©️®️अशोक रा. गोवंडे
सत्तरच्या दशकात मी पुण्यात होतो तेव्हाची गोष्ट. कॉलेज शिक्षण संपवून नुकताच नोकरीत कन्फर्म झालो होतो. आता एखादी मैत्रीण असावी, तिच्यावर प्रेम करावं असं वाटण्याचं ते वय होतं. प्रेम म्हणजे काय ? ते कशाशी खातात ह्याविषयी फारशी माहिती नव्हती. त्याच काळात राज कपूरचा बॉबी हा चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. तो चित्रपट बघून मात्र त्याबद्दल अधिकच आकर्षण निर्माण झालं आणि प्रेम वगैरे कशाला म्हणतात ते हळुहळू समजायला लागलं. बॉबी पाहिला तेव्हा वाटायला लागलं की प्रत्येकाची एक बॉबी हमखास असतेच.
एखाद्याची बेसनात हात भरलेली असते
तर एखाद्याची शेणात हात भरलेली असते….आणि आपणही अशी एखादी बॉबी कुठल्यातरी पिठात बरबटलेल्या हातांनी आपल्या केसावरची बट मागे घेत आपल्या समोर येऊन उभा राहिलीच तर तिला लगेच “आय लव्ह यू” म्हणायच, तिच्यावर जीवापाड प्रेम करायचं आणि कुणाचाहीं , अगदी तिच्या आई वडिलांचा विरोध झाला तरी, आणि तशीच वेळ आली तर शेजारच्या एखाद्या काकू, मामी किंवा आत्या यांच्या मदतीने बॉबीला मोटरसायकल वरून पळवून घेऊन जायचं, त्यासाठी मोटारसायकल लागते ह्याचा विचारही न करता, मनोमनी मी पक्कं ठरवून टाकलं होतं .
बस्स , आता अभ्यासात, नोकरीत कशातच लक्ष लागेना, अन्न गोड लागेना , बादशाही बोर्डिंगचे भरलेले पैसे वाया जाऊ लागले. डोळ्यासमोर सतत कुठलीतरी बॉबी कुठल्यातरी पिठात बुडवलेले हात येऊन उभी असल्या सारखं दिसु लागली.
कोण असेल आपली बॅाबी ?
कुठे असेल ती ? कशी असेल? विचार करून मेंदूचा पार भुगा व्हायची वेळ आली .
आणि एक दिवस मला बॉबी भेटली . त्याचं काय झालं ,मी पुण्यात कॉट बेसिसवर मित्रमंडळ हॉल परिसरातल्या ज्या होस्टेलमधे राहात होतो त्या आमच्या वसतिगृहाच्या बाजुलाच एक टुमदार दुमजली बंगला होता. बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक छान प्रशस्त बाल्कनी होती . हा बंगला कुणा विनायक परांजपे नावाच्या बड्या सरकारी अधिकार्याचा होता.. रोज संध्याकाळी आम्ही ज्यावेळी आमच्या रुमच्या बाल्कनीत येऊन उभा रहात होतो त्याच दरम्यान एक 19/20 वर्षांची मुलगीही त्या बंगल्याच्या बाल्कनीत उभी असायची. ती त्या बंगल्याच्या मालकाची मुलगी होती.
त्याचवेळी आम्हीही कांहीं रूममेट्स संध्याकाळी ॲाफिसमधुन परत आल्यावर आमच्या रुमच्या बाल्कनीत रस्त्यावरच्या गमतीजमती बघत उभे रहात असायचो. मला रस्त्यावर दिसणार्या हालचालींवर मजेशीर कॅांमेंट्स करायची सवय होती. मी केलेली कॅांमेंट बहुधा तिला ऐकु यायची. कारण त्यांवर ती खुदकन हसायची. माझे रुम पार्टनर तर मला सांगायचे की तु ॲाफिस मधुन परत यायची वेळ झाली की ती बाल्कनीत येऊन उभी राहते. सुरूवातीला मला ते खरं वाटलं नव्हतं पण नंतर मी वॅाच ठेवल्यावर माझ्याही ते लक्षात आलं. ती सारखी माझ्यावर लक्ष ठेऊन असायची. माझ्या कॅांमेट्सना हसून दाद द्यायची. मलाही त्यात गंमत वाटु लागली. माझे सर्व रुम पार्टनर्स तर मला कायम तिच्यावरून चिडवायचे आणि तिलाही ते आवडत असावं.
आम्हाला रोज सकाळी चहासाठी शेजारच्या उडप्याच्या हॉटेलमधे जायला लागायचं. पण आम्हा सगळ्या रुम पार्टनर्सना रोज रोज चहासाठी त्या हॉटेलात जाण्याचा कंटाळा आला होता त्यामुळं चहा रोटेशननं रूम वरच करायचं ठरलं .
आमच्यातल्या एकाकडे इलेक्ट्रीकची हॅाटप्लेट होती. साखर, चहा पावडर, कप बश्या, गाळणं वगैरे सगळं तुळशीबागातून आणुन झालं . एक आठवडा एकानं दूध आणायचं, एकानं ते तापवायचं आणि एकानं चहा करायचा असं ठरलं .
आणि एक दिवस माझा दूध आणायचा क्रम आला. रोज सकाळी मित्रमंडळ हॉल जवळच पाटणकर नावाचं एक कुटुंब रहात होतं. त्यांच्याकडे दूध मिळायचं. मी रोज तिथे दूध आणायला जाऊ लागलो. एक दिवस असाच मी दूध आणायला गेलो असताना पाटणकर काका तेथे दुधाच्या बुथवर पेपर वाचत बसले होते. “काय गोवंडे कसं काय चाललंय ? चहा जमतोय न करायला ?” पाटणकरांनी गमतीनं विचारलं. “हो, न जमायला काय झालय ? मी खूप छान चहा करतो , या कधीतरी प्यायला.” दुधाची पिशवी हातात घेत मी म्हणालो आणि परत निघालो इतक्यात , “गोवंडे माझं एक काम करा नं , तुमच्या होस्टेलच्या शेजारीच परांजपे नावाचे एक सरकारी अधिकारी राहतात , त्यांच्या घरी एवढी हि दुधाची पिशवी देता का? त्यांची मुलगी वृंदा रोज येते दूध आणायला पण अजून आलीच नाहीय आज”
अच्छा म्हणजे रोज गच्चीत उभी राहणाऱ्या मुलीचं नाव वृंदा होतं तर! “हो देतो कि” मी म्हणालो आणि पाटणकरांनी दिलेली दुधाची आणखीन एक पिशवी घेऊन तिथून बाहेर पडलो.
परांजप्यांचा बंगला आमच्या हॉस्टेल शेजारीच होता. मी दारावरची बेल वाजवली . बऱ्याच वेळानं परत एकदा बेल वाजवल्यावर “आले आले” अशी आतून हाक ऐकू आली आणि पाठोपाठ कुणीतरी दार उघडलं.
एक मुलगी दात घासायचा ब्रश तोंडात अडकवून दाराच्या आत उभी होती. तोंडात पेस्ट तशीच दिसत होती. “कोण हवंय तुम्हाला?” तोंडातली पेस्ट बाहेर ओघळणार नाही याची कशीबशी खबरदारी घेत तिनं विचारलं. उत्तरादाखल मी फक्त हातातली दुधाची पिशवी पुढं करत म्हणालो “पाटणकरांनी दिलीय, तुमच्या घरी द्यायला सांगितलीय.”
“ओह ! सॉरी सॉरी , तुम्ही आत यानं , बसा मी आलेच ” असं म्हणत दुधाची पिशवी हातात घेऊन ती ललना आत पळाली . मी मुकाट्यानं सोफ्यावर बसून राहिलो. इतक्यात ती परत आली . आता चेहरा , केस वगैरे अगदी छान सावरून आली होती.
“सॉरी हं , मी मगाशी जरा अवतारातच होते, आज रविवार आहे नं , रविवारी मी जरा उशिराच उठते. दाराची बेल वाजली तेंव्हा मी ब्रश करीत होते. मला वाटलं माझे पप्पाच आले म्हणून होती तशीच पळत आले, तुम्हाला विचित्र वाटलं असेल नं ?”
“नाही नाही , तसं कांही नाही , जरा गम्मत वाटली इतकच, पण तुम्हाला या अवतारात बघून मला बॉबी चित्रपटातली डिम्पल कपाडिया आठवली. फरक इतकाच की ऋषी कपूर जेंव्हा दारावरची बेल वाजवतो तेंव्हा ती दार उघडते तेंव्हा तिचे हात पीठाने भरलेले असतात. आणि आज जेंव्हा मी तुमच्या दारावरवजी बेल वाजवल्यावर तुम्ही दार उघडलत तेंव्हा तुमचे तोंड टूथपेस्टचा फेसानं भरलेलं होतं, म्हणुन गंमत वाटली एवढच” सोफ्यावरून उठून निघताना मी म्हणालो. त्यावर ती एकदम खुद्कन हसली आणि म्हणाली “कांहींतरीच तुमचं!
मी रूमवर परत आलो पण डोळ्यासमोरून तिचा तो गोड चेहरा जातच नव्हता . किती छान दिसत होती ती त्या अवतारात! बॉबी, माझ्या मनात असलेली हीच ती बॉबी. फरक इतकाच हिचे हात कुठल्यातरी पिठात घातलेले दिसत नव्हते तर तोंड टूथपेस्टच्या फेसानं भरलेलं होतं .
अरे, पण मी आय लव्ह यू म्हणायला विसरलोच की!धाडसच झालं नाही , बघु परत कधीतरी असं म्हणत मी माझ्या मनाची समजूत काढली.
त्यानंतर मी रोजच दुध आणायचं काम माझ्या रुम पार्टनर्स कडून मागुन घेतलं कधीतरी माझी बॅाबी मला भेटेल या आशेने.
आणि एक दिवस मला ती भेटलीच. मी पाटणकरांच्याकडून एका हातात दुधाची पिशवी आणि दुसऱ्या हातात पाटणकरांच्या बागेतून तोडून आणलेलं लाल गर्द गुलाबाचं टप्पोरं फुल धरून आमच्या होस्टेलकडे येत होतो. इतक्यात ती समोरून येताना दिसली. छान गोरापान तजेलदार चेहरा, गालावर लाडिकपणे रेंगाळणारी गोड खळी, कपाळावर रुंजी घालणारी, बॅाब केलेल्या केसांची एक बट एका हाताने सावरत आणि दुसऱ्या हातातली बास्केट मागेपुढे खेळवत आपल्याच तंद्रीत ती येत होती.
तिला बघून मी थांबलो आणि म्हणालो “हाय बॉबी “. तीनं चमकुन माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली “ओ हाय! तुम्ही? आणि हे ‘बॉबी’ काय?
“अहो मीच, परवा तुमच्याघरी दुधाची पिशवी द्यायला आलो होतो, म्हंटलं ओळखताय की नाही? आणि बॉबी म्हणालो कारण त्यादिवशी मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का? ती बॉबी चित्रपटातली पीठाने माखलेल्या हाताची डिम्पल आणि तोंडात टूथपेस्टचा फेसानं भरलेला तुमच्या तोंडाचा तोबरा बघून मलाही तुम्हाला बॉबी म्हणावसं वाटलं , असं म्हणत मी हातात धरलेलं गुलाबाचं फुल तिच्या पुढं धरलं.
“अय्या कित्ती छान! थँक्यू , मी पुढं केलेलं फुल हातात घेत ती म्हणाली.
“तुम्ही पण रोज दूध न्यायला येता का पाटणकरांच्या कडे?” मी विचारलं .
“हो, मी रोज सकाळी पर्वतीला जाते आणि येताना दूध घेऊन येते.
“ग्रेट ! मी पण उद्यापासून पर्वतीला यावं म्हणतोय , तुम्ही किती वाजता बाहेर पडता ? मी हसून विचारलं . “मी बरोब्बर सहा वाजता बाहेर पडते, सूचकपणे इशारा देत ती हसत निघून गेली.
आणि मग दुसरे दिवशी पासून घड्याळाचा पहाटे 5 चा अलार्म लावून,भराभरा सगळं आवरून नित्यनेमानं पर्वतीला जाण्याचा माझा उपक्रम सुरु झाला. मग रोजच तिची भेट होऊ लागली. एक दिवस पर्वती उतरून आम्ही पायथ्याशी एका पायरीवर बसलो. “तु काय करतोस रे ” तिनं मला विचारलं. “मी , मी एका विमा कंपनीत आहे. “आणि तुझ्या घरी कोण कोण असत? आणि मुळात तु होस्टेलला का राहतोस?” वृन्दानं विचारलं.
“अगं माझं गाव इचलकरंजी, आमचं घर आहे तिथं, मला इथं जॉब मिळाला म्हणून इथं होस्टेलला राहतोय, पण का गं ? असं का विचारलंस ?” मी प्रश्न केला.
“तसं नाही रे , पण असं किती दिवस भेटत राहायचं आपण ? माझ्या बाबांची आता बदली होणार आहे मुंबईला, तिथं त्यांना फ्लॅट मिळणार आहे, लवकरच आम्हाला मुंबईला शिफ्ट व्हावं लागेल. पुढं काय करायचं ठरवलं आहेस तू? तुला माझ्या बाबांना भेटावं लागेल. नाहीतर आपण इथंच थांबलेलं बरं .” किती स्पष्टपणे बोलत होती वृंदा .
पुण्याच्या मुली भलत्याच सडेतोड असतात असं ऐकलं होतं ते आज प्रत्यक्षात अनुभवलं. “आणि तुझ्या बाबांनी परवानगी दिली नाही तर?” मी प्रश्न केला.
“मग मला मोटारसायकलवरून पळवून न्यायचं त्या बॉबी चित्रपटातल्या ऋषी कपूर सारखं “वृंदानं लगेच सोल्युशन देऊन टाकलं . यांवर मी काय बोलावं हेच मला कळलं नाही, मी नुसतीच मान डोलावली. तिला कदाचित माझ्याकडून लगेच होकाराची अपेक्षा असावी. पण मी पुढे कांहीच बोलत हे बघुन ती ताडकन उठून “ओके, बाय’ असं म्हणत परत फिरली.
मग असे प्रसंग वारंवार यायला लागले. पण मला याच्यापुढे पाऊल पुढे टाकायचं धाडस मात्र झालं नाही. कारण त्यावेळेला मी कुणीच नव्हतो. एका अपघातात एका मनुष्याच्या मृत्युला कारणीभुत झालेला, शिक्षण अर्धवट सोडलेला, पुण्यासारख्या ठिकाणी महीना २५० रु. पगार असलेला मी तिला कसा रिस्पॅान्स देणार होतो?
आणि मग मी ठरवलं, तिला स्पष्ट कल्पना द्यायची की मी सेटल होईपर्यंत तुला कांहीं वर्षं थांबावं लागेल. आणि एक दिवस पर्वतीच्या पायरीवर बसून मी तिला याची कल्पना दिली. माझं बोलणं ऐकून ती ताडकन उठली आणि म्हणाली “का केलस असं? त्यावर, तिचा हात धरुन तिला मी थांबवलं आणि म्हणालो “वृंदा , तुला काय वाटतं? मी जरी तुझ्या बाबांना भेटलो असतो तरी दिली असती परवानगी त्यांनी आपल्या लग्नाला? शक्यच नाही.”
“मग त्या बॅाबीतल्या ऋशी कपुर सारखं, मोटरसायकलवरून मला पळवुन न्यायचा ॲाप्शन दिला होता की मी तुला, त्या बॅाबीतल्या ऋशी कपुर सारखं, वृंदा सहजच बोलुन गेली.
“पण त्यासाठी आधी मला कुणाचीतरी मोटरसायकल पळवून आणावी लागेल” मी खोटं खोटं हसत उत्तर दिलं. “मग चोरून आणलीस की सांग मला” असं म्हणत तणतणत ती निघून गेली.
त्यानंतर कांही दिवसानी तिचं बाल्कनीत उभे रहाणं बंद झालं. तिच्या वडिलांची मुंबईला मंत्रालयात सचिव पदावर बढती होऊन बदली झाली होती. ते कुटुंब तिथून गेलं तसं माझही बाल्कनीत उभं राहण्याचं आकर्षण संपलं. का कुणास ठाऊक आता रुमवर चहा करायचा कंटाळा येऊ लागला आणि एक दिवस तो बंदही झाला.
आणि एक दिवस अचानक तिचा माझ्या ऑफिसमधे फोन आला. “माझं लग्न ठरतंय , मुलगा आर्मीत कॅप्टन आहे. तुला मोटरसायकल मिळाली असेल तर लगेच ये” असं म्हणून तिनं फोन बंद केला.
त्यानंतर चार एक वर्षे गेली असतील. माझी इचलकरंजीला बदली झाल्याची ॲार्डर आली होती . त्यामुळे आमच्या वसतिगृहात रोज निरोप समारंभ सुरू होते. मला इचलकरंजीला जायला कांही दिवसच राहीले होते. २५ डिसेंबर १९७४, माझ्या वाढदिवसाची तारीख होती ती. त्यादिवशी पुण्यातला माझा एक जीवलग मित्र, प्रमोद थत्ते, रुम वर आला आणि म्हणाला ‘चला आज तुझा वाढदिवस साजरा करू. तुला माझ्यातर्फे ट्रीट व ‘सेंडॲाफ’. मस्त पैकी ‘सेव्हन लव्ह्ज’ला जेवायला जाऊ नि त्यानंतर रात्रीचा शो बी.आर चोप्राचा ‘धुंद’.
मी आपली तिकिटे काढूनच आणली आहेत. मस्त सस्पेन्स थ्रिलर आहे. ‘सुरवात चुकू नका शेवट सांगू नका’ या कॅटेगरीतला. प्रमोद नं मला कांही चॅाईसच ठेवला नव्हता.
त्यारात्री ‘सेव्हन लव्ह्ज’ ला मस्त जेवण झालं. जेवण उरकुन आम्ही अप्सरा थिएटर पाशी आलो. पण आम्ही येईपर्यंत चित्रपट सुरू झाला होता. अंधारात चाचपडतच आम्ही आमच्या खु्र्च्यांवर बसलो. शेजारच्या खुर्चीवर कोण बसलय ते अंधारात नीट ओळखु येत नव्हतं. कुणीतरी जोडपं बसलं होतं एवढच कळलं.
मध्यांतर झाला नि एकदम थिएटर मधले लाईट लागले. इतक्यात बाजुच्या खुर्चीवरून कुणीतरी ओरडलं ‘अय्या तुम्ही? मी चमकुन बघितलं , तीच होती ती, वृंदा, वृंदा परांजपे.
‘अरे वृंदा तु? बाबांची परत पुण्याला बदली झाली वाटतं? मी आश्चर्याने विचारलं.
“नाही, नाही, माझं लग्न झालं, आता मी पुण्यातच असते, मुकुंदनगर मधे राहते , हे माझे मिस्टर, कॅ.शेखर बर्वे, आर्मी मधे आहेत.” तिनं माझी तिच्या मिस्टरांशी ओळख करून दिली. पण कॅप्टन बर्व्यांना ते फारसं आवडलं नसावं. कॅप्टन बर्वे एका पायांनी अधू होते. बहुतेक कुठल्यातरी युद्धात त्यांनी एक पाय गमावला असावा.
“हॅलो, ग्लॅड टु मीट यु, मी अशोक गोवंडे , मी यांच्या शेजारी रहात होतो, असं म्हणत मी त्याच्याशी हस्तालोंदन केलं.
“ग्लॅड टु मिट यु टू ” असं उत्तरादाखल ते म्हणाले खरे पण लगेच “एक्सयूज मी ” असं म्हणत कांहीतरी आणायला म्हणून बाहेर गेले. “तुम्ही उशीरा आलात वाटतं नेहमीप्रमाणं ? सुरुवात चुकली तुमची” तुम्ही आलात तेंव्हा सिनेमा सुरू झाला होता” ते बाहेर गेल्यावर मिस्कीलपणे टोमणा मारत ती म्हणाली.
“तु कशी आहेस?” उत्तरादाखल मी वृंदाला विचारलं. “छान, अगदी या चित्रपटातल्या नायिके सारखी , माझी अवस्था तिच्यापेक्षा फारशी वेगळी नाही” असं कांहीसं ती पुटपुटली .
“म्हणजे ? मला तिच्या बोलण्याचा कांहीच अर्थबोध नं झाल्यानं मी विचारलं.
“ते जाऊदे ,पण मला एक सांग “तुला तुझी बॉबी मिळाली कि नाही अजून?” तीन हळु आवाजात मला विचारलं. मी त्यावर कांहीच बोललो नाही. इतक्यात कॅप्टन हातात पॉपकॉर्नची पॅकेट्स घेऊन आला आणि वृंदाकडे बघत म्हणाला “हॅव इट ” आणि माझ्याकडे बघत मला उद्देशून म्हणाला “झाल्या का एक्स.गर्लफ्रेंडशी गप्पा मारून?” येताना बहुतेक तो आम्हाला बोलत असलेलं पहात होता हे त्याच्या बोलण्यावरून आणि कपाळावरच्या आठ्यांवरून स्पष्ट दिसत होतं .
“अहो काय बोलताय हे? वूई वेअर जस्ट फ्रेंड्स” वृंदा त्याला समजावण्याचा प्रयत्न करु लागली. “ओह, जस्ट शट अप अँड वॉच दी मुव्ही ” हातातल्या कुबड्या खाली ठेऊन आपल्या खुर्चीवर बसत त्यानं वृंदाला सुनावलं.
इतक्यात सिनेमा परत सुरू झाला आणि मी परत माझ्या चेअरवर जाऊन बसलो. पण माझं सिनेमात लक्ष होतं कुठं? मी तिच्या टोमण्याचा आणि तिनं तिची तुलना चित्रपटातल्या नायिकेशी करणं या सगळ्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होतो.
सिनेमा संपला, आम्ही परत निघालो. परत जाताना, वृंदा माझा निरोप घेण्यासाठी आमच्या जवळ आली व डोळ्यात पाणी आणून मला उद्देशून म्हणाली, “बघितलंस? चुकीच्या सुरवातीचा शेवट कसा होतो ते?” असं म्हणत ती नवऱ्याची वाटही न पाहता झपाझप पावलं टाकत निघून गेली.
पाठोपाठ तिचा नवराही माझ्याकडे रागानं बघत लंगडत लंगडत “वेट , वेट असं म्हणत तरातरा तिच्या मागे गेला.
मी सुन्न होऊन नुसता बघतच राहिलो. आत्ता कुठं मला तिच्या “या चित्रपटातल्या नायिकेपेक्षा माझी अवस्था कांही वेगळी नाही” या तिच्या विधानाचा अर्थ कळला.
मला तिला सांगावसं वाटलं “वृंदा सुरवात तर मी मुद्दामुनच चुकवली होती, पण तुझ्या बाबतीत त्याचा शेवट असा होईल असं वाटलं नव्हतं , आणि ‘बॉबी’ म्हणशील तर तुझ्या रूपात मला खरंच ती मिळाली होती पण तेंव्हा माझ्याकडे तुला पळवून घेऊन जायला मोटारसायकल तरी कुठं होती? चित्रपटात आणि प्रत्यक्ष आयुष्यात हाच तर फरक असतो. बघू, भविष्यात काय लिहून ठेवलय माझ्या ते” असं मनाशीच म्हणत नि माझ्या मित्रांसमवेत थिएटर बाहेर पडलो.
शेवटी जीवन म्हणजे तरी काय?
“एक धुंदसे आना है एक धुंदमे जाना है!”
समाप्त.
©️®️अशोक रा. गोवंडे
सदर कथा लेखक अशोक रा. गोवंडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखकाची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.