©️®️सायली जोशी.
चिंगीचं लग्न ठरलं आणि अख्खी चाळ मदतीला धावली. खरंतर त्याची दोन कारणं होती. एकतर चिंगी कजाग मुलगी होती आणि वय वर्ष सत्तावीस उलटून गेलं तरी तिचं लग्न ठरत नव्हतं.
चिंगी सारखी भांडखोर मुलगी कधी एकदा या चाळीतून जाईल, असं सर्वांना झालं होतं.
तिचं लग्न ठरलं म्हणून चाळीतल्या सगळ्या बायकांना खूप आनंद झाला. सावंत काकूंनी लग्नाच्या फराळाची जबाबदारी घेतली तर माने ताईंनी रुखवताची सगळी जबाबदारी घेतली.
पिंट्याने लग्नाच्या पत्रिका माफक दरात काढायच्या ठरवल्या आणि संदीपने चिंगीचं दोन खोल्यांचं घर रंगवायला घेतलं सुद्धा.
रजनी बाईंना म्हणजेच चिंगीच्या आईला चाळीतल्या लोकांचं प्रेम बघून खूप खूप आनंद झाला. “अहो, सगळंच तुम्ही करायला लागलात तर आमची जबाबदारी काय राहिली?” बाई सावंत काकूंना म्हणाल्या.
“असं कसं? या चाळीतून चिंगी कधी एकदाची जाईल असं झालं होतं..म्हणजे लग्नाचं वय उलटून गेलं तिचं! काळजी वाटणारच ना आम्हाला.” काकू कसंबसं सांभाळून घेत म्हणाल्या.
लग्नाच्या आठ दिवस आधी साखरपुडा होता. तो पार पडला.
चाळीतल्या लोकांचं प्रेम बघून चिंगीला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने सर्वांची माफी मागितली.
“मी फार चुकीचं वागले तुम्हा सगळ्यांशी. माझा स्वभाव आड आला. पण इथून पुढं मी नीट वागेन.”
चाळीतल्या लोकांनी तिला मोठ्या मनानं माफ करून टाकलं.
लग्न जवळ आलं, तशी लगबग वाढली. सावंत काकूंनी केलेले फराळाचे पदार्थ अख्ख्या चाळीने पुन्हा पुन्हा मागून खाल्ले. नाईक वहिनींनी तर त्यांना दिवाळीच्या फराळाची ऑर्डरच देऊन टाकली.
माने ताईंनी रुखवताचे साहित्य चिंगीच्या घरात आणून ठेवले. चुडा, सप्तपदी, सुपारीचे भटजी, ‘लेकीची पाठवणी’ असे लिहिलेले पत्र, संसारासाठी लागणारी भांडीकुंडी, बेडशीट, उशीचे अभ्रे, पडदे असे बरेच साहित्य त्यात होते.
रजनी बाईंना हे पाहून आनंद झाला. पण फार अवघडल्यासारखे झाले.
त्यांनी पुन्हा पुन्हा सावंत काकू आणि माने ताईंचे आभार मानले.
“अहो, आभार कसले मानता? आपली चाळ म्हणजे एक कुटुंबच नाही का? आपल्या माणसांसाठी आम्ही केले तर त्यात काय बिघडले?” या वागण्या – बोलण्याने बाईंना माणुसकीचे दर्शन झाले.
लवकरच चिंगीचं लग्न थाटामाटात पार पडलं. ती सासरी जाताना तर अख्ख्या चाळीचे डोळे पाणावले होते.
“अशीच शांत, आनंदी राहण्याचा प्रयत्न कर.” राजगोळकर बाई तिला जवळ घेत म्हणाल्या अन् सगळ्या चाळीने तिला रडत रडत अर्थात मनातल्या मनात हसत निरोप दिला.
लग्नानंतर अगदी पंधरा दिवसांतच चिंगीला आपल्या सासूचे गुण कळले.
लग्नात इतका मानपान झाला म्हणून चिंगीच्या सासुबाईंची हाव वाढली. तिच्या माहेरहून आता सासुबाईंनी वेगवेगळ्या भेटवस्तू मागण्याचा सपाटा सुरू केला.
चिंगीसारखी शांत स्वभावाची सून मिळाली म्हणून सासुबाईंना फार खुमखुमी आली होती. पण आतली गोष्ट कुठे त्यांना ठाऊक होती?चिंगीच्या बाबांनी आणि रजनी बाईंनी पहिले दोन-तीन महिने या मागण्या पूर्ण केल्या. मात्र नंतर नंतर त्यांना या मागण्या जड जाऊ लागल्या म्हणताना त्यांनी नकाराचा निरोप आपल्या लेकीच्या सासरी पाठवला.
चिंगीच्या माहेरहून भेटवस्तू येणं बंद झालं, तसं चिंगीच्या सासुबाईंनी आपलं हत्यार उगारलं. त्या चिंगीला घालून -पाडून बोलू लागल्या. त्रास देऊ लागल्या. “तू माझ्या घरात राहतेस याचं भान ठेव, म्हणू लागल्या.
‘सासरी सौम्यपणे वागावं लागतं. कोणी कितीही बोललं तरी आपण उलट बोलून चालत नाही. आधीचा स्वभाव विसरून जा.’ असं आईने चिंगीला बजावलं होतं. आपला मूळचा स्वभाव बाजूला ठेऊन तिने सौम्यपणे आपल्या सासूला विरोध करून पाहिला. पण ऐकेल ती सासू कसली?
चिंगीच्या नवऱ्याचं आपल्या आईपुढे काही चालत नव्हतं. त्याचा स्वभाव ओळखून चिंगी आपल्या नवऱ्याला ‘वेगळं ‘राहण्यासाठी हट्ट करू लागली.
पण त्याने स्पष्ट नकार दिला.
बघता बघता ही बातमी चाळीत पसरली. सगळे मिळून पुन्हा एकदा चिंगीच्या मदतीला धावले.
“तुझ्या सासुबाईंची हाव वाढली. आता त्यांना दम द्यायला हवा.” राजगोळकर बाई पुढे आल्या.
“तू काही दिवस इथेच थांब. जाऊ नको सासरी. सगळी कामं तुझ्या सासुबाईंच्या अंगावर पडली की मग त्यांना कळेल.” माने ताई पदर खोचत म्हणाल्या.
“त्यापेक्षा तू वेगळी राहा.” सावंत काका मधेच म्हणाले.
“हे काय उपाय झाले? चिंगे, तुझा स्वभाव कधी कामी येणार? आमच्याशी विनाकारण भांडत होतीस! आता समजलं का? विनाकारण भांडायला डोकं लागत नाही. पण समोरच्याने ते उकरून काढलं तर आपल्याला भांडायला यायला हवं. ते काही नाही. तू तुझी लढाई लढायला हवीस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.” सावंत काकूंनी चिंगीला समजावत, आपली मनात साठलेली भडास काढून घेतली.
सरते शेवटी चिंगी पुन्हा सासरी आली. आता सासू खूपच त्रास द्यायला लागली. चिंगीच्या संयमाचा कस लागत होता. तिचा भांडखोर स्वभाव मधेच उसळी मारे. मात्र आईचे बोल ऐकून ती शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. तिचा नवरा मध्ये पडू पाहतो, तर त्याला सासू दम भरायला लागली. “हे माझं घर आहे,” असं म्हणायला लागली.
नक्की काय करावं?हेच चिंगीला कळत नव्हतं. चाळीतल्या बायकांनी समजावून देखील चिंगी सासुसमोर जास्त बोलू शकत नव्हती. कारण आपल्यापेक्षा वरचढ स्वभावाची सासू भेटली होती ना तिला!
“लग्नात खोटा मानपान केला म्हणायचा आमचा आणि आता मात्र आम्हाला काही मिळत नाही.
“ए चिंगे, सांग तुझ्या आई -वडिलांना, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.” सासू सुपारीचे खांड तोंडात टाकत म्हणाली.
हे ऐकून मात्र चिंगीचा संयम सुटला.
तिने लग्नात आणि गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेल्या सगळ्या भेटवस्तू सासुबाईंच्या पुढ्यात आणून आदळल्या.
“इतक्या वस्तू तुमच्या माहेरहून तरी आल्या होत्या का?” तिचा आवाज टिपेला पोहोचला होता.
“मग! माझं माहेर खूप गडगंज आहे.” सासू तोऱ्यात म्हणाली.
“मग इथून पुढं काय मागायचं ते तिथूनच मागवा.” चिंगी आत कामाला निघून गेली.
“मला उलट बोलतेस? हेच शिकवलं का आई – बापानं?” सासुबाई तिच्या मागून आत येत म्हणाल्या.
“त्यांनी शिकवलं नाही. पण तुम्ही बोलायला भाग पाडलं. इतकं सारं देऊनही तुमचं मन भरत नाही? एवढी कसली हाव आहे तुम्हाला? रोख रक्कम दिली, भांडीकुंडी, धान्य दिलं, आणखी काय काय दिलं याची गणतीच नाही..तरी आणि यांची हाव वाढत चालली आहे.” चिंगी पेटून उठली होती.
तिचा नवरा तिला “गप्प बस” अशी खूण करत होता. पण ती ऐकायचे नाव घेईना.
“मानपान असतो तो. इतकं माहित नाही? माझ्या घरात राहून मलाच उलट बोलतेस?” सासूने उगारलेला हात चिंगीने अलगद हवेत धरला आणि तिने सासूला दोन -चार शब्द सुनावले.
एरवी शांत असणारी सून इतकं बोलू शकते, हे सासुबाईंना माहितीच नव्हतं. त्या गप्पच बसल्या. मुलगा समोर असल्याने चिंगीने केलेला पराक्रम
त्याला तिखट -मीठ लावून सांगण्यात काही अर्थच नव्हता.
भांडता भांडता, रागाने चिंगीने आपल्या माहेरहून मिळालेल्या सगळ्या भेटवस्तू एकत्र केल्या,
पोत्यात भरल्या आणि माहेरी धाडून दिल्या. चिंगीचा स्वभाव असा कमी आला. तिने आईला फोन करून कळवले देखील, “सासुबाईंनी स्वतः या वस्तू परत पाठवल्या आहेत. त्या विनासंकोच ठेऊन घे.”
यावर सासुबाई काही बोलू शकल्या नाहीत. नुसत्याच धुमसत राहिल्या. तेलही गेले आणि तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे. अशी त्यांची अवस्था झाली होती.
समाप्त.
©️®️सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
आली माझ्या घरी ही दिवाळी
दीप उजळले आनंदाचे
साकव