प्रवास

©️®️सायली जोशी.
“आई, आज तिला तुझी गरज आहे.”  श्री म्हणाला.
“एक तर इतक्या वर्षांनी आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे आणि तू काहीच बघणार नाही असं का म्हणतेस?”
“मला सगळं जमणार नाही इतकंच म्हणाले मी. तुझ्या बायकोला बेडरेस्ट सांगितली म्हणजे घरचं एकूण एक मलाच बघावं लागणार ना!” छाया ताई म्हणाल्या.
“मग वरच्या कामाला एखादी बाई ठेऊ. तू तुला जमेल तेवढं कर. बाकी त्या बाईंना सांगू.”
“काही नको. माझ्या घरात कामाला बाई ठेवलेली मला चालणार नाही. इतक्या वर्षांत कित्ती अडचणी आल्या..कसले प्रसंग आले पण सगळं केलंच की.”

“तेच म्हणतोय मी. फक्त काही महिने बघ. इतकी वर्षे केलं ना तिने? आता तू जरा घराकडे बघ. बाबा, आईला समजावून सांगा.” श्री बाबांकडे वळून म्हणाला.
मात्र त्यांनी लक्ष दिलं नाही. पेपरमध्ये डोकं घालून ते पुन्हा आपल्या विश्वात मग्न झाले.
“अहो, आईला बोलावून घेऊ मग.” अनिता न राहवून म्हणाली.
“हम्म..माझ्या घरात इतर कोणीही येणार नाही.” मानेला झटका देत छाया ताई म्हणाल्या.
“आई, किती हा आडमुठेपणा? आता मात्र मला वेगळा विचार करावा लागेल.” श्री वैतागून बाहेर निघून गेला आणि छाया ताई तणतण करत राहिल्या.

‘इतकी वर्षे मूल नाही म्हणून किती टोमणे मारले सर्वांनी! आणि आता घरची लोकं मदतीला येत नाहीत.’ अनिताच्या डोळ्यांत पाणी आलं. 
‘मनावर, शरीरावर ताण येता कामा नये.’ डॉक्टरांचे बोल तिला आठवले आणि निग्रहाने तिने डोळ्यांतले अश्रू परतवून लावले.
——————————————-
“श्री, तू काळजी करू नको. काहीतरी मार्ग निघेल.” श्रीचा दोस्त त्याला समजावत राहिला.
बराच विचार करून तो पुढे म्हणाला, “असं करतोस का बघ, आपल्या ऑफिस जवळ एक फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे. तिथे राहायला ये हवं तर. ऑफिस जवळ पडेल आणि दवाखानाही. आमच्या घरी एक मावशी काम करतात. त्यांना गाठून देईन. त्या बघतील सगळं किंवा वहिनींच्या आईला इकडे बोलवता येईल. निर्णय मोठा अवघड आहे. पण काहीतरी करायलाच हवं ना?” 
“हो. राहतं घर सोडायचं? आई – बाबांना काय वाटेल?”

“जरा प्रॅक्टिकली विचार कर श्री. म्हणजे तुझ्या बोलण्यावरून तरी तसं वाटतंय. वहिनींचं करण्याची काकूंची तयारी नाहीय.” अमर बोलत होता ते खरं होतं. सध्या अनिताला माहेरी पाठवता येणं शक्य नव्हतं आणि आई काहीच ऐकायला तयार नव्हती. यातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागणार होता.
श्री घरी आला तेव्हा अनिता झोपली होती. आई – बाबा जेवत होते.
“अनिताने काही खाल्लं?”
“नको म्हणते. मग कशाला मागं लागू? सगळीकडे तुमचीच मर्जी चालायची आता.” छाया ताई.
“निदान तिला काय हवं, नको ते तरी विचार.” श्री आत आला.

“अनु, काय होतंय? खातेस का थोडं?” तिने हो म्हणताच श्री स्वयंपाक घरात आला. पण काहीच शिल्लक नव्हतं. आता मात्र त्याचा राग अनावर झाला. 
“ती नको म्हणाली म्हणून मी काही केलं नाही. तुम्हाला काय हवं ते करून घ्या.” छाया ताई म्हणाल्या.
“इतका परकेपणा का आई? तुझ्या दृष्टीने सून परकी असेल. पण मी तुझाच मुलगा आहे ना? बाबा, आता तरी तुमचं मत मांडा की आयुष्यभर आईच्या मताप्रमाणे वागणार आहात? तुमच्या दोघांचं वागणं असंच राहिलं तर मला इथून बाहेर पडावं लागेल.” श्री रागाने थरथरत होता.
“काय तो तुमचा निर्णय असेल. आम्ही काय बोलणार? या वयात आम्ही दोघं घराबाहेर पडू शकत नाही.” बाबा गंभीरपणे म्हणाले.
हे ऐकून श्रीने अमरला फोन लावला आणि  घर बघायला तो लगेच बाहेर पडला.

बैठकीची खोली, स्वयंपाक घर आणि त्यामागे बेडरूम. बेडरूमला लागून प्रशस्त गॅलरी होती. खिडक्या मोठ्या होत्या. भिंतीत कपाटं होती. एकंदरीत घर छान होतं. श्रीने भाड्यात थोडी घासाघीस करून लगेच होकार कळवला.
घरी येऊन सामानाची बांधाबांध करून त्याने आपण घर सोडणार असल्याचे जाहीर केले. हे ऐकून छाया ताईंनी आपले हात वर केले. 
“तुमचं तुम्ही निघून जाताय. पुढे काही झालं तर आमची जबाबदारी नाही हं ती!”
“बाबा, आम्ही निघतोय. या घरातून फक्त आमचे कपडे नेतोय. दागदागिने बाकी समान सगळं इथंच आहे.”
“अहो, हा निर्णय मला मान्य नाही.” अनिता.

“तुझ्या काळजीपोटी हा निर्णय घेतलाय मी. बाकी मी सगळं मॅनेज करेन. जरा माझ्यावर विश्वास ठेव. आत्ता मला तुझी आणि आपल्या बाळाची काळजी आहे. इथं राहून रोज शब्दाला शब्द वाढणार. असं असताना ऑफिसमध्ये माझं मन रमेल का?” श्री तिला समजावत म्हणाला. 
“मग आपल्यापुरता डब्बा सांगू.” अनिता.
“त्याने प्रश्न सुटणार आहे?” यावर तिच्याकडे काही उत्तर नव्हतं.
ती श्री पाठोपाठ बाहेर पडली. निघताना तिने मागे वळून दरवाज्याकडे पाहिले. पण तो केव्हाच बंद झाला होता. 
——————————————
अमरने घर लावायला खूप मदत केली. स्वतःकडे असलेला बेड, टेबल -खुर्ची आणखी सामान दिलं. त्याच्या आईने जरुरी पुरती भांडीही दिली. घर मालकांचा गॅस असल्याने तोही प्रश्न सुटला. राहता राहिला मावशींचा प्रश्न. त्या उद्या येणार होत्या.

हलका गोरा रंग, अंगावर कॉटनची साडी, थोडासा स्थूल बांधा आणि प्रसन्न चेहरा. मावशींनी दार वाजवलं.
“येऊ का आत? अमरने पाठवलंय मला.”
मावशी दारातून घर न्याहाळत होत्या.
“या. हा हॉल, हे किचन आणि ही बेडरूम. तुम्हाला इथं सगळंच करावं लागेल. स्वयंपाक – पाणी आणि हिची काळजी घ्यावी लागेल. सध्या बेडरेस्ट आहे. नंतर हळूहळू त्यात सुधारणा होईल असं डॉक्टर म्हणाले आहेत.” श्री स्पष्टच म्हणाला.
“बरं, कितवा महिना?” मावशी अनिता जवळ बसत म्हणाल्या.
“तिसरा लागेल आता.” 

“हम्म. घरात मोठं कोणी नाही?”
“आहेत. पण ते इथं राहत नाहीत आणि त्यांना कसलीच जबाबदारी घ्यायची नाहीय. सून फक्त कामापुरती हवी होती. बाकी नातवंड येणार म्हणून कोणीही खुश नाही.” श्री थोडक्यात म्हणाला.
“असो. मी आहे ना आता, कसलीच काळजी करू नका. सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवून मोकळे व्हा. अगदी लेकीप्रमाणे काळजी घेईन मी हिची. स्वयंपाक घर मोकळं दिसतंय. सामानाची यादी करून द्या. मी खालून घेऊन येईन. आजपासूनच सुरुवात करुया. 
तसंही मी माझ्या बहिणीकडे कायमची जाणार होते. मला दोन मुलं आहेत. पण एका शब्दाने विचारत नाहीत. हे होते तोवर कसलीच काळजी नव्हती. पण आता..” मावशी अनिताला म्हणाल्या. त्यांचा गळा दाटून आला होता.

हे ऐकून अनिताने त्यांचा हात हातात घेतला.
“पगार? ते आधी ठरवून घ्या.” अनिता मध्येच बोलली.
“राहणं, खाणं इथेच. मग मला सहा हजार परवडतील.” श्री.
थोडा विचार करून मावशी हो म्हणाल्या आणि त्यांनी कामाला सुरुवात केली सुद्धा. सामानाची यादी करून घेऊन ते आल्यावर स्वयंपाक घर छान लावून घेतलं. गरम गरम वरण -भात करून अनिताला जेवू घातलं.
श्रीसाठी सगळं जेवण केलं आणि आपलं समान आणायला त्या पुन्हा अमरच्या घरी गेल्या.

तासाचे दोन तास झाले. दोनाचे चार! पण मावशी यायचे नाव घेईनात.
‘पगार कमी पडला की काय यांना? मग तसं स्पष्ट बोलायचं तरी. आता मदतीला दुसरं येणार तरी कोण?’ इकडे श्रीच्या मनाची धाकधूक वाढली. अनिता निश्चिंत मनाने गाढ झोपली होती. तिच्याकडे बघून त्याचा जीव गलबलून आला.
इतक्यात दार उघडून मावशी आत आल्या.
“माफ करा. ते जरा उशीर झाला. अमरच्या घरी थोडी कामं उरली होती. ती निपटून आले. तसंही काम सोडलं होतं त्याचं. शेवटचा हात फिरवून आले.”
त्या दिवसांपासून मावशींचं बस्तान हॉलमध्ये बसलं. पण त्यांचा वावर स्वयंपाक घर आणि अनिताची बेडरूम इथेच जास्त असे.

लेकीप्रमाणे त्या तिची काळजी घेत होत्या. तिला झालेला त्रास बघून त्यांच्या डोळ्यांत पाणी येई. 
रूटीन बसलं तसा श्री निश्चिंत झाला. त्याला अधून -मधून आई – बाबांची आठवण येई.
अनिता सासुबाईंना फोन लावे. पण त्या काही बोलत नसत की चौकशी करत नसत. 
हे पाहून मावशींनी तिला दाटवलं, “मनाला त्रास होईल असं वागू नको. समोरचा कसाही वागू दे. आपण आपल्या तब्येतीवर परिमाण करून घ्यायचा नाही.”
हळूहळू अनिताची तब्येत सुधारली. मावशींच्या सोबत ती थोडं फार हिंडू -फिरू लागली. तिची आणि मावशींची जमलेली गट्टी पाहून श्री मनोमन सुखावला.
नऊ महिने सरत आले, तसं अनिताला टेन्शन येऊ लागलं.

“सगळं नीट होईल ना?” ती मावशींनी रोज विचारू लागली. त्या तिच्या पाठीवर हात ठेऊन तिला धीर देत, तिची समजूत काढत.
“कोण कुठल्या मावशी? त्या येतात काय, घरची जबाबदारी घेतात काय? मागच्या जन्माचे काही ऋणानुबंध असेल पाहिजेत.” श्री अमरला म्हणाला.
————————————————
यथावकाश अनिताची डिलिव्हरी झाली आणि छाया ताई नातू झाला म्हणून धावत -पळत दवाखान्यात आल्या. सुनेला घरी चल म्हणू लागल्या. 
“आता मला होत नाही काही. घरची एकुलती एक सून ना तू? मग चल आता घरी.”

यावर अनिता काहीच बोलली नाही.
“त्यांना तीन महिने विश्रांती घ्यावी लागेल. कुठलीही कामं करता येणार नाहीत.” नर्स म्हणाली.
“आमच्या वेळी असलं काही नव्हतं बाई. पंधरा दिवस खूप झाले! मी कामाला सुरुवात केली होती. अनिता, आता निर्णय तुझा आहे बाई.” छाया ताई.
“त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता तसलं काही करता येणार नाही.”
मावशी आळीपाळीने अनिता आणि छाया ताईंकडे पाहत होत्या. अनिता काय निर्णय घेते याकडे त्यांचे लक्ष लागले होते. इतक्या महिन्यांत जुळलेलं नातं असं झटक्यात तुटून जाईल? या विचाराने त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. 

“आई, तुला अनिताची काळजी घ्यायला जमेल?” श्री.
“मी म्हणाले ना, माझ्या हातून कामं होतं नाहीत म्हणून.” छाया ताई कशाबशा बोलल्या.
“शेजारी -पाजारी नावं ठेवायला लागलेत. चला दोघे घरी.”
“नाही आई. तुला मनापासून वाटत नाही तोवर आम्ही घरी येणार नाही. तुम्ही दोघांनी आपला मुलगा, सून म्हणून जीव लावणं दूर, पण साधं कर्तव्य म्हणून तरी काय केलंत? पण मी मुलगा म्हणून तुमच्याकडे लक्ष देईन तेही केवळ एक कर्तव्य म्हणून. आम्ही घरातून बाहेर पडलो तेव्हा थांबण्याचा प्रयत्न केलास? त्यानंतर तुला आमची आठवण आली?
या मावशी परक्या असूनही त्यांनी आम्हाला आईची माया दिली. त्यांनी अनितासाठी काय केलं नाही ते विचार. ” 

छाया ताई जागेवरून उठल्या. त्यांनी एकवार सर्वांकडे नजर टाकली.
आपल्या मनात आपल्याच माणसांविषयी इतकी अढी का आहे? याचं उत्तर त्यांना मिळेना.
जोवर मनातून अढी जात नाही तोवर पुन्हा मुलाकडे फिरकायचं नाही असं ठरवून त्या तडक बाहेर पडल्या. पण अजून किती दिवस? याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं.
मावशींच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. हे जुळलेले ऋणानुबंध असे सहजा सहजी तुटणार नव्हते.
त्या अनिताच्या जवळ आल्या. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू लागल्या. 
अनिताही त्यांच्या कुशीत विसावली. बाळाकडे पाहून तिचं मन भरून आलं अन् पुढच्या नव्या प्रवासासाठी ती नव्याने सज्ज झाली.
समाप्त.
©️®️सायली जोशी.

सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ (नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!