©®सौ. प्रतिभा परांजपे.
अशोक आणि मयंक च जेवण होताच सुषमा ही पानावर बसली. पण घास घशाखाली उतरेना. कसे बसे वाढलेले संपवून पटकन आवरून ती अप्पांच्या खोलीत आली .
अप्पांचा श्वास संथ गतीने चालला होता .श्वास म्हणजे शेवटची घरघर होती ती.
संध्याकाळीच डॉक्टर येऊन पाहून गेले .
“काही उपाय नाही का ?”अशोक नी विचारले.
“शांतपणे जाऊ द्या त्यांना.” डॉ म्हणाले! ऐकुन सुषमा चे डोळे भरून आले.
अशोक एकदा खोलीत येऊन पाहून गेले!
“अशोक, मी रात्री इथेच थांबते मला झोप येणारच नाही तेव्हा तुम्ही व मयंक झोपा.” सुषमा म्हणाली!
“बरं! काही वाटल तर आवाज दे” म्हणूनअशोक झोपायला निघून गेले..
सुषमा अप्पांच्या काॅट जवळ खुर्ची ठेवून बसली. त्यांच्या श्वास संथ होत चालला होता.
तिने एकदा अप्पा अप्पा म्हणून आवाज ही दिला. पण बंद डोळ्यांची सूक्ष्म हालचाल सोडता काहीही रिस्पॉन्स नव्हता.
अप्पांच्या देहाकडे पाहता पाहता सुषमाला लहानपणापासून पाहिलेले हसतमुख, शांत पण निग्रही स्वभावाचे अप्पा आठवले .
सुषमा व सुभाष दोघ भावंड. सुभाष मोठा होता. अप्पा शांत तर आई एकदम कडक स्वभावाची.
पण घरात कशाची कमतरता नव्हती.
सुभाष बारावी झाला. त्याला इंजिनिअर व्हायचे होते पण मार्क थोडे कमी त्यामुळे प्रायव्हेट कॉलेज शिवाय पर्याय नव्हता. पण तिथली फी भरण्याची अप्पांचे सामर्थ्य नव्हते.
सुभाष ने मग डिप्लोमा केला. पण त्या पायी अप्पांच्या विषयी त्याने मनात राग धरून ठेवला होता.
“तुमची इच्छाच नव्हती, नाहीतर आज मी इंजिनिअर झालो असतो,” असे अनेक राग तो मनात धरून होता.
अप्पांना ही त्याचे बरेचसे निर्णय पटत नसत. लग्नही त्यांनी त्याच्या मर्जीने केले.
सुभाष आणि अप्पा दोघांमध्ये एक अदृश्य भिंत उभी होती. पुढे सुषमाचे ही लग्न झाले.
आता घरात सुभाष, त्याची बायको मेघा, आई आणि अप्पा होते.
कालांतराने सुभाषला दोन मुली तर सुषमाला एक मुलगा झाला.
छोट्याशा आजाराचे निमित्य होऊन आई गेली. अप्पां ना रिटायर होऊन दोनच वर्षे झाली होती पण आईच्या जाण्याने ते अगदीच एकटे पडले.
एक दिवस मोरीतून येताना अप्पा पडले आणि सगळं बिनसलं. सुभाष आणि मेघा दोघं नोकरीत. मुली कॉलेज, अभ्यास यात.
मग अप्पांच करणार कोण? माणूस ठेवणे ही महाग पडेल.
सुषमा अप्पांना पहायला आली तेव्हा सुभाषने सुषमाला विचारले, “तू अप्पांना संभाळू शकते?”
मेघाच म्हणणं तुम्ही तर घरीच असतात तेव्हा काय हरकत आहे?
सुभाष ने वरवर दाखवत म्हटलं, “भाऊजींना चालेल ना?”
मी बोलते म्हणताच मेघा म्हणाली, ”पहा म्हणजे, तुम्ही ही नाही म्हणाल्या तर त्यांना वृद्धाश्रमात – –”
पुढचं काही ती बोलण्याच्या आधी सुषमा म्हणाली, “नाहीं नाही मी घेऊन जाते अप्पांना.”
आणि मग अशोकच्या संमतीची वाट न पाहता सुषमा अप्पांना घेऊन आली.
अशोक समजूतदार होते त्यांनी जमेल तशी मदत केली काहीही कुरकुर न करता. पण अप्पा जुन्या मतांचे. जावयां कडून करुन घ्यायचं, हे काही त्यांच्या मनाला रुचत नसे .
थोडे दिवस झाले की ते सुभाष ला फोन लावत, “मला तिथे यावसं वाटत रे ! कधी येतोय?”
सुभाष सुट्टी नसल्याचे कारण पुढे करीत असे.
एकदा त्यांनी खूपच हट्ट केला तेव्हा चिडून म्हणाला, “सोडून देतो नोकरी. मग तुम्हाला नेतो.”
मग मात्र अप्पा समजून चुकले, कि आता आपला शेवट इथेच आहे.
सुषमा ने ही अप्पांची समजूत काढली, “काय हरकत आहे ? मी आहे ना तुमचीच मुलगी. आजकाल मुलगा मुलगी दोघं समान आणि जावई ही मुला समान !”
सुभाष ला कळवावे कां, पण मागे एकदा अप्पा असेच भयंकर आजारी होते.
असं वाटंत होतं कि जातात कि काय, सुभाष ला बोलवून घेतले होते पण दोन दिवसांनी अप्पा बरे झाले.
सुभाष म्हणाला सारखं सारखं येणं नाही जमणार. म्हणून मग विचार सोडून दिला.
विचार करता करता सुषमाचा डोळा लागला. जाग आली तेव्हा अप्पांचा श्वास क्षीण होता होता थांबला.
सुषमा ने अशोक ला व मयंकला उठवले. त्यांनी सुभाषला अप्पा गेले म्हणून कळवले.
सकाळी सुभाष,मेघा सर्व आले व पुढचे क्रिया कर्म पार पाडले .
सुभाष आणि मेघा तिसऱ्याच दिवशी जायला निघणार होते पण त्याच दिवशी अप्पांचे मित्र वकील दामले काका आले.
त्यांनी अप्पांचे मृत्युपत्र आणले. ते आलेले पाहून मग सुभाष थांबला.
आमच्यावर तर रागच होता अप्पांचा, बहुतेक सर्व तुम्हाला दिले असणार असा टोमणा मेघाने मारला.
पण प्रत्यक्षात घरदार आईचे दागिने सर्व मालमत्ता अप्पांनी सुभाष च्या नांवानें केली होती. सुषमाला काहीच ठेवले नव्हते.
सर्वांना आश्चर्यच वाटले पण सुषमा शांतपणे म्हणाली, “बरं झालं. सेवा करता आली व आशीर्वाद ही मिळाले हीच माझी खरी संपत्ती.”
संपत्तीचा एकमेव अधिकार सुभाषला मिळाल्याने ते दोघं खुश होते. त्या आनंदात ते दोघे अप्पांचा तेरावा होईपर्यंत थांबले.
तरीही मेघाला राहून राहून मनात शंका येत होती. तिने आडून आडून विचारते” तुम्हाला काही देणार नाहीत अप्पा असे शक्यच नाही. आधीच काहीतरी दिलेले असणार”.
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्या पलीकडे काय हातात होते सुषमाच्या!
मध्यंतरी तिची जाऊ व नणंद ही येऊन गेल्या. त्यांनी ही अप्पांनी तुम्हाला कसे काही दिले नाही यावर आश्चर्य व्यक्त केले. पण सुषमा तेव्हाही शांत राहिली.
पाहता पाहता दोन वर्षे उलटली सुभाषच्या मोठ्या मुलीचे लग्न पार पडले आणि छोटी नोकरी ला लागली.
मयंक ही बारावी खूप छान मार्कानी पास झाला. त्याला इंजिनिअरिंग कॉलेज ला एडमिशन मिळाली .पण फी आणि इतर खर्च लाखांवर जाणार. तो कसा काय परवडणार होता हा मोठाच प्रश्न होता.
अशोक आपल्या परी प्रयत्न करत होते.
एक दिवस दुपारी एक रजिस्टर्ड लेटर आले. मयंक घरीच होता. त्याने उघडून पाहिलं.
आई अप्पांच्या पॉलिसी चे कागद आहेत त्यात .
अप्पां पाॅलिसीचं कधी बोललेलं सुषमा ला आठवत नव्हते.
त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर मयंक18 चा झाल्यावर पॉलिसीचे पैसे त्याला मिळावे अशी व्यवस्था करून ठेवली होती.
सुषमाला प्रश्न पडला. तिने विचार केला कदाचित सुभाषला माहीत असेल. विचारावे का कि अशोकच्या येण्याची वाट पाहावी?
पण तेवढ्यातच दामले काकांचा फोन आला.
सुषमा ने विचारताच म्हणाले, “ते पॉलिसीचे पैसे तुझे आहेत. सुभाषला कळवू नको. ही अप्पाची इच्छा होती. तो तसं बोलला होता माझ्यापाशी.”
“पण ते मला किंवा दादाला काही बोलले नाहीत किंवा मृत्युपत्रात ही तसा उल्लेख नव्हता.”
“ते मुद्दामच. जर त्याने मृत्युपत्रात याचा उल्लेख केला असता तर सुभाष किंवा मेघाने यावर आक्षेप घेतला असता. ते जे बोलले असते ते तुला सहन झाले नसते आणि तू ते पैसे त्यांना देऊन टाकले असते. आणि हेच अप्पांना व्हायला नको होते. आणि तू त्यांची सेवा पैशाकरता केली हेही तुला ते बोलले असते, कदाचित अप्पांना तू तसे करायला भाग पाडले असेही बोले असते. म्हणूनच त्याने तुला नॉमिनी न करता तुझ्या मुलाला म्हणजे मयंक ला तो अठराचा झाला की पैसे मिळावे अशी व्यवस्था केली. त्याने त्याचे शिक्षण नीट पार पडेल.
सुषमा आता नाही म्हणू नकोस. तू तुझे कर्तव्य निस्वार्थपणे केले. पण तरीही ते तुझे वडील होते. तेव्हा तुला नको असले तरीही केवळ त्याची इच्छा म्हणून तू स्वीकार कर.”
सुषमाचे डोळे भरून आले. तिने कागद अप्पांच्या फोटो समोर ठेवून हात जोडले.
किती दूरवरच्या विचार केला अप्पांनी! ती घेणार नाहीये त्यांना माहित होते.
पण तिच्या अडचणीच्या वेळी त्यांनी तिला आधार दिला हे जाणवतात तिथे मन प्रेमाने भरून आले.
©®सौ. प्रतिभा परांजपे.
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
गोष्ट खूप छान. मुलीच आईवडिलांची काळजी घेतात.त्या पैसा प्राॅपर्टीच्या लालची नसतात,(काही असतात पण]त्यांना पाहिजे असते आईवडिलांचं प्रेम.मुलाला म्हातारपणची काठी म्हटली जाते,पण खर्या काठीचा आधार मुलीच देतात.
अगदी खरंय…खूप धन्यवाद..
Atishay chaan shabdat mandli aahe
Vastav aahe
Nisvarthta seveche fal Swami detat Mala Anubhav aahe
Khupach chaan lihile aahe Lihit ja
Thank you
Very true.. thank you so much !!