बी माय व्हॅलेंटाईन

© वीणा विजय रणदिवे
नकळत तिच्या डोळ्यात पाणी आले. अत्यंत शिताफीने अश्रूबिंदूंना खाली पडू न देण्याची कसरत तिला करावी लागली.
पाणीभरल्या डोहात, तिने तिच्या बुबूळांना वर्तुळाकार फिरवून त्यांना बाहेर पडण्यास मज्जाव केला. तसा अश्रूंना आदेशपर प्रेमळ दम दिला. त्यांनाही तिच्या मनीचे भाव कळले. तिला तिच्या अश्रूंचे मोल वाया घालवायचे नव्हते.
तिच्याकरिता ते खरे मोती होते, प्रेमाने ओथांबलेले!
आज तरी त्याने आपल्या संतापाला आवर घालायला हवा होता. ऑफिसला त्यालाही जायचे होते आणि तिलाही. फक्त एक तासाचा फरक पडणार होता. आज ती ठरवून, एक तास लेट जाणार होती. त्यानेही तिच्या सोबतच ऑफिसला निघावे, अशी तिची इच्छा होती.

पूर्वीपासून ती अतिशय हळवी, संवेदनशील, प्रेम भावनेला जिवापाड जपणारी, पुस्तकातल्या प्रेमी-प्रेमिकांसारखं तरल, भावूक प्रेमात रममाण होत, स्वप्नरंजनात रमून जाणारी….
दैनंदिन कर्तव्ये करीत असताना देखील भावभावनांना अधिक महत्त्व देणारी, हळूवार प्रेम हृदयात जपणारी, छोटे छोटे आनंदाचे क्षण भरभरून अनुभवण्यास आतुर असणारी…. इवल्याशा गोष्टीत सुख शोधणारी, भारी कपडे; सोने; दागदागिने यांची अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे प्रेमळ स्पर्शाला, भावूक-हळव्या संवादाला, एकत्र सहवासाला आतुर असणारी!….
त्याचा स्वभाव मात्र रफटफ. कर्तव्यापुढे त्याच्या लेखी भावना दुय्यम .
‘ऑफिस ही माझी कर्मभूमी, तिच्यामुळे घरात पैसा येतो.’ तेव्हा ऑफिसबाबत कसलीही दिरंगाई त्याला खपत नसे.

लेट मार्क, हाफ डे… हे असले चोचले (त्याच्या लेखी) त्याला पटत नसे. प्रेमळ कटाक्ष, जाणून केलेला हळुवार स्पर्श, संवादातील प्रेम, अवेळी हलकेसे चुंबन…या गोष्टी त्याच्या व्यावहारिक मनाला पटत नसे‌.
कामाच्या वेळी काम/ प्रेमाच्या वेळी प्रेम ही त्याची संवादी भाषा आणि त्याच्या विचारांबाबत तो ठाम होता.
दोन ध्रुवावरचे दोन प्रवासी. “फोन करून जेवलीस का?” “आय लव यू…” असे प्रकार म्हणजे त्याच्या लेखी औपचारिकपणा!
‘प्रेम दाखवावे लागत नाही; ते वागण्यातूनही कळते’…ही त्याची नेहमीची प्रेमाची परिभाषा. ‘मी तुझी काळजी करतो; घरातील सर्व जबाबदाऱ्या उचलतो, हेच तर प्रेम असते’…असा त्याचा हेका!

” जसं दिसतं तसं नसतं, अनू! असा प्रेमाचा शो ऑफ करणारी माणसंच विश्वासघात करतात. मी तर अंत:करणातून प्रेम करतो. तुझ्या माझ्या संसाराची काळजी करतो. यालाच तर प्रेम म्हणतात. ते सिनेमातील रोमॅंटिक प्रेम करणाऱ्याला पैसे मिळतात. इथे प्रत्येक गोष्टीकरता आपल्याला पैसे कमवावे लागतात, पैसे मोजावे लागतात आणि त्याकरिता कष्ट करावे लागतात. तुला आणि आर्यनला, काही कमी पडू नये याकरताच करतो ना, एवढी दगदग! त्यामुळे कामाला प्रायोरिटी पहिले “….असे सर्वसाधारण त्याचे मत, तो अनघाला समजावून, पटवून द्यायचा.

अनघा जर त्याच्याशी वाद घालायला लागली की मग त्याच्या रागाचा पारा, थेट वरच्या लेव्हलला जायचा. मूळ स्वभाव शीघ्रकोपी! त्यामुळे त्याच्याशी प्रतिवाद घालताना, शब्दांना तिला आंजारून गोंजारून बोलते करावे लागायचे. तोलून मापून बोलायला लागायचे.

वाक्यातील शब्दांचे पारडे वर खाली झाले, त्याचा तोल गेला की वनवा पेटायचा आणि त्या वनव्यात तिच्या इच्छा आकांक्षा जळून खाक व्हायच्या. अर्थातच वनवा शांत झाला की त्याच्या क्रोधाचा अग्नी शांत झालेला असायचा. मात्र त्यातून निघालेला धूर तिचे विचार काळवंडून टाकायचा. राखेत ते क्षण दबून जायचे.पण विचारांची आंदोलने आतून अशांत करायची. विचारांची घुसमट आतून पोखरायची.
आजही तसेच झाले. नकळत तिच्या तोंडून प्रत्युत्तर निघाले….,” तुझ्यासाठी सारेच दिवस सारखे. मग बर्थडे असो की व्हॅलेंटाईन. फक्त विश केलं की झालं. कंटाळा आलाय. नुसते रेटतोय तू आयुष्य. खरं जीवन जगताच येत नाही तुला….”

झालं, त्याच्या मस्तकाची शीर ताणल्या गेली. ” खड्ड्यात गेलं तुझं व्हॅलेंटाईन! कसले कसले खूळ डोक्यात घालून कल्पनेच्या जगात रमायचं. वास्तवात जगणं शिक….”,असे म्हणून तिच्या डोळ्यात डोकावलेल्या अश्रूंकडे बघून, जाता जाता तो बोलून गेला—” झालं, आता रडून आपलं म्हणणं खरं समजायचं. मी निघालोय. मला उशीर होतोय.” आणि तो ऑफिसला निघून गेला सुद्धा.
फार नव्हे, माफक अपेक्षा होती तिची. त्यानेही थोडे उशिरा निघून, आपल्याबरोबर वेळ घालवावा. दोघांनी एकत्रच ऑफिसला जावं. दिवसाची सुरुवात छानशा ब्रेकफास्टने करावी.
तिच्या छानशा आवरण्याला नजरेने त्याने कवेत घ्यावे. ती तयार झाल्यावर रोमँटिक मूडने, हळूच कॉम्प्लिमेंट द्यावी. जाता जाता छानसा गजरा घेऊन तिच्या केसात माळावा. त्या सुगंधात तिने धुंद व्हावे आणि या धुंदीत तिचा त्याचा रोजचाच दिवस! खास व्हॅलेंटाईन दिवस व्हावा.

मात्र तिच्या मुक्या भावना ओठांवर आल्याच नाहीत. शब्द अश्रूंच्या धारेत वाहून गेले.
तिने स्वतःचीच समजूत घातली. सावरलं स्वतःला. टिफिन घ्यायचीही इच्छा उरली नाही. चेहरा पाण्याने धुतला. केस नीट केले. साडीच्या निऱ्या व्यवस्थित केल्या. एकदा आरशात निरखत, चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणण्याचा निरर्थक प्रयत्न तिने केला.
आपल्या वेदना व्यथा लपविण्याचे कसब तिने आत्मसात केले होते.
हसरा मुखवटा चढवून, घराच्या उंबऱ्याशीच सारे वाद,प्रतिवाद सोडून तिने ऑफिस करिता काढता पाय घेतला.

मनात मात्र विचारचक्र सुरू होते. तिचा स्वतःशीच संवाद चालला होता…..” तुला माहित आहे ना अनघा! तो शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्याच्याशी बोलतांना जपून बोलावे लागते. त्याचं वर्कोहोलिक असणं आणि कामाप्रती निष्ठा, वेळेबाबत शिस्त.. ह्या काही आताच्या गोष्टी नाहीत. उगाच आपण बोललो त्याला. बाकी या गोष्टी सोडून तो काळजी करतो ना आपली. आपली कामेही वाटून घेतो. मुलाचे लाड करतो. घरात काय हवं नको हे त्याला सांगावेही लागत नाही. प्रत्येक व्यक्ती परफेक्टच असेल असं नाही ना. संतापाच्या भरात बोलून जातो तो… नंतर सारं काही विसरतो. आपणच या गोष्टी मनाला लावून त्रास करून घेतो. जाऊ दे.. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच घडली पाहिजे असं नाही. एक दिवस! असाही समजा….”

तिने स्वतःला समजावले आणि ऑफिसच्या कामात स्वतःला झोकून दिले.
संध्याकाळी परतताना चाफ्याच्या फुलांचे दोन वाटे, तिने जास्तीचे पैसे देऊन नेहमीच्या तिच्या फुलवालीकडून घेतले.
“पुढच्या वेळेस फ्री मध्ये एक वाटा देईल हा ताई…” फुलवाली पुडी बांधत तिला म्हणाली.
तिने गोड स्माईल देत, ” असू दे ग, व्हॅलेंटाईन डे निमित्त ठेव तुझ्याकडे..माझ्याकडून तुला चाफा भेट समज.” म्हणत पुडी हातात घेतली आणि घराकडे निघाली.
वाटेत पाळणाघरातून आर्यनला घेतले. तिचा मूड आता साफ बदलला होता. विचारांची दिशा तिने बदलवली होती.

अत्यंत निगुतीने आवडीच्या पदार्थांचा बेत तिने जेवणात बनवला.
मसालेभात-कढी! झटपट आणि तिच्या हातची स्पेशालिटी.
अनिश घरी आल्यावर, काही न बोलता फ्रेश झाला. चाफ्याची फुले बघून त्याने, परिस्थितीचा अंदाज घेतला. त्याचाही राग मावळला होता. येताना त्याने दादरला उतरून, तिच्याकरता छानसा बांगड्यांचा सेट, गुलाबाची फुले आणि…तिला आणि मुलाला खास आवडतात म्हणून, आवर्जून पणशीकरचे पेढे घेतले होते.

जेवणाची ताटे घेतल्याबरोबर, त्याने गुलाबाची फुले आणि सेट तिच्यासमोर धरला. तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
” एवढाही वाईट नाहीस तू…. पण मला सॉरी म्हण हा…”, असे म्हटल्याबरोबर… ” मी का म्हणू सॉरी….तू म्हण…तू वादाला सुरुवात केलीस…..”
झालं, परत तू तू मै मै होणार! इतक्यात, त्याने, ” आता सॉरी असू दे, मला खूप भूक लागली आहे. जेवूया का आपण?..”, असे म्हणत गोष्ट बदलली.
तिनेही जास्त न ताणता, आनंदाने वाढावयास घेतले. वातावरणातील ताण निवळला होता.
खास दिवसाच्या खास प्रेमाची सुरुवात(!), आता दिवस मावळताना होत होती…हेही नसेना थोडके.
© वीणा विजय रणदिवे
सदर कथा लेखिका वीणा विजय रणदिवे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
कोंडी
त्यांचं काय चुकलं??
संसारावर आलेले सावट

Leave a Comment

error: Content is protected !!