कुटुंब

©️®️ सायली जोशी.
सासुबाई आजारी पडल्या आणि चारुला कळलं, आपल्या सासऱ्यांना जेवणातलं खूप काही येतं!
रोज सकाळी लवकर उठून ते आपल्या बायकोसाठी नाश्ता करत. तसा सगळ्यांनाच तो होई. पण त्यात नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम जरा जास्त होतं. 
“बाबांच्या हाताला काय मस्त चव आहे ना.” असं म्हणत चारू मनापासून त्या नाश्त्याच्या आनंद घेई. 
“बाबांच्या हाताला चव आहे म्हणून स्वयंपाक घरातून तुझी सुटका झाली असं समजू नको.” राघव हसत हसत म्हणाला.
“तसं नाही..मी फक्त कौतुक केलं त्याचं.” नाक मुरडत ती इतकंच म्हणाली.

चारू स्वभावाने खूप प्रेमळ होती. घरादाराला जोडून ठेवणारी, हसून -खेळून वागणारी होती. तरीही बायको आजारी पडली तशी बाबांनी स्वयंपाक घराची बरीचशी जबाबदारी स्वतः कडे घेतली. आपल्या बायकोला काय आवडतं, हे त्यांना नेमकं ठाऊक होतं. त्यानुसार ते जेवण बनवत. चारू पोळ्या, भाकऱ्या करे. वरवरची कामं करे. उरलं – सुरलं बघे. कधी बाबांच्या हाताखाली करे. 
तिलाही सासुबाईंची काळजी होती. पण या सगळ्याची गंमत वाटायची. एक पुरुष आपणहून, काही न बोलता बायकोची इतकी काळजी कसा काय घेऊ शकतो? या पिढीचं प्रेम हे असंच. न बोलता मनातलं सगळं समजून घ्यायचं आणि व्यक्त करायचं. सारं नजरेनं बोलायचं.
“राघव, तू अशी माझी काळजी घेशील ना?” चारू एक दिवस नवऱ्याला म्हणाली.
“त्याऐवजी तशी वेळच कधी येऊ नये असं म्हण.” राघव.
“का?”

“तू आजारी पडलीस तर माझं कसं होईल?” त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून तिचं मन कासावीस होई. ‘बाबांना अगदी असंच वाटत असावं. नवरा -बायकोचं नातं असंच असतं. नाही का? एकमेकांशिवाय ते राहू शकत नाहीत.’ तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं.
“चारू..”
खोलीतून हाक आली, तशी ती आत पळाली.
“अगं, तू काही कामं करतेस की नाही?” सासुबाई तिला विचारत होत्या.
“ती सगळं करते. पण मीच तिला थांबवतो. माझ्या बायकोची जबाबदारी आधी माझी आहे. माझ्या माघारी मग काहीही होवो.” बाबा मागून खोलीत येत म्हणाले.

“बाबा, उगीच काही तरी बोलू नका. तुम्हाला आईंची सेवा करायची असेल तर इथे त्यांच्या जवळ बसून करा. त्या कपाटात इतकी पुस्तकं पडली आहेत, ती वाचून दाखवा. जुने अल्बम काढा, जुने दिवस त्यातले सुख -दुःखाचे प्रसंग आठवा. मी बाकी सगळं बघेन.” चारू प्रेमळ स्वरात म्हणाली.
“माझी काही तक्रार नाही बाळा, मी सहज विचारलं. आपण बायका पुरुषांसाठी आयुष्यभर काही ना काही करतच असतो. नशिबाने आता त्यांना संधी मिळाली आहे तर करू देत.” सासुबाई किंचित हसत म्हणाल्या.
त्यांच्या चेहऱ्यावर काळजी, चिंता, प्रसन्नता, शांतता अशा भावनांचे मिश्रण झाले होते. ते पाहून सर्वांनाच कसेसे झाले.

‘आजपर्यंत सून, नवरा, मुलगा या सर्वांची साथ चांगली लाभली. इथून पुढे ती तशीच राहो आणि माझ्या माघारी हे कुटुंब नेहमी एक राहो.’ सासुबाई मनातल्या मनात म्हणाल्या.
“आई..” चारूचा आवाज कापरा झाला.
“तुमच्याशिवाय घराला घरपण नाही. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. मला बाकी काही नको.” जणू चारूने आपल्या सासुबाईंच्या मनातलं ओळखलं होतं.
“जा. तू पोळ्या आणि भाजी कर. मी मस्त खिचडी टाकतो.” वातावरण गंभीर बनलेलं पाहून बाबा म्हणाले.
“आणि आहेच का? तुम्ही काही ऐकणार नाही.” असं म्हणत लटक्या रागानं चारू आत पळाली.

बाहेर पावसाळी वातावरण झालं होतं. विजा चमकत होत्या. घरातले दिवे कधी जातील याचा नेम नव्हता. चारूने पट्कन तयारी केली. झटपट स्वयंपाक केला अन् लाईट गेले.
“खिचडी टाकलीस? अगं, मी येतंच होतो.” बाबा.
“दिवे जाण्याआधी सगळं करून घेतलं. आज तुम्हाला विश्रांती. बरं, तुम्ही दोघं मस्त कॅन्डल लाईट डिनर करा.” तिने जेवणाची दोन ताटं तयार करायला घेतली.
हे पाहून बाबांनी चारुच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. “चारू, मुलगी नसल्याची उणीव तू भरून काढलीस. ही जेव्हा आजारी पडली ना, तेव्हा मन फार कासावीस झालं. इतकी वर्षे मी तिला पहाडा सारखं घट्ट पाय रोवून उभं असलेलं पाहिलं अन् अचानक ती कोलमडून गेलेली पाहून मन अस्वस्थ झालं. ती सोडून जाते की काय? अशी कल्पना सुद्धा सहन होईना. 

इतक्या वर्षांचा सहवास असला तरी अजूनही ओढ शाबूत आहे. मला या भावनिक वातावरणाची भीती वाटते गं म्हणून तिला जपण्यासाठी ही जबाबदारी अंगावर घेतली मी. ती लवकर बरी व्हावी अन् माझ्या हातून तिच्यासाठी काहीतरी चांगलं घडावं, नसते विचार मनात येण्यापेक्षा मी गुंतून राहावं यासाठी हा सगळा घाट..”

“आपण सगळे एकमेकांसोबत आहोत ना? मग का काळजी करता बाबा? आई लवकरच बऱ्या होतील. तुमच्या सारखा जोडीदार सर्वांनाच मिळत नसतो काही. मलाही बाबा असते तर तेही अगदी तुमच्यासारखे असते.” चारू भरल्या आवाजात म्हणाली.
मेणबत्तीच्या प्रकाशात बाबांचा चेहरा भकास, उदास दिसत होता. पण मनातलं बोलल्यामुळं त्यांना खूप हलकं वाटत होतं. हे सगळं ऐकून चारूच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं, ते ओढणीने पुसत ती म्हणाली,
“बाबा, गंभीर वातावरण मलाही आवडत नाही. सुख निघून जातं त्यानं आणि आपलं सुख परिस्थितीच्या हाती का द्यायचं? ते तर मनातून वाटलं पाहिजे ना? आयुष्यातला प्रत्येक क्षण मनासारखा जगता यायला हवा. चला, आपण सगळे मिळून कॅन्डल लाईट डिनर करू.”
“चल, आज माझी आई असती तर अगदी तुझ्यासारखी बोलली असती बघ.” बाबा म्हणाले.

तिने भरकन चार ताटं तयार केली. दिवे नसल्या कारणाने राघवचं कामही कधीच थांबलं होतं. तो सून आणि सासऱ्यांचा संवाद ऐकत स्वयंपाक घराच्या दरवाज्यात उभा होता.
‘पाहता पाहता चारूने या घराला आपलंस केलं. मी माझ्या आई -वडिलांच्या मनातलं जितकं ओळखू शकलो नाही, तितकं ती त्यांना ओळखते. या बायका पण कमालीच्या हुशार असतात म्हणूनच देवाने सासरी येण्याचे अवघड काम त्यांच्यावर सोपवले असावे.’ राघव मनातल्या मनात म्हणाला.
इकडे बघता बघता सासुबाईंची खोली मेणबत्त्यांच्या प्रकाशने उजळून निघाली. मोबाईलवर वाजणारे मंद संगीत हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घेत असल्याचा भास निर्माण करत होते.
जेवताना चौघांचेही चेहरे प्रसन्न दिसत होते.

सासू आणि सासऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निरखत चारू आणि राघव मनातल्या मनात आपल्या भविष्याचे बेत आखण्यात हळूच बिझी झाले होते. 
बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत बाबा कितीतरी दिवसांनी समाधानाने जेवत होते आणि आपले कुटुंब असेच एकसंध राहावे म्हणून चारुच्या सासुबाई मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करू लागल्या. त्यांचे सुखी कुटुंबाचे चित्र कधीच पूर्ण झाले होते.
समाप्त.
©️®️ सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ (नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!