अकेला हुं मै

©️®️अशोक रा. गोवंडे
दमयंती आज तशी लवकरच उठली होती . स्वतःचं सगळं आवरून अगदी तयार होऊन बसली होती . हेमाला तिनं आज लवकरच यायला सांगितलं होतं . हेमा , तिची सोबतीण. दिवसभर तीन फक्त दमयंती सोबत राहायचं. बाजारहाट, बँकेत जाताना तिच्या सोबत राहायचं.
शिवाय ब्रेकफास्ट , स्वयंपाक आणि इतरही कांही कामं असली तर ती करायची, यासाठी तिनं हेमाला ठेवून घेतलं होतं . दमयंतीचे यजमान त्यांच्या चाळिशीतच गेले होते . त्यांनी त्यांच्या माघारी दमयंतीसाठी एक मोठ्ठासा बंगला , शेअर्स, म्युच्युअल फ़ंड इन्व्हेस्टमेंट, फिक्स्ड डिपॉझिट्स वगैरे भरपूर इस्टेट मागे ठेवली होती .
दमयंतीला एक लग्न झालेला मुलगा होता आणि तोही आपल्या बायको समवेत आयर्लंड मध्ये सेटल झाला होता .

सुनेच्या डिलिव्हरीसाठी दोनवेळा त्यानं तिला आयर्लंडला बोलावून घेतलं होत पण ते फक्त एक ‘मेड’ म्हणून. आता त्याला 5 वर्षं झाली होती पण त्यांनतर कधीच त्याचं तिकडं येण्याबद्दल निमंत्रण आलं नाही . अर्थात त्याचं तिला कांही दुःखही वाटत नव्हतं. पतीच्या माघारी तिचं आयुष्य तसं खूप मजेत चाललं होतं .
सकाळी लवकर उठून छानपैकी मॉर्निंग वॉक घ्यायचा , मग मस्तपैकी हेमाने केलेल्या चहाचे घुटके घेत व्हरांड्यात, झोपाळ्यावर , किंवा बंगल्याच्या बागेत ईझीचेअर वर पेपर चाळत बसायचं , मग अंघोळ वगैरे उरकून हेमानं बनवलेला ब्रेकफास्ट .
दमयंतिला पूजाअर्चा वगैरे करायची आवड नव्हती . त्यामुळे ब्रेकफास्ट नंतर ती मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसायची . फेसबुक, व्हॉट्स अप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती खूप ऍक्टिव्ह होती . त्यातून कंटाळा आला की मग टीव्ही . मग परत दुपारचं जेवण मग थोडी वामकुक्षी .

मग दुपारचा चहा झाल्यावर हेमाला बरोबर घेऊन बाजारात किंवा रंकाळ्यावर फेरफटका. मग परत रात्रीचं जेवण , परत टीव्ही आणि झोपण्याआधी परत ते फेसबुक आणि व्हॉट्स अप . पण अलीकडे तिला ह्या स्टिरिओ टाईप रुटीनचा अगदी कंटाळा आला होता . दमयंतीला अगदी जवळच्या अश्या मैत्रिणीही फारश्या नव्हत्या . ज्या एक दोन जवळच्या म्हणाव्या अश्या होत्या त्या त्यांच्या त्यांच्या संसारात इतक्या रममाण झाल्या होत्या की दमयंतीकडे गप्पा मारायला यायला त्यांना वेळच नव्हता .
तिच्या बरोबर बोलण्यासारखी एकच व्यक्ती होती ती म्हणजे हेमा , पण तिची निरर्थक बडबड ऐकण्यात दमयंतीला जरा देखील इंटरेस्ट नव्हता . त्यामुळे दमयंतीला आपलं जीवन एकदम निरस आणि कंटाळवाणं वाटू लागलं होतं .
आपल्या आयुष्यात कशाची तरी कमी आहे याची सतत जाणीव तिला व्हायची . फेसबुक आणि व्हॉट्स अपच आता तिचा विरंगुळा झाला होता . पण आज मात्र व्हॉट्स अप वरचा एक मेसेज वाचून ती जरा अस्वस्थ झाली होती .

कुणीतरी “अकेले हम अकेले तुम”या नावाने एक ग्रुप व्हॉट्स अप वर तयार केला होता आणि त्यात तिला ॲड केलं होतं . एकटे किंवा एकट्या राहणाऱ्या सर्व स्त्री पुरुष किंवा विधुर आणि विधवांसाठी हा ग्रुप तयार केला गेला होता .
ह्या ग्रुपमधील प्रत्येक मेम्बरनं चॅटिंगच्या माध्यमातुन आपापले समवयीन आणि समविचारी मित्र निवडायचे , त्यांच्याशी गप्पा मारायच्या , जमल्यास भेटावं, सिनेमा , नाटकं बघावीत, बाहेर कुठंतरी जेवायला जावं आणि आपला निरस एकटेपणा थोडावेळ का होईना विसरावा हा या ग्रुप स्थापन करणाऱ्यांचा उद्देश होता .
आपल्याला कुणी ह्या ग्रुपमधे ॲड केलं असेल म्हणून दमयंतीनं ग्रुप चेक केला तर तिच्या अशाच एकट्या राहणाऱ्या मैत्रिणीने हा ग्रुप बनवला होता . “कुणी सांगितलं होता हिला हा आगाऊपणा करायला ” असं मनातल्या मनात दमयंती म्हणाली खरं पण तिला सुद्धा कुठंतरी ही कल्पना आवडली होती . एकटेपणा घालवायला असं कांहीतरी असावं असं तिला सारखं वाटायचं .

ग्रुप मधल्या प्रत्येकानं आपापली माहिती संक्षिप्त स्वरूपात उत्तरादाखल देण्याबाबत त्या मेसेजमधे आवाहन करण्यात आलं होतं . खूप विचार केल्यांनतर दमयंतीबाईंनी मेसेजला प्रतिसाद दिला आणि आपली माहिती संक्षिप्त स्वरूपात त्यात लिहिली. फेसबुक वर सुद्धा असा ग्रुप तयार झाला असल्याचं तिला दिसलं आणि लगेच तिनं तो तो जॉईनही केला .
मग त्या ग्रुपवर अश्या “अकेले अकेले” राहणाऱ्या लोकांच्या पोस्ट्स यायला सुरवात झाल्या . त्या वाचताना तिच्या लक्षात आलं की त्यातल्या प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा वेगवेगळ्या आहेत . पण त्या वाचताना तिला मजा येऊ लागली होती हे नक्की .
एक दिवस त्यावर ग्रुपवर ॲडमिनची एक पोस्ट आली .
ग्रुपमधल्या कोल्हापुरात राहणाऱ्या मेंबर्ससाठी एक मेळावा ‘हॉटेल पॅव्हीलिअन’ मधे आयोजित केला होता . त्यासाठी सर्वांना हजर राहण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं .

मेळावा पुढच्या रविवारी होता . दमयंतीनं त्या मेळाव्याला जाण्याचं मनाशी पक्क केलं . कोल्हापूरच्या हॉटेल पॅव्हेलिअनचा दरबार हॉल संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच बऱ्यापैकी भरला होता . आज तिथं एक अनोखे सम्मेलन भरलं होतं . एकटं राहणाऱ्यांचं संमेलन . वयाच्या चाळीस, पन्नाशीतच ज्यांच्यावर एकटं राहायची वेळ येते त्यांच्यासाठी हे संमेलन एका संस्थेनं आयोजित केलं होतं .
या वयात आपल्या जोडीदाराचं अचानक जाणं , मुलं परदेशात असणं , किंवा तिचं किंवा त्याचं लग्नच झालेलं नसणं अश्या अनेक कारणांनी सध्या त्याला किंवा तिला एकटं राहण्याची वेळ आलेली असते.
त्याची किंवा तिची आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असली तरी एका ठराविक काळानंतर हे एकटं राहणं खुप अवघड आणि कंटाळवाणं होतं . अश्या लोकांच्या साठी , त्यांची हीं अवस्था लक्षात घेउन एका संस्थेनं हे संमेलन भरवलं होतं आणि त्याची बऱ्यापैकी जाहिरातही केली होती .

बस्स इथं यायचं, आपलं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन करताना एका फॉर्मवर आपली सगळी माहिती भरायची , नाव , पत्ता , फ़ोन नंबर , मेल आय डी , सध्या एकटं राहण्याचं कारण, लग्न केलं होतं कि नाही? वगैरे वगैरे . हॉलमधे जमलेले बरेचजण हा फॉर्म भरताना दिसत होते .
रजिस्ट्रेशन झाल्यावर प्रत्येकानं आपापली ओळख करून द्यायची होती . त्यानंतर गेट टुगेदर , एकमेकांचा परिचय , गप्पा टप्पा आणि सर्वात शेवटी डिनर असा कार्यक्रम होता .
संमेलनाच्या आयोजकांनी संमेलनाला जमलेल्या सगळ्यांना उद्देशुन आपलं मनोगत आणि सम्मेलनाचा उद्देश सांगितला . इथं जमलेल्या प्रत्येकानं स्वतःचे एकटेपण कांही वेळेपुरते तरी विसरावं , आपल्याला आवडलेल्या व्यक्तीशी परिचय वाढवावा , जमल्यास या परिचयाचं रूपांतर मैत्रीत करावं . आपल्याला आवडलेल्या व्यक्ती बरोबर आपलं पुढचं आयुष्य एकत्र व्यतीत करता येईल का ते पहावं आणि जमल्यास लग्नही करावं हा या संमेलनाचा उद्देश होता.

पन्नाशीतले कांही पुरुष आणि स्त्रिया तिथं जमल्या होत्या . अजुनही काही जण येत होते . एका कोपऱ्यात रजिस्ट्रेशनचं काम सुरु होतं. इतक्यात दमयंतीची BMW कार हॉटेलच्या पोर्चमध्ये पोहोचली आणि दमयंती त्यातून खाली उतरली .
दमयंती दिसायला खुप सुंदर होती . अजुनही बऱ्यापैकी लांबसडक असलेल्या तिच्या दोन्ही वेण्यांमधून डोकावणारा एखादा रुपेरी केस ती पन्नाशीत पोहोचल्याची जाणीव करुन देत होता इतकंच .
आज तिनं साडी ऐवजी ड्रेस घातला होता, पायात हाय हिल्स सँडल्स आणि गळ्यात एक नाजूकसा हिऱ्याचा नेकलेस आणि तो तिला खुप खुलून दिसत होता . असं म्हणतात की स्त्रिया पन्नाशीत आल्या की आपलं वय लपवण्याचा जास्त प्रयत्न करु लागतात आणि त्यासाठी काय काय करतात! पण दमयंतीला तसं कांही करावं लागलं नव्हतं. दमयंती दरबार हॉलमधे शिरली आणि ओळखीचं कुणी दिसतंय का ते बघु लागली .

इतक्यात ग्रुपची ॲडमिन असलेली तीची मैत्रीण त्यांना दिसली. “हाय रागिणी ” असं म्हणत ती तिच्या जवळ गेली .
त्यावेळी रागिणी एका अत्यन्त देखण्या आणि रुबाबदार दिसणाऱ्या एका पुरुषाशी बोलत होती . तिनं दमयंतीला बघितलं आणि म्हणाली “हाय दमयंती , ये , मला वाटलं तु येतीस का नाहीस ? पण आलीस बरं झालं ,तुलाही आवडेल बघ आजचा हा सोहळा आणि आमचा उपक्रम आणि दमयंती, मीट मि. दातार, कॅ. देवदत्त दातार, खास मुंबईहून आलेत या मेळाव्याला , रागिणींनं त्यांची ओळख करून दिली .
“हाय , मी दमयंती दामले , मी इथं कोल्हापुरातच असते” दमयंतीनं हस्तानंदलोनासाठी हात पुढं करत आपली ओळख करून दिली . “ग्लॅड टु मीट यु”, असं म्हणत देवदत्तनं हात मिळवला .
“माझे मिस्टर 10 वर्षांपूर्वी गेले . माझा एकुलता एक मुलगा आयर्लन्ड मधे स्थायिक झाला आहे . तेंव्हापासुन मी इथे एकटीच राहते . पण आता हे एकटेपण मला खायला उठतं हो . मी या संस्थेची जाहिरात व्हॉट्स अप वर वाचली , मला ही कल्पना खूपच आवडली म्हणून इथे आले” दमयंतीनं आपली सगळी माहिती आणि इथं येण्याचं कारण सांगितलं .

“वा ! खुप छान आपली चांगली मैत्री होईल.”
” तुम्ही मिलिटरीत होता का ” दमयंतीन संभाषण चालु ठेवायच्या उद्देशानं विचारलं .
“नो नो आय वॉज इन नेव्ही”. देवदत्तनं खुलासा केला .
“पण मग तुम्ही इथं कसे? डु यु ऑल्सो स्टे अलोन?” दमयंतीनं विचारलं .
“येस मॅम , आय ॲम अलोन अँड ऑल्सो स्टे अलोन ” देवदत्तनं उत्तर दिलं.
“बट यु लुक प्रेट्टी स्मार्ट ॲंड हॅण्डसम , तुम्ही लग्न नाही केलंत का ? का तुमच्या सौ.? दमयंतीन उत्सुकतेनं विचारलं .
” नो नो तसं कांही नाही , मी लग्नच केलं नाही ” देवदत्तनं उत्तर दिलं.
“का ? कारण कळु शकेल ? ” दमयंतीनं विचारायचं धाडस केलं .

“असच , मला त्याची जरूर नाही वाटली , आणि नेव्हीत काम करत असताना बरीच दुनिया पाहुन झाल्यावर मला असं वाटलं की आयुष्यात एकटे राहणारे लोकच खुप सुखात , आनंदात राहतात . सिंगल्स आर ऑल्वेज हॅपी यु नो , दे आर फ्री बर्डस ! .” देवदत्तनं मिस्किलपणे उत्तर दिलं .
“पण पण ?” दमयंतीनं पुढं कांही बोलायच्या आतच देवदत्त म्हणाला, “अहो मॅडम , खलाशांची प्रत्येक बंदरावर बायको असते असं म्हणतात हे तुम्हाला माहित असेलच की आणि नेव्हीतला माणुस म्हणजे एक प्रकारचा खलाशीच की ” देवदत्त एक डोळा मिचकावत म्हणाला .
“नेव्हीत असताना ठीक आहे पण आता रिटायर झाल्यावर , तुम्हाला कुणी साथीदार , जोडीदार असावा असं वाटत नाही ?” दमयंतीनं प्रश्न केला .
“नो नो , नाऊ आय ॲम युज्ड टू इट . हे मायेचे पाश असतातं नं मॅडम हे फार वाईट असतात . हे जवळ असताना जेवढं सुख देतात त्याच्यापेक्षा कैकपटीने जास्त दुःख ते जवळ नसताना देतात , मग हे पाश लाऊन घ्याचेच कशाला?”

देवदत्तचं हे उत्तर ऐकून दमयंती निरुत्तर झाली तरी पण तिनं परत प्रश्न केला ” पण मग तुम्ही या मेळाव्याला कसे काय आलात ? तेही मुंबईहून ?”
“ते माझ्या बहिणीच्या आग्रहामुळे . तिनं लग्न कर लग्न कर असा सारखा घोषा लावलाय . मी तिला खुप सांगायचा प्रयत्न केला की आता माझं लग्नाचं वय राहिलेलं नाही पण ती ऐकायलाच तयार नाही , सारखी माझ्या मागं लागलेली असते लग्न कर म्हणुन .
तिनं ही फेसबुक वरची जाहिरात बघितली आणि जबरदस्तीनं बोलाऊन घेतलंय .अहो कोल्हापुर हे माझं आजोळ , माझी आज्जी पण राहते इथं . खुप वर्षात मी तिला भेटलो नव्हतो. मी विचार केला त्या निमित्तानं आज्जीला भेटायचंही होईल म्हणुन मी कोल्हापुरला यायला तयार झालो .” देवदत्तनं आपल्या मेळाव्याला उपस्थित राहण्या मागचं कारण सांगितलं .
पण आता मी ठरवलंय गोव्यात शिफ्ट व्हायचं. मुंबईत मी नेव्हीच्या क्वार्टर्समधे राहत होतो . मी आता रिटायर झालोय. रिटायरमेंटनंतर बेघर झालो . मग मी गोव्यात एक फ्लॅट घेतलाय , जस्ट अपोझिट मिरामार बीच . आता तिथं मी राहणार एकटा. कुणाला टेन्शन द्यायचं नाही कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही. ”

“पण मग इथं येण्याचा उद्देश ?” दमयंतीनं परत प्रश्न केला .
” जस्ट टु मेक फ्रेंड्स फ्रॉम दी ग्रुप व्हु स्टे अलोन लाईक मी, अँड बिलिव्ह मी दोज व्हु स्टे अलोन कॅन ओन्ली बिकम गुड फ्रेंड्स, यु नो ! . नाऊ आय ॲम लुकिंग फॉर रिअल फ्रेंड्स इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर.” देवदत्तनं दमयंतीला पटवून द्यायचा प्रयत्न केला .
“पण मग तुमचा वेळ कसा जाईल गोव्यात ? तिथं तर तुमच्या ओळखीचं कोणच नसेल नं ? दमयंतीनं प्रश्न केला .
” तुमची इच्छा असेल आणि तुमचं तोंड चांगलं असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही मित्र मिळवू शकता . सो आय विल मेक मेनी फ्रेंड्स इन गोवा, इन्क्लुडिंग गर्लफ्रेंड्स ” डोळे मिचकावत देवदत्त म्हणाला.
देवदत्तचे विचार ऐकुन त्यावर कसं रीॲक्ट व्हावं हेच दमयंतीला कळत नव्हतं .
“नाऊ इट इज 8.30, देवदत्तनं हातातलं घड्याळ बघत दमयंतीला विचारलं “शुड वुई गो फॉर डिनर ?”

“हो नक्कीच , पण एक विचारू ? तुम्हाला कुणी गर्ल फ्रेंड नव्हती का ? अर्थात तुमच्या त्या निरनिराळ्या बंदरांवरच्या गर्लफ्रेंड्स सोडून हं ” दमयंतीन गमतीनं विचारलं .
“सिन्स आय वॉज इन नेव्ही , ‘सी’ इज माय बेस्ट फ्रेंड . दॅट इज व्हाय आय पर्चेस्ड ए फ्लॅट जस्ट इन फ्रंट ऑफ ए बीच हॅविंग ए क्लिअर सीव्ह्यू फ्रॉम माय बाल्कनी, बट, यस आय डिड हॅव ए गर्लफ्रेंड पण दॅट इज माय पास्ट, पण तुम्ही या एकदा गोव्याला ” असं म्हणत देवदत्तनं त्याविषयावर आणखीन जास्त कांही बोलायचं टाळुन दमयंतीला गोव्याला यायचं आमंत्रण दिलं .
जेवण झाल्यानंतर मेळाव्याला जमलेले एकेक जण निघु लागले .
“ओके दमयंती नाऊ इट इज टाइम टु से गुडबाय टु इच अदर , मी तुला तुझ्या घरी ड्रॉप करू का? ” कळत न कळत देवदत्तनं दमयंतीला एकेरी नावानं संबोधलं होतं .

दमयंतीच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहुन देवदत्त पुढं म्हणाला “वुई आर नाऊ फ्रेंड्स नो “.
ते ऐकून दमयंतीला खुप बरं वाटलं आणि ती आपसूकच देवदत्तच्या गाडीत जाऊन बसली . दमयंतीच्या बंगल्यापाशी गाडी थांबली . दमयंती गाडीतून खाली उतरताच देवदत्तही गाडीतुन उतरला आणि म्हणाला “ओके मॅडम , सी यु अगेन ”
“पण कुठे ? ” दमयंतीन विचारलं.
“तुम्ही सांगा , मी आहे अजुन दोन एक दिवस कोल्हापुरात कारण माझी आज्जी मला एक दोन दिवस ठेऊन घेतल्याशिवाय सोडायची नाही.”देवदत्त म्हणाला .
त्यानंतर सलग दोन तीन दिवस देवदत्त आणि दमयंती भेटत होते . दमयंतीला देवदत्त आवडु लागला होता . वयाच्या साठीत सुद्धा त्याची पिळदार शरीरयष्टी , देखणा रुबाबदार चेहरा आणि मिश्किल स्वभाव तिला खुप भावला होता .

“उद्या डिनरला येताय माझ्याकडे ? आमची हेमा छान जेवण बनवते “. दमयंती म्हणाली .
“नो प्रॉब्लेम, आय विल” देवदत्तनं होकार दिला .
ठरल्या प्रमाणे देवदत्त दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दमयंतीच्या घरी पोहोचला. दमयंतीन शेक हॅन्ड साठी हात पुढं करत त्याचं स्वागत करताना म्हंटलं “व्हेरी पंक्च्युअल , राईट इन टाइम!”.
“येस मॅम , थँक्स टु नेव्ही ” तिचा हात हातात घेत देवदत्त म्हणाला . दमयंती देवदत्तला आत हॉल मधे घेऊन आली .
“वॅाव, ब्युटीफुल ” आय मस्ट अँप्रिसिएट युवर ॲस्थेटिक सेन्स”. हॉलमधलं इंटिरिअर बघुन देवदत्त म्हणाला.
” नो, धिस इज ऑल क्रिएशन ऑफ माय लेट हसबंड, ही वॉज बिल्डर , इन कन्स्ट्रक्शन लाईन यु नो “हेमानं ट्रे मधुन आणलेला पाण्याचा ग्लास देवदत्तच्या पुढं करत दमयंती म्हणाली .
“आपण आमच्या गार्डन मधे बसुया का ? आमची गार्डन खुप छान आहे. धिस इज ऑल्सो क्रिएशन ऑफ माय लेट हसबंड . ऑल एक्स्ल्युसिव्ह अँड रेअर कलेक्शन ऑफ प्लॅन्ट्स, मी हेमाला टेबल आणि चेअर्स लावायला सांगितलं आहे , लेट अस गो देअर”

दमयंतीची गार्डन खरच खुप छान आणि प्रशस्त होती . अत्यन्त खुबीनं केलेली प्रकाश रचना आणि एका लोटस पॉन्डवरचा छानसा कारंजा बागेच्या सौन्दर्यात भर घालीत होती.
हिरव्यागार लॉनवर एका कलात्मक डायनींग टेबल वर दमयंतीनं जेवण लावलं होतं .
“ड्रिंक घेणार ? माय हजबंड हॅज लेफ्ट बिहाइंड ॲन एक्झॉटिक कलेक्शन ऑफ लिकर फ्रॉम ऑल अराउंड द वर्ल्ड .” दमयंतीनं विचारलं . “आय डोन्ट माईंड इफ यु विल गिव्ह कंपनी ” देवदत्त मिस्किलपणे म्हणाला .
“मी वाईन घेते , पण तुम्हाला चालेल ? ” दमयंतीनं विचारलं .
“आय ॲम ‘थ्री एफ’ लव्हर मॅडम , फ्रेंड्स, फेणी अँड फिश. पण कोल्हापुरात फेणी कुठं मिळणार ? वाईन विल डु ” देवदत्तनं होकार दिला.
“दॅट्स गुड , आय हॅव ॲन एक्सक्लुसिव्ह कलेक्शन ऑफ वाईन टू , स्ट्रेट फ्रॉम पोर्तुगाल, यु विल लव्ह इट”, असं म्हणत दमयंती फ्रिज मधून एक वाईनची बॉटल आणि वाईन बॉटल ओपनर घेऊन आली.

कट ग्लासच्या दोन नाजूक वाईन ग्लासमध्ये वाईन ओतून तिनं एक ग्लास देवदत्तच्या हातात दिला. आणि “चिअर्स टु अवर फ्रेंडशिप ” असं म्हणत तिनं आपला ग्लास ओठाला लावला .
“वाईन खरंच छान आहे हं दमयंती, मी नॉर्मली वाईन घेत नाही . ॲज आय सेड , आय ॲम फॉन्ड ऑफ फेणी , बट धिस इज रिअली गुड , आय मस्ट से यु हॅव गुड चॉईस ऑफ वाईन्स टु ” देवदत्त डोळे मिचकावत म्हणाला .
बघता बघता दोघांनी वाईनची अक्खी बॉटल संपवली . तोपर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते . त्यानंतर हेमाला डिनर लावायला सांगत दमयंती देवदत्तला म्हणाली, ” देव , माय मेड हॅज प्रिपेअर्ड ॲन ऑथेंटिक गोवन फुड फॉर यु , फिश बॉलचाव, तंदुरी पॉम्फ्रेट अँड फिश करी राईस ,लेट अस एन्जॉय इट”.
वाईन, डिनर आणि गप्पांच्या ओघात तीन एक तास कसे गेले ते दोघांनाही कळलंच नाही आणि मग निरोपाची वेळ जवळ आली.

“नाऊ आय मस्ट लीव्ह दमयंती , माझी आज्जी वाट बघत असेल” असं म्हणत देवदत्त उठला .
दमयंतीला मात्र वाईनचा परिणाम जाणवू लागला असावा. थोडं अडखळतच ती म्हणाली “थांब नं अजुन थोडा वेळ, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी”
देवदत्तनं तिला सावरलं आणि परत खुर्चीवर बसवलं आणि म्हणाला “बोल, काय सांगायचंय ?”
“देवू मला तु खरंच खुप आवडलायस, यु आर सच ए वंडरफुल पर्सन, विल यु मॅरी मी?” देवदत्तला यावर काय बोलावं तेच कळत नव्हतं . तो क्षणभर गप्पच बसला.
तेवढ्यात दमयंती परत खुर्चीवरून उठली आणि देवदत्तचे हात हातात घेऊन म्हणाली “देव काय हरकत आहे ? तुही एकटा आहेस आणि मीही आणि मला वाटतंय कि मीही तुला आवडलेय, वुई कॅन हॅपिली स्पेंड अवर रिमेनिंग लाईफ टुगेदर”.
” दमयंती, आय थिंक धिस इज नॉट द राईट टाइम टू टेक सच डिसिजन्स, वुई मस्ट थिंक ऑन धिस लिट्टल मोअर अँड डीप . वाईन इज ए व्हेरी डिसेप्टिव्ह ड्रिंक मॅडम, डोन्ट एव्हर बिलिव्ह ऑन इट, इट इन्फ्लुएन्सेस मोअर टु युअर आईज दॅन युअर बॉडी, माय बॉस ऑल्वेज युज्ड टु टेल मी , ‘यु शुड नेव्हर टेक ए डिसिजन व्हेन यु आर ड्रंक “. देवदत्त तिला हळुच बाजुला करत म्हणाला आणि आपल्या कार कडे निघाला .

दमयंती त्याला त्याच्या गाडीपर्यंत सोडायला आली आणि स्टेअरिंगवर बसलेल्या देवदत्तला म्हणाली ” मला उद्या माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील ? “आय विल ट्राय” असं म्हणत देवदत्तनं गाडी स्टार्ट केली आणि एका दमात निघुनही गेला .
दुसऱ्या दिवशी दमयंती थोडी उशिराच उठली . डोकं खुप दुखत होतं . कशीबशी ती उठली आणि आपला फोन शोधु लागली पण तिला तो कांही सापडला नाही .
हेमाला हाक मारत तिनं विचारलं “माझा फोन कुठाय गं?” काल बागेतच विसरला होतात ताई तुम्ही, मी सकाळी आत आणुन डायनिंग टेबलवर ठेवलाय ” हेमानं सांगितलं .
वॉश घेऊन दमयंती डायनिंग टेबलपाशी आली आणि खुर्चीवर बसत तिनं हेमाला विचारलं ” कुणाचा फोन येऊन गेला का गं ? ” “नाही ताईसाहेब , पण बहुतेक कांही मेसेज आले असावेत” हेमा चहाचा कप तिच्या समोर ठेवत म्हणाली . तोपर्यंत सकाळचे 10 वाजले होते . “हेमा मी परत जरा पडते , मला उठवु नकोस , मला ब्रेकफास्ट वगैरे कांही नको, मी जेवीनच एकदम” असं म्हणत हातातला चहाचा काप बाजुला ठेवत दमयंती परत सोफ्यावरच आडवी झाली .

“कुणाकुणाचे मेसेज आले आहेत हे बघण्यासाठी तिनं फोन हातात घेतला . इतर बरेच GM वगैरे मेसेज आले होते त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत ती आणखीन कुणाचा मेसेज आला आहे का ते बघु लागली .
एक मेसेज आला होता तो देवदत्तचा होता . तिला खुप आनंद झाला आणि उत्सुकतेनं तिनं तो ओपन केला व वाचु लागली .
“प्रिय दमयंती, गुड मॉर्निंग . मला कल्पना आहे कि तु माझ्या उत्तराची वाट पाहत असशील . खरंतर काल रात्रीच माझं उत्तर तयार होतं पण तुला ते कसं सांगावं हेच मला कळत नव्हतं. कारण एकतर तु ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हतीस आणि दुसरं ते उत्तर एका वाक्यात ‘हो किंवा नाही’ असं सांगण्यासारखं नव्हतं . तु माझी ही पोस्ट पूर्णपणे वाच आणि पोस्टच्या शेवटी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल . दमयंती, तुला आठवतंय? आपल्या कोल्हापुर भेटीच्या दरम्यान तु मला माझी कोणी गर्लफ्रेंड होती की नाही असं विचारलं होतस . त्यावेळेला मी कांहीतरी सांगुन वेळ मारून नेली होती . पण आज तुला सांगतो . येस , मला होती एक गर्लफ्रेंड, देवयानी , खुप सुंदर होती ती, ॲन एंजल, जणु देवलोकातुन रस्ता चुकून पृथ्वीतलावर आलीय असं वाटावं. खुप प्रेम होतं आमचं एकमेकांवर . आम्ही लग्न करायचं नक्की केलं पण तिच्या घरातल्याना नेव्हीत असणारा जावई नको होता . त्यांचा कडाडुन विरोध होता आमच्या लग्नाला .

आम्ही पळुन जाऊन लग्न करायचं ठरवलं होतं . मी सहा महिन्यांसाठी विशाखापट्टणमला ट्रेनिंग जाणार होतो . तिकडुन मुंबईत परत आल्यावर लग्न करायचं आम्ही पक्कं केलं होतं . किती स्वप्नं रंगवली होती आम्ही आमच्या संसाराची ! तिलादेखील समुद्राचं प्रचंड आकर्षण होतं . समुद्रकिनारी आपलं घर असावं असा तिचाच हट्ट होता . ती नेहमी. म्हणायची, मी नेव्हीतील नवरा का बघितला माहित आहे ? मला समुद्र खुप आवडतो म्हणून . मग मी तिला म्हणायचो, पण मी जेंव्हा जेंव्हा शिपवर असेन तेंव्हा काय करशील ? त्यावर ती म्हणायची म्हणुन तर मला आपलं घर समुद्रकिनारी हवय. तु जेंव्हा नसशील नं तेंव्हा सतत मी समुद्राकडं डोळे लाऊन तुझी वाट बघत राहीन. अशी कल्पना करत की एखादी लाट अलगद तुला माझ्याकडं खेचत घेऊन येईल . पण दमयंती, नियतीच्या मनात कांही वेगळच होतं. माझं वैझागचं ट्रेनिंग संपायला कांही दिवसच उरले होते. मला कधी एकदा मुंबईला परत जातोय आणि देवयानीला भेटतोय असं झालं होतं . पण दुसऱ्याच दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या . जे दुर्दैवी लोक त्यात मारले गेले त्यात माझी देवयानीही होती .

झालं सगळं संपलं होतं . एका क्षणात आमची सगळी स्वप्न जळून खाक झाली होती . मला देवयानीचं जळालेलं शरीरही बघायला मिळालं नाही . स्वर्गलोकातुन वाट चुकून भरकटत भुलोकात आलेली एक अप्सरा परत आपल्या मूळ गावी परत गेली होती . आज तिच्या ईच्छेप्रमाणे समुद्रकिनारी माझं घर आहे . मी रोज संध्याकाळी माझ्या त्या घराच्या बाल्कनीत बसुन मांडवी नदी आणि त्या अथांग सागराच्या मिलनाचे दृश्य हातात कॅश्यु फेणीचा ग्लास घेऊन एकटक बघत बसतो. त्याचवेळी सागराच्या कवेत शिरणाऱ्या सूर्याचा आकार रेड वाईनने भरलेल्या एका नाजुक आणि नक्षीदार कट ग्लास सारखा होतो आणि हळुहळु त्या ग्लासचा आकार इतका छोटा आणि हुबेहुब असा दिसतो की जणु एक सुंदर तरुणी अचानक कुठूनतरी समुद्रातून उगवलीय आणि तिने आपले नाजुक लाल चुटुक ओठ त्या वाईनच्या ग्लासावर टेकवलेत. आणि बिलिव्ह मी दमयंती , ती सुंदर तरुणी माझी देवयानीच असते. नाऊ , दमयंती व्हु सेज आय स्टे अलोन ?. आय ॲम नॉट ॲट ऑल अलोन . मी रोज देवयानीला भेटतो . नाऊ डु यु स्टील थिंक दमयंती, आय शुड मॅरी विथ यु ? दमयंती, मी तुझ्यात एक मित्र किंवा मैत्रीण म्हण हवंतर , बघितली होती पण आपण जर लग्न केलं तर आपण सुखी होऊं शकणार नाही. म्हणुन, बेटर , आपण चांगले मित्रच बनुन राहु . मला समजुन घेशील अशी अपेक्षा आहे . आणि हो, लवकरच गोव्याला यायचा प्लॅन कर , तुझा मित्र तुझी वाट पाहतोय तुझी देवयानिशी भेट घालुन द्यायला ! देवदत्त .” मेसेज वाचुन झाल्यावर दमयंती स्वतःशीच हसली .

“कसा आहे नाही हा माणुस ? एकदम क्लीअर, आणि स्ट्रेट फॉरवर्ड . आय लाइक्ड हिम” दमयंती स्वतःशीच बोलली . आता तिचा मूड एकदम बदलला होता .
हेमानं ते ओळखलं आणि म्हणाली, “ताई तुम्हाला एक सुचवू ? तुम्ही एखादं मूल दत्तक का घेत नाही ? तुमचा एकटेपणा निघुन जाईल बघा .
” नो नो हेमा, नो दत्तक बित्तक , मी आता एकटी कुठाय ? मला एक छान मित्र मिळालाय,” स्वतभोवतीच एक छान गिरकी घेत दमयंतीन उत्तर दिलं .
समाप्त.
©️®️अशोक रा. गोवंडे
सदर कथा लेखक अशोक रा. गोवंडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखकाची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!