आईचं माहेर

© सायली जोशी
सान्वी आणि मंदिरा दोघी मायलेकी आज बऱ्याच वर्षांनी मंदिराच्या माहेरी आल्या होत्या. परदेशी राहणारी आपली लेक अन् तिची लेक प्रत्यक्ष भेटायला आली म्हणून सुमेधा ताईंना कोण आनंद झाला होता!
आल्या आल्या सान्वी सर्वांच्या पाया पडली. सुमेधा ताईंना बरं वाटलं, परदेशी राहूनही आपली नात संस्कार विसरली नव्हती.
आई -वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केलं आणि मंदिरा आपल्या नवऱ्यासह परदेशी निघून गेली. तसा तिचा आपल्या माहेरी असणारा संपर्क कमी झाला. 
एका वर्षानंतर सान्वीचा जन्म झाला आणि मंदिराच्या सासुबाई आणि सासरे तिकडेच शिफ्ट झाले.

मंदिरा आपल्या माहेरच्या माणसांना लेकीचे फोटो पाठवत होती. तिची दिवसेंदिवस होणारी प्रगती कळवत होती. पण नातीला डोळे भरून पाहण्याचा योग अजून सुमेधा ताई आणि महेशरावांच्या भाग्यात आला नव्हता.
दिवस सरत गेले, तसा सुमेधा ताईंचा आपल्या लेकीवरचा राग हळूहळू कमी होत गेला.
मंदिरा आपल्या आई – वडिलांना तिकडे बोलवत राहिली. मात्र महेशरावांचा राग म्हणावा तसा अजून कमी झाला नव्हता.
आज तब्बल पंधरा वर्षांनी मंदिरा भारतात आली होती. तेही आपल्या लेकीसह!

त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती सर्वांनी. सुमेधा ताईंनी आपल्या नातीला डोळे भरून पाहिले तेव्हा कुठे त्यांचे समाधान झाले. सान्वी म्हणजे आपल्या आईची छबी होती जणू. 
“मंदिरा, सान्वी तुझ्यासारखी दिसते. तू कॉलेजला असताना दिसायचीस अगदी तश्शीच! वागणं, बोलणंही तसंच आहे.” सुमेधा ताईंनी आपल्या नातीला जवळ घेतलं.
सान्वी मात्र भिरभिरत्या नजरेने आपलं आजोळचं घर पाहत राहिली. ती कोणाशी जास्त बोलत नव्हती. कोणी काही विचारलं तरच एखादा शब्द बोलत होती.

“ताई, सान्वी स्वभावाने तिच्या वडिलांसारखी वाटते. मोजकं बोलणं, हसणं अगदी तसंच आहे.” देवदत्त म्हणाला.
“अरे, अजिबात नाही. आता तू सुबोधला पाहशील तर तो वेगळाच दिसेल तुला. आता सर्वांशी मिळून -मिसळून राहतो तो. प्रचंड बोलका झाला आहे. त्याच्या स्वभावात खूपच फरक पडला आहे आणि सानूचं म्हणशील तर ती इथे पहिल्यांदाच आली आहे. जरा रुळली की बघ, कशी बोलते ती बिनधास्त.” मंदिरा आपल्या भावाला म्हणाली.
मंदिरा आल्याचे कळाले, तसे शेजारी -पाजारी तिला भेटायला येऊ लागले. 

“ही तुझी लेक का? किती मोठी झाली! पण तू अगदी आहेस तशीच आहे. काही बदल झाला नाही तुझ्यात.” अशा कॉम्प्लिमेंट्स तिला मिळू लागल्या आणि मंदिरा मनोमन सुखावली.
‘इतकी वर्षे आपण हे सारं मिस करत होतो. ही आपुलकी, जिव्हाळा, नाती जीवापाड जपणारी माणसं. तसेच आपल्या आई -वडिलांचे प्रेम, भाऊ आणि वहिनीची माया..’ 
देवदत्तचा मुलगा, राघव केवळ आठ वर्षांचा होता. त्याची आणि सान्वीची गट्टी मात्र लवकर जमली. राघव आत्या, आत्या करत दिवसभर मंदिराच्या मागे, मागे फिरत होता.

परदेशी असलेली आणि पहिल्यांदाच पाहिलेली, आपल्या बाबांसारखी दिसणारी, त्यांची सख्खी बहीण त्याला खूपच आवडली होती. त्याहूनही तिने आणलेले गिफ्टस त्याला खूप जास्त आवडले होते.
भोवताली इतकी सारी आपली माणसे पाहून सान्वी खरंतर भांबावून गेली होती.
आपले कोणाशी काय नाते आहे? हेच तिला कळत नव्हते. आजपर्यंत केवळ बाबा, आजी -आजोबा अन् फ्रेंड्स ही इतकीच नाती जवळून अनुभवली होती तिने. 
मात्र मम्माच्या माहेरी इतका गोतावळा आहे हे पाहून तिला गंमत वाटली आणि टेन्शनही आले. 

परदेशी कसं, सुटसुटीत असतं सारं. जो तो आपल्या नादात असतो. पण इथे सगळ्यांची चौकशी केल्याविना कोणी गप्प बसतच नाही. जुन्या आठवणी देखील इतक्या निघतात की मामा आणि मम्मा रात्रभर त्या आठवणीत रमतात, गप्पा मारतात.
अगदी मम्माच्या लहानपणीच्या आठवणी देखील इतक्या तिखट -मीठ लावून सांगितल्या जातात की आपणही ते सारं अनुभवायला हवं होतं, असं वाटायला लागलं तिला.
आपल्या मामा -मामीला सान्वीने फोटोत पाहिलं होतं. मात्र त्यांना प्रत्यक्षात पाहून तिला खूप छान वाटलं. लवकरच तिची आणि मामाची गट्टी जमली.

इतकी वर्षे ‘एकटी ‘वाढलेल्या सान्वीला भाऊ, बहिणीचे प्रेम ठाऊक नव्हते. आता मात्र राघवच्या रूपाने ते तिच्याजवळ आले. या साऱ्यांशी कधीतरी फोनवर बोलणे व्हायचे. मात्र त्या बोलण्यात जिव्हाळा नसायचा. 
आता आपल्या माणसांना प्रत्यक्ष भेटून तिला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. हळूहळू सान्वी रुळली. सर्वांच्यात कधी मिसळून गेली, तिचे तिलाच कळाले नाही.
परदेशातून आलेली सान्वी शेजारी – पाजारी सर्वांची लाडकी झाली. त्यात ती मंदिराची लेक म्हणून तिचे जरा जास्तच लाड होऊ लागले. 

“खरंच मम्मा, तू इतकी फेमस होतीस का? इथे ‘मंदिराची लेक’ म्हणून मला सारे तुझ्याच नावाने ओळखतात. तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स खूप भारी असतात गं.” सान्वी आपल्या आईला म्हणाली.   
“मग..आईचं माहेर हे असंच असतं. इथे आई आणि तिच्या लेकरांना फक्त माया मिळते. भरभरून प्रेम मिळतं.” मंदिरा आपल्या लेकीला जवळ घेत म्हणाली.
दुसऱ्या दिवशी मंदिराचे चुलत बहीण -भाऊ हजर झाले आणि घर हास्य -विनोदाने भरून गेले.
ही मावशी आणि मामाची नवी जोडी सान्वीला खूप आवडली. 

“मम्मा, आपण इतकी वर्षे इथे का नाही आलो?” मी हे सारं मिस केलं. आता दरवर्षी मी इथे येणार. त्यापेक्षा असं करू, आपण इथेच शिफ्ट होऊ. तू सांग ना बाबांना.”
“ते इतकं सोपं असतं का? आपण तिथे सेटल झालो आहोत. आणखी काही वर्षांनी आपण राहायला येऊ शकतो. पण तुझी इथली ओढ पाहून मला खूप बरं वाटलं. इतक्या वर्षात या घराशी माझा संपर्क जणू तुटलाच होता. पण आता आपल्या माणसांना भेटून खूप छान वाटतंय. मस्त रिफ्रेश झाल्यासारखं!” मंदिरा कौतुकाने आपल्या लेकीकडे पाहत म्हणाली.
निघण्याचा दिवस उजाडला. तशा सान्वी आणि मंदिरा दोघी हळव्या झाल्या. घरातून दोघींचाही पाय निघत नव्हता. मात्र जाणे तर भागच होते. तिथे सुबोध त्यांची वाट पाहत होता.

“आजी, मी पुढच्या वर्षी पुन्हा येईन. पण त्या आधी तुम्ही साऱ्यांनी आमच्या घरी यायला हवे.”
“सानू, आमचं घर नाही. आपलं घर म्हणावं.” मंदिरा मधेच म्हणाली.
“ओके, सॉरी. कोणतीही कारणं न देता तुम्ही सर्वांनी यायचं म्हणजे यायचं. मला आईचं माहेर जपायला खूप आवडेल.” सानू उत्साहाने म्हणाली.
“चल.. वेडी कुठली. आली मोठी, आईचं माहेर जपणारी! ही सगळी आपली माणसं आहेत.” मंदिरा आपल्या लेकीचा कान पकडत म्हणाली. तसे सारे हसू लागले.

“दोघी अशाच खुश राहा आणि सुबोधरावांना आमचा आशीर्वाद सांगा.” महेशरावांनी आपल्या लेकीला आणि नातीला जवळ घेतलं.
“आबा, ते आशीर्वाद म्हणजे काय?” सानू आठवण्याचा प्रयत्न करू लागली. 
“अगं, ब्लेसिंग असतं ते..” मामी हसत हसत म्हणाली.
“ताई, पुढच्या वर्षी नक्की या. तुम्हा सर्वांची वाट पाहू आम्ही.” वहिनीने आग्रहाचे आमंत्रण दिले.
“मंदिरा, परदेशी गेलात तरी नाळ आपल्या मातीशी जुळलेली असावी गं. अशीच दरवर्षी येत जा. पुन्हा इतकी वाट पाहायला लावू नको बाई. काळजी वाटते आम्हाला. लेकीच्या येण्याने घर कसं भरून जातं बघ.” सुमेधा ताईंनी डोळ्याला पदर लावला.

“आजी, डोन्ट वरी. मम्मा नाही आली तरी मी नक्की येईन.” सान्वी आजीच्या मिठीत शिरत म्हणाली. तसं सुमेधा ताईंनी आपल्या नातीला आणखी जवळ घेतलं.
दोघींनी साऱ्यांचा निरोप घेतला. निघताना सान्वीचे डोळे भरून आले.
या साऱ्या आठवणी तिने मनाच्या कप्प्यात साठवून घेतल्या.
आता कितीही झालं तरी आईचं माहेर तिलाच जपायचं होतं, आईची लेक म्हणून.
तिने मंदिराकडे पाहिलं, आपल्या आईच्या चेहऱ्यावरचे हे एक्सप्रेशन्स सान्वीने कधीच पाहिले नव्हते..कधीच!
© सायली जोशी

सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
कोंडी
त्यांचं काय चुकलं??
संसारावर आलेले सावट

Leave a Comment

error: Content is protected !!