वाव

© धनश्री दाबके
रोजच्या सारखा साडे पाचचा गजर झाला. वैभवीने दचकून उठत तो स्नूझ केला. पाच मिनिटांनी तो परत वाजला. मग मात्र वैभवी उठली.
आज तिला खूप फ्रेश वाटत होतं कारण झोप पूर्ण झाली होती. कितीतरी दिवसांनी आज गजर ऐकू आला होता. नाहीतर गेले काही दिवस गजर व्हायच्या आधीच तिला जाग यायची आणि कितीही प्रयत्न केला तरी परत झोप लागायचीच नाही. मग ती जबरदस्तीने लोळत पडायची आणि थोड्यावेळाने उठून कामाला लागायची.

उठून तोंड धुवून तिने चहा ठेवला. आज साधा चहा नको तर आपल्या आवडीचा आलं, वेलची घालून मसाला चहा करु असा विचार मनात येताच तिला स्वत:चंच आश्चर्य वाटलं. हे काय चालवलं होतं आपण इतके दिवस? आज मन ताळ्यावर आलंय तर मसाला चहा आठवला नाहीतर त्यालाही विसरलेच होते. अशी काही अवस्था करून घेतली होती स्वतःची की जणू काही संपलंच होतं सगळं.
गेले कित्येक दिवस कशात लक्षच नव्हतं. सतत एकच ध्यास.. मी आणि माझं नवीन ऑफिस.. एवढंच मनात असायचं… हो माझंच.. एकटीचं ऑफिस .. कारण नेहमी प्रत्येक बाबतीत सपोर्ट करणारा, पडल्यावर सावरणारा, स्वतःकडे दुर्लक्ष केल्यावर ओरडणारा, बिझी शेड्युल मधेही माझे मूड जपणारा माझा विनयही ह्यावेळी माझ्या बरोबर नव्हता.

तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस.. तू नेहमी आऊट ऑफ द बॉक्स विचार करतेस आणि म्हणूनच मला अजूनच आवडतेस असं म्हणून माझ्या प्रेमात पडलेला विनय, माझ्या प्रत्येक निर्णयात पाठीशी ठामपणे उभा राहाणारा विनय ह्यावेळी मात्र काठावर उभा राहून माझी घुसमट बघत होता. सगळं त्याच्या सामोर तर घडत होतं. तरीही.
तसंही माझं कॉलेजमधून बाहेर पडले तेव्हाच ठरलं होतं की पहिली चार पाच वर्षच काय ती नोकरी करायची. तीही चांगलं नाव कमवलेल्या मोठ्ठ्या कंपनीत..सगळं शिकून घ्यायचं. दोन चार यशस्वी प्रोजेक्टच्या अनुभवाचं गाठोडं पाठीवर बांधायचं आणि मग नोकरीला रामराम ठोकून स्वतःची स्टार्ट अप सुरु करायची.

कॉलेजपासूनच माझा बेस्ट फ्रेंड असल्याने विनयला माझी ही महत्वाकांक्षा माहिती होती.. खरंतर त्यानेच माझ्या हुशारीला प्रोत्साहन देत देत entrepreneur होण्याच्या स्वप्नाचं बीज मनात रुजवलं होतं. मला वेगवेगळे कोर्सेस करायला लावले होते.. तू हुशार आहेस.. फक्त बॅचलर डीग्रीवर थांबू नकोस.. मास्टर्सला ॲडमिशन घे… स्पेशलायझेशन पूर्ण कर.. त्याशिवाय personality grooming कडेही लक्ष दे.. तुला खूप पुढे जायचंय.. एक यशस्वी उद्योजिका व्हायचंय.. असं म्हणत म्हणत त्याने मला या आजसाठी घडवलं होतं.

बुद्धीमत्ता, चिकाटी, परिश्रम हे यशाच्या रेसिपीचे घटक जरी माझ्याकडे असले तरी चाकोरी सोडून धडाडीने बाहेर पडायला जो एक भक्कम आधार लागतो त्यासाठी मी विनयकडे पाहात होते. पण ज्याने मला इथपर्यंत आणलं त्या विनयनेच वेळ आल्यावर माघार घेतली.
चार पाचच वर्ष करायची असं म्हणत म्हणत चक्क दहा वर्ष नोकरी झाली.. त्यात पार्ट टाईम मास्टर्स, लग्न, घर, संसार, रितीभाती, सणवार, मातृत्व सगळ्या सगळ्या पायऱ्या चढत गेले.. कंपन्या बदलल्या, प्रमोशन्स झाली, recognition ही मिळालं आणि डावललीही गेले.
माझ्या नवनवीन कल्पनांना वावच मिळाला नाही.. तू काल आलीयेस तेव्हा मला शिकवू नकोस असंच म्हणणारे सिनिअर्स जिथे तिथे मिळाले ज्यांच्यामुळे प्रचंड घुसमट होत राहिली.. पण कौटूंबिक जबाबदाऱ्या आणि माझी महत्वाकांक्षा ह्या दोन्हीमधे कायम जबाबदाऱ्यांचं पारडेच जड ठरत राहिले.

सासूबाईंना तर पहिल्यापासूनच माझा नोकरी सोडून स्वतःची स्टार्ट अप सुरू करायचा प्लॅन म्हणजे माझं दुखणारं सुखच वाटायचं. एवढी चांगली नोकरी, इतका पगार हे सगळं हातचं सोडून पळत्याच्या मागे उगीच कशाला लागायचं असं त्या म्हणायच्याच.. पण निदान त्या क्लिअर तरी होत्या..
सासरेबुवा.. आधी माझ्या प्रत्येक हो ला हो करायचे.. पण जेव्हा प्रत्यक्ष नोकरी सोडायची वेळ आली तेव्हा अचानक सासूबाईंच्या पक्षात जाऊन बसले… आणि जो कायम मला माझी नोकरी आहे ना तू कर तुझ्या मनासारखं असं म्हणत आला तो विनयही मागे हटला.

तो खरोखरीच कोरोनामुळे बदललेल्या मार्केट situations ला व मंदावलेल्या बिझनेसला घाबरला की त्यालाही हा आता दहा वर्षांचा कंफर्ट झोन सोडवेनासा झाला ते देवालाच ठाऊक.. पण मला आता माझी ही नोकरीतली घुसमट थांबवायचीच होती..मला जर माझ्या स्वप्नांना सत्यात आणायचं असेल तर ती हीच वेळ आहे..आत्ता नाही तर परत कधीच नाही अशी अंतर्मनाने ग्वाही दिली आणि मी ठरवलं आता बास.
मग आधी जाऊन राजीनामा दिला.. एक मोठ्ठा आणि कठीण निर्णय एकटीने घेण्याचा गड सर केला.. विनयने समजावून पाहिले आणि मी ऐकत नाही म्हंटल्यावर शांतपणे तो माझ्या निर्णयातून बाजूला झाला.

मी त्याला दुखावलं म्हणत माझ्या त्याच्याकडून असलेल्या सगळ्या अपेक्षांतून स्वतःला मोकळं करून घेतलं त्याने.. पण खरंतर दुखावली मी गेले होते… मग मीही ठरवलं.. आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करायचाच.. विनय सोबत असला तरी आणि नसला तरीही.. आणि तेव्हापासून सुरु झाला माझ्या एकटीचा प्रवास.. ध्यास लागला होता नुसता.. वरवर पाहाता सगळं नेहमीप्रमाणेच सुरू होतं पण मनातली वादळं फक्त मलाच माहित होती.. झोपेनेही साथ सोडली होती.
अंगात वारं शिरल्यासारखी मी निघाले होते… माझ्या ideas घेऊन investors ना भेटणे, त्यांना convince करणे, funding जमवणे, त्याचवेळी माझ्या टीमसाठी नवीन यंग टॅलेंट शोधणे, ऑफिसची जागा फायनल करणे एक ना अनेक गोष्टी डोक्यात सुरु असायच्या.. जमा आणि खर्चाचे आकडे तर दिवसरात्र डोळ्यांसमोर नाच घालायचे.

पण हार न मानता मी पाठपुरावा करत राहिले… घरातल्या विरोधाची झळ आणि बाहेरच्या परिस्थितीचे चटके दोन्ही सोसत प्रयत्न करत राहिले आणि फायनली माझी आयडीया क्लिक झाली अन् funds मिळाले.
गेल्याच आठवड्यात ऑफिसच्या जागेचा ताबा मिळाला..ऑर्डर केलेलं फर्निचरही काल आलं.. आपल्या प्लॅनची गाडी रूळावर येतीये ह्याचा आनंदही होताच आणि त्याचबरोबर मनावर विनयच्या सोबत नसण्याचा प्रचंड ताण होता.
काल मावशी आल्या होत्या मदतीला पण तरी दिवसभर सगळं सांभाळून इतकी थकली होते की त्या सगळ्या सामानाच्या मधेच मी बसकण मारली. थकलेल्या शरीराने जरा विसावले तर डोळाच लागला.

थोड्यावेळाने अचानक कुणीतरी हाका मारतंय अशी जाणीव झाली अन् जागी झाले तर काय आश्चर्य ! हातात वाफाळत्या चहाचा ट्रे घेऊन विनय बाजूला बसला होता.
मला आधी खरंच वाटेना.. तर माझ्याकडे हसून बघत म्हणाला, “उठा मॅडम, चहा घ्या गरम गरम.. आज माझी आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग करणारी हुश्शार बायको चक्क सगळ्या बॉक्सेस मधे हरवून गेलीये.. राणी माझ्यावर रागावू नकोस प्लीज.. मला आपल्या आयुष्यात येऊ घातलेल्या एवढ्या मोठ्या बदलाचं टेंशन आलं होतं ग.. आमच्याकडे इतक्या लोकांना कमी करतायत की मी घाबरलो होतो.. तुझी निर्णय घेण्याआधीची घुसमट आणि त्यानंतर एकटी पडल्याने होणारी ओढाताणही मला दिसत होती, कळत होती.. पण तरीही मी अलिप्त राहिलो.

कदाचित भविष्याच्या काळजीने निर्णयाची जबाबदारी घ्यायला घाबरलो. माझं चुकलंच.. आज बाबांनी सुनावल्यावर का होईना मला माझी चूक समजली आणि तुला साथ देण्याचे माझे आद्य कर्तव्य आठवले.. तुला दिलेली सगळी वचनं आठवली. तुझ्यातल्या असामान्य टॅलेंटवर माझ्या ह्या अशा वागण्यामुळे अन्याय होईल की काय अशीही भीती वाटली आणि मी धावत इथे आलो.. खरंच तू कामाच्या ताणापेक्षा माझ्यामुळे जास्त थकली आहेस.. आता हा गरम गरम चहा घे आणि मला माफ कर प्लीज..”

ज्याच्या आधारावर माझ्या स्वप्नांची वेल उमलू पाहात होती त्या माझ्या विनयने आज नेहमीप्रमाणेच मला वटवृक्षासारखा आधार दिला होता..अजून काय हवंय? वैभवी विचारांत रमली होती.
आज बऱ्याच दिवसांनी आपल्या आवडत्या मसाला चहाचा आनंद घेत वैभवी पुढचे प्लॅन आखायला निघाली.. परत कधीही मागे वळून न बघण्यासाठी.
*********
समाप्त
© धनश्री दाबके
सदर कथा लेखिका धनश्री दाबके यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!