केल्याने होत आहे रे

“आई.. तुझा फोन वाजतोय” आर्या खोलीतून ओरडली.
“अग पहा ना कोणाचा आहे? मी जेवते आहे.” सुनंदा म्हणाली .
आर्याने फोन घेतला.
”आई मीनल मावशीचा आहे व्हाट्सअप कॉल! रोहन दोन दिवस स्कूल ला नव्हता आला त्याला होमवर्क हवा आहे, मी पाठवते त्याला.”
“का नव्हता आला ग?”
“त्याला बरं नाहीये म्हणत होता सौम्य ,त्याचा फ्रेंड.”
मागच्या महिन्यात मीनल  ही बोलली होती  ‘रोहन आजकाल थकलेला वाटतो म्हणून सुनंदा ला आठवले.

रात्री झोपायच्या आधी पेपर चाळायची  सुनंदा ने सवय करून घेतली होती .
अमित नेहमी म्हणतो “अग जरा  पेपर पाहत जा, काय नुसते सिरीयल पाहत असता तुम्ही बायका!” 
मुख्य न्युज वाचता-वाचता तिचे लक्ष एका बातमीकडे गेले ‘बच्चो को बना रहे बीमार’
तिने पूर्ण बातमी वाचली .
वाचता वाचता तिला जाणवलं खरंच मागच्या वर्षी मिसेस  सान्याल नेआपल्या मुलीची शाळा बदलली, म्हणत होती तिथे मुलांना खेळायला शाळे जवळ ग्राउंड नाही ,पी.टी पण होत नाही..म्हणून दुसऱ्या शाळेत घातली.
सुनंदा ने तेव्हा फारसा विचार नाही केला पण जशी जशी बातमी वाचत गेली तिलाही जाणवले खरच की आजकाल मुलांना खेळायला ग्राउंड नाही त्यामुळे आर्या आणि तिचे फ्रेंड्स घरातच धुमाकूळ घालतात .

दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये लंच अवर मध्ये मीनल भेटली.
” मीनल अग रोहन कसा आहे काय होतंय ?”
मीनल च्या डोळ्यात पाणी आलं, म्हणाली “दाखवलं डॉक्टरला.”
“मग डॉक्टर काय म्हणाले? काय होत आहे?”
“अगं त्याचं मधून मधून पोट दुखायचं. डॉक्टर म्हणाले फॅटी लीव्हर  चा प्रॉब्लेम आहे.”
“म्हणजे काय ग?” सुनंदा ने विचारले!
“अग त्याचं वजन वयाच्या मनाने खूप जास्त आहे आणि त्याला खेळायला आजूबाजूला कोणीही नाही  त्यामुळे तो घरीच असतो. मलाही वेळ नाही यांनाही नाही.

मग काय आजी-आजोबांच्या भरोशावर, बरं त्यांचेही तो ऐकत नाही आणि ते फार काही बोलत नाही. मग दिवसभर तो टिव्ही पाहतो, विडियो गेम  खेळतो आणि भूक लागली की मॅगी खा, चिप्स खा, तर कधी ब्रेड.
वरण भात भाजी पोळी असे नको असते…! आता त्याच्या खाण्यावर कंट्रोल करायला हवा आहे.पौष्टिक जेवण द्या असे डॉ म्हणाले.
यूट्यूब वर नव्या रेसिपी आज काल मी ट्राय करते.”
घरी आल्यावर सुनंदा ने फ्रीज उघडून पाहिला पालक ,गाजर, बीट असलं काहीच नव्हतं. डब्यात कडधान्य शोधले, जराशी मूग मटकी मिळाली.
आता आठवड्यातून दोनदा आपणही कडधान्य उसळी करायच्या आणि आर्या च्या टिफीन मधे द्यायच्या, असे निश्चित करून तिने मूग भिजवले.

“मम्मा समृद्धीने काल वाढदिवस होता म्हणून चॉकलेट केक, आणि कोल्ड्रिंक दिलं. मी पण माझ्या वाढदिवसाला असच देईन.”
सकाळी टिफीन बॅग मध्ये ठेवताना आर्या ने विचारले, “आज काय दिले आहे?” 
सुनंदाच्या डोळ्यासमोर काल पेपर मध्ये वाचलेले नाचू लागले. तिने शांतपणे” मुगाची उसळ” असे सांगितले.
“नको, मंचुरियन दे ना” आर्या ने लाडिगोडी लावत म्हणून पाहिले.
“हे बघ आता आठवड्यातुन फक्त एक दिवस जंक फूड मिळेल.”
“काय ग मम्मा !”
“मला सांग– तुला त्या साक्षी सारखं व्हायचंय का?” दोन्ही हाताने जाडेपणाची एक्टिंग करत सुनंदा ने विचारले.
“ना रे बाबा,” आर्या घाबरून म्हणाली “बर ,दे उसळ..”

 शाळेतून आल्यावर आर्या चा टिफिन सुनंदा ने पाहिला.
“अरे वा ssआज टिफिन एकदम फिनिश ?”
“हो ग ममा ,टुडेज बेस्ट टिफिन  बिकॉज यू हॅव स्प्राउट्स” असं मॅम म्हणाल्या .
“चला स्प्राऊट तर ते म्हणा, पण उसळ आवडली ना?”
मग आर्या उत्साहात म्हणाली “अग रोहन नी पण माझ्यातून घेतलं. म्हणाला मस्त लागते.”
सुनंदाला माहीत होतं हे कौतुक एक दिवसाच आहे नुसतं खाण्यावर कंट्रोल करून काही साध्य होणार नाही बरोबर फिजिकल ऍक्टिव्हिटीज ही हव्या.

तिने नवीन आयडिया काढली. यंदा आर्या चा वाढदिवस गार्डन मध्ये करायचं ठरवलं तसं तिने आर्याला सांगितलं, “तुझ्या मैत्रिणींना पाच वाजता कॉलनीतल्या गार्डन मध्ये बोलव .”
“का ग ?”
“आपण तुझा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करूया.”
वाढदिवसाच्या दिवशी बरोबर पाच वाजता आर्या चे मित्र, मैत्रीणी पार्क मध्ये हजर. मीनल आणि रोहन ही आले.
आर्या ने केक कापून झाल्यावर  सुनंदा ने मुलांना गेम खेळायला बोलावलं.
डिस्क थ्रो, डिस्क  एकमेकांकडे फेकायची.
मुलांना खेळायला खूप मजा आली. नंतर तिने खो-खो खेळायला लावले. मुलं-मुली खेळून चांगलेच दमले त्यामुळे त्यांना  भूक सणकून लागली.
सुनंदाने,फ्रुट चाट, भेळ आणली होती मुलांनी आवडीने पोटभर खाल्ली.

रिटर्न गिफ्ट म्हणून तिने ड्रायफ्रूट ची पाकीट दिली.
दुसऱ्या दिवशी तिच्या या वेगळ्या वाढदिवसाचे त्यांच्या मल्टी मध्ये खूपच कौतुक झाले .
ऑफिसमध्ये मीनल ही म्हणाली, “अग  कितीतरी दिवसांनी रोहन इतक्या लवकर झोपला तो एकदम सकाळी च उठला. खूप फ्रेश दिसत होता.”
“रोज पाठवशील त्याला गार्डनमध्ये ? मी आणि आमच्या मल्टी मधल्या मैत्रिणींनी ठरवलं आहे अगदी रोज नाही तरी आठवड्यातून दोनदा तरी मुलांबरोबर गार्डन मध्ये जायचं तिथल्या जिम वर आपण व्यायाम करायचा  आणि मुलांना खेळू द्यायचे. पाहून मुलांनाही आवड निर्माण होईल. त्याचा त्यांना आणि आपल्यालाही फायदा होईल.”
“खरच ग मला पटतंय, येऊ आम्ही.” म्हणत मीनल फोन ठेवला.

सकाळी सकाळी नणंदेचा  रेखाचा फोन.
”सुनंदा अग काल खूप इच्छा होती आर्या  च्या वाढदिवसा ला यायची पण नेमकी प्रिया च्या प्रीबोर्ड—टेस्ट सुरू होत्या. आज संपली यंदा बोर्ड ची परीक्षा. त्या मुळे अभ्यासाचं खूप टेन्शन आहे. त्यामुळे येता नाही आलं. पण आमची आरू नाराज तर नाही ना? तिला सांग आत्या उद्या येते आहे.”
दुसरे दिवशी रेखा आणि प्रिया दोघी आल्या.
प्रिया ची नुकतिच परिक्षा संपली होती. त्यामुळे ती  व ताई दोघी रिलॅक्स होत्या. 
आता चार दिवस रहा  सुनंदा ने आग्रह केला, तेव्हा ताई म्हणाल्या, “प्रिया ला ठेवून घे. पण मी जाईन संध्याकाळी. तिकडे सासुबाई ना झेपत नाही काम.”

प्रिया रहाते आहे कळल्यावर आर्या ही खुश.
“ताई आपण खूप मजा करु .”
“हो पण ताई ला जरा आराम करु दे. अभ्यासामुळे तिची झोप ही झाली नसेल.”
“हो ग मामी, खरच खूप ताण होता. अजून ही आहे फायनल चा, त्या नंतर मार्क्स चा. मग विषय कोणते घेता येईल, ते सर्व ह्या परिक्षे च्या रिझल्ट वर अवलंबून आहे. त्या मुळे झोप ही शांत लागत नाही.”
“अग होईल ग ! तू आहेस हुषार,” सुनंदा ने तिची समजू तर काढली.
पण  सुनंदा च्या मनात विचार आला “खरंच आज काल मुलांना किती स्ट्रैस आहे! पुढे जायचे आहे.  स्पर्धा वाढली आहे. त्यातून आरक्षण प्रकार आहे, त्यामुळे सीट्स अजुन लिमिटेड.”

हा ताण सर्वच मुलांना होत असावा पण त्याला हॅंडल करायला मन ही शरीराबरोबर स्ट्रॉन्ग हवं.
सुनंदा ला आठवल मागच्या मल्टी मध्ये एक काका मेडिटेशन चे क्लास घेतात.
संध्याकाळी प्रिया ला घेऊन ती काकां कडे गेली.
काकांनी दहा दिवसाचे क्लासेस घेतात अस सांगितलं. प्रिया ही तयार झाली.    
दहा दिवसांत प्रिया बरीच रिलॅक्स वाटू लागली .
“मामी थॅन्क्स ग. आता मी नियमितपणे मेडिटेशन करेन. मला खूप  छान फिलींग येत. अभ्यासा मुळे येणारा ताण कमी होतो.
प्रिया आज घरी परत जाणार म्हणून आर्या उदास होती.

 “ताई मी खूप बोर होईन ग उद्या पासून.”
“अगं पण आता फायनल आहे माझी आणि तुझी पण. तेव्हा अभ्यास एके अभ्यास. आणि हो  तुझ गार्डनमध्ये खेळायला जाण परत सुरू कर . मी देखील मेडिटेशन रोज करेन.  आता सुट्यांमध्ये तू माझ्या घरी येणार आहे .येताना तुझी बॅडमिंटन ची रेकेट घेऊन ये. पाहू कोण जिंकत.?” प्रिया म्हणाली.
ऑफिस मधे जाताना सुनंदा ला जाणवलं, “केल्याने होत आहे पण आधी करून पहायला हवं. अडचणी येतच रहाणार त्या वर मार्ग ही मिळतोच.”
समाप्त.
©®सौ. प्रतिभा परांजपे.
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!