© परवीन कौसर
पहाटेच्या अजानची आवाज ऐकल्याबरोबर रुकसाना पटकन उठली. उठून तिने वजू करून नमाज पठण केले आणि अल्लाह जवळ दुआ मागितली की ,’आज माझे काम होऊ दे. मला ही नोकरी मिळू दे. मला माझ्या परिवारासाठी खूप काही करायचे आहे. अल्लाह माझी ही दुआ कुबूल कर आमीन सुम्मा आमीन ‘ असे म्हणत तिने दुआ साठी उठवलेले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवले.
तिने पटापट घरातील सर्व कामे उरकून घेतली. आपल्या अम्मी अब्बूंना चहा नाश्ता दिला. छोट्या भावाचा शाळेचा डबा तयार करून देऊन ती नोकरीच्या इंटरव्ह्यू द्यायला जाण्यासाठी तयार झाली.
” अम्मी मैं जा रही हूं. दुआ करना ये नौकरी मुझे मिल जाये.” असे म्हणत तिने आपल्या अम्मीचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेतले. अम्मीच्या डोळ्यात पाणी तरळले. समोरच अब्बू बसले होते त्यांनी आपले हात दुआ साठी उठवले आणि काही ही न बोलता फक्त डोळ्यांनीच रुकसानाला शुभाशीर्वाद दिले.
रुकसाना पटकन घराबाहेर पडली. पटापट पाय उचलत ती जवळच्या बस स्थानकावर गेली. बसस्थानकावर तशी गर्दी खूप होती.
तिला रिक्षातून जाणे परवडणारे नव्हते म्हणून ती या गर्दीत बसमधून प्रवास करण्याची भुमिका घेतली होती.
इतक्यात बस आली तसे सगळेजण गडबडीत बस मध्ये चढू लागले. जो तो धक्का देत वर चढत होता. रुकसाना आपले अंग बचावत स्वतः ला सावरता सावरता वर चढण्याचा प्रयत्न करत होती. तोच एक तरुण पळत पळत येऊन बसमध्ये चढू लागला आणि चढता चढता रुकसानाला जोरात धडक दिली.तशी तिच्या हातातील पर्स खाली पडली.
” या अल्लाह…!!!!” असे म्हणत तिने आपली पर्स उचलली आणि बसमध्ये कशी बशी चढली. या धक्का बुक्कीत तिच्या डोक्यावर असलेली ओढणीचा पदर एकदम सर्रकन खाली पडला आणि तिचे भुरभरणारे केस चेहऱ्यावर रुळू लागले. तिने या गर्दीत आपली ओढणी सावरण्याचा प्रयत्न करत होती पण ती यामध्ये असफल झाली. तशी ती पुन्हा आपली ओढणी डोक्यावर घेऊन आपले भुरभरणारे केस मागे सारु लागली इतक्यात तिच्या कानावर काही शब्द पडले, ” रहने दो न ऐसे ही बिखरे बाल. बहुत खुबसुरत लग रही हो.”
हे ऐकून तिने रागाने मागे वळून पाहिले तर तोच तरुण जो तिला धडक देऊन वर चढला होता तो तिच्या मागेच उभा होता. हिने काही ही न बोलता जरा समोर जाऊन उभारली.
रुकसानाचा इंटरव्ह्यू चांगला झाला. तिने तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक दिली. तिला इंटरव्ह्यू चा निकाल दोन दिवसांत कळविण्यात येईल असे सांगितले. तिचा इंटरव्ह्यू चांगला झाला असलेमुळे तिला खात्री होती की ही नोकरी आपल्याला मिळणार या आनंदात ती आपल्या घरी परतली.
रुकसाना शेख कुटुंबातील मोठी मुलगी. तिचे वडील त्याच्या मित्राबरोबर एक बिझनेस करत होते. त्या मित्राने धोक्याने यांच्या सह्या घेऊन सगळा बिझनेस आपल्या नावावर करवून घेऊन यांना त्यामधून बेदखल केले होते. सगळे काही होत्याचे नव्हते झाले.
या धक्क्यामुळे त्यांनी त्यांची वाचा गमावली. आई पण यामुळे सतत आजारी पडू लागली.
त्यांनी केलेल्या काही इनवेस्ट मध्ये घर कसे बसे चालत होते. तिला एक लहान भाऊ होता. जो आता नववी इयत्तेत शिकत होता. रुकसानाने बी कॉम पूर्ण केले होते. आता घरची परिस्थिती बेताची असल्याने तिने नोकरी करायचा निर्णय घेतला होता.
घरी परतल्यावर तिने आपल्या आईबाबांना सगळे सांगितले आणि आपल्याला ही नोकरी मिळेल अशी आशा आहे हे देखील सांगितले. बघता बघता दोन दिवस निघून गेले.
तिला नोकरीसाठी काही कॉल आलाच नाही. ती दिवसभर नाराज होऊन बसली.
इतक्यात तिच्या फोनमध्ये ईमेलची रिंग वाजली तशी तिने पटकन आपला फोन घेऊन मेल चेक केले आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. ती तशीच पळत पळत आपल्या अब्बूजवळ जाऊन तो मेल दाखविला. अब्बूंना अश्रू अनावर झाले.
अम्मीने आपले हात वर करून दुआ मागितली आणि आपल्या लेकीला आशीर्वाद दिले.
आता रोज रुकसाना आपली घरची कामे आवरून बसमधून कामाला जायची.
तसा तो तरुण पण रोजच बसमध्ये असायचा. हिला बघून कधी शीळ घालत तर कधी सिनेमाचे गाणे म्हणत तर कधी हाय हाय क्या दिखती हो असे म्हणायचा. पण ही नेहमीच त्याच्याकडे दुर्लक्ष करायची.
आज रुकसानाचा पहिला पगार झाला. तिने आपल्या अम्मी अब्बूंना नवीन कपडे घेण्याचा विचार करून ती कपड्यांच्या दुकानात गेली. तिने अम्मीसाठी सुंदर असा सलवार कमीज आणि आपल्या अब्बूसाठी कुर्ता पायजमा घेतला. ती बिल देण्यासाठी कॅश काऊंटर वर आली आणि आपली पर्स उघडली इतक्यात….!!!
” ये…!!! ते बिलचे पैसे घेऊ नकोस रे..!!! आपुन की जान है ये…!!! समजलं का समजावून सांगू..!!!” समोर तोच तरुण उभा होता आणि दुकानदाराला जरासे दरडावूनच म्हणत होता.
हे ऐकून रुकसाना रागाने लाल बुंद झाली आणि त्या कपड्यांच्या बॅगा तिथेच फेकून दुकानाबाहेर पडली.
दुसऱ्या दिवशी तिने सकाळी आपल्या घराचे दार उघडले तर समोर त्याच कपड्यांच्या बॅगा आणि त्यावर काही गुलाबाच्या फुलाची रास ठेवलेली दिसली.
हे बघून तिचा रागाचा पारा चढला. तिने तशाच त्या बॅगा आणि फुले उचलून रस्त्यावर फेकल्या.
आता हे रोजच घडत होते. रोजच तो तरुण काही न काही तरी वस्तू तिच्या घरासमोर ठेवत होता आणि ही रस्त्यावर फेकत होती. तिच्या शेजारी असलेल्या काकूं हे रोज पाहत होती.
तिने एकेदिवशी तिला म्हटले,” अगं रुकसाना हा एक नबरचा मवाली आहे याच्या नादाला लागू नकोस. खूप लोकांना याने त्रास दिला आहे. दुकानात जाऊन हप्ता वसुली कोणाची घरे मोकळी करायची तर दादागिरी करून मारामारी करत असतो हा.गुंडा मवाली आहे हा. तू जरा सांभाळून ग पोरी.” अगदी काळजीपूर्वक काकू म्हणाल्या.
रुकसाना म्हणाली,” हो का..!! दिसतोच तसा मवाली गुंडा. रोज माझ्या मागे हात धुवून लागला आहे.पण मी घाबरत नाही त्याला.माझा अल्लाह माझ्या सोबत आहे तर मला भीती कोणाचीही नाही.”
” हो ग तेही आहेच पण तरी देखील त्या मन्यापासून सावध राहा एवढेच.” असे म्हणत काकू आत गेल्या.
आता हे जवळजवळ सलग तीन महिने सुरू होते. तो रोज काही ना काही वस्तू ठेवायचा आणि ही फेकून देत होती.
” अरे मन्या ती तुला घास घालत नाही तर तू का तिच्या साठी इतका मरतो आहेस. सांग तू नुसता इशारा कर आज रात्री तिला उचलून आणून तुझ्या बिछान्यावर टाकतो का नाही बघ.” दिग्याने म्हटले.
हे ऐकून तो एकदम चिडला आणि त्याची कॉलर पकडून त्याला म्हणाला,” दिग्या तोंड सांभाळून बोल. तसं करायचं असतं तर मला तुझी गरज भासली नसती. ती मुलगी तशी नाही आहे. मी आयुष्यात इतक्या मुली बघितल्या ज्या पैशाच्या हव्यासापोटी काहीही करायला तयार असतात. पण ही तशी नाही आहे. हिला मी तीन महिने झाले इतक्या महागड्या वस्तू दिल्या पण तिने त्याला हात ही लावला नाही. ती मला नजर उठवून बघत ही नाही.तिच्या अंगात इमानदारीचे रक्त आहे रे. अशा मुली क्वचितच असतात. खरं सांगायचं तर मी हिच्या वर मनापासून प्रेम करु लागलो आहे. भलेही तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही.” मन्या म्हणाला.
“आयला हे तू बोलतोस. मन्या तूच आहेस न रे की कोणते भूत आहे हे.” दिग्याने आश्चर्य व्यक्त केले.
” दिग्या तुला नाही कळायचं प्रेम म्हणजे काय असतं ते. मी तिच्या साठी जीवही देईन इतकं प्रेम करतो मी.” असे म्हणत मन्या उठून गेला.
” अहो रुकसाना भाभी एका न.भाभी थांबा न…!!!!” दिग्या रुकसानाच्या मागे मागे पळत पळत म्हणाला.
” लाज वाटते का असे बोलायला. मी कुठली भाभी तुझी ???” रुकसाना रागाने म्हणाली.
” माफ करा मला पण थोडे थांबा काही बोलायचे आहे तुमच्या बरोबर.तुम्हाला रोज भेटवस्तू पाठवणारा माझा मित्र मन्या हा तुमच्यावर खूप प्रेम करतो आहे. तुम्हाला दिसतो तो फक्त एक मवाली गुंडा पण तो तसा नव्हता.” दिग्याने एक दिर्घ श्वास घेतला.
” मग मी काय करू तो नव्हता तसा आणि आता आहे हे मला काय करायचे.” रुकसाना म्हणाली.
” ऐका तर खरे. मन्या म्हणजे मनीष हा एक खूप हुशार विद्यार्थी . शाळेत नेहमी पहिला नंबर यायचा. त्याचे वडील एका कारखान्यात काम करत होते आई घरात कपडे शिवायची. लहान बहीण आणि हा हे दोन भावंडे. घरची परिस्थिती बेताची असली तरी सुखी कुटुंब होते.
वडिल आपले काम प्रामाणिकपणे करत होते . त्यांच्या या प्रामाणिकपणा मुळे कारखान्यात काही जणांना त्रास होत होता. त्यांना कामचुकारपणा करून वरची कमाई खाता येत नव्हती. कधी कधी ते यांना काहीही कारण नसताना भांडणे काढून त्रास द्यायची. पण कारखान्याचे संचालक मंडळ यांच्या प्रामाणिकपणा मुळे त्या लोकांना ओरडून कामावरून काढून टाकू असे म्हणायचे.
एके दिवशी ते लोक काही तरी चोरीचे काम कारखान्यात करत होते. हे मन्याच्या बाबांच्या लक्षात आले तसेच त्यांनी असे करु नका ज्यांच्या मुळे आपले घर संसार चालतात त्यांना असा धोका देणे बरोबर नाही असे समजावले. पण त्यांनी काही ऐकले नाही उलट त्यांना मारायला सुरुवात केली.
काय दंगा सुरू आहे हे बघण्यासाठी दुसरे कामगार येऊन उभे राहिले तर त्यांनी मन्याच्या बाबांना चोर म्हणून दाखविले.
हे बघून सगळे कामगार कारखान्याचे संचालक मंडळाच्या समोर मन्याच्या बाबांना दोषी ठरवले आणि त्यांना चोर म्हणून दाखविले. हा धक्का सहन न झाल्याने ते तिथेच गतप्राण झाले.
इकडे आई या लहान जीवांना घेऊन कसे बसे आयुष्य काढत होती. पण नियतीला हे पण मंजूर नव्हते. त्याची आई बाजारात गेली असता समोरून एक भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची धडक लागून ती जोरात फेकली गेली आणि तिथेच तिचा जीव गेला. मन्यावर तर संकटांचे डोंगर कोसळले.
आता घरात ही दोघेच. मन्याने शाळेला जायचे बंद केले. लहान बहिणीला सांभाळायची जबाबदारी संपूर्णपणे आपल्या वरच आहे हे त्याला समजून चुकले होते.
आता खायला पैसे नाहीत म्हणून तो कचरा गोळा करण्याचे काम करु लागला सोबत बहिणीला पण घेऊन जात होता. एके दिवशी तो कचरा गोळा करत असताना समोर एक महिला येऊन उभारली. तिने त्याच्या बहिणीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली,” किती सुंदर पोर आहे आणि अशी कचरा गोळा करतेय. अरेरे काय हे. चला रे माझ्या घरी मी तुम्हाला खाऊ घालते.”
ही दोघे तिच्या बरोबर तिच्या घरी गेली. तिने दोघांना चांगले जिन्नस खायला दिले. ही दोघे बहिण भाऊ आनंदाने खाऊ लागली. जेवण झाल्यावर मन्याला झोप लागली. अंगावर उन्हाचे चटके बसलेमुळे मन्या पटकन जागा झाला पहातो तो स्वतः ला रस्त्याच्या कडेला झोपला होता. गडबडीने तो आपल्या बहिणीला शोधू लागला. पण….!!!! ती
यानंतर मन्या तो मन्या राहिला नाही. त्याचे आयुष्य पूर्ण पणे बदलले. तो चोरी करु लागला मारामारी करु लागला आणि आता या तीन महिन्यांत मी तो लहान मन्या पाहतो आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्या मुळेच. मी तुमच्या जवळ त्याच्या प्रेमाची भीक मागतो. त्याचा स्वीकार करा.”
” ही सगळी सिनेमाची कथा आहे. तुम्हाला काय वाटले ही कथा ऐकून माझे मन परिवर्तन होईल. चुकून नाही होणार.” असे म्हणत रुकसाना पुढे निघून गेली.
रात्री सगळी कामे आवरली आणि रुकसाना आपल्या भावाचा अभ्यास घेऊ लागली तोच तिच्या दारावर टकटक झाली.
” यावेळी कोण असेल???” असे म्हणत ती दाराजवळ येवून
” कोण आहे??” असे विचारले.
” मी दिग्या. रुकसाना मन्याने चार दिवस झाले अन्न पाणी घेतले नाही आणि तो चक्कर येऊन पडला आहे. त्याच्या तोंडातून फक्त रुकसाना असेच शब्द येत आहेत.”
” या अल्लाह…!!!” असे म्हणत रुकसाना ने दार उघडले. समोर दिग्या रडवेला चेहरा घेउन उभा होता.
रुकसाना दिग्या बरोबर मन्याच्या घरी गेली.
मन्या छोट्या पलंगावर डोळे मिटून पडला होता त्याचे ओठ सुकलेले होते चेहरा अगदीच निस्तेज दिसत होता. पण ओठांची हालचाल होत फक्त रुकसाना असेच शब्द येत होते.
हे पाहून रुकसानाच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
तिने पळत जाऊन मन्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली,” मनीष वेडे आहात का तुम्ही. असे कोणी अन्न पाणी त्यागते का. चला उठा काही तरी खाऊन घ्या.”
मन्याला आपले पूर्ण नाव आपल्या आईबाबा नंतर कोणीतरी पहिल्यांदा घेतले हे ऐकून अश्रू अनावर झाले. त्याने आपल्या थरथरत्या हाताने रुकसाना समोर हात जोडले.तो काही बोलणार तोच रुकसाना ने म्हटले,” अंहं…!!! आता काही बोलायचे नाही. शहाण्या बाळासारखे उठून जेवायचे.”
हे ऐकून दिग्याने पटकन किचनमध्ये जाऊन एका प्लेटमध्ये भाजी भाकरी आणून दिली. मन्या ने ती भाजीभाकरी खाल्ली.
” रुकसाना मला माफ कर. मी तुला या तीन महिन्यांत खूप त्रास दिला. तुझ्या जागी कोणी दुसरी असती तर इतके महागड्या वस्तू बघून माझ्या जवळ आली असती.
पण खरंच तुला सलाम करतो मी तू आपल्या इमानावर कायम राहिली. तुझ्या आईबाबांचे संस्कार आहेत हे. पण मला माफ कर मी खरंच खूप वाईट आहे.”
” तुम्ही वाईट नाही तुम्हाला परिस्थितीने वाईट बनवले होते. आता झाले गेले विसरून जा आणि नवीन आयुष्य सुरु करा. ही मारामारी मवाली गुंडगिरी कशाला हवी. एखादी चांगली नोकरी बघा आणि कष्टाची भाकरी खा. आणि हो आजपासून तुमचे दोन्ही वेळचे जेवण आमच्या घरी. पण आमच्या घरी यायचे ते मनीष बनून मन्या नाही.” रुकसाना म्हणाली.
हे ऐकून दिग्याने आपले डोळे पुसत म्हटले,” मन्या सॉरी सॉरी मनीष तुझे प्रेम जिंकले रे. आजपासून मन्या मेला. तू तुझे आयुष्य नव्याने सुरू कर आणि सुखी रहा. मी जातो परत त्याच दलदलीत.”
” छे हो तुम्ही कुठेही जायची गरज नाही. आमच्या शेजारी असलेल्या काकूंना घरकामासाठी गडी हवा आहे मी सांगते तुमच्या साठी.” रुकसाना म्हणाली.
हे ऐकून दिग्याने रुकसानाचे पाय धरले.
” या अल्लाह माझ्या पाया काय पडता. मला पाप लागेल.” असे म्हणत रुकसाना ने पटकन आपले पाय मागे घेतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मनीषने आपली कामे आवरली आणि रुकसानाच्या घरी गेला.
तिने हसतमुखाने त्याचे स्वागत केले. त्याला जेवायला वाढले.
जेवण झाल्यावर त्याने रुकसानाच्या आईबाबा समोर जाऊन माफी मागितली त्याचबरोबर त्यांचे आशीर्वाद घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडला.
© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.