या भीतीने ती, “वाचवा वाचवा कोणी वाचवा” असे जिवाच्या आक्रंताने ओरडू लागली. तो मात्र आणखीन जोरात राक्षसी हसू लागला. पळत पळत तो तिच्या पालथ्या पडलेल्या देहाजवळ पोहचला.
त्याच्या पायाच्या आवाजाने तिने आपल्या शरीराचे गाठोडे करायला सुरु केले.
‘पाठमोऱ्या असलेल्या तिला आता आपण समोरून कालच्या हिरो सारखे…’विचार करत तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला.
आणि अचानक त्याला दरदरून घाम फुटला. तिथे ती नव्हतीच..तिथे त्याला दिसत होती त्याची बहीण…
घरी असलेली त्याची लहान बहीण.
त्याने डोळे चोळले आणि नीट पहिले तर त्याला तीच सुंदरी दिसली..!
परत डोळे चोळून बघतो तर बहीण..!
त्याला काही कळेना..शेवटी रडवेल्या झालेल्या त्याने तिचे पाय पकडले.
“हे काय होतंय सगळं? कधी तू मला माझी बहिण दिसतेस कधी ती..काय चालले आहे हे?” गोंधळून घाम पुसत त्याने तिला विचारले.
“काही नाही तुझ्या कर्माची फळे. मी तर तुला आधीच सांगितले होते की मी गेल्या दोनशे…” ती अजून पूर्ण बोलणार त्या अगोदर तो भितभित म्हणाला,”म्हणजे तू खरोखरच भूत आहेस?”
“मग तुला काय खोटं वाटले? जे लोकं मुलींकडे वाकड्या नजरेने बघतात त्यांच्या करता मी भूतच आहे, नाहीतर मी एक देवी आहे, बहीण आहे. आता तुझ्यावर आहे की तुला मला बहीण करायचे आहे की…!” आता जोरजोरात हसण्याचा आवाज तिचा होता.
ह्याच्यातला राक्षस मरगळून पडला होता आणि ती ह्याला धडा शिकवून, अदृश्य झाली होती.
© सौ. अनला बापट
सदर कथा लेखिका सौ. अनला बापट यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
वटपोर्णिमा
खरी जीवनसाथी
जाणीव