अतिथी कोण?

©®सौ. प्रतिभा परांजपे.
संध्याकाळ चे सात वाजले. स्मिता घरी आली तेव्हा बाहेर अंधारून आले होते.
आज दुकानात दिवसा खूप गर्दी होती पण दुपार नंतर फारशी गिर्हाईक नव्हते म्हणून एका नोकराला आठ वाजता दुकान बंद करायला सांगून ती घरी आली.
तेव्हा तिच्या सासूबाई सरोज ताई,  स्वयंपाक घरात होत्या.. स्मिता हात पाय धुवून, कपडे बदलून स्वयंपाक घरात आली.
” काय करताय आई?”
“अगं खीर करते  आहे, पुर्‍यांची कणीक भिजवली आहे.आता तुम्ही दोघी जावा मिळून पुर्‍या करा, मी जरा पूजेची तयारी करते.”

” आज काय आहे?”
“आज पिठोरी आहे. माझा उपास आहे. पूजा करेन, मग सोडेन उपास.”
उरलेला सगळा स्वयंपाक स्मिता व मोठी जाऊ निशा दोघींनी मिळून केला व किचन आवरले.
सरोज ताईंनी पूजेची तयारी केली.
देव्हार्‍यात चौसष्ट योगिनींचा पाट लावला, समोर चौरंगावर मुठभर तांदूळ ठेवून त्यावर  विड्याचे पान  त्यावर सुपारी ठेवून त्याला हळद कुंकू हार फुल  वाहिले, त्याची मनोभावे पूजा केली.
पांच फळ,नारळ आणी सौभाग्य अलंकारांनी देवीची ओटी भरली.

‘माझ्या सौभाग्याचे व माझ्या लेकरांचे रक्षण कर ग.’ म्हणून हात जोडले.
निशा ने हळदकुंकू वाहून नमस्कार केला, स्मिता ने ही नमस्कार करून  “जिथे कुठे असतिल  सुमित त्यांच्या वर लक्ष ठेव” अस मनात म्हणत हळदकुंकू वाहिले.
सरोजताईंनी प्रसाद म्हणून ताटात खिरी ची वाटी ठेवली त्या वर पुरी ठेवली व मागे न पाहता  “अतिथी कोण” असं विचारलं
मागे मोठा मुलगा अमित होता. तो ” मी आहे” म्हणाला.
सरोज ताई नी डोक्यावरून ताट मागे केले ते अमित ने घेतले. मुलाच औक्षण करून त्यांनी त्याला जेवायला बसवलं.

“आई  हे दुसरं नेवेद्याचे ताट देवा समोरच? “ निशा ने विचारले.
“असू दे ते झाकलेले”. सरोज ताई म्हणाल्या.
निशा समजून गेली आई ची माया, आशा  असते..
पूजा पूर्ण होताच सर्वजण जेवायला बसले, पण स्मिता व  सरोजताई त्यांच्या घशाखाली घास उतरत नव्हता.
त्यांना सुमित ची आठवण येत होती. कसा असेल, कुठे असेल?  दोन घास कसेबसे त्यांनी खाल्ले. 
सुमित  त्यांचा धाकटा मुलगा ,स्मिता चा नवरा आज सहा महिने झाले घर सोडून निघून गेला होता,  तो आजपर्यंत परत आला नव्हता.

खूप तपास केला. न्युज पेपर, टीव्हीवर मिसिंग मध्ये देऊन झाले पण काही फायदा नव्हता. 
बिछान्यात पडल्या पडल्या स्मिताला सुमित ची आठवण येत होती. 
सुमित  तिचा नवरा, लग्न झाले ते अरेंज मॅरेज होतं. घरात आई बाबा सुमितचा मोठा भाऊ अमित, जाऊ निशा, असे कुटुंब .
अमित इंजिनियर, त्याची नोकरीही छान होती.
सुमितच डिपार्टमेंटल स्टोअर, सुमित ला शिक्षणात फार रस नाही असे पहाता बाबांनी त्याला दुकान काढून दिले.
स्मिताने पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर बी.एड केले होते! शाळेत चांगली नोकरी होती. एकूण सर्व छान असे पाहून तिच्या बाबांनी हे स्थळ पसंत केलं. 

सुमित स्वभावाने छान ,पण मितभाषी. त्याला आपण बरे नि आपले बरे असे वागणे. 
दुकानात त्याच्या सोबत बाबा बसत त्यामुळे सुमित वर थोडा वचक असे.
प्रमोद राव दुकानात काय संपले, काय मागवायचे, कुठल्या कंपनीला आर्डर द्यायचे ह्या कडे जातीने लक्ष घालत व सुमित कडून करवून घेत.
पण त्यांना वयापरत्वे दगदग धावपळ सहन होत नाही हे पाहून घरच्यानी, विशेष करून अमित ने, ‘बाबा आता तुम्ही आराम करा’ असा सल्ला दिला. 
आता स्टोअर ची पूर्ण जबाबदारी सुमित वर आली. मधुन मधुन प्रमोद राव दुकानात फेरफटका मारत त्यांना लक्षात येऊ लागले कि सुमित च कामावर लक्ष नसतं.

ग्राहक खोळंबून रहातात, मालकांच लक्ष नाही मग नोकर ही तसेच वागत. दुकानात सामान पडून आहे, हिशोब ही नीटपणे मांडलेला नाही, दुकानाचे उत्पन्न कमी कमी होत आहे.
ग्राहक येत पण सुमित आपल्या फोनवर गेम खेळत बसे, त्यामुळे दुकान ही फारसे चालत नसे. त्यावरून आई-बाबा त्याला नेहमी सूचना देत असत. एकुण वरवर पाहता सगळ ठीक होतं.
स्मिताला पूर्वी चा एक प्रसंग आठवला, “सुमित, अरे त्या प्रधान काकूंचा फोन होता रवा पोहे सगळे जुने आहे! पोह्यांना वास येतो आहे. त्यांना ते सामान परत करायचं आहे. तुझे सामानाकडे लक्ष नसते का ? एक्सपायरी डेट न पाहता सामान पाठवतो ?अशाने अनेक ग्राहक नाराज होतील व ते दुसरे दुकान पाहतील. आजकाल स्पर्धेचा जमाना आहे!.”

“पाहू दे मला, काय अशी 56 ग्राहक येतील!” सुमित आपल्यातच मग्न.
हे पाहून मग बाबांचा संताप झाला. ते म्हणाले, “सुमित, अशाने तुझे दुकान एक दिवशी बंद पडेल, ते कोपऱ्यावरचे दुकान गुजराती भाऊचं, पहा किती ग्राहक जोडले त्यांनी. जरा गोड बोलून, सामानाकडे लक्ष देऊन  ग्राहक जोडले जातात.”
त्यानंतर सुमित आणि बाबांची बरीच वादावादी झाली.
बाबांचे म्हणणे बरोबर होते, पण सुमित आपल्याच गुर्मीत. अधुन मधून असे वाद होत.
स्मिता काही बोलली तर “तुला यात पडायची गरज नाही” असे तो तिला ऐकवत होता.

एक दिवशी बाबांना एक ग्राहकांनी तक्रार केली. मग घरात परत बरेच वाद-विवाद झाले  नि रागाच्या भरात त्या रात्री सुमित घर सोडून निघून गेला.
आता दुकानात बाबा बसु लागले.
पण त्यांना ही एकट्याला झेपत नसे, म्हणून मग स्मीता ने नौकरी सोडून स्टोअरची जवाबदारी घेतली.
तिच्या मेहनती मुळे दुकानाची भरभराट झाली. 
स्मिता च्या माहेरच्यां नी सुमित नाही हे पाहून तिला  तिकडे निघुन ये असे समजावले. पण स्मिता म्हणाली ‘आई बाबा, हे घर आणी  माणसं  माझी काळजी करताय , सुमित फार दिवस नाही राहू शकत तो नक्कीच परत येईल आणि ह्या प्रसंगी मी ह्या घरच्यांना सोडून नाही येणार  तसे करणे योग्य नाही ह्याच ही माझ्यावर प्रेम आहे.’

रात्री झोपण्यापूर्वी सरोज ताईं देव्हाऱ्या जवळ आल्या.
का कोण जाणे पण आज त्यांना सारखं वाटतं होत कि येईल आत्ता माझा सुमित आणि नेवेद्याचे ताट मागेल.
देवा माझा सुमित जिथे कुठे असेल त्याला सुखरूप ठेव व घरी परत येण्याची सद्बुद्धी दे. म्हणून त्यानी हात जोडले व झोपायला खोलीत आल्या पण त्यांनाही झोप येत नव्हती.
रात्री बाहेर काहीतरी आवाज झाल्यासारखे वाटले म्हणून स्मिता हॉलमध्ये आली हॉलमध्ये आई बाबा बसलेले .
“काय झाले तिने घाबरून विचारले ?”
“अगं सुमित —”.
“काय – सुमित च?”

“सुमित येतो आहे, फोन होता त्याचा. खूप बोलला. त्याला त्याची चूक लक्षात आली वाटतं, म्हणत होता बाहेर राहिल्यावर समजलं आपलं काय चुकतंय ते.”
थोड्याच वेळात दार वाजले, स्मिताने धावत जाऊन दार उघडले. समोर सुमित उभा, तिने त्याला घट्ट मिठी मारली.
घरात आल्यावर हात पाय धुऊन सुमित आला. त्याने आईबाबांच्या पाया पडून त्यांची क्षमा मागितली,
“अरे कुठे होता इतके दिवस सुमित?”
“सांगेन ग सर्व आई पण ,आता जेवायला वाढ. किती दिवस झाले तुझ्या हातचं जेवलो नाही !”
“हो हातपाय धुवून देवघरात ये”.

सुमित  देवघरात आई समोर येऊन उभा राहिला. आईने त्याच्याकडे ना पाहता विचारले “अतिथ कोण?”
मी सुमित ,म्हणताच सरोज ताईंनी देवा समोर च ताट डोक्यावरून मागे केले सुमित ने आईच्या हातातले जेवणाचे ताट घेतले. 
जेवण झाल्यावर सुमित ने घरातिल सर्वांची क्षमा मागितली.
तो म्हणाला, “बाबा मी घरातून रागाच्या भरात निघालो ,जी गाडी समोर होती त्यात बसलो, मुंबई सारख्या शहरात पोचलो. पोटात कावळे ओरडत होते पण खायला  खिशात दमडी ही नव्हती. फुकट कोण देणार मग एका दुकानात कपबश्या धुवायचे काम मिळाले. इतकं हलक काम करायला मन मानत नव्हते चिडचिड व्हायची एक जरी कपबशी फुटली तरी मालक ओरडायचा, पैसे कापायचा,  पण  दुसरं काम मिळेल पर्यंत सहन करावं लागलं आणि तेव्हा मी जमीनीवर आलो. स्वभावातली मग्रुरी कमी होत गेली.

नंतर बरीच दुसरी काम केली. एका किराण्याच्या दुकानात नोकरा सारखं काम केलं. त्या मालकाला काम करताना पाहिलं. ग्राहकांशी प्रेमानी आणखी नोकरांशी कामाच्या वेळी कडक व नंतर प्रेमानी,आणि मला माझ्या चुका जाणवायला लागल्या.”
“एकूण दुकान कस चालवायचं ह्याच ट्रेनिंग मिळालं” बाबां हसत हसत म्हणाले.
“हो बाहेरच्या जगाचा अनुभव घेतला, तेव्हा जाणवलं मी किती चुकीचे वागलो.”
“मग आता उद्या पासून दुकानात जाणार?”
“हो बाबा.”
“मालकिण बाईंना विचार.”स्मिता कडे बोट करत बाबा म्हणाले. 

बाबा नी असे म्हणताच सर्व  हसायला लागले 
त्याला सुखरूप पाहून सर्वांचे डोळ्यात पाणी आले .
सरोज ताईंनी देव्हाऱ्यातल्या देवाला हात जोडले व म्हणाल्या, “तुझीच कृपा म्हणून माझं पोर शहाणपण शिकलं व आज घरी परत आलंं. माझ्या सुनेचा संसार वाचला.”असे म्हणत त्यांनी व स्मिताने दोघींनी देवाला हात जोडले.
समाप्त.
©®सौ. प्रतिभा परांजपे.
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

4 thoughts on “अतिथी कोण?”

  1. लघुकथेचा बाज सांभाळणारी अतिशय छान, आटोपशीर आणि बोधपर कथा!

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!