©️®️ सायली जोशी.
“उद्या माझा वाढदिवस आहे. मला काय गिफ्ट देशील?” दीप्ती आपल्या नवऱ्याला विचारत होती.
“बोल, काय हवंय तुला?” सारंग गाडी सुरू करत म्हणाला.
“सरप्राईज म्हणून काहीही दे. बघ, दरवेळी असं होतं. मी जे मागेल ते तू मला आणून देतोस. कधीतरी तुझ्या मनाने ठरवत जा ना. खरंतर मला सरप्राईज खूप आवडतात रे. पण कोणीच देत नाही. मला तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण तुला कशातही इंटरेस्ट नाही.” दीप्ती वैतागून म्हणाली. “साधी शॉपिंग करायची असली तरी तुझी चिडचिड होते. कुठे बाहेर फिरायला जरी जायचं म्हंटलं की तुला राग येतो.
आधी तुझे मित्र -मैत्रिणी नेहमी घरी यायचे. पण हल्ली तू त्यांच्यात मिसळायचं देखील कमी केलं आहेस. तू आता माझ्याशी धड बोलतही नाहीस की काही शेअर करत नाहीस. आपलं काम भलं नि आपला मोबाईल बरा!” दीप्ती आपल्या नवऱ्याच्या तक्रारींचा पाढा त्याच्यासमोर वाचून रिकामी झाली.
“अगं, कुठला विषय कुठे नेतेस? काय हवं ते बोल ना.” सारंग.
“मी जे मागेन ते देशील?” दीप्ती आपल्या भुवया उंचावत म्हणाली.
“ट्राय करेन.” सारंग गाडीचा गियर बदलत म्हणाला.
“हम्म. मला तुझा वेळ हवा आहे. तुझं अटेंशन हवं आहे. आपल्या लग्नाला फक्त पाच वर्षे झालीत सारंग. मात्र आपण वीस -पंचवीस वर्षे झालेल्या कपल सारखे वागतो. चक्क एकमेकांकडे दुर्लक्ष करतो आपण.
कधी कधी असं वाटतं, मी एकटीच संसार करते. तू नुसताच शरीराने माझ्यासोबत असतोस. पण तुझं मन मात्र कुठेतरी दूरवर हरवलेलं असतं.”
“दीप्ती, स्टॉप इट यार..सारखं काय तेच तेच? वर्क फ्रॉम होम असल्याने मी दिवसभर तुझ्यासोबत तर असतो. तसंही घरात आपण दोघेच असतो. आई -बाबा सहा महिन्यातून एकदा येतात. म्हणावं तर त्यांचाही त्रास नाही तुला. शिवाय इतर कोणी पाहुणे घरी येत- जात नाहीत. आणखी काय हवंय तुला?”
“दिवसभर आपण एकत्र असून काय उपयोग? तुझं मन कधी थाऱ्यावर नसतं. सतत कसले ना कसले विचार तुझ्या मनात सुरू असतात. काम संपलं की तू मोबाईलमध्ये डोकं घालून बसतोस, ते जेवायलाच उठतोस. ताटात जे वाढेल ते खातोस. आपणहून कधी काही मागत नाहीस की आवडीने एखादा पदार्थ कर असंही म्हणत नाहीस.” दीप्ती.
“झालं पुन्हा सुरू..” सारंगने गाडीचा वेग वाढवला.
“निदान माझ्या हातचा एखादा पदार्थ टेस्ट केल्यावर तो बरा झाला की नाही, हे तरी सांगत जा. मी कधी साडी नेसले तर ‘छान दिसतेस ‘असं म्हणत जा. मला हे खूप आवडतं रे. बोलून कॉप्लिमेंट दिली नाहीस तरी चालेल. मात्र चेहऱ्यावर, निदान डोळ्यातून तरी कौतुक दिसू दे. कधी माझ्या आवडीचे टी -शर्टस् घालत जा. सारखं काय ते फॉर्मल कपडे? या कपड्यात तू अगदी वयस्क माणूस दिसतोस.
बरं ,मी शंभर शब्द बोलल्यानंतर तू एखादा शब्द बोलतोस आणि मी बोललेलं ऐकतोस की नाही हे देवच जाणे.”
“बस् कर बाई. माझ्या डोक्यात शंभर विचार असतात. त्यात आणखी तुझी भर नको. तुला काय करायचं ते तू कर. पण दरवेळी माझ्या मागे नको लागू.” सारंग.
“तुम्हा पुरुषांना कधीच कळणार नाही, आम्हा बायकांच्या मनात काय आहे ते. मला काहीच बोलायचं नाही तुझ्याशी. मला आईकडे सोड आणि तुझं तू घरी जा. काय करायचं ते कर.” दीप्ती आपलं सामान पर्समध्ये भरत म्हणाली.
काही वेळातच सारंगने आपली गाडी दीप्तीच्या माहेरच्या घरासमोर आणून उभी केली.
“बघ, खरंच उतरू ना इथे? नंतर मला पन्नास वेळा अजिबात फोन करायचे नाहीत. जेवणाची सोय तुझी तू बघायची. साखर कोणत्या डब्यात आहे? डाळ, तांदूळ कोणत्या डब्यात आहेत, हे सुद्धा विचारायचे नाही. ओट्यावर पसारा मांडून ठेवायचा नाही. बेडरूम साफ करायची आणि हॉलमध्ये जरा सुद्धा पसारा नकोय मला.”
“उतर आता. लेक्चर बस् झालं.” सारंग हात जोडत म्हणाला.
“अगं, आत्ता कसे काय आलात?” आई खिडकीतून दोघांना पाहत म्हणाली.
“मी राहायला आले.” आईला पाहताच दीप्ती खाली उतरली.
“अगं, अचानक कशी राहायला आलीस? आधी सांगायचं ना. आम्ही दोघे तुझ्या मावशीकडे चाललो आहोत. काका परगावी गेलेत म्हणून चार दिवस तिथे राहणार आहोत.
मावशी म्हणाली, छान गप्पा होतील, दोघेही या म्हणून.” आई भराभरा म्हणाली.
“मग तिलाच बोलवायचं इथे. तुम्ही कशाला चाललात? उद्या माझा वाढदिवस आहे ना!” दीप्ती आत येत म्हणाली.
“आता लहान आहेस का वाढदिवस साजरा करायला? आणि नवरा आहे ना सोबत? त्याला घेऊन साजरा कर तुझा वाढदिवस.” आई तिला चिडवत म्हणाली.
“तो असून काय उपयोग? त्याला कशात काडीचाही इंटरेस्ट नाही म्हणून तर..” दीप्तीने कॉफीसाठी दूध गरम करायला ठेवले.
“अहो, वरच्या मजल्यावरची दारं नीट बंद केली ना? खिडक्या लावल्या का बघा. नळ बंद आहेत का? आणि जिन्यामधला दिवा सुरू ठेवा. नंतर उगीच ताप नको.” आई बाबांना ओरडून सांगत म्हणाली. “यांना काही करायला नको. सकाळपासून माझी नुसती धावपळ सुरू आहे. तासाभरापूर्वी मावशीचा फोन आला आणि मग हे आवरायला पळाले. तोपर्यंत सगळं थंडच होतं. रोज वेळच्या वेळी आवरून बसावं तर ते नाही.”
“आई, घरोघरी मातीच्या चुली! आपण कुणाला ओरडून काही फायदा नाही. ज्याला जसं वागायचं तसंच तो वागणार.” दीप्ती सारंगला ऐकू जाईल इतक्या आवाजात म्हणाली.
“सगळं नीट चेक करून आलो. कधी निघायचं ते सांगा आणि सारंगराव, या बायकांचं बोलणं कधी मनावर घ्यायच नाही. घेतल्यासारखं करायचं आणि सोडून द्यायचं.” बाबा हसत म्हणाले.
“बाबा, काहीपण शिकवू नका त्याला. तोही असाच वागतो हं.” दीप्तीने कॉफीचे मग दोघांसमोर ठेवले.
“म्हणजे तुमचा संसार नीट सुरू झाला म्हणायचा. बायकोच्या तक्रारी सुरू झाल्या की संसार सुखाचा होतो म्हणतात.” बोलता बोलता बाबांच्या चेहऱ्यावर काळजी उमटली.
“बाबा..?” सारंग बाबांच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजी निरखत म्हणाला.
“लेकीची काळजी वाटते. काहीही झालं तरी बापाचं काळीज आहे. पण तुम्ही तिला तक्रारीला जागा देत नसाल. आत्ताची पिढी ही आमच्या पिढीसारखी नाही. या पिढीला खूप काही समजतं.” बाबांनी ‘खूप’ या शब्दावर जोर दिला.
“आमच्यावेळी आमचा संसार बाहेर आणि बायकांचा संसार घरात चालायचा. बायका स्वयंपाकघरात राबायच्या आणि आम्ही नोकरीसाठी बाहेर राबत होतो. पण आता तुमची पिढी घर आणि नोकरी दोन्हीही छान सांभाळते.”
बाबांचं बोलणं ऐकून सारंगला कसंतरीच झालं.
“आम्हाला खूप वाटायचं, संसार फक्त दोघांचा असावा. त्यात कुणाची लुडबुड नसावी. दोघांनीच कुठेतरी फिरायला जावं. कधी खरेदीला जावं. कधी एखादा पिक्चर पाहावा. पण ते काही जमलं नाही. कारण आमच्या सासुबाई फार कडक होत्या. त्यांना असलं काही चालायचं नाही.” आई मधेच म्हणाली. “कधी कधी आम्हाला तुमचा हेवा वाटतो. सगळं कसं काय जमतं या पिढीला!”
“पण जे आम्हाला मिळालं नाही, ते तुम्हाला मिळतं याचा आनंद आहे म्हणूनच आम्हीही काळानुसार बदलण्याचा प्रयत्न करतो आहोत.
बरं, चला. उशीर होतो आहे.” बाबा बॅग गाडीत ठेवायला गेले.
मागोमाग सारंग थोडं सामान घेऊन आला.
“बाबा, सॉरी.”
“का?” बाबा आश्चर्याने म्हणाले.
“तुमच्या लेकीला तक्रारीला वाव दिला म्हणून.”
“एकमेकांविरुद्ध तक्रारी सुरू झाल्या की खरा संसार सुरू होतो असं म्हणतात. मी मगाशी म्हणालो खरा, पण पुरुषांना बायकांच्या कलाने वागावं लागतं.
बायको घरात आली की सगळी जबाबदारी तिच्यावर टाकून आपण मोकळे होतो म्हणूनच पुरुष जोपर्यंत जबाबदारी अंगावर घेत नाहीत तोपर्यंत बायका आपल्याला का ओरडतात हे त्यांना कळतच नाही. आपण चुकत नसतो सारंग. फक्त कुठेतरी कमी पडतो इतकंच.” बाबा हसत हसत म्हणाले.
सारंगला बाबांचं म्हणणं अगदी पटलं. ‘संसार एकट्याचा नसून तो दोघांचा असतो. दोघेही अनुभवातून शिकत असतात आणि अनुभव येण्यासाठी आधी जबाबदारी घ्यावी लागते. आता आपण ही जबाबदारी मनापासून घ्यायची.’ तो मनातल्या मनात म्हणाला.
अचानक त्याचे लक्ष या दोघांच्या मागे उभ्या असलेल्या दीप्तीकडे गेलं. तिच्याकडे पाहून सारंगने आपले कान पकडल्याचा अभिनय केला अन् नवं काही उमगल्याच्या आनंदात दोघेही एकमेकांकडे पाहून समाधानाने हसले.
समाप्त.
©️®️ सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ (नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.