रघु आणि छोटू

©®सौ. प्रतिभा परांजपे.
रघू नी ऑफिसला कुलूप लावून  किल्ली वॉचमेनला दिली व घरी जायला निघाला. तेव्हा अंधारून आलं होतं.
अताशा त्याला रोजच उशीर होत असे.
आषाढाचे दिवस ,आभाळ गच्च भरलं होतं. भयंकर उकाडा होत होता. केव्हाही पाऊस कोसळेल असं वाटत होतं.
सायकल ला टांग मारून रघु घरी निघाला, त्याला घरी जायची घाई ही नव्हती. आहे कोण वाट बघायला?
घरी माय होती तेव्हा म्हणायची, “अरं माझ्या लेकरा भूक लागली असेल. ये पटकन” आणि गरमागरम भाकरी बनवून खाऊ घालायची. पण्- दोन वर्ष झाली माय ला जाऊन.

त्याच्या लग्नाची फार काळजी होती  माय ला, तिने बरीच खटपट केली. पण रघु सारख्या पोलिओने अपंग झालेल्या कमी शिकलेल्या प्युन मुलाला सहजासजी बायको नाही मिळणार  म्हणून भावाच्या गावी जाऊन मुलगी शोधली.
लग्न ठरलंही पण् ऐनवेळी मुलगी पळून गेली. तेव्हापासून रघु व त्याची म्हातारी दोघंच. 
शेजारीपाजारी यांच्याच सारखे हातावर पोट असलेली माणसं.
माय गेली नी रघू एकटा पडला. आता  रघु हाताने जेवण रांधू लागला.
सकाळी लवकर उठून भाजी भाकरी बनवून खाऊ लागला.

एक दिवस समोरच्या झोपड्यात राजाराम च्या बायकोची दूरची बहीण चंद्री आली. तिला पाहून रघु चा जीव हरकला. चंद्रावाणी गोल चेहरा, हनुवटी वर गोंदण ,
चंद्री रघु  शी हसुबोलू  लागली.
रघु घ्या मनात ही समथिंग  वाजू लागले.
आता कामावरून येताना तो तिच्यासाठी कधी भजी, कधी वडापाव आणू लागला, तिच्या संग हसू बोलू लागला .
रात्री झोपताना तिच्या संगतीचे स्वप्न पाहू लागला.
पण एक दिवस हे स्वप्नही भंग झाले  राजारामच्या बायकोने त्याला चंद्री च्या लग्नाची बातमी दिली.

‘भाऊजी चंद्री च भाग्य उजळलं बघ. तालुक्याच्या गावी सुधाकर माळी च्या लेका संग लगीन ठरलं, लई शिकलेला शहरात राहणारा आहे मुलगा.”
रघुच्या स्वप्नाचा बंगला क्षणात कोसळला.
तेव्हापासून एकटा जीव सदाशिव , रघु एकटाच राहत आहे.
अचानक अंगावर पावसाचे थेंब पडू लागले तेव्हा  विचारांच्या तंद्रीतून रघू जागा झाला. पावसाबरोबरच सुसाट वारे वाहू लागले. आता  सायकल रेटण कठीण होऊ लागले. तशी एका झाडाखाली सायकल टेकवून रघू उभा राहिला.

अचानक वीज चमकली दूर कुठेतरी कोसळली त्या उजेडात त्याला पायापाशी एक कुत्र्याचे पिल्लू उभ दिसलं. तेही पावसाने ओले चिंब होऊन कुरकुडत होतं.
थोड्यावेळाने पावसाचा जोर कमी झाला तशी रघु निघाला, ते पिल्लूही त्याच्याबरोबर येऊ लागले. ते अगदी घरापर्यंत सोबत होते कोणीतरी सोबतीला आहे पाहून रघु ला बरे वाटले.
घराचे कुलूप उघडून त्याने आत जाऊन दिवा लावला व डब्यातून एक बिस्कीट आणून कुत्र्याला दिले. ते खाऊन ते खोलीत येऊन गप्प गार पडून राहिलं.
सकाळीच केलेल्या भाकरीवर तिखट ठेचा घालून रघुणे जेवण केले व उरलेला भाकरीचा तुकडा कुत्र्याला दिला व झोपला. बाहेर अजून पाऊस कोसळत होता .

सकाळी उठून दार उघडून रघू तोंड धुवायला बाहेर आला तशी ते कुत्र्याचे पिल्लू ही बाहेर पडलं. आपलं सर्व उरकून परत रघु कडे पाहून शेपटी हलवू लागलं, रघुच्या पायाला आपला अंग घासू लागलं त्याचं ते मूक प्रेम पाहून रघुला भरून आलं.
त्याने त्याला उचलून घेतलं व घरात आणल आता रघुला प्रश्न पडला भूक लागली असणार याला, त्याने दोन-तीन डबे हुडकले पण देण्याला काहीच नव्हते. तो बाहेर निघाला वस्तीच्या बाहेर एका दुकानातून बिस्किट व थोडे दूध घेऊन आला त्यातूनच चहा करून घेतला व उरलेले दूध व बिस्कीट छोटूला दिले.
आता प्रश्न होता  रघु समोर कामावर जाताना ह्याला कुठे सोडणार?
त्याने एक दोरी घेऊन कुत्र्याच्या गळ्यात बांधली व बाहेर सोडले. कामावर जाताना शेजारच्या बच्चू ला सांगून गेला याला कुठे जाऊ नको देऊ, माझा छोटू हाय तो. 

संध्याकाळी कामावरून घरी आला तो छोटू कुठे दिसत नव्हता, रघु न दार उघडलं फ्रेश होऊन तो स्वयंपाकाला लागला तेवढ्यात कुठून तरी धावत छोटू हजर.असेच दिवस जाऊ लागले पाहता पाहता छोटू अंगाने भरला, मोठा दिसायला लागला.  घराची राखण करू लागला,रघू त्यांच्या साठी मटन आणू लागला.
एक दिवस रघुला यायला उशीर झाला इकडे तिकडे पाहतआवाज देऊ लागला पण छोटूचा काहीच पत्ता नव्हता.
बरेच उशिरा आला तो -लंगडतच . पायाला जबरा मार लागलेला दिसत होता. रघु  चा  जीव कळवळला, त्याने गरम पाण्याने स्वच्छ करून पायाला पट्टी बांधली.
चार दिवस झाले जखम भरली पण पाय काही सुधारला नाही आता छोटू ही लंगडत लंगडत धावू लागला. रघुला आपल्या भाग्यावर हसू आले , हाय रे नशिबा जसा मी तसाच हा माझा , तुलाही भोग भोगावे लागणार दिसतय.

दिवस येत होते जात होते छोटू आता त्या पायाने लंगडत का होईना व्यवस्थित धावू लागला. वस्तीतल्या कुत्र्यांचा लीडर होता.
अधून मधून आजूबाजूच्या वस्तीतल्या कुत्र्यांबरोबर भांडू लागला‌.
ती कुत्री व तो का भांडत असे हे काही रघुला कळत नसे.
एक दिवस सुट्टी म्हणून रघू छोटूला बरोबर घेत फिरायला जायला निघाला .वाटेत बर्याच कुत्र्यांशी त्याचे भांडण चालू होते, बरेच ठिकाणी त्याने तंगडी वर करून निशाणी सोडली.
थोडे पुढे गेल्यावर एका कचरा कुंडी पाशी एक कुत्री बसलेली दिसली तशी छोटू तिच्याकडे धावला ती पण प्रेमाने त्याच्याजवळ येऊ लागली. दोघ प्रेमात येऊ लागली. क्षणभरात हे काय होतंय याचा उलगडा रघुला झाला. पुढे काही घडायच्या आधीच रघू ने हातातली दोरी खेचून छोटूला दूर केल व  जवळजवळ ओढत ओढत घरी आणलं. 

छोटू खूप जोरात जोरात भुंकत  होता,  तो रघू वर चिडलेला दिसत होता. त्याने दिलेलीदूध पोळी ही खाल्ली नाही.
सकाळी पाहिलेल ते दृश्य रघु च्या डोळ्यासमोरून जात नव्हते त्याचा छोटू जवान झाला त्याला प्रेयसी भेटली.
आता छोटू चा स्वभाव खूपच हायपर होत चालला होता. रघुला त्याचे ते प्रेम प्रकरण सहन होत नव्हते.
कां कोण जाणे जे ह्याला मिळतय ते आपल्याला का नाही मिळाले या भावनेने रघु ची चिडचिड वाढत चालली होती.
तो छोटूला घरात बांधून जाऊ लागला .छोटू आता आक्रमक होऊ लागला एक दिवस तो दोरी तोडून बाहेर पळाला. पुढे दोन चार दिवस त्याचा पत्ता नव्हता .
रघुला सुरुवातीला राग आला व नंतर काळजी.आता त्याला करमेनासे झाले.

चार दिवसांनी छोटू परत आला तो बराच शांत झाला होता . रघु चाही राग तोपर्यंत कमी झाला होता. त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप वाटू लागला.
काही झालं तरी छोटू हा एक जानवर आहे. माणसांसारखे समाजात राहताना आपल्या भावनांना काबूत ठेवण्याची त्याला गरज नाही.
कुठेतरी रघुला छोटू चा हेवा वाटू लागला. आपला सर्व जन्म भावना कोंडून ठेवण्यातच गेला. त्याची शिक्षा आपण ह्याला का देतो, हे लक्षात आल्यावर त्याने छोटूला प्रेमाने थोपटलं व दार उघडून बाहेर जाऊ दिलं.
एका थंडी च्या दिवशी रघुने दूध पोळी घालून छोटूला दिली. पोळीचा तुकडा तोंडात धरून छोटू बाहेर गेला. रघू ही उत्सुकते पोटी बाहेर आला. एक छोटसं पिल्लू बाहेर बसलेल होतंं.  ते पोळीचा तुकडा कुरतडत होतं.

रघूने पाहिले ते पिल्लू अगदी छोटू च जणू बालरूपच वाटलं.
“अरे वाsबाप झाला माझा छोटू ,मंजे म्या आजा झालो कि”  असे लक्षात येतात रघु चा चेहरा आनंदाने फुलला.
त्याने राजाराम ला आवाज देत बातमी दिली.
राजाराम , वहिनी व बच्चू बाहेर आले व कौतुकाने हसू लागले.
वहिनी म्हणाल्या, “भाऊजी, आता तुमची प्रजापार्टी वाढतिय”
तशी रघू लाजला व काहिही न कळून छोटू शेपटी हलवायला लागला.
समाप्त.
©®सौ. प्रतिभा परांजपे.
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!