प्यार तो होना ही था !

©®सौ. प्रतिभा परांजपे.
“हे बघ आई,” राधिका म्हणाली, “मी तुला आधीच सांगितले आहे मला  अश्या कांदे पोहे कार्यक्रमात अजिबात इंटरेस्ट नाही. आणि सध्या मला माझं करिअर महत्त्वाचं वाटतं त्यावरच मला कॉन्सन्ट्रेट करू दे , मला नागपूरला येणं जमणार नाही.”
“अगं– पण पाह्यला काय हरकत आहे,? ओळखितल स्थळ आहे ! तुला कोणी पसंत आहे कां? तसं असलं तरी हरकत नाही.”
“नाही ग बाई!..”
आईचं म्हणण ऐकता ऐकता राधिका ने रागाने फोन ठेवून दिला…
‘काय लग्न लग्न लावून ठेवलं आहे आईने, म्हणूनच मी आत्ता जातच नाही’ असे म्हणून ती ऑफिसला जायची तयारी करू लागली.
लंच अवर वर मध्ये प्रिया बोलली, “अग मी दोन-तीन दिवसाच्या या सुट्टीत सासरी इंदोरला जाती आहे.”

“एकटी जाते?”
“हो म्हणजे, नंतर दोन दिवसांनी प्रशांत येणार आहे, परत येताना आम्ही बरोबरच येऊ.”
“वाह मज्जा आहे” राधिका ने असे म्हणताच, “तुझा काय प्रोग्राम आहे?” ’प्रिया ने विचारले.
“मी तोच विचार करते आहे, आई बोलावते आहे नागपूरला. पण मी नाही येत असे सांगितले. तिचं तेच स्थळ पाहणं वगैरे, मला सध्या ते नकोय .”
“अगं पण पाहिलं आणि लगेच ठरल असं तर होत नाही.”
“तरीही नकोच, ती रिस्क नको आहे.”
“मग सुट्टीत काय झोपा काढणारं आहे?”

 “पाहते ग ! सुट्टीत बोर होतंं.”
“असं कर ना, चलते  इंदौरला माझ्यासोबत? खूप छान शहर आहे मस्त फिरू आपण.”
“इंदोरला? अग माझी मावशी पण राहते तिथे.”राधिका उत्साहात म्हणाली.
“मग? काय ते लवकर सांग विचार करून. रिझर्वेशन मिळत नाही. माझं झालं आहे.”
रात्री राधिका ने प्रियाला फोन केला’ मी चलते ग इंदोरला! पण रिझर्वेशन?
“पाहते ग. आरएसी मिळते का नाही तर तात्काळ मध्ये पाहू.”
सकाळी सकाळी राधिकाने आईला फोन केला ‘आई मी प्रिया बरोबर इंदौर फिरायला जाते आहे दोन दिवसांसाठी.’
“इंदोरला –का ?”

“सहजच, मावशीलाही भेटायला जाईन ग एक दिवस.”
“जा बाई, इथे नाही तर तिथे तरी!”
“हो, पण मावशीला कळवत नाहीये, सरप्राईज देणार आहे.”
रात्री राधिका आणि प्रिया स्टेशनवर भेटल्या  गाडी  थोडी लेट होती. चार्ट वररिझर्वेशन कन्फर्म नाही.
“पाहू माझी बर्थ आहे लोअर, काहीतरी करु “ प्रिया म्हणाली.
गाडीत बसल्यावर टी.सी.ला विचारले, समोरची लोअर सीट रिकामी दिसते कोणी आलं नाही ?
“पुढच्या स्टेशनवरून चढणार आहे.”
पुढचं स्टेशन यायला दोन तास तरी लागतील तोपर्यंत झोपून घ्यावे  असा मनात  विचार करून राधिका आडवी झाली

गाडी आपल्या गतीने धावत होती. थंडीचे दिवस, गाढ झोप लागली ति सरळ पहाटेच उघडली .
राधिका ने दोन्ही हात वर करून मस्त आळस देत इकडे तिकडे पाहिले. एक सुदर्शन तरुण तिच्याकडे पाहत आहे असे दिसतात ती बावरली. हात खाली करून ती खिडकी बाहेर पाहू लागली.
तेवढ्यात प्रिया ही उठली. तिनेही आजूबाजूला पाहिलं साईड लोअर सीटवर एक आजी  झोपल्या होत्या, त्यांच्या पायाशी एक तरुण युवक बसला होता . 
थोड्याच वेळात ती वयस्क स्त्री उठून बसली तशी तो बाजूला उभा राहिला.
“अरे तू रात्रभर बसूनच होता? तुझे रिझर्वेशन नव्हते?”
“होतं ना.”
“कोणता बर्थ?” प्रियाने शंका काढली.
“24 नंबर,” राधिका बसलेल्या बर्थ कडे बोट करून तो म्हणाला.

“ अरे बापरे मग तुम्ही रात्रीच का नाही आला? उठवायचं होते ना!”
“आलो होतो. पण यांना शांत झोप लागली होती. म्हणून उठवणे योग्य नाही वाटलं.”
राधिकाला आता संकोचल्यासारखं वाटायला लागलं. याच्या बर्थ वर आपण मस्त ताणून दिली आणि हा  बिचारा कुडकुडत बसला.
तेवढ्यात प्रिया म्हणाली “सॉरी हं तुम्हाला फारच त्रास झाला.”
राधिकालाही मनातून सॉरी म्हणावेसे वाटत होते पण का कोण जाणे त्याच्याकडे बघायचा संकोच वाटत होता.
“सकाळचे सहा वाजले तरी अजून भोपाळ आलं नाही? गाडी बरीच लेट झाली वाटतं.” आजी म्हणाल्या.
तेवढ्यात  “गरमा गरम चाय वाला” चहा वाल्याचा आवाज आला.
प्रियाने राधिका कडे पाहत’ चहा शिवाय काही झोप उडणार नाही ‘म्हणत दोन चहा घेतले ‘’चाय वाला’ म्हणत चहावाला इकडे तिकडे पाहू लागला.

“अरे बाबा आधी टॉयलेटला जाऊ पाहते. पण ही गाडी इतकी हलते की मला भय वाटतं.” आजी म्हणाल्या.
“या आजी, मी हात धरून घेऊन चलतो तिथपर्यंत,” म्हणत त्या तरुणाने आजींना टॉयलेट पर्यंत पोहोचवून दिलं व परत घेऊन आला. प्रियानेही आपल्या बॅगमधून पेस्ट ब्रश काढून तीही टॉयलेट जाऊन आली. चहा पिता पिता आजींनी विचारलं’ तुझं नाव गावं काय रे?
“आजी मी मयंक साने, नरसिंगपूरला बँकेत आहे.”
“लगीन झालं का रे तुझं?”
राधिका हातातल्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप पाहत होती .आता तिचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे गेलं.
“नाही आजी मुलगी पाहायलाच जातो आहे.”
एंगेज होणार! याला कोण नाही म्हणेल, राधिका मनातल्या  मनात म्हणाली.
‘अरे तुझ्यासारख्या राजबिंड्या मुलाला कोण मुलगी नकार देईल ? मूर्खच असेल ती.”

राधिका उठून टॉयलेटला गेली. तिथे आरशात पाहून तिने आपला अवतार आवरला , केस नीट केले चेहरा स्वच्छ करून  चेहर्यावर पफ फिरवला. फ्रेश झाली.
राधिकाला गेलेली पाहून मयंक ने आपल्या फोनवर असलेला फोटो  पाहिला, हो हिच ती. राधिका नांव, अगदी मला  हवी तशीच. फोटो पेक्षा सुंदर. पण जरा अबोल वाटते.
“तुला कशी बायको हवी सांग बघू ?माझ्या  ओळखीचे आहेत त्याची मुलगी…”
“नाही आजी, आता गरज पडेल असं वाटतं नाही.”
थोड्याच वेळात  नर्मदा एक्स्प्रेस  भोपाळ स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला लागली. भोपाळ राजधानी, मोठ्ठं स्टेशन गाडी बराच वेळ थांबली. “इथे ब्रेड पकोडे मस्त मिळतात , तुम्हाला   आणून  हवे कां?”  मयंक ने विचारले.
राधिका कडे पाहत प्रिया म्हणाली, “अगं खाऊन पहा. खूप मस्त असतात.”

राधिका  हो म्हणाली. खाऊन झाल्यावर प्रिया ने ताणून दिली.
भोपाळ स्टेशनवर वरच्या बर्थ वरचे प्रवासी उतरून गेल्याने ती रिकामी होती . त्यावर चढून फोन पाहतपाहात मयंक आडवा झाला. 
तो इतक्या जवळ राधिका ला आता कसकसचच वाटू लागल. मधून मधून तिची नजर त्याच्याकडे वळू लागली आणि तोही पाहतो आहे असे वाटल्यावर तिला लाजल्यासारखे झाले.
थोड्याच वेळात प्रिया उठली व तिच्या नवऱ्याशी व नंतर  सासरच्‍यांची फोनवर बोलत  बसली.
साधारण तासाभराने एक जरा मोठे स्टेशन आल्यासारखे झाले गाडी थांबली, कुठलआहे बरं? राधिका ने खिडकीतून वाकून पाहिलं “सुजालपूर” प्लॅटफॉर्मवर चढण्या उतरणाऱ्यांची घाई गर्दी दिसत होती.
वरून मयंक खाली  आला व गाडीतून खाली  प्लॅटफॉर्मवर उतरला.
दुसऱ्या बाजूच्या फलाटावरून एक  फास्ट गाडी चे क्रासिंग झाले आणि थोड्याच वेळात यांच्या गाडीचा हॉर्न वाजला व गाडी हळूहळू पुढे सरकू लागली.

 मयंक अजून आलेला दिसत नव्हता आजींना पण काळजी वाटू लागली त्या प्रिया व राधिकाकडे पाहत म्हणाल्या, ”अग जरा बघ ना खिडकीतून हा पोरगा अजून चढला की नाही?” 
“आजी तुमचं काय नात आहे या मयंक शी?” प्रिया ने विचारले.
“नाही ग , काहिच नाही. रक्ताच नाही, ऋणानुबंध असतात , म्हणून भेटतात अशी माणसं. देव घडवून आणतो अश्या भेटी . गाडी हे एक निमित्त.”
गाडीने आता चांगलाच वेग धरला राधिका ने दोन-तीन दा खिडकीतून बाहेर पाहिलं, मग प्लॅटफॉर्मवर ही नजर टाकली पण मयंक दिसत नव्हता व जागेवरही आला नव्हता.
आपण का इतके अस्वस्थ आहोत? आपला काय संबंध? तो मुलगी पाहायलाच जातो आहे.

 तिने स्वतःच्या मनाला विचारले आवडायला लागला की काय ?असे जाणवतात तिचा चेहरा लाजेने लाल झाला.
“कां ग?” प्रियाने तिला हळूच चिमटा घेत विचारलं, “बाहेर कोणाची वाट पाहते?”
“नाही कोणाची नाही.” चोरी पकडली गेल्यासारखं वाटून ती मोबाईल पाहू लागली..
थोड्याच वेळात अचानक गाडी चेन ओढल्या सारखी थांबली, बाहेर गोंगाट ऐकू येत होता “चलती गाडी मे चढते समय पाव फिसला और नीचे गिर गया कोई नौजवान है।”
राधिका चा जीव  एकदम घाबरा झाला, तो अजून आला नाही. 
तिची अशी अवस्था पाहून आजी प्रिया ला म्हणाल्या, “अग जरा बाहेर उतरून पहा ना काय झाले आहे.”
प्रिया पाहून आल्यावर म्हणाली  कोणी अजून मुलगा आहे त्याला फारसं काही झालं नाही.

देवाचीच कृपा म्हणत आजींनी हात जोडले.
‘काय जीव घाबरला होता एक जणांचा.’ प्रिया राधिका कडे पाहत म्हणाली.;
“काहीतरीच काय?माझा काय संबंध?”
“हं– समजतय मला तुमच  काय चाललंय!”
बाजूच्या बर्थ वर मुला मुलींचा एक मोठा ग्रुप बसलेला होता. त्यांच्या गप्पांचा आवाज जोरात येत होता.
त्यातला एक जण म्हणाला ” चलो अंताक्षरी खेलते है टाइमपास हो जायेगा” म्हणताच जोरात गाणी सुरू झाली. त्यांच्यामध्ये दोन गृप बनले. एकावर एक गाणी होतं होती.
“शादी के लिए रजामंद कर ली मैंने एक लडकी पसंद करली ,उडती चिडिया पिंजरे मे बंद करली”  मयंक  चा आवाज  ऐकून, आला वाटतं हा,  तिकडे पाहून  आजी म्हणाल्या ,तशी राधिकाच्या जीवात जीव आला.

मुलगी पाहायला जातोय म्हणत होता. ठरेल ही त्याचे , पण मला का काहीतरी गमावल्यासारखे वाटते आहे ?राधिका ने मनाला समजावून पाहिल आपल्याला तर इतक्यात लग्न करायचं नाही अजून मग का अशी हुरहुर वाटते?
इंदोर येण्यात आहे असं वाटतं, प्रियाने बाहेर पाहत म्हटलं .आता सर्व प्रवासी हळूहळू सामान गोळा करू लागले.
राधिका ने पाहिलं मयंक ने आपली बँग आवरली आणि आजींचं सामान ही भरायला मदत करू लागला.
आता हा कधीही भेटणार नाही, विसरण कठीण होईल. राधिका ची पावलं जड झाली.
“आजी कोणी येणार आहे का घ्यायला तुम्हाला?” मयंक ने विचारले.
“हो माझा मुलगा येणार आहे.” आजी म्हणाल्या.
“बरं मी तुमचं सामान दाराशी घेऊन चालतो.” असे म्हणत त्याने आजींचा हात धरून त्यांना डब्याच्या गेटपाशी नेलं. गाडी हळूहळू प्लॅटफॉर्मवर लागली व थांबली.

प्रवासी भराभरा उतरू लागले, प्रिया व राधिका ही गेट पाशी आल्या. अचानक राधिकाला मावशी प्लॅटफॉर्मवर उभी दिसली.
मावशी ,ही इथे कशी? आईने कळवले की काय, तरी मी नाही सांगितले होते. ही आई पण न… राधिका ला चिडायला  झाले. 
आजींचा हात धरून मयंक ने खाली उतरवले.
राधिका आणि प्रिया ही आपलं सामान घेऊन खाली उतरल्या.
मावशींकडे पहात’ मी आलोच’ म्हणत मयंक आजींना सोडायला गेट पर्यंत गेला. 
‘मावशी तू कशी काय आली? तुला माहीत होत मी येणार आहे? तू मला घ्यायला आली आहे?” राधिका ने जरा चिडूनच विचारलं.
“हो माहिती आहे. पण मी तुला घ्यायला नाही आले.”
“मग ?”
“मयंकला घ्यायला आले.”
“तुझा त्याचा काय संबंध?”

“अगं हा माझ्या नणंदेच्या जावेचा भाऊ आहे.”
आता राधिका च्या लक्षात येऊ लागले हा सगळा प्लॅन आई आणि मावशीचा दिसतोय, नक्कीच आईने मावशीला कळवले असणार.
“अरे वा !” प्रिया हसत म्हणाली. “म्हणजे हा जे स्थळ पाह्यलाआला आहे ते हेच कां?” राधिका कडे बोट करून तिने विचारले.
“हो, पाहिले त्याने पसंत आहे असं वाटतंय. पण एका मुलीला जर लग्न करायचं नसलं तर?”
तेवढ्यात मयंक तिथे येऊन उभा राहिला.” काकू माझ्याकडून तर हरी झंडी आहे तुमच्या स्थळाला, पण तिला पसंत आहे कां?
मयंक चा होकार ऐकून राधिका गोरी मोरी झाली आणि लाजून प्रियाच्या मागे लपली.
“अग तुला पसंत आहे न  गाडीतला हा  हमसफर?”
राधिका ने मानेने होकार दिला.

“चला तुमच्या लव स्टोरी च्या गाडीला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला हो.”
“तो दिसतोच आहे दोघांच्या चेहऱ्यावर चा आनंद. आता ही सुपरफास्ट गाडी  बोहल्यावरच थांबेल असं दिसतंय.” असं म्हणत प्रिया ने तोंडाने शिट्टी वाजवली तशी सर्व हसायला लागले.
समाप्त.
©®सौ. प्रतिभा परांजपे.
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!