प्राक्तन भाग 5

भाग 4 इथे वाचा
©® वर्षा लोखंडे थोरात.
मुलगा झाल्यावर केशव ने खूप काळजी घेतली माझी. त्या वेळेस त्याची कितीही घृणा येत असली तरी मलाही मदतीची गरज होतीच. बाळ आणि मी दोघेही अशक्त होतो त्यामुळे महिनाभर दवाखान्यात होतो.
घरी आल्यावर आठ दहा दिवसांनी केशव अगदी गोडीत म्हणाला मंजू बाळाची खूप काळजी वाटते. या अशा वातावरणात आपलं बाळ कसं काय वाढवणार आपण? तू इतक्या श्रीमंत घरची तू का असं गरिबीत जगायचं. असं करायचं का तुझ्या बाबांना पत्र पाठवायचे का? ते जरूर आपल्याला मदत करतील.
अच्छा असा डाव होता काय? म्हणून माझ्याशी चांगलं वागत होता हा. मला त्याचं खरं रूप माहिती आहे हे कळू न देता मी स्पष्ट नकार दिला. मला माझ्या कुटुंबाला अजून दुःख द्यायचे नव्हते. माझा नकार ऐकून केशव ने माझा खूप छळ केला.

सिगारेट चे चटके सुध्दा दिले. पण मी ठाम राहिले. मला माझ्या आई वडिलांच्या आयुष्यात अजून अडचणी निर्माण करायच्या नव्हत्या. आणि केशव बरोबर पण खूप काळ रहायचं नाही असा पण विचार होता. बाळ थोडं मोठं झालं की काहीतरी काम शोधून या घरातून बाहेर पडायचं हे पक्कं केलं होतं. असेच दोन तीन महिने गेले.अनन्वित छळत होता तो मला. मी मात्र ठाम होते.
सर्ड्याप्रमाणे रंग बदलणारा केशव परत एकदा चांगला वागू लागला.
या वेळेस ना कुठली मागणी ना मारझोड. घरात खाण्या पिण्याची आबाळ होतीच. आता तो कोणाला घरी आणत नव्हता. दारू,सिगारेट सगळं बंद केलं होतं. छोटी मोठी कामे पण करत होता. तरीही मी सावध होतेच. याला भुलयाचे नाही हे जाणून होते. बघता बघता बाळ सहा महिन्याचे झाले.

केशव म्हणाला अंजू बाळ जसजसे मोठे होईल तसा खर्च वाढेल. आणि मुंबईत राहणं काही सोपे नाही. माझं चुकलं. तुझ्या घरी जाण्याचा निर्णय योग्य नव्हता. आता आपण आपलं विश्व बनवू. खूप कष्ट करून.बरे दिवस आले की स्वाभिमानाने तुझ्या घरी जावू. केशव वर माझा थोडाही विश्वास नव्हता पण आता तो जे म्हणतोय त्याचा तात्पुरता स्वीकार करावा असा माझ्या मनाने कौल दिला. आणि केशव ने ठरवल्या प्रमाणे चार महिन्यापूर्वी आम्ही या शहरात आलो जे आपल्या गावापासून जवळच आहे.
हे सगळं ऐकून सगळे सुन्न झाले. काय बोलावे काहीच कळेना. “अगं पण मग आता केशव कुठे आहे?” आईने विचारले.
परत तशीच वस्ती आणि तीच परिस्थिती. थोडं मोकळं वाटत होतं कारण आता मी माझ्या भागात होते. एक दिलासा होता मी थोड्या फार अंतरावर का होईना माझे जिवलग आहेत आजूबाजूला. मागील तीन वर्षे मला खूप काही शिकवून गेली. आयुष्य नेमकी काय आहे ते कळलं.आपण आपल्या मायेच्या लोकांच्या कुशीत निर्धास्त असतो.आपल्याला कायम जगातील वाईट गोष्टींपासून वाचवण्यासाठी एक संरक्षक कवच असते. पण आपणच करंटे. आपल्याला ते कवच भेदून जग बघण्याची घाई असते.

तीच घाई आज मला या जगात घेवून आली.जिथे आजूबाजूला फक्त गरिबी,नैराश्य,व्यसन,आणि गुन्हेगारी आहे. माझ्या बाळाला वाचवू शकेल का मी या सगळ्यापासून? मी देवू शकेल  का त्याला संरक्षणाची कवच कुंडले?
दिवस जात राहिले.चाळीच्या कोपऱ्यातील त्या छोट्याश्या खोलीत माझं जग. केशव पण विशेष बाहेर जात नसे. घराच्या बाहेर पडून काम केल्याशिवाय मी केशव ला सोडू शकत नव्हते आणि मी काय काम करू शकते याचा मला स्वतः लाही अंदाज येत नव्हता.या शहरात बाहेर पडले तर मला ओळखणारे कोणी तरी भेटणारच. केशव आपण गावी जावून तुझ्या आजी बाबांबरोबर राहू. तिथेच तू छोटा मोठा व्यवसाय कर असं मी सुचवलं. पण केशव काही तयार झाला नाही.
“तुम्ही गाव सोडून गेल्यावर वर्षभरातच सहा महिन्यांच्या अंतराने केशव चे आजी आजोबा हे जग सोडून गेले.”आई म्हणाली.
मंजू ताईच्या डोळ्यात वेदना होती.

दोनेक महिने पुरतील एवढे पैसे होते ते हळूहळू संपत आले.केशव काही काम करायला जात नव्हता.भांडत नव्हता आणि नीट वागतही नव्हता.एके सकाळी म्हणाला मंजू मला एक  मस्त काम मिळालं आहे. आता काही आपल्याला चिंता नाही. मी तिथे जावून बघून येतो आणि मग तुला आणि बाळाला घेवून जातो. तू विश्वास ठेव माझ्यावर. आता काय आणि कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? ठीक आहे म्हणून मी त्याला निरोप दिला.
दिवसामागून दिवस गेले. केशव काही आला नाही. कुठे गेला आहे , कधी येणार काहीच माहिती नाही .निरोप नाही पत्र नाही.आता सहा महिने होत आले आहेत .
हे सगळं अनपेक्षित नव्हतं पण धक्कादायक खचितच होतं. कसे दिवस काढले मग मंजू तू? गाठीशी पैसा नाही आणि हा छोटासा जीव. सगळ्यांच्या डोळ्यात प्रश्न. मंजू ताईने उसासा सोडला.

माझ्या वाट्याला आलेले भोग ते पण मीच माझ्या ताटात वाढून घेतलेले. महिनाभर पुरेल म्हणजे कसं बसं भागेल इतकं होतं घरात म्हणजे धान्य वगैरे. दूध तर मी किती महिने बघितलं पण नव्हतं. कसा तरी दीड एक महिना काढला. मग पुढे काय? बाहेर कुठे काम मागायला जावं तर अंगावर पिणारे लेकरू आणि माझी अशक्त तब्येत. कधी तरी द्यायचं कोणी काम .त्याबदल्यात कधी खायला नाहीतर थोडे फार पैसे. हे सांगताना मंजू ताई खिन्न हसली.
दूध तुपात वाढलेली मंजू आणि लोकांच्या घरची कामं करणारी मंजू ते सुध्दा फक्त पोटासाठी. काय म्हणावं नियतीला? दोष कोणाला द्यायचा? मंजू,केशव,अल्लड वय की सूडबुद्धीने केवळ एका पदासाठी केलेल्या राजकारणाचा?
नंतर नंतर तर दोन दोन दिवस काही खायला मिळत नसे. उमा काकू तुम्हाला सांगू एकदा अशीच भुकेने कावरीबावरी झाले. खूप रडू येत होतं. पण रडायचं सुध्दा त्राण नव्हतं. त्या वेळी आई बाबांची खूप आठवण आली. विचार केला त्यांच्याकडे जावं.ते नक्कीच मला माफ करतील .स्वीकारतील.

त्या तंद्रीत मी एसटी स्टँड वर गेले. आपल्या गावी जायला एसटी लागते तिथे गेले. काही ओळखीचे चेहरे दिसले अन् माझ्या काळजात धस्स झालं. मी घरातून पळून गेल्यावर काय त्रास झाला असेल सगळ्यांना हे जाणवलं.आणि आज जर मी या गाडीत अशा अवस्थेत बसले आणि मला या सगळ्यांनी ओळखलं तर काय वाटेल त्यांना? या अवस्थेत मला बघून आजी तग धरू शकेल का? आणि मी मागे फिरून एका बाकड्यावर जावून बसले.
मांडीवर बाळ पोटात अन्न नाही मला तशीच गुंगी आली. बाळ रडत होतं जोरजोरात. थोडी सावध झाल्यावर डोळे उघडले तर… “तर…काय झालं मंजू?” ताई ने विचारले. “रजनी, माझ्यासमोर भिक म्हणून लोकांनी नाणी टाकली होती गं…आणि जेवण सुध्दा. शेवटी टीचभर पोटासाठी माणूस हतबल असतो. मग अधून मधून मी तिथे जावून बसायची. तु काही भीक मागायला येत नाहीस इथे असं स्वतः ला सांगत पण काहीतरी मिळेल याच आशेने.”

हे सगळं ऐकणं ही एक प्रकारची शिक्षाच होती सगळ्यांसाठी. ऐकताना आणि कल्पना करताना इतकं जड जात आहे तर जिने भोगलं आहे तिची काय अवस्था असेल,? बरं तिचाच दोष म्हणावं तर तिने केलेली चूक ही अजाणतेपणे केलेली होती.त्याची एवढी मोठी शिक्षा. स्वर्ग आणि नरक यांच्यातील पुसटशी सीमा रेषा.
“मंजू तुला इथला पत्ता कसा मिळाला बाळ?” बाबांनी विचारलं.
“काका पावसामुळे मी बरेच दिवस घरीच होते. एके दिवशी अचानक मला चाहूल लागली की घरात कोणी तरी आलं आहे. मी मागे वळून बघितलं तर एक शाळकरी मुलगी.अगदी खूप ओळखीचा आणि जवळचा वाटणारा चेहरा.ओळखीची खूण मनात येतच होती की ती मुलगी धावत सुटली. नंतर दोन तीन दिवस मला काही दिसली नाही.एके दिवशी हिम्मत करून मीच शाळेजवळ थांबले. शाळा सुटल्यावर परत तीच मुलगी दिसली आणि मग माझ्या लक्षात आलं अरे ही तर रेवा.. रजनी ची बहिण. मी तिला हाक मारली परत  ती तशीच काही न बोलता निघून गेली. का बरं बोलली नसेल माझ्याबरोबर? मला ओळखलं नसेल का? एवढ्या छोट्या मुलीला पण माझा तिरस्कार वाटत आहे का? असंख्य प्रश्न मनात.

पोटात भुकेचा डोंब,शरीरातून नाहीसे होणारे त्राण…काय करू? कोण मला पोटभर खायला देयीन? नंतर मी रेवाची वाट बघितली पण काही फायदा झाला नाही. अन् देवाने जणू माझी प्रार्थना ऐकली. चाळीत राहणाऱ्या त्या मावशी तुमच्याकडे घरकाम करायला येतात. त्यांनी रक्षा बंधनाच्या दिवशी डब्बा आणि काही कपडे साड्या दिल्या. मालकीण ताईंनी दिल्यात म्हणाली. उमा काकू तुमची साडी ओळखली मी. जेवणाची चव आणि डब्यावर असलेले नाव. सगळ्यांनी पृष्टी दिली की तुम्हीच  आहात. खूप खूप आनंद झाला मला. त्या मावशींना मी काही सांगितले नाही पण त्यांच्या मागे येवून घर मात्र बघून ठेवले होते. त्यांना सांगणार तरी काय होते? माझ्या आयुष्याची राखरांगोळी?
त्या दुपारी घरमालक घरी आले.जवळजवळ तीन महिने खोलीचे भाडे भरले नव्हते.ते पण गरीबच…त्यांनी माझं सगळं सामान बाहेर टाकून मला घराबाहेर काढलं. चार दिवस पोटात अन्नाचा कण नाही..डोक्यावर छप्पर नाही. त्या वेळी मला एकच सुचलं.तुमच्या दारात यायचं.माझ्यासाठी आधार आणि सुरक्षित ठिकाण दुसरं कुठलं असू शकणार होते? आणि मी तशीच तुमच्या घराकडे धावत सुटले.

पुढील दोन दिवस घरात कोणी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. मंजू ताईच्या आयुष्यात काय घडलं या प्रश्नाचे उत्तर तर मिळाले होते. पण  समोर अगणित प्रश्न उभे राहिले होते. मंजु ताईचे भविष्य काय असेल?तिच्या घरच्यांना काय कसे आणि कधी सांगायचे? आणि महत्वाचे म्हणजे केशव कुठे आहे?
दरम्यान मुंबईला जावून दादाने बाळाच्या जन्माचा दाखला काढून आणला.सोहम नाव ठेवले .बाबांनी गुप्तपणे कागदपत्रं जमा करून मंजू ताईचा दहावीच्या परीक्षेसाठी ऑक्टोबर चा फॉर्म भरला. दिवाळीत सगळेच गावाला जाणार त्या आधी मात्र  विनायकंकाकांच्या कानावर हे सगळं पोहोचवणं गरजेचं होतं. मंजू ताईचे आयुष्य असंच पुढे जात राहणार की त्यात अजून काही वळण येणार हे येणारा काळच ठरवेल.
विनायक काका म्हणजे मंजू ताईचे वडील आणि माझे बाबा अगदी पाळण्यात असल्यापासूनच मित्र. पिढ्यानपिढ्या आमचे घरोब्याचे संबंध. त्यामूळे मंजू ताईची जबाबदारी घेताना मनात कुठलाही किंतू नव्हता. तिच्या घरातून निघून जाण्यामुळे ताईचे कुटुंब जितके हवालदिल झाले होते तितकेच आमचेही. तिच्या काळजीने आमच्याही घरातील सगळेच हळहळ करत असत.

कदाचित तेच प्रेम मंजू ताईला आमच्यापर्यंत घेवून आले. तिची झालेली चूक,ओढाताण, त्याची दैवाने तिला दिलेली क्रूर शिक्षा. तिच्या तोंडून सगळं ऐकल्यावर आई बाबांनी तिच्या पाठीशी उभे राहण्याचा ठाम निश्चय केला.
मंजू ताईच्या घरच्यांचा तिच्यावर असलेला राग साहजिकच होता. इतक्या सहजासहजी ते तिला माफ करून स्वीकारतील ही अपेक्षा फोल होती. किंबहुना तशी अपेक्षाही नव्हती. आता जे काही करायचं ते आपणच करायचं ते पण सावधपणे हे बाबांनी ठरवलं. तसं दादा काका आणि गावातल्या चार जाणत्या लोकांना ही सांगितलं.
*********
आज मंजू ताईचा साठावा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसासाठी मी खास सुट्टी घेवून येत आहे. पोलिस अधिकारी असल्यामुळे सुट्या दुर्लभ . पण ताईचा इतका खास दिवस आणि त्या दिवशी आपण हजर रहायचं नाही, हे कसं शक्य आहे? तिला अजूनही मला ताई म्हणायला आवडतं. जरी आता नातं खास असलं तरी.
सात आठ तासाचा प्रवास करून मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले.अगदी निसर्गरम्य ठिकाणी सगळी व्यवस्था होती. कार्यालय आदल्या दिवशीच नातेवाईक आणि सगे सोयाऱ्यानी तुडुंब भरले होते. सोहम आता चाळिशीच्या आसपास होता.

ताई, मी,दादा, प्रेमची मुलं आणि सोहम सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ताईचा वाढदिवस तर होताच पण अजूनही एक महत्वाचा दिवस साजरा करायचा होता. सगळेच खूप आनंदी आणि समाधानी दिसत होते.
झोपताना रजनी ताई म्हणाली, “काय मग रेवा आज पण मंजू बरोबर झोपायचा विचार असणार.”
“अर्थात ताई..तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच ना? मग का विचारते सारखी?” अशा हसत खेळत वातावरणात गप्पा टप्पा करत आम्ही झोपी गेलो.
पहाटे मला जरा लवकरच जाग आली.सगळे दमून झोपले होते. मंजू ताई झोपेत खूप गोड दिसत होती. मला चाळीस वर्षांपूर्वी पुढे काय झालं ते आठवू लागले.
गणपती विसर्जन झाल्यावर रजनीताई हॉस्टेल वर गेली. मंजू ताईची तब्येत बऱ्यापैकी सुधारली होती. बाळ पण छान गुटगुटीत झाले होते. ताईने अभ्यासही चालू केला होता. प्रेम दादा,माझा दादा तिला मदत करत होतेच.

दरम्यान बाबांनी आईकडून अंजू ताईला इंदोर ला फोन केला. तिच्या सांगण्यावरून तिच्या यजमानांना  एक सविस्तर पत्र लिहिले मंजू ताई बद्दल.
त्यांनी पण तत्परतेने त्याचे उत्तर देवून मी तुम्हाला नक्कीच साथ देणार अशी ग्वाही दिली. त्यामुळे बाबांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला. ठरल्याप्रमाणे ताईची परीक्षा झाल्यावर इंदोर वरून अंजू ताईचे यजमान आमच्या घरी आले. अंजू ताईने त्यांच्या सोबत अगदी घरभर कपडे,खेळणी आणि खावू पाठवला होता. बहिणीची माया. इंदोर चे पाहुणे पण मंजू ताईला बघून भावनाविवश झाले.
बाबा,आई आणि पाहुणे यांच्या मधे बरीच चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी दादा गावी जावून मंजू ताईच्या भावला काम आहे असं सांगून घेवून आले. येताना दादाने त्याला सगळी कल्पना दिली. काय प्रतिक्रिया देणार होता तो? पण जवळ जवळ चार वर्षांनी फुलासारखी जपलेली लाडकी बहीण समोर दिसल्यावर त्याला राहवलं नाही आणि दोघे बहीण भावू एकमेकाला बिलगून रडू लागले.

इतक्या वर्षांनी रक्ताच्या नात्याचा स्पर्श झाला ताईला. काय नव्हतं त्या अश्रुंमध्ये? त्या मिठीमध्ये? मागील काही वर्षात तिला कित्येकदा वाटलं असेल की असाच बेवारस आपला अंत होणार कदाचित. कोणाला भणक पण लागणार नाही.आणि आज तिचा दादा तिच्यासमोर होता .त्याच्या पायाकडे बघून ताईला खूप अपराधी वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी आई ,मी,मंजू ताई सोडून सगळे गावाला गेले.काय होणार तिथे देवच जाणे ज्याची भीती होती तेच झालं. सगळं ऐकल्यावर विनायक काकांनी मंजू ताईला स्वीकारायला भेटायला साफ नकार दिला. ती माझ्यासाठी चार वर्षापूर्वीच मेली आहे. त्यामुळे मी तिला माझ्या घरात कदापि पावूल ठेवू देणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले. घरातील कोणीही तिला भेटायला अथवा काही मदत करायला जायचे नाही हे पण जाहीर केले. मंजू ताईबद्द्दल काहीतरी बातमी आल्यामुळे ताईच्या आईच्या डोळ्यात परत चमक आली. आजी उठून बसली. व्यक्त करायला बंदी होती पण मनाला उभारी आली होती. चैतन्य आले होते.

मित्राचं नाही ऐकलं तर जावयाला मध्यस्थ म्हणून बोलावले होते. पण तरीही काका तयार झाले नाही. पुढे काय? अंजू ताईचे यजमान मंजू ताईला इंदोर ला घेवून जातो आम्ही असं बाबांना म्हणाले. पण मंजू ताईने स्पष्ट नकार दिला होता. कुठल्या तोंडाने जाणार होती ती? ज्या घरात लग्न जमले होते ..जे तिने झिडकारले तिथे ती कशी काय जावू शकत होती? आर्थिक मदत स्वीकारण्याचे आश्वासन घेवून अंजू ताईचे यजमान इंदोर ला रवाना झाले.
ताईची परीक्षा चांगली झाली.दिवाळी ला आम्ही सगळे गावी गेलो .रजनी ताई आणि मंजू ताई शहरातच थांबल्या. विनायक काकांना परत सगळ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही बघता बघता आता सहा महिने झाले होते. विनायक काकांनी कितीही सक्त विरोध केला तरी मायेचे पाश तुटतात थोडे? मंजू ताईचे काका,दादा अगदी न राहवून ताईला भेटायला येत राहिले. वहिनी आणि भाचा बघून ताईला आकाश ठेंगणं झालं.अंजू ताई फोन वर संपर्कात होती. खंत फक्त आई, आजीला आणि बाबांना भेटायची होती. तिची तगमग बघून दवाखान्याच्या निमित्ताने ताईची आजी आणि आई भेटायला आल्या.

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आपलं लेकरू आणि त्याचं लेकरू बघून आजी पणजीची माया ओथंबून आली. लेकीचे, नातवाचे मुके घेत डोळ्यातील पाण्याला वाट करून दिली. काय भावना असतील मंजू ताईच्या मनात त्या क्षणी? दैव,प्राक्तन,नशीब…
बऱ्यापैकी परिस्थिती हातात होती. मंजू ताई उत्तम गुणांनी दहावी पास झाली. डी एड ला प्रवेश मिळाला. विनायक काका सोडून सगळेच ताईला भेटायला येत होते. काका विरोध करत नव्हते पण ताईने गावात पाय ठेवायचा नाही या वर ते ठाम होते.
नातवाच्या बाळ लीला ऐकून ते पण हरकून जात होते. शेवटी बापाचं काळीज. हट्ट मात्र सोडत नव्हते. घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवून तोंड लपवून पळून गेली होती मंजू..त्यामुळे परत या गावात येण्याचा तिला काही हक्क नाही असं त्यांचे मत होते.
कॉलेज चालू झाल्यावर जवळच मंजू ताईंच्या काकाने एक घर बघून दिले. आई बाबा अगदी तयार होते ताईला सांभाळायला. पण खूप केलंय तुम्ही आता आम्हाला आमची जबाबदारी पार पाडू द्यात असं त्यांनी हात जोडून सांगितले.

मंजू ताईबरोबर तिची आजी आली राहायला. सोहमचा घरात सगळ्यांना खुप लळा लागला होता. विशेषतः दादाला. ताईने पण सगळ्यांचे मन जिंकले होते. बघता बघता ताईचे शिक्षण पुर्ण झाले. तिला शिक्षिकेची नोकरी पण मिळाली. माझी पण दहावी झाली. केशव ची मात्र काही खबर नव्हती.
अचानक एके दिवशी काहीतरी निरोप आलं आणि बाबा,ताईचे काका आणि दादा तातडीने मुंबई ला गेले. केशव दादा  तिथे तुरुंगात होता. त्याच्यावर अनेक गुन्हे होते.खुनाचा सुध्दा. त्यामुळे तिथून त्याची सुटका होणे अशक्य होते. त्याने मंजू ताईंच्या काकांची माफी मागितली. मी चुकलो हे मान्य केलं. छोटासा स्वार्थ साधण्यासाठी खूप मोठा गुन्हा घडला हातून हे कबूल केलं. प्रायश्चित म्हणून मी तुम्हाला एक वचन देतो की परत काहीही झालं तरी मंजू च्या आयुष्यात लुडबुड करणार नाही. ती माझ्यापासुन मुक्त आहे नव्याने आयुष्य सुरू करायला. हे ऐकून सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

कायदेशीर प्रक्रियेनंतर केशव चे नाव मंजू ताईच्या आयुष्यातून कायमस्वरूपी पुसून टाकले. खूप मोठा आणि अगणित वाकड्या तुकड्या वळणाचा एक अध्याय मंजू ताईच्या जीवनातील संपला.
निसर्ग आपलं काम चोख करतो. भावना ही माणसाला दिलेली खूप मोठी देणगी आहे.अवघी २२ वर्षाची ताई. इतकं काही झालं तिच्या आयुष्यात. आता स्थिरावली. आता खरं वय जोडीदार निवडायचं. कोणीतरी सोबती असावं वाटण्याचं. पण मंजू तशी स्थितप्रज्ञ होती. शांत..तेजोमय…वयाच्या मानाने खूप लवकर प्रगल्भ झालेली आणि त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झळाळी आली होती. तिच्या त्या रुपाची कोणालाही भुरळ पडली तर काय नवल? माझ्या दादा लाही पडली भुरळ. त्याने तिचा प्रवास अगदी जवळून अनुभवलेला. लहानपणाची अल्लड मंजू,तारुण्यात आलेली सुंदरा,केशव ला भुलून घरदार सोडून जाण्याची हिंमत केलेली मंजू, उध्वस्त होवून परत समोर आलेली आणि त्यातूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारी मंजू.

सहचारिणी म्हणून हीच मुलगी आपल्यासाठी अगदी योग्य आहे हे दादाला जाणवले होते.आईच्या आणि मंजू ताईच्या आजीच्या नजरेतून दादाच्या भावना लपल्या नव्हत्या. दादाला कोणाला काही सांगायची गरज पडली नाही. परत घरात एक बैठक झाली आणि पुढील निर्णय घेतला.सु रुवातीला मंजू ताई गोंधळली…पण सोहम बद्दल दादाकडूनच खात्री मिळाली आणि सगळ्या मोठ्यांनी केलेल्या विनंतीला ती नकार देवू शकली नाही. जाणती लोकं जे. करतात ते आपल्या हितासाठीच हा विश्वासही होताच.
जवळचा मुहूर्त बघून दादाचे आणि मंजू ताईचे धूमधडाक्यात लग्नं झाले.
शालू दागिने ल्यालेली ताई साक्षात लक्ष्मी दिसत होती. विनायक काका लग्नाला आले नाही. लग्नानंतर वऱ्हाड गावी गेले. धूमधडाक्यात स्वागत झाले दोघांचे. जिथून रात्रीच्या अंधारात गुपचूप निघून जाण्याची बुध्दी नियतीने तिला दिली तिथेच वाजत गाजत नियती तिला परत घेवून आली.

विनायक आज माझी सून सन्मानाने या गावात आली आहे त्यामुळे तू पण त्याच सन्मानाने तिचे स्वागत करशील अशी मला खात्री आहे. बाबांनी त्यांच्या मित्राला निरोप पाठवला.
सत्यनारायण पूजेला लोकांची वर्दळ चालू झाली आणि विनायक शेठ संपूर्ण कुटुंबासह कार्यक्रमात सहभागी झाले.
लेकीसाठी खूप भेटवस्तू, दागदागिने साड्या घेवून.एकच पीळ राहिलेला तो पण सुटला. मानाने मुलगी परत गावात आली. विनायक काकांनी कृतज्ञेने बाबांना हात जोडले. एका मित्राने खचलेल्या आपल्या मित्राला त्याचा मानसन्मान पुन्हा मिळवून दिला.
सोहम आणि नैना, निलेश अशी जुळी दादाला.
मंजू ताईला मी अजूनही वहिनी म्हणत नाही. केशव दरम्यान तुरुंगातच मृत पावला होता.
सगळं आठवताना सकाळ कधी झाली मला कळलेच नाही.

कार्यक्रमाला सुरुवात झाली .दोन्ही आजींची कमी होती. दोन्हीकडचे नातेवाईक,आई बाबा,ताईचे आई बाबा…सगळी तरुण पिढी.. परिपूर्ण सगळं…
पैठणी साडीत सजलेली माझी वहिनी…रुबाबदार दादा..देखणी भाचरं…भरून आलं मला.
सगळ्यांच्याच एका डोळ्यात आनंदाचे आसू आणि हासू होते. मंजू ताईचा साठवा वाढदिवस आणि तिच्या लग्नाचा वाढदिवस पण. अतिशय भरगच्च असा कार्यक्रम संपन्न झाला.
पहिल्या काटेरी अध्यायानंतर अतिशय कोमल असा अध्याय मंजुंताईच्या आयुष्यातील आणि आता पुढचा अध्याय भारावलेला निवृत्तीचा… आयुष्यातील आलेले इतके मोठे संकट पार करून आजचा दिवस बघणे म्हणजेच मंजु ताईचे प्राक्तन….
समाप्त.
©® वर्षा लोखंडे थोरात.
सदर कथा लेखिका वर्षा लोखंडे थोरात यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
कुवत
ओढ
हनीट्रॅप
नवं माहेर

9 thoughts on “प्राक्तन भाग 5”

  1. खूप छान लिहिले आहे👌 वाचताना प्रसंग समोर उभा राहतो 👍👍

    Reply
  2. हृदयस्पर्शी कथा. अल्लड वयात मुली चूक करतात, त्या पुन्हा सावरल्या तर बरं वाटतं.

    Reply
  3. खूपच सुंदर कथा.. तारुण्यात मुले मुली चुका करतात.. पण मुलींनाच झळ जास्त बसते.. त्यातून सावरण तितकेच महत्त्वाचे असते… खूप छान लिहिलं आहे.. डोळ्यासमोर पूर्ण आयुष्य उभ राहिल मंजू च

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!