लग्न होवून सासरी गेलेली मधुरा पहिल्यांदाच रहायला म्हणून माहेरी आली. अनेक दिवसांनंतर, आजी आणि आईसोबत गप्पा करायला तिला निवांत वेळ मिळाला होता. तीचं नविन घर, म्हणजेच सासर कसं मनमोकळं आहे सांगताना तिच्या उत्साहाला उधाण आलं होतं.
माझ्या घरी प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य आहे. सगळ्यांनाच एकमेकांचा आदर आहे, सगळेच आपापल्या मनाप्रमाणे वागतात, हे सांगताना तिच्या चेह-यावरची चमक आजीच्या पारखी नजरेतून काही सुटली नाही.
“जावईबापू कसे आहेत गं?” आजीने नातजावयाची चौकशी केली. नातजावयाची तब्बेत हा एकच मुद्दा नव्हता, तर त्यांचा स्वभाव, व्यवहार ह्यादृष्टीने विचारण्याच्या प्रयत्नात होती आजी.
“पंकज, स्वभावाने छान आहेत आजी” मधुराने सुटसुटीत उत्तर दिलं.
“काय बाई पोरी तुम्ही!”, नव-याला नावाने हाका मारता, आदर करावा नव-याचा…असं एकेरी हाक नाही मारु गं, चांगल नाही दिसत ते.”
आजीच्या बोलण्यावर मधुरा हजरजवाबीपणाने उत्तर देत म्हणाली, “आज्जी आदर मनातून करावा, नाव घेतल्याने तो कमी थोडाच होतो.”
“नशिब हो तूझे, एवढे छान घर मिळाले ते. बर झालं बाई, नाहीतर तुझी पंचाईतच झाली असती. पुढारलेल्या विचारांची शिकली सवरलेली तू, कसं घर मिळतंय, किती काळजी वाटायची म्हणून सांगू”आजीने तिच्याबद्दलची चिंता क्षणात बोलून दाखवली.
जीन्स चालते का’? विचारता क्षणी मधुराने थ्री-फोर्थ, स्लीव्हलेस, गाऊन, ड्रेस सगळं सगळं चालतं! म्हणत आजीच्या हातावर टाळी देत उडीच मारली.
“कामाचं काय?” आजीने प्रश्न विचारताच, मधुरा उत्तरली, “त्याबाबतीत आहेत सासूबाई थोड्या आग्रही, म्हणतात स्वयंपाक, घरातल्या गृहिणीनेच करायचा. सुरवातीला महिनाभर त्यांनीच सांभाळलं स्वयंपाकपाण्याचं, नंतर म्हणाल्या, दोघी मिळून सांभाळून घेवू. पुढाकार तुलाच घ्यावा लागेल. कोणती भाजी कधी, सुट्टीच्या दिवशीचा नाश्ता तो काय करायचा तो तूच ठरवायचा. आणि म्हणाल्या, आधिच सांगितलं तर, पूर्वतयारी करुन ठेवत जाईल.. वेळेवर मदत ही करेल पण.. आत्ता तु ह्या घरची गृहलक्ष्मी आहेस तेव्हा..काही जबाबदा-या ह्या घ्याव्यात लागतील तुला. तसाही आवडतो ना आजी आपल्याला स्वयंपाक बनवायला… तूझ्या आणि आईच्या हाताखाली expert झालीय बघ” मधुरा बोलत होती.
“बाकी कामाला, म्हणज झाडूपोछा, भांड्याला बाई आहे, आई म्हणतात, सगळी काम घरी केली की स्वत:साठी वेळच उरत नाही.” सासूबाईंसाठी ‘आई’ उच्चारताना मधुराच्या तोंडी जराही परकेपणा नव्हता. आजीला छान वाटलं.
“नशीब काढलसं पोरी, चांगली मिळाली हो सासू तुला.” आजीने लाडक्या नातीच्या डोक्यावरुन फिरवून, दोन्ही हाताने मधुराची द्रुष्ट काठली. आपली नात तिच्या नविन संसारात सुखी असल्याची आजीला खात्री पटली होती.
इकडच्या तिकडच्या खूप गप्पा रंगल्या आज्जी नातीमध्ये. मधुरा सासू, सासरे, दिर आणि नणंदेबद्दलही भरभरुन बोलत होती. असं ही सासरं असू शकते आजीला हेवाच वाटला.
“नविन जमाना तुमचा, नशिबवाना आहात… आम्ही पण जन्माला यायला हवं होतं, तुमच्या जमान्यात… आजी बोलून शांत झाली. डोक्यावरुन पदरं सावरतं बोलली, “आमच्या जमान्यात नऊवार आणि सासूबाईंच्या तो-यात डोक्यावरचा पदर सांभाळता सांभाळता आयुष्य गेलं. तुझे आजोबा, जून्या विचारांचे मग तर काय सांगूच नकोस. हातात बांगड्या, मंगळसूत्र, या दागिन्यांनी नटलेली सुन म्हणजे घरातली बाहुली बनून रहावी एवढंच सासरच्यांना वाटायचं. कुठे जाण्यायेण्याचं स्वातंत्र्य नाहीच, की कुठली आवड नाही की निवड नाही. नव-यासोबत जायचं आणि त्याच्यासोबतच यायचं. साधं माहेरपणाला चार दिवस जायचं म्हटलं तरी… तीन पिढ्यांची परवानगी लागायची.
चूलमूल सांभाळण्यात आणि रांधावाढा उष्टी काढण्यातच गेलं हो आमचं आयुष्य. आयुष्याच्या या संध्याकाळी”
काहीतरी राहून गेलयं याची हुरहूर तर आजीला वाटत नसेल ना मधुराला क्षणात वाटलं.
“बोलेतो आज भी जीन्स पेहनकर घुमने जा सकती हो आजी” म्हणत मधुराने आजीची थोडी उडवलीच. “चल हट पोरी, काहीतरीच… आता कुठे जायचयं मिरवायला, तो जिन्स घालून” बोलताना आजी जरा लाजलीच.
“सुखी रहा पोरी, सुखाचा संसार कर, दोनाचे चार झाले आता लवकर पाळणा हलू दे हो” म्हणत, आजीने डोक्यावरुन आशिर्वादाचा हात फिरवला..
“चल, काहीतरी काहीतरी खायला घेवून येते तुझ्यासाठी, काय बनवू?” आजीने विचारल्यावर, मधुराच्या आवडीचचं काहीतरी बनवायच्या विचारात, आजी स्वयंपाक घरात निघून गेली.
आजीच्या मांडीत लोटपोट होवून, सासरच्या कौतुकाची बरसात करायला आता स्वारी कोप-यात बसलेल्याआईकडे वळली.
दोन पाय पोटाशी जवळ घेवून आई, बसल्या जागी पुन्हा सावरुन बसली. “हं!!हं!! तिथेच थांब.”
“आई आमच्याकडे हे सगळं चालतं. पूजेला चार दिवस सुट्टी बाकी सगळं ओके. कुठलंच बंधन आडवं येत नाही घरात वावरताना. सोवळं-ओवळं नाही की सणासुदीचे फार कडक नियमही नाहीत. सासूबाई म्हणतात झेपेल तेवढंच आणि कुठल्याही गोष्टीचं ओझं वाटणार नाही तेच करावं” अगदी उत्साहात मधुरा आईशी बोलत होती.
“बरं झालं बाई!!आमचं कुठचं एवढं नशीब” मधुराची आई सारंगी बोलली. आईच्या चेह-यावर लेक सुखी असल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. दूधात साखर विरघळते तसं विरघळून जाव हो पोरीने संसारात, म्हणत आई जरा सावरुनच बसली.
नशिबावर सगळं ओझं टाकून दोघीही मोकळ्या झाल्या होत्या. मधुरासाठी खूप आनंदी झाल्या मात्र स्वत:च्या बाबतीत बघितलं तर दोघीही उदासीन वाटल्या.
“आई परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासूनच करावी. प्रथा परंपरा पाळाव्यात, पण आपल्याला त्रास होत असेल अशा प्रथा, परंपरा, चालीरिती तरी काय कामाच्या?” मधुराने आईला विचार करायला भाग पाडून, अनुत्तरीत केलं.
मधुराच्या बाबतीत आईने अनेकदा खंबीर निर्णय घेतला होता. तिचं बाहेर जावून शिक्षण असो की तिचे कपडेलत्ते आणि राहणीमान असो. नेहमी पुढारलेले निर्णय घेतले होते.
‘माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी रहाणारी आई स्वत: साचेबद्ध आयुष्य का जगली असावी?’ मधुराला प्रश्नच पडला.
आजपर्यंत आईला काय वाटतं, याचा विचारच मधुराने कधी केला नव्हता. मुलगी म्हणून आपल्याला आईसाठी काहीच करता आलं नाही याची खंत मधुराला वाटली. सासरी गेल्याशिवाय सासुरवाशिन कळत नाही म्हणतात तेच खरं. आज मधुराने आईलाच स्वत:मध्ये पाहीलं आणि क्षणभर विचलितच झाली.
“आई, तुलाही छान मनसोक्त होवून बागडावं वाटलं असेलच ना गं कधीतरी, आजीपेक्षा तू तरी काय वेगळं केलसं, चोविस तास साडी, कंटाळा नाही आला तुला कधी? आता साडी नेसायचा कंटाळा आला असेल ना, तर छान सलवार, गाऊन, घालायला सुरुवात कर. गळक्या केसांची शेपटी झालेली लांब वेणी कापून, छान एखादी शोभेल अशी हेअर स्टाईल कर. दिवसभर काम करुन थकत असशील, तर घरकामाला बाई लाव, सांगून टाक माझ्याच्याने आता दगदग होत नाही. घर सांभाळताना भीसी, योगा क्लास लावून स्वत:ला वेगळ्या दुनियेची ओळख करुन घे. सर्वाच्या आवडीनिवडी जपताना कधी स्वत:च्याच आवडीचा विचार कर. तुला आवडतो त्याच पदार्थाच्या सुवासाने तुझे किचन दरवळू दे.
पांढ-या पिकलेल्या केसांना कलर, सुरकुत्या आणि काळ्या डागांनी वेढलेल्या चेह-यावर अधूनमधून फेशियल कर.” घरच्यांसाठी जगणाऱ्या आईला काही क्षण स्वत:साठी काठून स्वत:साठी जगायला सांगत होती. मधुरा खूप उत्साहात बोलत होती.
कितीतरी दिवसांनी मधुराने आईला निरखून पाहीलं. एकाच वयाच्या असलेल्या तिच्या सासूबाई आणि आई मधला बदल तीने हळूवार टिपला.
थोडंसं स्वत:कडे लक्ष दिलं की सगळं सोप्प होतं हे मधुरा सासुबाईंकडूनच शिकली होती. तेच ती आईला समजावून सांगत होती “माणूस पहिले विचारांनी म्हातारा होतो आणि विचारांनी तरुण असेलेला माणूस कधीच म्हातारा होत नाही”. मधुराने आईच ब्रेन वॉशचं केलं. दुस-यांच्या मताला जपताना तुलाही तुझ्या मतांचा आदर करायला हवा हे सांगताना ती जरा भावूकच झाली.
सारंगीला आवडायचं सगळं, लग्नाआधी ड्रेसही घालायची पण लग्नानंतर साडीतच वावरली. सासूबाईप्रमाणे संसाराला नेटकेपणाने सांभाळण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. मोठी सून म्हणून चोख जबाबदारी बजावली. लग्न होवून सासरी आली आणि ‘आदर्श सुनेचं कवच’ स्वत:भोवती तयार करुन घेतलं. सारंगी सर्वांची लाडकी, पण उत्तम आदर्श मोठी सून, पत्नी, आई, वहिनी, काकू, मामी, होताना ती मात्र स्वत:लाच विसरली.
सर्वाच्या मनात घर करुन रहाण्याचा खटाटोप करताना माझं माझ्यापद्धतीने जगायचं राहूनच गेलं, हे प्रकर्षाने सारंगीला जाणवलं. लोक काय म्हणतील? या संभ्रमात अडकलेली सारंगी स्वत:ला काय पटतं, काय आवडतं हे विसरूनच गेली होती.
विचारांनी पुढारलेली होतीच म्हणून मधुराला तिच्या इच्छेप्रमाणे सगळ्या सवलती देण्याचा तीने प्रयत्नही केला. अनेकदा घराच्यांशी लेकीच्या सुखासाठी भांडलीही होती. सोशिक नव्हतीच ती. फक्त स्वत:पुरत मर्यादित कवच तयार करुन जगत राहीली होती अनेक वर्षांपासून.
बोलताना दोघीही सासूरवाशीनीच, जणू एकमेकींजवळ आपलं मन मोकळं करत होत्या. दोन हात लांब बसलेली मधुरा आईच्या कुशीत कधी विसावली कळलंच नाही.
जीवन जगण्याचा, आनंदी राहण्याचा एक सोप्पा, मार्ग मधुराने सारंगीला, एक मुलगी म्हणून नाही तर, एक स्त्री म्हणून सांगितला. जणू स्वच्छंदपणे जगण्याचा ‘कानमंत्रच’ तिने दिला होता.
लाडक्या, नातीसाठी तिची फेवरेट शेवयाची गोड खीर घेवून आजी बाहेर आली, दोघींनाही चमच्याने शेवयाची खीर भरवत प्रेमाने जवळ घेत आजी म्हणाली, “बदलाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकताना अडचणी येणारच, तेव्हा खीर खा आणि सज्ज व्हा.”
एरवी पाळीच्या दिवसांमध्ये, दुरुनचं सारं खाणं पिणं पुरवणारी, सणासुदीला पाळी आल्यावर उगाच सुनेची चूक असल्यासारखी तिलाच बोलणारी, चिडचिड करणा-या सासूने सारंगीच्या हाती शेवयाची खीर दिली. सारंगीला आश्चर्य वाटलं, शेवयाची खीर घेताना, ती सावरुन मागे सरकली होती.
“घे गं” म्हणून सासूबाईंनी डोळ्यांनीच इशारा केला होता.
“परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासूनच करायला हवी. लोक काय म्हणतील? या गुंत्यात शिरलं की गुंता अधिकच वाढतो तेव्हा लोकांच्या विचारांचा गुंता आपल्या भोवती होवूच द्यायचा नाही. आपणच आपल्या मतांना जपायचं.” आजीने दोघींच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला, आशिर्वाद दिला.
नविन आलेल्या पोरीला ‘सून’ नावाचं जबाबदारीने वागण्याच लेबल लावताना ती कुणाची तरी लाडकी लेक आहे हे आपण विसरुनच जातो, याचं आजीला खरचं वाईट वाटलं.
ज्या पद्धतीचं जीवन आपण आपल्या घरातल्या लेकींना देतो तेच आयुष्य, तेच अधिकार, आपण आपल्या सूनांना दिले असते तर आज प्रत्येक मुलीने आपल्या सासरचे गोडवे माहेरी गायले असते.
सासरच्या घराला माझं घरं म्हणत गोंजारलं असतं, प्रत्येक घरातली सुन माझ्या मधुरा सारखी आनंदी दिसली असती.” बोलताना आजीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या मथुरा आणि सारंगीच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू बाहेर पडले.
मी कोणाला आवडते की नाही, लोक काय म्हणतील याचा विचार करत बसण्यापेक्षा, मला काय आवडते हेच माझ्यासाठी खूप आहे हा मंत्र जोपासला तर प्रत्येक स्त्री आनंदी दिसेल.
जुन्या प्रथा परंपरांचा आदर करताना नविन बदलांना आपलसं करण्याची प्रेरणा देणारी एखादी व्यक्ती आयुष्यात असायलाच हवी. बदलांना आपलसं करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली की नविन बदलासह ती स्वत:चीच फेवरेटच होवून जाते.
म्हणूनच, स्वच्छंदी होवून जगताना नविन विचारांची कास धरताना, कुणी काय म्हणेल? यानी मला काहीही फरक पडत नाही म्हणायला आणि आनंदात जगायला प्रत्येक स्त्रीने शिकायला पाहिजे. मीच माझी फेवरेट..या दिशेने उचललेले पहिले पाऊल महत्वाचे.
आज, ख-या अर्थाने, तीन पिढ्या विचारांनी समृद्ध झाल्या होत्या. समाधानाच्या तेजात तिन पिढ्या उजळून निघाल्या होत्या.
*********
समाप्त
©शुभांगी मस्के
सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथा एकदम आवडली. बाकी बहुतेक कथांमध्ये सासर कस वाईट. सासु, नणंदा कशा वाईट वागणूक देतात सुनांना हेच असत. आणि सुना कशा गरीब बिचाऱ्या. कुठल्या काळातली ही माणसं असतात कोण जाणे. पण ह्या कथेत नविन लग्न झालेली मुलगी सासरचे गोडवेही गाते. आणि त्याप्रमाणे आई, आजी बदलण्यासाठी उद्युक्त ही करते. आणि त्याही तिच्या बोलण्याचा विचार करतात. छान.
Thank you so much mam