©️®️सायली जोशी.
संध्याकाळची वेळ, घरात हळदी -कुंकू समारंभाची गडबड सुरू होती. सोसायटीतल्या सगळ्या बायका रमा काकूंच्या घरी जमा झाल्या होत्या. त्यांचा चिवचिवाट तिसऱ्या मजल्यावरून अगदी तळमजल्यापर्यंत ऐकू येत होता.
दरवर्षी मोठं हळदी – कुंकू करायचं हा रमा काकूंचा शिरस्ता त्यांची सूनही पाळत होती. जमलेल्या आपल्या मैत्रिणींसाठी मसाला दूध तयार करण्याचं काम स्वयंपाक घरात जान्हवी मनापासून करत होती.
या समारंभाची माहिती नसलेली कावेरी अचानक रमा काकूंच्या घरात शिरली. “अय्यो, चुकीच्या वेळी आले की काय मी!”
तिला पाहताच रमा काकूंच्या कपाळावर आठया पडल्या.
‘नेमकं आत्ताच कडमडायचं होतं हिला?’
“काय गं, काय काम काढलंस?” इतर बायकांसमोर आपली नापसंती दाखवायला नको म्हणून काकू वरवर हसत म्हणाल्या.
“जान्हवी ताई?” कावेरी दरवाज्यापाशी उभी राहिली.
“ती आत आहे.”
“मी आत जाऊ?” काकूंच्या चेहऱ्यावर नापसंतीचे भाव बघून कावेरी जरा घाबरूनच म्हणाली.
“नको. गॅलरीत बैस. येईल ती इतक्यात.” काकू कावेरीकडे न पाहताच म्हणाल्या. तशी ती गॅलरीकडे वळली. जमलेल्या साऱ्या बायका तिच्या ओळखीच्या होत्या. अख्ख्या सोसायटीत जवळपास सगळ्या घरात ती धुणं -भांड्याचं काम करत होती. एरवी तोकड्या कपड्यात असणाऱ्या या बायका आज छान नट्टापट्टा करून आल्या होत्या. साऱ्याजणी एकदम सुंदर दिसत होत्या. तिला बरं वाटलं.
कावेरीचा हात आपसूकच आपल्या गळ्यातल्या मोठ्या मंगळसूत्राकडे गेला. तिच्या सासुबाईंनी आज हट्टाने तिला ते घालायला लावलं होतं.
मग तिचं लक्ष नेसलेल्या हिरव्या नऊवारी साडीकडे गेलं. केसांतल्या गुलाबाच्या फुलावरून उगीचच तिने हात फिरवला आणि अस्वस्थतेने स्वयंपाक घरातल्या दाराकडे ती नजर लावून बसली.
मसाला दूध घेऊन बाहेर आलेली जान्हवी आज फारच सुंदर दिसत होती. कावेरीला वाटलं, झटकन जावं आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून कडाकडा बोटे मोडावीत. ती काही क्षण नुसतीच जान्हवीला न्याहाळत राहिली.
जान्हवीचं तिच्याकडे लक्ष नसलं तरी रमा काकू मात्र कावेरीवर अधून – मधून लक्ष ठेऊन होत्या.
रिकामे कप टाकण्यासाठी कचऱ्याची टोपली आणायला जान्हवी गॅलरीत आली तेव्हा कुठे तिचं लक्ष कावेरीकडे गेलं.
“अगं, अशी परक्यासारखी काय बसलीस? बाहेर सर्वांसोबत बसायचं ना!”
“ते आपलं..एक काम होतं म्हणून आले होते. जरा वेळ आहे का?”
“हो. या बायका गेल्या की मग बोलू. तू आधी आत ये. हळदी -कुंकू लावते तुला. तुझी ओटीही भरायची आहे.” जान्हवी कावेरीला घेऊन आत आली. तिला हळदी -कुंकू लावून मसाला दुधाने भरलेला ग्लास तिच्या हातावर ठेवत म्हणाली,
“न लाजता घे. आज कोणी काहीही बोलणार नाही तुला.”
हे ऐकून कावेरीची नजर रमा काकूंकडे वळली.
त्या रागाने तिच्याकडे पाहत होत्या. त्यांची नजर चुकवत ती बाजूला बसून राहिली.
सगळ्या बायका निघून गेल्या तसा कावेरीने देव्हाऱ्यासमोर पाट मांडला.
“जान्हवी ताई, बसा बघू. मला उशीर होतो आहे.” देवीला नवस बोलले होते तो पूर्ण झाला.
एका सवाष्णीची ओटी भरायची होती.. विचार करताना तुमचा चेहरा डोळ्यासमोर आला बघा.
जान्हवी आश्चर्याने पाटावर बसली. हिरवागार, सोनेरी काठाचा ब्लाऊज पीस, त्यासोबत ओटीची पिशवी अन् त्यात पाचशे एक रुपये! कावेरी आनंदाने ताईंची ओटी भरून पाया पडली.
“कसला गं नवस?” रमा काकू हॉलमध्ये बसून सारं काही पाहत होत्या.
“आता कामवालीने दिलेले पैसे वापरायचे आम्ही?” त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.
“आई, नका ना..”
“जान्हवी, तू मध्ये बोलू नकोस. बोल बाई कावेरी, कसला नवस बोलला होतास?”
“सासुबाईंना बरं वाटावं असा नवस देवीला बोलले होते. बरेच दिवस झाले त्या आजारी होत्या. आता अगदी ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. सगळी देवीची कृपा. सवाष्णीची ओटी भरायची हा विचार मनात येताच ताईंचा चेहरा डोळ्यासमोर आला म्हणून ताबडतोब निघून आले. काकी, तुम्ही कसला वाईट -वंगाळ विचार मनात आणू नका बघा.” कावेरी एका दमात बोलून गेली.
रमा काकू मात्र अजूनही शंकेने तिला न्याहाळत होत्या. ‘जान्हवीने उगीच डोक्यावर चढवून ठेवलंय हिला. कोण कुठली ही देव जाणे.’
इतक्यात खालच्या मजल्यावर राहणारी चित्रा दार उघडून आत आली. “सॉरी, उशीर झाला मला. जान्हवी लवकर हळदी -कुंकू दे. अजून दोन ठिकाणी जायचं आहे.” चित्रा गडबड करू लागली.
“कावेरी, सासुबाई कशा आहेत?”
हे ऐकून कावेरीने हसून नुसतीच मान हलवली.
“हे एक बरं झालं. तुम्हाला सांगते काकू, ही कावेरी म्हणजे अजब रसायन आहे.”
“तरीच.. मला वाटलंच होतं ते. अशा बायकांवर विश्वास कशाला ठेवायचा म्हणते मी. अशांना कामाला ठेवताना दहा वेळा विचार करावा बाई.” काकू मध्येच बोलल्या.
हे ऐकूनही न ऐकल्यासारखं करत कावेरी जान्हवीला आवरण्यासाठी मदत करू लागली.
‘या नेहमी अशा का बोलतात? धुणं- भांडी करत असलो तरी कष्ट करून कमावतो आम्ही. लोकांच्या नजरेत असा तिरस्कार, द्वेष, अपमान पाहिला की जगणं नकोसं वाटतं.’ तिचा पडलेला चेहरा पाहून चित्रा आणि जान्हवीचं मन कासावीस झालं.
“तसं नाही काकू, पाच -सहा घरची कामं करते. आजारी सासुबाईंची सेवा करते, स्वयंपाक -पाणी सांभाळते. घर तरी इतकं स्वच्छ आणि छान ठेवलंय हिने! की आपल्या घरातला पसारा कितीही आवरला तरी हीचं घर उठूनच दिसणार. मुलीवर सुद्धा चांगले संस्कार केलेत, जो घरी येईल आधी त्याच्या पाया पडते ती. काकू, बाईच्या चांगल्या गुणांचं कौतुक व्हायलाच हवं. नाही का? एरवी तिला नावं ठेवणारीच जास्त भेटतात.
बघा, आपण सहसा या कामवाल्या बायकांना किंमत देत नाही. पण हिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. कामाचा उरक जबरदस्त आहे. शिकली असली तरी कधी उलट बोलणं नाही की कधी सुट्टी म्हणून घेत नाही. आपण मात्र जरा कंबर धरली की चार दिवस झोपून राहतो. मला काही काम होत नाही म्हणून नुसत्या तक्रारी करत राहतो.” चित्रा हसत- हसत बोलत होती. कावेरीचं कौतुक करत होती.
“ताई, हे सगळं बोलायलाच हवं का?” कावेरी लाजत चित्राला म्हणाली.
“अगं, चांगल्या गुणांची कदर व्हायलाच हवी. शेवटी तूही एक माणूसच आहेस ना!” चित्रा तिरक्या डोळ्यांनी रमा काकूंकडे पाहत म्हणाली.
हे ऐकून रमा काकूंना आपल्याच विचारांची लाज वाटली.
‘अख्खी सोसायटी हिचं कौतुक करते आणि आपण मात्र विनाकारण हिला बोल लावतो. चार घरात कामं करते म्हणून हिची किंमत ठरवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला?’ मनातले विचार चेहऱ्यावर दिसू नयेत म्हणून त्यांनी मान खाली घातली.
“चला, येते मी. कावेरी उद्या सवाष्ण म्हणून आमच्या घरी जेवायला यायचं आहे. लक्षात आहे ना?” असं म्हणत चित्रा गडबडीने निघून गेली. रमा काकूंना चित्राचं आश्चर्य वाटलं. ‘ही इतर बायकांना कायम नावं ठेवते. पण आज कावेरीचं कौतुक करते आहे म्हणजे नक्कीच हे सगळं खरं असलं पाहिजे.’
तोवर कावेरीने अख्खा हॉल आवरून स्वच्छ केला होता.
“ताई, मीही येते.”
“जान्हवी, तिच्या सासुबाई आणि मुलीसाठी मसाला दूध दे.” काकू बसल्या जागेवरून ओरडून म्हणाल्या. “आणि हो.. पुढच्या शुक्रवारी सवाष्ण म्हणून आमच्या घरी जेवायला ये.” काकू कावेरीची नजर चुकवत म्हणाल्या.
तशी तिने जान्हवीकडे एक नजर टाकली.
“आईंची इच्छा आहे. मग तुला यावं लागेल कावेरी. न विसरता ये.” जान्हवी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. तशा रमा काकू नकळत पण मनापासून हसल्या. जणू त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती.
‘उद्या कामाला ये. वाट बघते तुझी.’ रमा काकू कावेरीला म्हणाल्या खऱ्या. पण ते बोलणं स्वत:साठी अधिक होतं.
कावेरी कधी नव्हे ते समाधानाने काकूंच्या घरातून बाहेर पडली. उगीचच तिच्या मनात आलं..’नवस फळाला आला म्हणायचा. इकडे सासुबाईंची तब्येत सुधारली अन् कोणाच्या तरी सासुबाईंच्या विचारात फरक पडला! पण माणसाच्या चांगल्या गुणांची ओळख झाली तरच समोरचा त्याच्याशी नीट वागतो का?’ समोरचा कसाही वागू दे. आपण मात्र आपलं काम मनापासून करत राहायचं. कोणाच्या सहानुभूतीनं हुरळून जायचं नाही की चांगल्या वागणुकीचा फायदा घ्यायचा नाही.’ आपल्याच विचारांचं तिला हसू आलं. ‘हा सारा शिकल्याचा परिणाम!’
आता सगळे विचार पाठीवर टाकून ती भरभर घराकडे जाऊ लागली.
तिला माहिती होतं, आपल्या सासुबाई जेवणासाठी वाट पाहत असतील आणि आपण गेल्याशिवाय त्यांच्या घशाखाली घास देखील उतरायचा नाही!
त्यांचा मायेने भरलेला चेहरा तिच्या डोळ्यांसमोर तरळला.
‘काहीही असो, अखेर आपली माणसं महत्त्वाची. बाकी कोणी आपल्या बाबत काहीही विचार करू देत, आपल्या माणसांची सर इतर कोणालाही नसते हेच खरं.’
समाप्त.
©️®️सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ (नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
खूप छान बोध घेण्यासारखी कथा
Thank you very much Ma’am !