©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे
श्री ICU मध्ये निपचित पडला होता. व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल असे डॉक्टर म्हणाले.
आम्ही सगळे ICU बाहेर उभे होतो.
डॉक्टर , सिस्टर सारखे आतबाहेर करत होते. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकत होता.
दोन्ही मुलं आईला घट्ट बिलगून होती.
सासरे सासूबाईंना धीर देत होते. आईच ती, आपल्या लेकाला अश्या अस्वस्थेत पाहून अस्वस्थ झाली होती.
सलोनी, आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हॉस्पिटलच्या दारातून आत आल्यावर सुरेख आरास करून मांडलेल्या गणपती बाप्पा कडे हात जोडून प्रार्थना करत होती.
बाप्पा समोर मंद समई तेवत होती. अगरबत्ती आणि धुपाच्या सुगंधाने संपूर्ण परिसर मंगलमय झाले होते.
इतक्या मंगल वातावरणात श्रीच्या बाबतीत अमंगल होऊच शकत नाही. त्याला तुला बरे करावेच लागेल.
बाप्पाकडे पाहून तिचे प्रश्न उत्तर चालले होते.
“आई, बाबांना काही होणार नाही. बाबा बरे होतील. बाप्पा आहे ना तो त्यांना बरे करणार.
छोटा आयुष बोलला, “बाप्पा त्यांना बुद्धी पण देणार. तु काळजी करू नको.”
तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. श्रीचे नातेवाईक जरा एकडे या.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजीची लकेर होती.
सगळे उठून डॉक्टर भोवती गोळा झाले.
“अहो काय काम करतात मिस्टर श्री? कामाचा जास्त ताण आहे का?”
श्री च्या आई म्हणाल्या, “भौतिक सुखाच्या मागे धावत कामाचे लोड उरावर घेऊन बसतो.”
“म्हणजे?”
“म्हणजे असे डॉक्टर, वाजवी पेक्षा जास्त काम करतो.
वेळेचे, खाण्याचे आणि घरी येण्याची वेळ सगळेच विसरला भौतिक सुखासाठी.
त्याची ही दोन लहान मुल ते सुध्दा सांगतात समजावून. पण ऐकेल तो श्री कसला.?”
“तरीच शारीरिक थकवा खूप आला आहे. नशीब लवकर आलात.
हे बघा, आता ते out of danger आहे.
पण आता कामाचे ओव्हरलोड कमी करावे लागेल. नाहीतर!!!!!”
“नाहीतर काय डॉक्टर?”
“मीच काय ? कोणताच डॉक्टर वाचवू शकणार नाही.
तुमच्या पैकी एक जण त्यांच्या जवळ थांबू शकता. बाकीच्यांनी त्यांना दुरून पाहा आणि घरी जा.”
सगळ्यांनी त्यांना काचेच्या झरोक्यातून पाहिले.
“आई तुम्ही थांबा इथे. मी बाबांना आणि मुलांना घेऊन घरी जाते.”
“सलोनी मी जन्म दिला. पण जन्मभर तुलाच त्याची साथ द्यायची आहे. तुझ्या मनातली घालमेल मी समजू शकते.
आम्ही घरी जातो. तू थांब श्री जवळ आणि हो घरची काळजी करू नको आम्ही सगळे करू हॅण्डल.
तू फक्त तुझी आणि श्री ची काळजी घे.”
सासूबाई असे बोलतात सलोनी ला खूप बरे वाटले. श्री ला सोडून घरी जायची तिची अजिबात इच्छा नव्हती.
ती ICU मध्ये गेली. स्टूल घेऊन त्याच्या उशाशी बसली. डोळ्यात अश्रू होतेच. पण आता out of danger असल्यामुळे थोडे हायसे वाटत होते.
एक सिस्टर थोडी लांब उभी राहून तिचे काम करत होती.
सलोनी ने आपला हात श्रीच्या डोक्यावर ठेवला .
“श्री अरे किती काम करत होता? किती वेळा समजून सांगत होतो सगळेच, थोड कामाचं लोड कमी कर . पण तुला खूप पैसे कमवायचे होते. मुलांना महागडे फोन घेऊन देणे, ब्रँडेड कपडे , घड्याळ, शूज . काय काय डोक्यात असायचे.
मागच्या वर्षी अंकितची ट्रीप गेली दुबईला. तो म्हणाला बाबा इतके पैसे भरून मला नाही जायचे.
मी मला जॉब लागल्यावर जाईन. तुम्ही मला ट्रीपला पाठवण्यासाठी जीवाची ओढाताण करू नका.
तरीही तू ऐकले नाही. ओव्हर टाईम केला. दिवस रात्र काम केल्यावर काय होईल ?
इतके ओव्हरलोड खरच गरजेचे आहे का?
आज जर तुला काही झाले असते तर….. आमचे काय?
बाबा रिटायर्ड. कंपनीत होते थोडेफार पैसे मिळाले. सगळेच आपल्याला देऊन टाकले.
का ? कधी विचार केला. तुला मोठे घर हवे होते.
त्यांना आपल्याला सोडून राहायचे नव्हते.
मला म्हणाले होते, सलोनी हे सगळे पैसे घे. त्याला म्हणावं घे मोठं घर.
पण इतकं मोठ घर घेण्यासाठी दिवसरात्र कष्ट करू नको. जेणेकरून त्या घरात त्याला रात्री निवांत झोपायला यायला वेळच मिळू नये.
मुलं अजून लहान आहेत, शिकत आहे. माझा असा कितीसा पगार आहे.
घर, मुलं आणि तुझे आईबाबा यांना सांभाळून मी पार्ट टाईम नोकरी करते.
तुझ्या अती पैसे कमवण्याच्या, अती सुखसोईने जगण्याच्या हव्यासापायी तुझ्या शरीरावर त्या ओव्हरलोड कामाचा काय परिणाम होईल याचा कधी विचार केलाच नाही.
अरे आज जी पोटभर भाकरी खातो ना, तुझे काही बरेवाईट झाले तर दोन वेळचे पोटभर जेवण सुध्दा मी देऊ शकणार नाही.
आहे त्यात सुख मानायला शिक.
आम्हाला तू हवा आहेस. ओव्हरलोड काम करून आम्हाला जास्तीत जास्त सुख सुविधा देणारा पैसा नकोय.
आता तूच ठरव फॅमिली की पैसा?”
“सॉरी सलोनी. खरच मी वेड्यासारखा भौतिक सुखाच्या मागे धावत होते. आज कळले खरे सुख काय असते.
या भौतिक सुखाच्या हव्यासापायी मी तुला, , मुलांना तसेच आई बाबांना वेळच देऊ शकत नव्हतो.
इतके कष्ट करतो , तेही तुमच्यासाठी तरीही तुम्हाला माझी किंमत नाही म्हणून चिडचिड करत होतो.
भौतिक सुखाच्या हव्यासापायी खऱ्या सुखाला मुकत होतो.
बरं झालं थोडक्यात निभावलं . देवाने माझे डोळे उघडण्यासाठी माझ्यावर हे अरिष्ट आणले.
त्यालाही सांगायचे असेल. अरे श्री थांब थोडा. गरजा खूप कमी आहेत रे! तुझा हव्यास जास्त आहे!
तेव्हा भोग ओव्हरलोडचे दुष्परिणाम !
पण आता नाही. आहे त्यात समाधानाने आणि आनंदाने राहू.
माझ्यासाठी सर्वात महत्वाचे कुटुंब! कुटुंबाला वेळ देणार…
श्री ने सलोनीचा हात हातात घेतला, “सलोनी सॉरी , तुझे बोलणे मला पटत नव्हते.
मला वाटायचे तूच मुलांना भडकवते. त्यामुळे ती अशी मिडल क्लास वाली भाषा बोलतात. माझी मुलं सुध्दा त्यांच्या आई सारखी समजूतदार आहे आज कळले. कधी कधी सुखाची किंमत कळायला दुःखाच्या झळा सोसल्याच पाहिजे नाही का?”
“बरं झालं. या एका घटनेने तुमचे डोळे उघडले. हो ना ? खूप मोठा अनर्थ टळला.”
” माझे काही बरे वाईट झाले असते तर…..!”
सलोनी ने श्रीच्या तोंडावर आपला हात ठेवला.
“आता काहीही अभद्र बोलू नको. Please……!
श्री सलोनीचा हात हातात घेऊन, हाताचे दीर्घ चुंबन घेत ‘सॉरी सॉरी’ म्हणत राहिला.
©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे
सदर कथा लेखिका सौ. प्रभा कृष्णा निपाणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. कुठेही या कथेचे अभिवाचन करू नये.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
वास्तू
या वळणांवर
गजरा