©️®️ सौ.हेमा पाटील.
झुकझुक झुकझुक अगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया…
आद्या आणि वेद दोघेजण ट्रेनमध्ये खिडकीजवळ बसून हे गाणे मोठ्याने म्हणत आपला आनंद व्यक्त करत होते. छोट्या बालकांचे उत्स्फूर्तपणे गायलेले गाणे ऐकून डब्यातील सगळेजण कौतुकाने त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करत होते.
गाण्यावरुनच मुलांना घेऊन आई माहेरी चालली आहे हे सगळ्यांच्या सहजच लक्षात येत होते. पण त्यांच्याशेजारी बसलेल्या सीमाच्या तणावग्रस्त चेहऱ्याकडे पाहून मात्र गाडीतील बाकीचे प्रवासी बुचकळ्यात पडले होते.
माहेरी जायचे म्हणजे चेहऱ्यावर आनंद किती ओसंडून वाहत असतो! पण सीमाच्या चेहऱ्यावर मात्र तणाव दिसत होता.
विचारात ती गढून गेली होती.
सीमा..उर्फ सिमंतिनी ही आपल्या आई बाबांची लाडकी लेक होती.लग्नानंतर मुल होण्यासाठी चार वर्षे वाट पहावी लागली ,त्यानंतर ही जन्मली. त्यामुळे आईबाबांच्या काळजाचा तुकडा होती.पहिली बेटी धनाची पेटी असे म्हणतात. मनोजरावांच्या बाबतीत हे अगदी खरे ठरले.
सीमाचा जन्म झाला आणि त्यांच्या व्यवसायात जी बरकत आली ती उत्तरोत्तर वाढतच गेली. हा सीमाचाच पायगुण आहे..पोरगी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरी आली असेच मनोजराव समजत होते आणि परिस्थिती ही अगदी तशीच वेगाने बदलत गेली होती. कितीही नाही म्हंटले तरी पैसा ही गोष्ट या जीवनात आवश्यक असतेच. त्यांचा पैशाचा ओघ सुरू होण्याचा काळ हा सीमाच्या जन्मानंतर सुरु झाला. त्यामुळे तिच्या आपल्या आयुष्यात येण्याने आपला भाग्योदय झाला असे ते मानू लागले.
आई तर काय आईच असते! बाळाला कुठे ठेवू आणि कुठे नको अशी भारतीताईंची अवस्था झाली होती.
त्यात तिच्या पाठीला पाठ लावून वंशाचा कुलदीपक मिहीर आला होता.. त्यामुळे दुधात साखरच पडली होती. हे चौकोनी कुटुंब आता अगदी दृष्ट लागावी असे भासत होते. मूल होत नव्हते तेव्हा भारतीताई त्याच विवंचनेत कायम असायच्या. तसे लग्न होऊन चारच वर्षे झाली होती, पण तो काळ आजचा नव्हता. त्या काळात चार वर्षांत दोनदा पाळणा हलायला हवा होता. त्यामुळे महिलांच्या कार्यक्रमात आपल्याकडे वांझ म्हणून तर पाहिले जात नाही ना याचा घोर भारतीताईंना लागला होता. पण सुदैवाने त्यांच्या पदरात सीमाचे दान पडले आणि त्या कृतार्थ झाल्या.
मुली या बाबांच्या फार लाडक्या असतात. मनोजराव तिची खूप काळजी घेत. आपल्याकडे कुठली गोष्ट नाही असे सीमाला कधी वाटलेच नाही, कारण तिच्यासाठी जे जे गरजेचे होते ते मनोजराव आधीच आणून ठेवत.
तिच्यासाठी भातुकलीचा संच तिच्या लाडक्या बाबांनीच आणला होता.
घरी आल्यावर सीमा बाबांच्या अवतीभवती भिरभिरत असे. मिहीरच्या आगमनाने ही त्यात फरक पडला नाही. त्यामुळे घरात कायम सीमाचाच वरचष्मा होता. पण सीमाने ही आपल्या आईने दिलेल्या संस्कारांची जाण ठेवत आपले वर्तन संयमित कसे राहील याची नेहमीच दक्षता घेतली होती.
काळ पुढे सरकतो त्यासोबतच माणसाला आपली नाळ जोडून घ्यावी लागते. भूतकाळ हा स्मरण करण्यापुरताच.. भविष्यकाळ उज्ज्वल व्हावा यासाठी वर्तमानात पाय रोवून उभे रहावे लागते. त्याप्रमाणे सीमाने इंजिनिअरींग काॅलेजला ॲडमिशन घेतली. अभ्यासात बुडून गेल्याने बघता बघता चार वर्षे निघून गेली.
तिने M.S. करावे अशी मनोज रावांची इच्छा होती. M.S. करण्याची सीमाचीही इच्छा होती, पण चांगल्या कंपनीत नोकरी साठी निवड झाल्याने तिने तो विचार दूर सारत ही नोकरीची ऑफर स्विकारली.
बाबांना हे अजिबात आवडले नाही.एवढा मोठा निर्णय सीमाने स्वतःच घेतला हे बाबांना रुचले नाही.
एकदा नोकरीत गुंतले की शिक्षण घेण्यासाठी वेळ उरत नाही, त्यामुळे आधी उच्चशिक्षण घ्यावे . नोकरी तर काय परत मिळणारच की…असे मनोज रावांना वाटत होते. सीमाने घेतलेला निर्णय बाबांना अजिबात रुचला नाही हे लक्षात येऊनही सीमाने आपला निर्णय बदलला नाही, उलट ती त्यावर ठाम राहिली हे बाबांना खटकले.
आयुष्यात पहिल्यांदाच बाबांनी सीमाशी अबोला धरला. सीमाने आपले न ऐकता स्वतःच्या मनाने निर्णय घेतला याचा मनोज रावांना धक्का बसला. आपली मुलगी कधीच आपला शब्द डावलणार नाही या त्यांच्या विश्वासाला तडा गेला असा ग्रह त्यांनी करुन घेतला. वास्तविक पहाता वयाने मोठे झाल्यावर आपल्या आयुष्याबाबत स्वतः निर्णय घेणे हे स्वाभाविक होते. पण “मेरी बेटी मेरा अभिमान” अशी काहीशी मनोज रावांनी मनाशी समजूत करुन घेतली होती.
खरं तर स्वतःच्या भूतकाळात ते डोकावले असते तर त्यांच्या लक्षात आले असते की, हा व्यवसाय सुरू करण्याऐवजी चालून आलेली नोकरी करावी असा आपल्या तात्यांचा आग्रह होता. तो डावलून आपण या व्यवसायात उतरलो. सुरवातीला अनेक टक्केटोणपे खाल्ले. पण यापासून दूर झालो नाही. आज एक यशस्वी उद्योजक म्हणून मनोज रावांचे नाव आदराने घेतले जाते यामागे त्यांचे अविरतपणे घेतलेले कष्ट आहेत. पण त्यावेळी तात्यांच्या आग्रहाला बळी पडून नोकरी स्विकारली असती तर आज स्वतःला जे करायचे होते ते शक्य झाले नसते.
पण काय होते माणसाचा अहंकार दुखावला गेला की सारासार विवेकबुद्धी काम करेनाशी होते. सीमाने स्वतः घेतलेल्या निर्णयावर नाराज होऊन मनोजराव तिच्यापासून मनाने दुरावलेच.. दोघांमध्ये पूर्वीसारखे बंध राहिले नाहीत. सीमाला हे खूप खटकत होते. ती पूर्वीसारखीच बाबांकडे जायची.. प्रत्येक घडणारी गोष्ट सांगायचा प्रयत्न करायची, सल्लाही विचारायची. मनोजराव आपले मत तर दर्शवायचे,पण त्यातील भावनिक ओल संपली आहे व कोरडेपणाने उत्तर मिळतेय हे सीमाच्या लक्षात येई.
बाबांचा राग दूर करण्याचा तिने खूपदा प्रयत्न केला,पण दोघांमधील नाजूक बंध विरळ झाले ते झालेच…
यथावकाश तिला शैलेशचे स्थळ सांगून आले.सगळ्या बाजूंनी योग्य असल्याने सर्वांनीच होकार दिला. त्यावेळी ही सीमा बाबांच्या पुढ्यात निःशब्दपणे बसली होती. बाबा आता तरी आपल्याशी मोकळेपणाने बोलतील असे तिला वाटत होते. पण मन जेव्हा दुखावते तेव्हा आवाज होत नाही, पण तरीही तो फार मोठा आघात असतो.
आपल्या लेकीशी परवा परवापर्यंत बोबड्या बोलीत बोलत होतो, तिच्या भल्यासाठी योग्य निर्णय घेत होतो ती बबडी आज एवढी मोठी झाली की, आपला निर्णय डावलून स्वतः साठी निर्णय घेऊ लागली हे पचविणे मनोजरावांसाठी फार अवघड होते. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सीमा माझी मुलगी आहे, त्यामुळे मी सांगतो ते तिने ऐकावे. माझ्याइतका तिच्या भल्याचा विचार कुणीच करु शकत नाही,ती स्वतःही नाही हा समज उराशी बाळगून मनोजराव मनात अढी धरुन बसले होते.
तिचे लग्न मात्र अगदी धुमधडाक्यात लावून दिले. तिची सासरी जाण्याची वेळ आली तेव्हा ते भावूक झाले होते, पण या भावूकतेवरही अहंकाराने मात केली. हमसून हमसून रडत बिलगलेल्या सीमाच्या डोक्यावरुन हात फिरवत कोरड्या डोळ्यांनी त्यांनी तिची पाठवणी केली होती. ती वळून जाईपर्यंत पुन्हा पुन्हा आपल्या बाबांकडे पहात होती,पण ते निर्विकारपणे समोर पहात होते. तिची नजर मात्र तिथेच अडखळली होती…
त्यानंतर ती अनेकदा माहेरी आली. दिवाळसणाला आली तेव्हा जावईबापूंच्या व तिच्या सरबराईत त्यांनी काहीही कमतरता जाणवू दिली नाही. जावईबापूंशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. परंतु सीमाशी मात्र पुन्हा पहिल्यासारखे बंध जुळले नाही ते नाहीतच !
सीमा जेव्हा पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आली तेव्हा तिला वाटले आता आपण खूप दिवस माहेरी रहाणार आहोत. बाबांचा राग घालवण्याचा नक्की प्रयत्न करुयात..तिने खूप प्रयत्न केला,अगदी स्पष्टपणे विचारले ही, “बाबा, असे तुटक का वागता माझ्याशी? माझ्या घेतलेल्या एका निर्णयाची खूप मोठी शिक्षा तुम्ही मला देत आहात”.
“नाही बेटा..तू आता मोठी झालीस. तुझ्या आयुष्यात आता मी ढवळाढवळ करणे योग्य नाही”.असे उत्तर मनोज रावांनी दिले.
यावर आपल्या बाबांची समजूत कशी काढावी हे सीमाला कळेना. खूप प्रयत्न करुन थकली ती..
मनाशीच तिने कबूल केले,”थकले मी…माझ्या आयुष्यात माझे बाबा आजही प्रथम क्रमांकावर आहेत. आज भलेही त्यांच्या मनात माझ्यासाठी जागा नाही, पण माझ्यासाठी ते माझे रोलमाॅडेल आहेत. माझ्या एका निर्णयावर रागावून ते तटस्थ झालेत .पण मला खात्री आहे पूर्वीचे माझे बाबा नक्की परततील. कधी ते माहीत नाही, पण मी वाट पाहीन”.
तिला पहिला मुलगा झाला.त्याला सर्वात आधी बाबांनीच छातीशी धरले. नातवंडांशी बाबा अगदी प्रेमाने वागत.त्यांचे खूप लाड करत. तिच्याही आवडीचे पदार्थ आणत.नाटकाची तिकीटे काढून आणत. आपली आवड आजही मनापासून जपणाऱ्या आपल्या बाबांकडे पाहून तिचे डोळे भरुन येत.
दोघांमध्ये काही बिनसले आहे अशी शंकाही घरातील इतर सदस्यांना कधी आली नव्हती…पण ते दोघांमधील जे मखमली नाते होते त्यावर बुरशी चढली होती ही फक्त तिलाच जाणवत होती. अहंकार जोपर्यंत आपला ठेका सोडणार नाही तोपर्यंत ही बुरशी जाणार नाही हे तिने जाणले होते आणि त्यामुळेच आता माहेरी निघाले असताना मुले खूप आनंदात होती, पण ती मात्र याच विचाराने तणावात होती.
स्टेशनवर मिहीर घ्यायला आला होता. मुले मामा मामा करत त्याला बिलगली. घरी आल्यावर जेवण झाल्यावर ती आईशी बोलत बसली. बाबांना आल्या आल्या नमस्कार केला होता तेव्हा बाबा थकल्यासारखे दिसत होते.
तिने आईला याबाबत विचारले तेव्हा आईने सांगितले,”अगं ते टायफॉइडने आजारी पडले होते”.
“मला का कळवले नाहीस?की आता मला तुमच्या कुटुंबातून पूर्णपणे वगळलेच आहे का”?असे ती रागाने म्हणाली. यावर, “तुझ्या बाबांनीच सांगितले होते की,सीमाला कळवू नका. तिच्यामागे नोकरी, संसाराचे खूप व्याप आहेत. तिची आणखी पळापळ नको. म्हणून कळवले नाही”.असे आईने सांगितले.
“यात पळापळ कसली गं… आपल्या माणसा़साठी नाही तर कुणासाठी करायची मग पळापळ”! पण तिला खूप वाईट वाटले.
बाबांनी आपल्याला त्यांच्या आयुष्यातून पूर्णपणे वगळले आहे असा तिचा ग्रह झाला व ही गोष्ट तिच्या मनाला फार लागली.या विचारांमुळे ती रात्रभर झोपूही शकली नाही.
दुसऱ्या दिवशी मंडईत भाजी आणायला जायचे होते.मिहीर लवकरच ऑफीसला गेला होता म्हणून तिने स्कुटी काढली व मंडईत भाजी आणायला गेली.
तिच्या डोक्यात कालचेच विचार घोळत होते. अचानक काय झाले ते तिला समजलेच नाही आणि तिची स्कूटी स्लिप झाली. ती गाडी वरुन पडली. फारसे लागले नाही, पण हाताला व तोंडाला बरेच खरचटले होते. माणसे गोळा झाली तिला ओळखणाऱ्या एका मुलाने घरी फोन केला.
घरुन आईबाबा धावतच तिथे आले .तोपर्यंत तिला गोळा झालेल्या लोकांनी उठवून बसवले होते. पाण्याची बाटली दिली होती. ती पाण्याचा एक घोट घेत होती तेवढ्यात आईबाबा आले.
आल्या आल्या बाबांनी तिच्याजवळ जमिनीवर फतकल घातले व तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. तिच्या हातावरील खरचटलेल्या जखमेवर हळूवारपणे बोट फिरवत ते भारतीताईंना बडबड करत होते की, “चार दिवस पोरगी माहेरी आली तर तिला कशाला कामे सा़ंगता”?
तिला हाताच्या आधाराने उठवत ते जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले.जखमांवर मलमपट्टी करून औषधे घेऊन ते तिला घरी घेऊन आले. त्यानंतर तिला जबरदस्तीने झोपायला लावून तिच्या उशाशी बसून राहिले. तिने डोळे मिटून घेतले. मिटल्या डोळ्यांसमोर बालपणीचे आजारी पडल्याचे अनेक प्रसंग तरळले.
आपण आजारी असताना बाबा आपल्यासाठी रात्रभर जागरण करत असत.आई म्हणायची,” तुम्हाला ऑफीसला जायचे असते.मी बसते, तुम्ही झोपा”. पण त्यांनी कधीच तिचे ऐकले नाही.
आज तशाच काळजीने बाबांना आपल्या उशाशी बसलेले पाहून तिला बरे वाटले.
आई म्हणाली,” तुम्हाला थकवा आहे अजून.. तुम्ही झोपा.मी बसते तिच्याजवळ”. पण नकारार्थी मान हलवत बाबा तिथेच बसून राहिले.
सीमाने डोळे उघडले तेव्हा बाबांनी काळजीयुक्त स्वरात विचारले, ” बेटा, खूप दुखतेय का”? आणि तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात तिच्या प्रती तीच काळजी दिसली ज्याची ती इतकी वर्षे वाट पहात होती.
तो बाबांचा हात सीमाने हातात धरला व तिच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या.
ती म्हणाली, “बाबा, इतकी वर्षे हृदयावर झालेल्या जखमा मी तुम्हाला दाखवू शकले नाही त्या जखमांच्या पुढे हे खरचटणे अगदी किरकोळ आहे. पण या जखमांमुळेच आज मला माझे ते बाबा परत मिळाले. खूप वाट पहायला लावलीत बाबा”…
यावर काहीच न बोलता बाबांनी तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला, पण त्याचवेळी तिच्या कपाळावर दोन उष्ण पाण्याचे थेंब पडले. ते बाबांच्या डोळ्यांतील अश्रू आहेत हे तिला समजले.
लग्नाची पाठवणी करताना ही डोळ्यात न आलेले पाणी आज मनातील भावनांचा कल्लोळ दर्शवत होते.आजही आपल्या बबडीसाठी त्यांच्या मनात जे प्रेम आहे त्याची प्रचिती तिला आली होती. त्यांचा आपल्यावर किती जीव आहे हे तिला माहीत होतेच.. फक्त जो अहंकाराचा पडदा त्यावर आला होता तो दूर होणे गरजेचे होते.
आजच्या किरकोळ अपघातामुळे बाबा तिच्या काळजीने अगदी घायाळ झाले होते. आता या अश्रूंसोबत तो अहंकार दूर झाला होता. मन पूर्वीसारखेच निर्मळ झाले होते.
डोळ्यांतल्या पाण्यासोबत इतके दिवस हृदयात साचलेल्या दुःखाचा निचरा होत होता..तिचे बाबा तिला परत मिळाले होते…
इति हेमा उवाच.
©️®️ सौ.हेमा पाटील.
सदर कथा लेखिका सौ.हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.